scorecardresearch

दाहक वास्तवाचा शोध

ग्रामीण लोकांना निरामय आरोग्य देता यावे यासाठी सीमा किणीकर यांनी सुरू केलेल्या सेवायज्ञामुळे काही समाजघटकांचे दाहक वास्तव त्यांच्या समोर आले आणि ‘निरामय आरोग्यधाम’ची सुरुवात झाली.

दाहक वास्तवाचा शोध
सीमा किणीकर

आरती कदम

ग्रामीण लोकांना निरामय आरोग्य देता यावे यासाठी सीमा किणीकर यांनी सुरू केलेल्या सेवायज्ञामुळे काही समाजघटकांचे दाहक वास्तव त्यांच्या समोर आले आणि ‘निरामय आरोग्यधाम’ची सुरुवात झाली. हा सेवायज्ञ  वेश्या व्यवसायातील स्त्रिया, समलैंगिक, तृतीयपंथीय, एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलं यांच्या दाहक आयुष्याला मायेची शीतलता देतो आहे. १०० जणींना पूर्णत: वेश्या व्यवसायातून बाहेर काढणाऱ्या, अनेकींना व्यवसाय प्रशिक्षण देत पायावर उभं करणाऱ्या, विविध स्तरांतील एचआयव्हीबाधितांना निरामय आरोग्य देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीमा किणीकर आहेत, यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.

ती फक्त १८-१९ वर्षांची पोर. खरे तर बागडण्याचे तिचे दिवस, पण तिच्या आयुष्यात ते दिवस कधी आलेच नव्हते. एका कुंटणखान्यात सीमाताईंना ती भेटली तेव्हाही ती आजारीच होती.  रोजचा दिवस ढकलायचा एवढेच तिला माहीत. वरचेवर आजारी पडू लागली तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘‘वेश्या व्यवसाय बंद कर.’’ तिने त्यांच्या नजरेला नजर भिडवत विचारले, ‘‘आणि रात्री काय जेवू?’’ तो विषय तिथेच संपवला गेला. महिन्याभराने ती त्यांना पुन्हा भेटली ती मरणासन्न अवस्थेत. त्यांनी तिला रोज डबा पुरवणे सुरू केले. एके दिवशी भेटायला गेल्यावर त्यांचा हात घट्ट पकडून तिने विचारले, ‘‘मी तुम्हाला आई म्हणू?’’ त्या हो म्हणताच ती आनंदली आणि दुसऱ्या दिवशीच ती गेली. ती मरणार हे माहीत असूनही सीमाताईंसाठी तो धक्का मोठा होता. त्यातूनच या शोषित स्त्रियांसाठी काम करण्याचा विचार पक्का झाला आणि त्यांनी अशा असंख्य शोषित स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे त्यांचे अधिकार मिळवून दिले. किमान १०० जणी पूर्णपणे या व्यवसायातून बाहेर पडल्या आहेत. त्यांच्या मुलांपैकी काही अभियंते आहेत, काही ‘एमएसडब्ल्यू’ करून नोकरी करत आहेत. अनेकींनी छोटेमोठे व्यवसाय सुरू केले आहेत.

या आहेत सीमा किणीकर. सोलापूरमध्ये गेली ३० वर्षे ‘निरामय आरोग्यधाम’च्या माध्यमातून समाजातल्या उपेक्षित घटकांचे आरोग्य आणि जगणे कसे निरामय करता येईल, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, यासाठी अखंड  प्रयत्न करीत आहेत. समाजमनही त्यामुळे हळूहळू बदलत चालले आहे. सुरुवातीला सांगितलेल्या घटनेतील मुलीने त्यांना एका मोठय़ा समाजघटकापर्यंत पोहोचवले खरे, परंतु त्याची सुरुवात झाली ती ट्रक चालकांमधील जाणीव-जागृतीपासून. सीमाताईंच्या घरी पती डॉ. भालचंद्र किणीकर यांच्याप्रमाणेच सासरे, दीर, जाऊबाई सगळेच डॉक्टर. साहजिकच ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत औषधे पोहोचणे सुरू झाले.

पती-पत्नी दोघेही या कामाला लागले. त्या वेळी चहापानासाठी महामार्गावर थांबणे होई. तिथे भेटणाऱ्या असंख्य ट्रक ड्रायव्हरांच्या आयुष्याची ‘सच्चाई’ कळत गेली आणि समाजाचे एक दाहक वास्तव समोर आले. बहुतेक ट्रक चालक  गुप्तरोगाचे शिकार झालेले असत. त्याचे समुपदेशन, त्यांचा औषधोपचार, कंडोमच्या वापराबाबत जागरूकता आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी जोडून देणे, अशी कामे संस्थेतील त्यांच्या सहकाऱ्यांसह सुरू झाली. त्याचे फळ म्हणजे तेथील ट्रक चालकांमधील गुप्तरोगाचे ३७ टक्के प्रमाण ७ टक्के इतके खाली आले. पण पुढे जेव्हा एचआयव्ही- एड्स वाढू लागला तेव्हा ट्रक चालक त्याचे शिकार बनू लागले. १९९८ ते २००१ दरम्यान त्यांनी संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ वरच्या सोलापूर ते टेंभुर्णी रस्त्यावर ‘निरोगी महामार्ग प्रकल्पां’तर्गत ८८ हजार ट्रक ड्रायव्हरांना भेटून आजाराचे गांभीर्य शास्त्रीय माहिती, समुपदेश, चित्रप्रदर्शनाद्वारे पटवून दिले.

याच ट्रक चालकांमुळे त्यांना आणखी एका समाजघटकाच्या दु:खाला भिडता आले ते म्हणजे वेश्या व्यवसायातील शोषित स्त्रिया. सोलापूर परिसरातील कुंटणखान्यांतील एकेक दुर्दैवी कहाणी समोर येऊ लागली आणि सीमाताई आतून हलल्या. केवळ खायला मिळावे म्हणून रोजच्या रोज देहाला जाळणाऱ्या अनेक स्त्रियांच्या पदरी दु:खाशिवाय काहीच येत नव्हते. वर्तमानसुद्धा माहीत नसलेल्या या स्त्रियांचे भविष्य अंधकारमयच असणार होते. त्यांनी सोलापूर, बार्शी, टेंभुर्णी, पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्यांतून २२ फिरते दवाखाने, समुपदेशन केंद्रे आणि एचआयव्हीबाधितांसाठी मोफत रक्त तपासणी केंद्रे सुरू केली. या स्त्रियांना व्यावसायिक शिक्षण देऊन छोटे उद्योग उभे करून दिले. अनेकींना मोफत शिलाई मशिन्स घेऊन दिली. अनेक मुलींचे पुनर्वसन केले. इतकेच नाही तर अनेकींच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली. त्यातल्या एकाला ‘एमएस्सी’ व्हायला आर्थिक मदत केली. पुढे त्याने ‘पीएच.डी.’ केले आणि आज तो एका महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून काम करतो आहे.

एकदा पंढरपूरला कंडोमवाटप करत असताना कुंटणखान्याच्या बाईने दुप्पट कंडोम मागितले. त्याचे कारण विचारले असता उत्तर मिळाले, ‘वर्षभराचे आमचे कर्ज एका वारीच्या काळात फिटून जाते.’ आणखी एका दाहक वास्तवाचा परिचय. त्यामुळे त्यांनी वारीच्या दिवसात एड्सवर उपचार, मोफत कंडोम वितरण, समुपदेशन यासाठी स्टॉल लावणे सुरू केले. या प्रकल्पामुळे ‘तुम्ही वारकऱ्यांच्या भावना दुखावत आहात,’ असे सांगत त्यांना धमक्या आल्या, मात्र त्यांनी न डगमगता आपले काम चालूच ठेवले. त्यानंतर आणखी एका समाजगटाला सोसावा लागणारा अनुभव त्यांना सामोरा आला तो समिलगी आणि तृतीयपंथीयांचा. ही तरुण मुलं संस्थेत कंडोम मागायला येऊ लागली. त्यातून त्यांचा परिचय होत गेला. त्यांच्यासाठी २००८ मध्ये ‘संजीवनी गट’ स्थापना करण्यात आला. आज त्यातले अनेक जण स्वत:च्या पायावर उभे आहेत. एक जण पेट्रोल पंपावर काम करतो आहे, तर दोन जण पोलीस आयुक्तालयात कामाला आहेत.

सोलापूरमधल्या दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने सीमाताईंनी  एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांसाठी ‘बहर’संस्था सुरू केली. आज ५० मुले योग्य औषधोपचारांमुळे निरामय आयुष्य जगत आहेत. संस्थेतील कर्मचारी, आणि विश्वस्त यांचे सहाय्य, कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट आणि महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी, मुंबई तसेच इतर दानशूर लोकांच्या आर्थिक मदतीमुळे त्यांना या सर्वाना निरामय आरोग्य देता आले आहे. यापुढेही त्यांच्या कार्यामुळे समाजाच्या वास्तवाची दाहकता कमी होऊन सर्वाना निरामय आरोग्य लाभो ही शुभेच्छा.

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या