|| आसाराम लोमटे

शेती-मातीचे प्रश्न शेतकऱ्यांना नेहमीच मांडावे लागले… शेतकऱ्यांबद्दलची असंवेदनशीलता नित्याचीच; पण कृषी कायद्यांना विरोध करणारे ‘देशद्रोही’ अशा प्रचाराचे खिळे सत्ताधाऱ्यांनी पेरले. त्याही स्थितीत, ‘शेतकऱ्याचा आसूड’ खाली  न ठेवणारी वज्रमूठ इथं दिसली…

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
decision to create an independent family is right or wrong
स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

अकबर बादशहा अस्वस्थ असतो. ‘‘इकडे पंजाबात जेव्हा येतो तेव्हा मी क्रुद्ध होतो. स्वस्थ का वाटत नाही? माझ्यापर्यंत बातम्या पोहोचतात, पंजाबचा मोठा भाग तर मला बादशहा म्हणून स्वीकारायला तयार नाही.’’ अकबर दु:खातिरेकाने एक खोलवर श्वास घेतो. त्याच्याकडे आलेला एक पादरी आहे; त्याच्याशी अकबराचा हा संवाद चाललेला असतो.

‘‘तलवारीच्या टोकावर माणसाच्या केवळ शरीराला गुलाम करता येईल. त्याचं मन आणि आत्म्याला नाही. लोकांच्या अंत:करणात अशी एखादी भावना असते जी सत्तेला आव्हान देते. गुस्ताखी माफ… शहेनशहा हुजूर… छोटा मुँह बडी बात. एक गोष्ट सांगायची परवानगी मागतो…’’ पादरी विचारतो.

अकबर नि:शंकपणे परवानगी देतो.

‘‘हुजूर… एखादा शहेनशहा बेशक साऱ्या पृथ्वीवर राज्य करील. प्रजेच्या देहावरही आपला हक्क गाजवील. त्यांना गुलाम करील. याउलट लोकांतून पुढे आलेला एखादा ‘शख्स’ मात्र सत्तेला डोळा भिडवत सम्राटाच्या शक्तीला नाकारतो. जो सदैव आपल्या लोकांचे रक्षण करतो तो लोकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करतो.’’

पादरीने हे सांगितल्यावर अकबर विचारतो, ‘‘तो क्या हिंद के लोग अपने मनसे हमे शहेनशहा नही मानते?’’ हे विचारताना अकबराच्या माथ्यावर आडव्या रेषा उमटतात.

‘‘मानतात शहेनशहा… ‘हिंद’चे लोक जरूर आपणास शहेनशहा मानतात. पण त्या मानण्यात आपल्या शक्तीची भीतीच जास्त असते.’’

– ‘तोडूँ दिल्ली के कंगुरे’ ही पंजाबी लेखक बलदेव सिंह यांची कादंबरी आहे. त्या कादंबरीतला हा संवाद आहे.

सोळाव्या शतकात दुल्ला भट्टी या नावाचा एक लोकनायक अकबराच्या सत्तेला आव्हान देतो. लगान वसुलीला नाकारतो. त्याचं म्हणणं असतं की धरती आमची, मेहनत आमची तर मग शेतात लहरणाऱ्या पिकावर बादशहाचा हक्क कसा. लोकांमध्ये सत्तेविरुद्ध सुरुंग पेरणाऱ्या दुल्ला भट्टी या लोकनायकाच्या अनेक लोककथा आणि लोकगीतं आजही पंजाबातील लोकांच्या ओठांवर आहेत. दिल्लीचे बुरूज उद्ध्वस्त करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या या लोकनायकाची गाथा असलेली ‘तोडूँ दिल्ली के कंगुरे’ ही कादंबरी पंजाबीप्रमाणेच हिंदी भाषेतही उपलब्ध आहे.   

गेल्या वर्षभरापासून अधिक काळ शेतकऱ्यांच्या असंतोषाचे केंद्र पंजाब हे होते. त्या पार्श्वभूमीवर या कादंबरीतील हा प्रसंग आठवला.

पंजाब, हरियाणातून एकवटलेला शेतकऱ्यांचा उठाव पुढे देशाच्या राजधानीत पोहोचला आणि पाहता पाहता ही शेतकऱ्यांची वज्रमूठ सरकारविरुद्ध अशी काही आवळली की सरकारला तीन कृषी कायदे रद्द करावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीचे औचित्य साधत तशी घोषणा केली.

काळजी अपवादात्मकच

शेतकरी विरुद्ध शासनकर्ते असा संघर्ष काळाच्या विविध टप्प्यांवर घडत आला आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचीही काळजी करणारे शासनकर्ते असतीलच असे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका आज्ञापत्रात आपल्या सैनिकांना असे सांगितले होते की घोडी वाटेल तशी चारू नका. आता चारा संपवाल तर पुन्हा मिळणार नाही. कोणी कुणब्याच्या घरातील दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी भाजी असे आणील तर कष्टणारा शेतकरी धास्तावेल. आपल्या मुलखात मुघल आला त्यापेक्षा तुम्ही जास्त त्रासदायक आहात असे त्याला वाटेल. तेव्हा रयतेचा तळतळाट घेऊ नका, असे शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना बजावले होते. रयतेप्रतिची ही संवेदनशीलता अपवादात्मक आणि असाधारण आहे.

शेती-मातीच्या प्रश्नावर लढणाऱ्या अनेकांनी आजवर त्या-त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांशी संघर्ष केला आहे. भारतातल्या शेतकरी उठावांना मोठा इतिहास आहे. देशाच्या वेगवेगळ्या प्रांतांत शेतकऱ्यांनी संघटित होऊन केलेल्या उठावांची मोठी परंपरा आहे. शेतकऱ्यांना सत्तेच्या बळावर चिरडण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. महाराष्ट्रातसुद्धा १९८० ते ९० या दोन दशकातां शेतकरी आंदोलने धुमसत होती. या आंदोलनांना दडपण्यासाठी गोळीबाराच्या घटना घडल्या. शासनकर्त्यांशी डोळा भिडवणारा संघर्षशील समूह हा कोणत्याही सरकारला सलत असतो. ऊस, कापूस, तंबाखू अशा वेगवेगळ्या पिकांच्या बाजारभावासाठी शेतकऱ्यांनी रक्त सांडले. हे संघर्ष घडत असताना आंदोलनकर्त्यांवर ‘देशद्रोही’ म्हणून शिक्के मारण्याचा संसर्ग मात्र त्या वेळी फैलावला नव्हता.

अलिप्तता, तुच्छता

कृषीसंबंधित कष्टकऱ्यांच्या जगण्याची धग आज तीव्र असली तरीही ती उग्र रूपात जाणवत नाही याची कारणे म्हणजे कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरील चळवळी आता मंदावल्या आहेत. या सर्व घटकांसाठी निष्ठेने झगडणारे कार्यकर्ते आजही आपल्या पातळीवर काम करताना दिसतात. दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत हे लढे धारदार होते. आता ही संघर्षाची धार समाजात दिसत नाही याचे कारण कष्टकऱ्यांच्या जगण्यातले ताण समजूनच घ्यायचे नाहीत आणि आपल्या सुखवस्तू व आत्ममग्न जगात त्यांची चर्चाही करायची नाही हा निर्ढावलेपणा वाढला आहे. गेल्या दोन दशकांत आलेला मध्यमवर्ग आणि झपाट्याने वाढलेली या वर्गाची संख्या मोठी आहे. तो कोणत्याही जातीतून आला असला तरीही एक वर्ग म्हणून तो जेव्हा स्थिरावतो, तेव्हा त्याचे वर्तन एकसाची असते. या वर्गाला कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांच्या जगण्यातल्या पडझडीशी कोणतेही देणेघेणे नाही.

हा सर्व जातींतून आलेला मध्यमवर्ग आजच्या कष्टकऱ्यांच्या जगाकडे कमालीच्या अलिप्तपणाने आणि तुच्छतेने पाहतो. जो बिचारा निमूटपणे आपल्या जगण्यावर फिरणारा वरवंटा अनुभवतोय त्याला तर वाचाच नाही. त्याने आपल्यावरील दुष्टचक्राबद्दल शब्द उच्चारावा की जगण्यातल्या उरस्फोड संघर्षाला सामोरे जावे? कृषी क्षेत्रातले हे घटक असहाय, हतबल आहेत. ते संघर्षाला उभे राहतील किंवा त्यांचा प्रक्षोभ दिसेल एवढी ऊर्जा गोळा करण्याची उसंतसुद्धा या वर्गाकडे नाही. माध्यमे आणि समाजमाध्यमांवरही अस्मितांचे प्रश्न अधिक धारदार झालेले पाहायला मिळतात. कृषीसंबंधित वंचित घटकांच्या प्रश्नांना वर्गीय परिमाण प्राप्त होण्याची शक्यता अशा काळात धूसर होऊन जाते. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या मागण्यांसाठी शेतकरी एकवटतात, आंदोलनाची प्रच्छन्न टवाळी चालू असताना वर्षभराहून अधिक काळ नेटाने आंदोलन चालू ठेवतात ही घटना अर्थपूर्ण आहे.

असंवेदनशीलतेचे प्रकार… 

हे तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी अस्तित्वात आल्याचे सांगितले गेले. शेतकऱ्यांची बाजारपेठेतील लूटमार थांबविण्यासाठी जरूर सुधारणा व्हाव्यात; पण या सुधारणांविषयी शेवटच्या शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा. हे कायदे शेतकऱ्यांसाठी नसून मूठभर भांडवलदारांचे हित जोपासणारे आणि त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठीच जन्माला घातले आहेत अशी भावना सर्वदूर शेतकऱ्यांमध्ये दृढ होत असताना दुसरीकडे सरकार मात्र सारे काही रेटून नेण्याच्याच पवित्र्यात होते. या असंतोषाला खिजगणतीतही लेखायचे नाही, उलट अनुल्लेखाने मारायचे असा प्रकार सुरू होता. सरकारच्या दृष्टीने हे शेतकरी ‘आंदोलनजीवी’ होते. त्यांची दखल घेण्याचा किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना जुमानायचेच नाही अशीच सरकारची देहबोली होती. ‘शेतकऱ्यांच्या पायी असलेल्या शृंखला तोडून त्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य बहाल करण्या’ची भाषा जरी सरकारच्या तोंडी असली तरी प्रत्यक्षात वर्तन मात्र तसे नव्हते. अत्यंत घाईघाईत ही विधेयके संमत करण्यात आली. त्यानंतर पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन केले. देशभरात ‘चक्का जाम’ची हाक दिली गेली. शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले. ते दिल्लीच्या वेशीवर येईपर्यंत लाठीमार, पाण्याचे फवारे अशा मार्गाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या मार्गात प्रचंड अडथळे निर्माण केले गेले. गेल्या वर्षभरात आंदोलन दडपण्याचे, त्याची बदनामी करण्याचे प्रकार सातत्याने घडले. तरीही आंदोलनाचा वणवा हळूहळू पसरत गेला.               

कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहेत असे सांगायचे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी मात्र अत्यंत असंवेदनशील असे वर्तन करायचे असा प्रकार दीर्घकाळ चालला. दुसरीकडे समाजमाध्यमांवर आंदोलनकत्र्या शेतकऱ्यांविषयी जहरी तुच्छता व्यक्त करणाऱ्यांनी अष्टौप्रहर विद्वेष पसरवणे सुरू ठेवले. शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग, खलिस्तानी, पाकिस्तानी, दहशतवादी अशा शब्दांच्या माध्यमातून हिणवत भक्तगणांचा हा विखार बाहेर पडत होता. जणू या शेतकऱ्यांचे काही म्हणणेच नाही आणि काही प्रश्नही नाहीत. त्यांना केवळ हुल्लडबाजी करायची आहे, देशात अशांतता निर्माण करायची आहे. परकीय शक्तींच्या चिथावणीतून हे सारे सुरू आहे. हे शेतकऱ्यांचे नाही तर दलालांचे आंदोलन आहे… असा उग्र प्रचार अक्षरश: फेसाळला होता.

कुऱ्हाडीचा दांडा… 

लखीमपूरच्या घटनेत शेतकरी चिरडले गेले. वर्षभर आंदोलनात असंख्य शेतकऱ्यांचे बळी जात असताना, कित्येक जण जखमी होत असताना सरकारच्या तोंडून चकार शब्दही उमटत नव्हता. भविष्यात उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांतल्या निवडणुका तोंडावर नसत्या तर कदाचित एवढ्या ‘विनम्र भावनेने’ हे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केलीही नसती. शेतकऱ्यांच्या अविचल, संघटित शक्तीपुढे सत्ताधाऱ्यांना माघार घ्यावी लागते ही बाब आंदोलनाची परिणामकारकता सार्थ ठरवणारी तर आहेच, पण भविष्यातल्या शेतकरी आंदोलनांना, चळवळीला व लढ्यांना बळ देणारी आहे.

जाता जाता पुन्हा ‘तोडूँ दिल्ली के कंगुरे’ या कादंबरीतलाच एक प्रसंग… दुल्ला भट्टी या लोकनायकाने पंजाब, पिंडी, सांदल या सर्वच इलाख्यांत लोकप्रियता मिळवली आहे. मुघल सम्राट अकबराच्या सत्तेला ललकारलं आहे. गुरं सांभाळणाऱ्यापासून ते हस्तकारागीरापर्यंत कोणीही लगान द्यायचा नाही हा त्याचा निर्धार सर्वांनाच धीर देणारा ठरला आहे. तेव्हा एक बुजुर्ग इसम एका निवांत क्षणी दुल्ला भट्टीला सांगतो, ‘‘तू लोकांना जागं करण्याचं काम हाती घेतलंस ते आनंदानं चालू राहू दे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. मोठमोठी जंगलं कशालाच घाबरत नाहीत. हत्ती, वाघ, चित्ते, हिंस्रा  श्वापदं कोणाचीच जंगलाला भीती वाटत नाही… पण एखाद्या झाडाची छोटी फांदी जरी कुऱ्हाडीचा दांडा बनली ना तर मग सारं जंगल भयभीत होतं. जर एखादं ‘तख्त’ डावपेचांची राजनीती खेळत असेल तर आपणही ती राजनीती शिकली पाहिजे. बेटा, युद्धात लढत मरणं ही बहादुरी नाही. जिवंत राहून युद्ध चालू ठेवणं ही खरी बहादुरी आहे. एवढंच तुला सावध करतो.’’ असं तो बुजुर्ग सांगतो आणि उठतो. दुल्ला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहातच राहातो. आपल्या सगळ्या शेतकरी चळवळींकडे पाहाताना पाचशे वर्षांनंतरही त्या बुजुर्गाचं म्हणणं दुर्लक्षिता येत नाही.aasaramlomte@gmail.com