काय विचित्र योगायोग आहे बघा. गेल्या वर्षीच्या १२ जुलै रोजी दारासिंग आपल्यातून गेला. आणि आता त्याचा समव्यावसायिक प्राणच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला. गेल्या काही दिवसांपासूनच प्राणच्या आजारपणाबद्दल उलटसुलट बातम्या पसरत होत्या. दुर्दैवाने आज त्या सगळ्या गोष्टींना विराम मिळाला.
प्राणची कारकीर्द खूप मोठी. ‘यमला जाट’ या पंजाबी चित्रपटात नायक साकारुन प्राण नावारुपास आला. पण गाजला तो यशस्वी खलनायक म्हणून. विशेषत: ५० व ६० या दोन दशकांतील चित्रपटांत प्राणची खलनायकी प्रचंड गाजली. उत्तम शरीरयष्टी, भव्य कपाळ, रोखून पाहणारे डोळे आणि जीभेवर जळजळीत संवाद या शस्त्रांमुळे प्राण एक क्रूरकर्मा खलनायक म्हणून प्रचंड गाजला. प्राणच्या खलनायकीचे अजून एक विशेष म्हणजे त्याचे विविध प्रकारचे गेटअप. चित्रपटातील नावे सांगितली तरी ते असंख्य गेटअप या क्षणी डोळ्यासमोर येतात. ‘जीस देस मे गंगा बहती है’, ‘मधुमती’, ‘राम और श्याम’, ‘पत्थर के सनम’, ‘रुप तेरा मस्ताना’, ‘मर्यादा’, ‘कब, क्यू और कहा’ इत्यादी. विशेष म्हणजे आपल्या देशात चित्रपट कलाकारांची नावे आपल्या अपत्याला देण्याची पद्धत आहे. परंतु प्राण हे नाव मात्र कधीच कोणी आपल्या अपत्याला दिले नाही. एकदा प्राण दिल्ली येथे आपल्या मित्राच्या लग्नाला गेला असता त्याला पाहूनच महिलांनी पळ काढला. त्याच्या खलनायकीची सामाजिक दहशत ही अशी होती. ही त्याच्या अभिनयाला मिळालेली अस्सल व मोठी दाद आहे, असेच म्हणायला पाहिजे.
मनोज कुमारने मात्र प्राणचे हे रुप पालटले. आपल्या ‘उपकार’ या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटात प्राणला ‘मंगल चाचा’ ही लंगडय़ा इसमाची भूमिका दिली. प्राणने या भूमिकेचे अक्षरश: चिज केले आणि चित्रपटाने मुंबईत ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. प्राणला नवा डाव सुरू करण्यासाठी ही योग्य संधी व वेळ होती. त्यानंतर प्राण खलनायकीच्याच ताकदीने व विविधतैने चरित्र भूमिकातही गाजला.या नव्या डावात प्राणला ‘धर्मा’ या चित्रपटात शिर्षक भूमिका मिळाली. विशेष म्हणजे कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात प्राणने राजा नवाथे दिग्दर्शित ‘आह’ या चित्रपटात डॉक्टरची सकारात्मक भूमिका करुन प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी त्याला प्रेक्षकांनी नाकारले. पण ‘उपकार’पासून मात्र त्याच्यावर बेहद प्रेम केले. या दुसऱ्या डावात त्याने ‘दुनिया’, ‘अंधा कानून’ अशा चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारुन आपल्यात पूर्वीची रग कायम असल्याचा प्रत्यय दिला. रुपेरी पडद्यावर त्याने काही गाणीदेखील साकारली. अशोक कुमारबरोबर ‘दो प्यारे बिना सहारे’ (व्हिक्टोरिया नंबर २०३), तसेच ‘यारी हैं इमान मेरा’ (जंजीर), ‘ओ मायकल सायबा दारु पीके दंगा करता है’ (मजबूर), ‘हम बोलेगा तो बोलता है बोलता है’ (कसौटी) अशा काही गाण्यांचा समावेश आहे. प्राण प्रत्यक्षात एक सद्वर्तनी व सद्ग्रहस्थ होता असा आम्हा सिनेपत्रकारांचा अनुभव आहे. त्याच्या वयाच्या ७५ व्या वर्षी त्याच्या विशेष भेटीचा योग आला असता तसा अनुभव आला. प्राणने आणिबाणीला विरोध करुन आपला स्वाभिमान स्पष्ट केला हे विशेष. आपल्या वैचारिक स्वातंत्र्याबद्दल प्राण नेहमीच जागरुक असे. त्यामुळे विनाकारण त्रास देणाऱ्या कलाकारांसोबत काम करणे त्याने नेहमीच टाळले. विविध सामाजिक संस्थांशी प्राणचे विशेष संबंध होते. खास करुन क्रीडा संस्थांत तो प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा. गेली काही वर्षे प्राण सिनेमा जगतापासून दूरच होता. घरी बसून क्रीडा वाहिन्या पाहणे हा त्याचा आवडता उद्योग होता. किशनचंद सिकंद हे त्याचे मुळ नाव. यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्याला देऊन त्याच्या दीर्घ अभिनय वाटचालीचा गौरव करण्यात आला. त्यानिमित्ताने प्राण पुन्हा एकदा चर्चेत आला आणि आज दुर्दैवाने हा प्रवास संपला.
एकदा प्राण दिल्ली येथे आपल्या मित्राच्या लग्नाला गेला असता त्याला पाहूनच महिलांनी पळ काढला. त्याच्या खलनायकीची सामाजिक दहशत ही अशी होती. ही त्याच्या अभिनयाला मिळालेली अस्सल व मोठी दाद आहे, असेच म्हणायला पाहिजे.
प्राण खलनायकीच्याच ताकदीने व विविधतैने चरित्र भूमिकातही गाजला. ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’, ‘बॉबी’, ‘डॉन’, ‘मजबूर’, ‘कसौटी’, ‘गोरा’, ‘सनम बेवफा’, ‘सलमा पे दिल आ गया’, ‘वॉरंट’, ‘जुगनू’ असे करता करता त्याची ही कारकीर्द देखील वैशिष्ठय़पूर्ण ठरली.