हर्षद कशाळकर

सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील आंबा यंदा धोक्यात आला आहे. या संकटावर मात कशी करायची याची उत्तरे सापडत नसताना आलेल्या उत्पादनाच्या वितरण आणि विक्रीवर आता टाळेबंदीचे ढग जमा होऊ लागले आहेत.

कोकणातील हापूस आंबा यंदा निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. हवामानातील बदल आणि निसर्ग वादळाचा प्रकोप अशा दुहेरी संकटामुळे यंदा आंबा पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशातच करोना विषाणूचा प्रादुर्भाव जोमाने सुरू झाल्याने आंबा वितरण आणि विक्रीचेही मोठे संकट उत्पादकांपुढे उभ राहीले आहे.

संकटे येतात तर ती चहूबाजूने येतात असे म्हणतात. कोकणातील आंबा बागायतदारांना सध्या याचाच प्रत्यय येत आहे. गेल्या वर्षी ३ जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळ रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर धडकले होते. या वादळाचा आंबा बागायतींना मोठा फटका बसला. रायगड जिल्ह्यातील ८ हजार ०७९ हेक्टर वरील आंबा पिकाचे नुकसान झाले, वर्षानुवर्ष मेहनतीने जोपासलेल्या बागा उद्ध्वस्त झाल्या. हजारो झाडे उन्मळून पडली. काही मोडली. दुखावली गेली. त्यामुळे आंब्याच्या उत्पादन क्षेत्रात घट झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड, गुहागर तालुक्यांना निसर्ग वादळाचा तडाखा बसला. त्यामुळे तेथील आंब्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले.

यानंतरही आंबा पिकासमोरील आव्हाने कमी झाली नाहीत. आंबापिकाचे उत्पादन हे प्रामुख्याने पावसाळा संपल्यानंतर अनुकूल असणाऱ्या हवामानावर अवलंबून असते. यंदा मात्र पिकासाठी अनुकूल हवामान तयार झालेच नाही. यंदा पावसाळा लांबला, मातीतला ओलावा कायम राहिला. ऑक्टोबर महिन्यात उष्णता जाणवली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडी पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया दीड महिना उशिराने सुरू झाली. त्यानंतरही हवामानाचा लहरीपणा सुरूच राहिला. फेब्रुवारी- मार्च महिन्यातही ढगाळ हवामान आणि वादळी पावसाच्या सरी सुरूच राहिल्या. मार्च आणि एप्रिल महिन्यात उष्णतेत वाढ झाली. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सीअसवर जाऊ न पोहोचला. त्यामुळे बागायतदारांच्या उरल्या सुरल्या अपेक्षाही धुळीस मिळवून टाकल्या.

संपूर्ण हंगामात आंब्यापुढे हवामानाची एकामागोमाग एक संकटे येत गेली. यामुळे आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. रायगड जिल्ह्यातील उत्पादन निम्म्याने, तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्गातील उत्पादन ३० ते ४० टक्के शिल्लक राहिले आहे. मार्च अखेरपर्यंत यातील १० टक्के आंबा बाजारात दाखल झाला आहे. तर उर्वरित आंबा एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात बाजारात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. जून महिन्यापर्यंत आंब्याची आवक सुरू राहण्याची शक्यता आहे.

शासनाने आंबा पिकासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना लागू केली असली तरी ती कुचकामी ठरत असल्याचा अनुभव बागायतदारांना सातत्याने येत आहे. त्यामुळे पीक विमा योजनेला रायगड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

अशातच आता करोनाचे नवे संकट बागायतदारांसमोर उभे राहिले आहे. राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा एकदा अंशत: टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव असाच सुरू राहिला तर पूर्ण टाळेबंदी लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार अधिकच धास्तावले आहेत. गेल्या वर्षी आंब्याचा संपूर्ण हंगाम टाळेबंदीत गेला होता. त्यामुळे बागायतदारांची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे बागायतदारांना थेट विक्री करण्यावर भर द्यावा लागला होता. या वर्षी पुन्हा एकदा टाळेबंदीचे ढग दाटू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा थेट विक्रीवर बागायतदारांना भर द्यावा लागणार आहे. गेल्या वर्षी बऱ्याच बागायतदारांनी स्वत:ची वितरण व्यवस्था तयार केली होती. त्याचा काही प्रमाणात फायदा होऊ  शकणार आहे. पण यंदा बाजारात आंब्याची आवक कमी राहणार असल्याने दर मिळेल अशी आशा बागायतदारांना आहे.

आधी निसर्ग वादळामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले, त्यानंतर हवामानातील बदल, वादळी पावसाने त्यावर कडी केली. त्यामुळे यावर्षी सरासरीच्या तीस ते चाळीस टक्के च पीक बागायतदारांच्या हाती लागणार आहे. यामुळे बागायतदारांचे अर्थकारण कोलमडून पडणार आहे. वर्षाअखेरीस उत्पन्न मिळेल या आशेवर बागायतदार वर्षभर पिकाची देखभाल करत असतो. त्यात लाखो रुपयांची गुंतवणूक केलेली असते. अशावेळी जर ३० ते ४०टक्केच आंबा पीक हाती लागले आणि तेही चांगल्या दर्जाचे नसेल तर होणारे नुकसान न भरुन येणारे नसेल, अशी खंत आंबा बागायतदार डॉ. संदेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. या संकटावर मात कशी करायची याची उत्तरे मात्र बागायतदारांना सापडतांना दिसत नाहीत. एकवेळ कीड रोग रोगांना फवारणी करता येईल, फवारणी आणि मशागत करून बागांची जोपासना करता येईल. पण बेभरवशाच्या हवामानाचे करायचे काय, याचे उत्तर बागायतदारांकडे नाही. त्यामुळे निसर्गाच्या दुष्टचक्रात कोकणातील हापूस आंबा आणि बागायतदार दोघेही अडकल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

५० टक्के  घट येण्याची भीती

रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकू ण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर  उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. मात्र यंदा आंबा उत्पादनात ४० ते ५० टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोहोर करपून गेला

साधारणत: होळी झाल्यानंतर रायगड जिल्हयात ऊ न वाढायला सुरुवात होते. परंतु यंदा त्यापूर्वीच सूर्य आग ओकू लागला. उन्हाच्या झळा मार्चच्या दुसऱ्या आठवडयापासूनच सुरू झाल्या. मार्चच्या शेवटच्या आठवडयात संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट आली. अनेक भागात तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसवर गेले आहे. उन्हाच्या माऱ्याने हा मोहोर करपून गेला. तर ,आंब्याच्या बागा पुरत्या काळवंडल्या आहेत.

– कल्पेश बलोसे, आंबा बागायतदार

वादळामुळे उत्पादनात घट

वादळामुळे काही प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. सध्या साधारणपणे २० टक्के आंबा बाजारात दाखल झाला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारातील आंब्याची आवक वाढणे अपेक्षित आहे. पण यावर्षी नेमके उत्पादन किती घटेल हे आत्ता सांगता येणार नाही.

– दत्तात्रय काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

harshad.kashalkar@expressindia.com