दयानंद लिपारे

सुगंधी वनस्पतींच्या उत्पादनाकडे सध्या मोठय़ा प्रमाणात शेतकरी वळत आहेत. मात्र ही शेती करताना सुगंधी वनस्पतीमधील तेलाचे प्रमाण नेमके कधी किती तयार झाले आहे हे न समजल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. या अडचणीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी एक उपकरण तयार केले आहे.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

सुगंधी द्रव्य, सौंदर्यप्रसाधने वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याकरिता सुगंधी वनस्पतींचे उत्पादन अधिक प्रमाणात होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शेतकरी सुगंधी वनस्पतीचे उत्पादन घेण्याकडे वळत आहेत. मात्र त्यामध्ये मुख्य अडचण येते, ती सुगंधी वनस्पतीमधील तेलाचे प्रमाण नेमके किती झाले आहे हे समजण्याची. ते शेतकऱ्यांना नीटपणे समजत नाही. अवेळी, अकाली सुगंधी वनस्पती तोडून त्या तेल गाळपासाठी नेल्या जातात. तेव्हा त्यामध्ये तेलाचे प्रमाण कमी, अल्प, अत्यल्प असल्याचे आढळते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. या अडचणी पाहता आता शेतकऱ्यांच्या मदतीला एक महत्त्वाचे उपकरण येत आहे.

सुगंधी वनस्पतींमधील तेलाचे प्रमाण मोजण्यासाठी विशेष उपकरणाची निर्मिती करण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले आहे. या संशोधनास भारतीय पेटंट प्राप्त झाले असल्याने गुणवत्तेची खात्री देता येते. शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक व सध्या डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, सहायक प्राध्यापक डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. गणेश निगवेकर, डॉ. क्रांतिवीर मोरे आणि डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांचा या संशोधन चमूमध्ये समावेश आहे.

सुगंधी वनस्पतीचे उत्पादन अलीकडच्या काळामध्ये वाढत चालले आहे. सुगंधी तेलाची बाजारपेठ वाढत चालली आहे. औषधी वनस्पतीच्या विविध भागांचा वापर विशिष्ट रोगावर उपचार करण्यासाठीही होतो. आयुर्वेदिक आणि युनानीसारख्या भारतीय औषध प्रणालीमध्ये त्याचा वापर केला जातो. जैवविविधतेने नटलेल्या आपल्या राज्यात असंख्य वनस्पतींच्या प्रजाती आहेत. त्यातील अनेक वनस्पतींचा उपयोग औषधी म्हणून होत असतो. आयुर्वेदाचे महत्त्व वाढत चालल्याने औषधी वनस्पतींची गरज, मागणी वाढत आहे. तसेच सुगंधी वनस्पतींची मागणीही झपाटय़ाने वाढत आहे.

सुगंधाचा दरवळ

आपल्याकडे प्रामुख्याने चंदन, केवडा, जिरॅनियम, पाल्मारोजा, दवणा, गवती चहा, पुदिना, सेंट्रोनेला, लेमन ग्रास, पचौली, वाळा, पुदिना आदी प्रमुख सुगंधी वनस्पती आहेत. सुगंधी वनस्पतीच्या सुमारे १५०० प्रजाती आहेत. त्यांपैकी ५०० पेक्षा जास्त प्रजातींचा अभ्यास केला गेला आहे. औषधी आणि सुगंधी वनस्पती आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या वनस्पतीद्वारे औषधे, परफ्युम, फ्लेवर्स आणि सौंदर्यप्रसाधने बनवली जातात. सुगंधी वनस्पतीमधील तेल काढण्यासाठी तेल निष्कर्षणाच्या विविध पद्धती वापरल्या जातात. ऊर्ध्वपातन या प्रक्रियेत पाण्याद्वारे ऊर्ध्वपातन, पाणी व वाफेद्वारे ऊर्ध्वपातन, वाफेद्वारे ऊर्ध्वपातन यांचा समावेश होतो. सुगंधी विलयनमध्ये ‘बसोल्यूट’ व ‘कॉन्सन्ट्रेट’ बनवणे, वायुरूप द्रावके वापरून निष्कर्षण याचा समावेश होतो. सुगंधी वनस्पतीपासून विविध रसायने, तेले वेगळी करणे, विशेष प्रक्रियेद्वारे अल्कलाइड्स, स्टिरॉइड्स, बाष्पनशील/व्होलाटाइल ऑइल्स अर्क वेगळे करून त्याची विक्री करणे या बाबींचा प्रक्रिया पद्धतीत समावेश होतो. अशी प्रक्रिया केंद्रे वैयक्तिक अथवा सामुदायिक पद्धतीने चालवली जातात. शुद्ध स्वरूपातील सुगंधी द्रव्ये निर्यात करून मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन मिळू शकते. सुगंधी तेलांमध्ये ‘फ्रॅग्रन्स’ व ‘फ्लेवर’ यांना मोठे महत्त्व आहे.

उपकरणाचा सुगंध

सुगंधी वनस्पतींमधील तेल सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी निर्माण केलेल्या उपकरणासाठी संशोधकांच्या चमूला हे पेटंट मिळाले आहे. या उपकरणामध्ये तेलाचे प्रमाण मोजण्यासाठी अस्थिर सेंद्रिय संयुगे सेन्सर वापरला आहे. या सेन्सरला मायक्रो-कंट्रोलरद्वारे आउटपुट दिले जाते, तेव्हा सॅम्पलमधील तेलाचे प्रमाण दर्शविले जाते. हे उपकरण अगदी हाताच्या तळव्यावर मावण्याइतके असून, ते सहज हाताळता येते. प्रत्यक्ष चाचणीच्या ठिकाणीही त्यामुळे सहज वापरता येऊ शकते. सुगंधी वनस्पतींच्या लागवडीमधून होणारा नफा हा त्या वनस्पतीमधील तेलाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हे तेलाचे प्रमाण वनस्पतीचे वय, हवामान आणि जमिनीची उत्पादनक्षमता आदी घटकांवर अवलंबून असते. योग्य वेळी पिकाची काढणी केली, तरच जास्तीत जास्त तेल मिळून शेतकऱ्यांचा नफा वाढू शकतो. परंतु वनस्पतीमध्ये तेल योग्य प्रमाणात तयार झाले आहे की नाही, हे ओळखण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पद्धती अत्यंत खर्चिक व वेळखाऊ आहेत. तसेच त्या शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडून चुकीच्या वेळी पिकाची कापणी केली जाते. त्यामुळे प्रचंड नुकसान सोसावे लागते. यामुळेच बरेचसे शेतकरी सुगंधी पिकांच्या लागवडीपासून दूर चालले असल्याचेही चित्र आहे. आता शिवाजी विद्यापीठाच्या या अभिनव संशोधनामुळे थेट शेतामध्ये जाऊन या उपकरणाच्या साहाय्याने पिकामध्ये तेलाचे प्रमाण किती आहे, याचा अंदाज बांधता येणे शक्य झाले आहे.

दूध, साखर आणि सुगंधी वनस्पती

या उपकरणाची उपयुक्तता स्पष्ट करायची झाली, तर ती दूध, साखर उद्योगातील वापराच्या काही उपकरणांसंदर्भासह देता येईल. शेतात जाऊन ऊस, त्याच्या पानांची विशिष्ट उपकरणाद्वारे पाहणी, चाचणी करून त्याद्वारे साखर उतारा किती येऊ शकतो याचा अंदाज घेतला जातो. ऊस पुरेसा पक्व झाला नसल्याचे निदर्शनास आले, तर तो गाळपासाठी नेण्याचे थांबवले जाते. किंवा दूधउत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना डेअरीमध्ये विशिष्ट यंत्राद्वारे फॅट मोजले जाते. त्यातून दुधाची प्रत कोणत्या दर्जाची आहे हे समजू शकते. साधारण याच धर्तीवर सुगंधी वनस्पतींमधील तेलाचे प्रमाण शोधणारे हे बहुगुणी उपकरण आहे. म्हणजे शेतकरी सध्याचे ऊस, दुधात अनुभवतात, साधारण त्याच तुलनेचा अनुभव त्यांना या सुगंधी उपकरणातून येऊ शकतो. सध्या बनवण्यात आलेले पोर्टेबल उपकरण हे विद्यापीठामधील उपलब्ध यंत्रणेद्वारे तयार केले आहे. त्याची व्यावसायिक विक्री करण्यासाठी खर्चाचा ताळेबंद करणे गरजेचे आहे. सुगंधी तेलाचे प्रमाण मोजले जात असले, तरी अन्य काही तत्सम कामासाठी याचा वापर करता येईल, असे अधिक उच्च प्रतीचे संशोधन केले जात आहे. या संशोधक चमूला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

उपकरणाची अचूकता वाढवणार

हे उपकरण शेतामध्ये कितीही वेळा चाचणीसाठी वापरता येते. यामध्ये थोडा बदल करून इतर वनस्पतींच्या तेलाची चाचणी करता येऊ शकते. किंबहुना विविध वनस्पतींसाठी एकच उपकरण तयार करता येणेही शक्य आहे. भविष्यात याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून या उपकरणाची अचूकता वाढवता येऊ शकते.

– डॉ. मानसिंगराज निंबाळकर.

शेतकऱ्यांसाठी वरदान

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक चमूने सुगंधी वनस्पतींमधील तेलाची चाचणी करण्यासाठी विकसित केलेले पोर्टेबल उपकरण हा एक अत्यंत महत्त्वाचा शोध असून, सुगंधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या चाचण्या शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तेथील वनस्पतीमधील तेलाचे प्रमाण मोजणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्याचे अकाली कापणीमुळे होऊ शकणारे संभाव्य नुकसान टळेल.

-डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू