-गिरीश कुबेर

प्रिय डॉ. फौची..

आपण अमेरिकेतील एक आघाडीचे वैद्यक आहात आणि करोनाकालोत्तर आमचे आयुष्य पुन्हा सुरळीत कधी होईल, यात आपले मत महत्त्वाचे असणार आहे. अमेरिकी नागरिक कोणत्याही गंभीर आजाराचे निदान झाले की ‘सेकंड ओपिनिअन’ घेतो. म्हणजे आणखी एका वैद्यकाचे मत स्वत:च्या आजाराविषयी जाणून घेतो. डॉ. फौची.. सध्याच्या या करोनाकालीन टाळेबंदीविषयीदेखील आता ‘सेकंड ओपिनिअन’ची वेळ आली आहे.

स्टॅनफर्ड विद्यापीठातील न्यूरोरेडिओलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. स्कॉट अ‍ॅटलास सध्या जे काही सुरू आहे त्याविषयी अलीकडे म्हणाले : करोनाग्रस्तांची संख्या किती झपाटय़ाने वाढेल हे सांगणाऱ्या काल्पनिक प्रारूपांपेक्षा प्रत्यक्ष पुराव्यांकडे लक्ष द्यायला हवे. या दाव्यांपेक्षा सत्य महत्त्वाचे आहे.

डॉ. फौची, आम्ही काही केवळ तीन कोटी लघुउद्योजक आणि त्यांचे सहा कोटी कर्मचारी यांच्याच नजरेतून बोलत नाही. अर्थव्यवस्था नक्कीच महत्त्वाची आहे, पण तितकेच महत्त्वाचे आहे करोनाबाधा न झालेल्या अमेरिकनांचे आरोग्य. तुमच्या टाळेबंदीच्या पर्यायामुळे या सगळ्यांच्या आर्थिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत असून त्याची दखलच तुमच्या सरकारी       अहवाल/नोंदी यात नाही.

करोना जीवघेणा ठरू शकतो. पण अन्य आजारही तितकेच जीवघेणे आहेत. तथापि सर्व रुग्णालये केवळ करोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याच्या तुमच्या धोरणामुळे अन्य आजारांचे अनेक रुग्ण अत्यवस्थ आहेत. देशात अशी हजारो रुग्णालये आहेत, ज्यांच्यासमोर करोना रुग्णांचे आव्हान नाही. पण तरी अन्य रुग्णांवर त्यांना उपचार करू दिला जात नाही. न्यू यॉर्कच्या आणीबाणी वैद्यक सेवेचे प्रमुख डॉ. डॅनिअल मर्फी यांनी अन्य सर्व रुग्णसेवा तातडीने सुरू करायला हवी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर करोनाकाळात वैद्यक सेवेअभावी घराघरांत मरण पावलेल्या अनेकांचा समावेश करोनाबळींत करावा, असेही त्यांनी म्हटले आहे, हे आपणास माहीत असेलच.

या सगळ्याचे आर्थिक परिणाम काही फक्त आरोग्य क्षेत्रापुरतेच मर्यादित राहणारे नाहीत. आताच बेरोजगारीचे प्रमाण १४.७ टक्क्यांवर गेले आहे. १९३०च्या महामंदीनंतर बेरोजगारीत इतकी वाढ पहिल्यांदाच झाली. देशभरात हजारो लघुउद्योजक तर देशोधडीलाच लागतील अशी परिस्थिती आहे. जे कसेबसे तगून आहेत त्यांच्यासमोर या करोनानिर्मित आणीबाणीमुळे ग्राहकच नाहीत. ताजा सरकारी अहवाल सांगतो की, साधारण एकतृतीयांश व्यवसाय तर आता पुन्हा उभेच राहू शकणार नाहीत. डॉ. फौची, हे सगळे व्यवसाय जिवंत माणसे करीत होती आणि त्यांचा संबंध जिवंत माणसांशीच होता आणि या सगळ्यामुळे ज्यांचे रोजगार जाणार आहेत तीही जिवंत माणसेच आहेत.

यामुळे परिस्थिती गंभीर आहे. तुम्हाला हे माहीतच असेल की, फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च या एकाच महिन्यात मानसिक आधार देणाऱ्या मदतवाहिन्यांच्या मागणीत तब्बल ३३८ टक्क्यांची वाढ झाली. आपणास हेही माहीत असेल की, आत्महत्यांचे प्रमाण बेरोजगारीच्या दर एका टक्क्यास एक असे वाढत जाते. अवघ्या ३७ वर्षांची जेमी स्टुअर्ट ही अमेरिकनांच्या सध्याच्या मानसिक आरोग्याचे रास्त वर्णन करते. जेमी ही फ्लोरिडातल्या एका हॉटेलातली प्रशिक्षित मद्यसेविका. पण या काळात तिची नोकरी गेली. दोन घास खायची भ्रांत. मग तिने आपल्याच राहत्या घरात एक भाडेकरू घेतला. ‘‘मी इतकी गांजलेली आहे की, मी आताशा मलाच ओळखेनाशी झाली आहे,’’ अशा शब्दांत तिने आपली व्यथा एका बातमीदारासमोर व्यक्त केली.

डॉ. फौची, लाखो अमेरिकी नागरिक आता आपल्या आयुष्याची अशीच ओळख विसरले आहेत. त्यांना आपले हरवलेले जगणे हवे आहे. त्यामागे काही केवळ पैशाची हाव नाही. ती त्यांची जैविक गरज आहे. माणसाचे अस्तित्व म्हणजे त्याचे कर्म, काम. जगण्यासाठी आवश्यक या कामातून त्याच्या अस्तित्वास अर्थ येतो. तुमच्या टाळेबंदीमुळे केवळ त्याचे हे कामच हिरावून नाही घेतले. तर त्याचे सामाजिक जगणे, अस्तित्वच तुम्ही अर्थहीन केलेत. ‘ते बेसबॉलचे सामने, त्याला गर्दी करणारे आपण, आपले आवडते-नावडते संघ. त्यांच्या जयापराजयाचे सामाजिक उत्सव, बारमध्ये मित्रमंडळींसमवेत जाणे, कौटुंबिक सहल-सोहोळे, सप्ताहान्त आनंदमेळे असे अनेक काही आपण गमावून बसलो आहोत,’ असे ‘न्यूजवीक’ साप्ताहिक लिहिते ते खरेच नव्हे काय?

डॉ. फौची, हे जगणे आणि अर्थव्यवस्था यातील द्वैत नाही. या दोनांपैकी एक अशी काही ही निवड नाही. तर श्वास सुरू राहणे आणि जगणे यांतील हा फरक आहे. तुमचा तो करोनालेख सपाट करण्यासाठी तुम्ही टाळेबंदीचा मार्ग निवडलात. त्या वेळी करोनावर उपचार सापडेपर्यंत वा करोनाग्रस्त मृतांची संख्या शून्यावर येईपर्यंत टाळेबंदी सुरू राहणे अपेक्षित नव्हते. पण तसे झाले आहे. रुग्णांचे विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी आपण सर्वच समाजाचाच कोंडवाडा केला. मोजक्या रुग्णांना वेगळे करण्याऐवजी आपण मोजक्यांसाठी सर्वाना एकटे पाडले.

डॉ. फौची, तुमच्या मनातील देशहितभावनेबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. तथापि तुमच्या या ‘मर्यादित उपाययोजना’ दृष्टिकोनामुळे त्या देशहितालाच बाधा पोहोचते. डॉ. फौची.. इट्स टाइम वुई टेक अ सेकंड ओपिनिअन!!

आपले विदित

अमेरिकेतील रोजगार इच्छुक

(डॉ. अँथनी फौची हे अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्शस डिसीजेस’ या संस्थेचे प्रमुख आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार. त्यांना उद्देशून ‘जॉब क्रिएटर्स नेटवर्क’ या संस्थेने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये अलीकडेच प्रसृत केलेल्या पत्राचा स्वैर अनुवाद).

@girishkuber