विदर्भाच्या गडचिरोलीत नक्षलक्रौर्याच्या कथा काही संपायचे नाव घेत नाहीत. मागच्या अनेक दशकांपासून सुरू असलेले हे क्रौर्य सरत्या वर्षांतही कायमच राहिले. उलट महाराष्ट्र दिनाच्या एका घटनेमुळे तर या क्रौर्याने जणू परिसीमाच गाठली.

मावळत्या वर्षांत गडचिरोली पोलीस दलाने दंडकारण्य स्पेशल झोन समितीचे सदस्य नर्मदाक्का व किरणकुमार या दोन जहाल नक्षलवाद्यांसह २२ नक्षलींना अटक, २९ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण तथा ९ नक्षलींना ठार करीत जंगलातील सहा नक्षलवादी शिबीरस्थळ उद्ध्वस्त करून यशस्वी कामगिरी बजावली असली, तरी १ मे महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांच्या सर्वात मोठय़ा भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी १८ आदिवासींची हत्या करीत या जिल्ह्य़ात नक्षलवादाचे मूळ अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले. ऐंशीच्या दशकापासून या आदिवासी अतिदुर्गम जिल्ह्य़ात नक्षलवाद फोफावला आहे. कागदोपत्री नक्षलवाद कमी झाला असे चित्र रंगविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. नक्षलवाद्यांची राजधानी अबुजमाडला पोलिसांनी सध्या लक्ष्य केले आहे. मात्र अबुजमाड येथील चकमकीत दोन सामान्य नागरिकांना पोलिसांनी ठार केल्याच्या मुद्दय़ावरून दोन दिवसांपूर्वीच नेलगुंडा परिसरातील चार ते पाच हजार आदिवासींनी धोडराज पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला नक्षलींची फूस होती, असा दावा पोलिसांनी केला आहे. ही वस्तुस्थिती असेल तर गंभीर परिस्थिती येथे आहे. मावळत्या वर्षांत महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी कुरखेडा येथे सर्वात मोठा भूसुरुंग घडवून आणला. या हल्ल्यात १५ पोलीस शिपाई शहीद झाले. वर्षभरात २३ चकमकी झाल्या, १८ हत्यारे व १४१.५०० किलो लॅन्ड माइन्स जप्त करण्यात आले.