साहसाला रहस्यात मिसळणारा लेखक…

गुरुनाथ नाईकांच्या कादंबरीने  रहस्यकथेचा चेहरामोहरा बदलून टाकला. तत्पूर्वीच्या रहस्यमालेतील कथानकांमध्ये रहस्याला प्राधान्य होते.

गुरुनाथ नाईकांनी ठरवून साहसाला रहस्यात मिसळून कादंबऱ्या लिहिल्या. या क्षेत्रात आपल्यासारखी कादंबरी कुणी लिहू शकणार नाही तसेच बाजारात खळबळ माजेल याचा त्यांना अंदाज होता. हा अंदाज पहिल्या दोन कादंबऱ्यांनंतर जेव्हा खरा ठरला, तेव्हा सदानंद प्रकाशनाने केवळ रहस्यकथा लिहिण्यासाठी तयार केलेल्या दिवाकर नेमाडे, सुभाष शहा, अनिल.टी. कुलकर्णी. शरदचंद्र वाळिंबे यांच्या फौजेतील नाईक आघाडीचे लेखक बनले.

गुरुनाथ नाईकांच्या कादंबरीने  रहस्यकथेचा चेहरामोहरा बदलून टाकला. तत्पूर्वीच्या रहस्यमालेतील कथानकांमध्ये रहस्याला प्राधान्य होते. गुरुनाथ नाईकांच्या कथेत साहसाला अव्वल स्थान आले. त्यांचा शिलेदार ऊर्फ कॅॅप्टन दीप निधड्या छातीचा, तर मेजर अविनाश भोसले ऊर्फ गरूड ठोशास ठोसा देणारा, उदयसिंग चौहान म्हणजे गोलंदाज अव्वल निशाणबाज. जीवन सावरकर ऊर्फ सागर समुद्रात संचार करून बदमाषांचा नि:पात करणारा होता.

 चिनी-पाकिस्तानी हेरांना पाणी पाजून देशावरच्या हल्ल्यांना परतवून लावणारा, शत्रूच्या हद्दीत शिरून तेथे ताब्यात असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना खुबीने सोडवत परतणारा कॅप्टन दीप किंवा समोरच्याने झाडलेली गोळी अंगाला स्पर्श करू शकणार नाही, इतके विलक्षण चपळ शरीर घेऊन मध्य-उत्तर भारतातील खोऱ्यांमध्ये दरोडेखोर, सरंजामी राजे यांना पुरून उरणारा उदयसिंह चौहान असे नायक मराठी वाचकांना पहिल्यांदाच वाचायला मिळाले. लष्करी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या भाषेचा शिलेदार कथांमध्ये वापर झाला. तर इंग्रज आमदानीत मध्य भारतात उरल्या-सुरल्या सरदार-राजवाड्यांतील धुसफूस, अंतर्गत कटूता आणि एकमेकांविरोधातील सूडाचे राजकारण यांचा काल्पनिक इतिहास नाईकांनी येथे रचला. गुरुनाथ नाईक यांच्या पूर्वसूरींनी तोंडावर बुरखा चढवून पराक्रम रचणारे कित्येक नायक तयार केले होते. नाईकांचा बुरखाधारी गरुड दुसऱ्या कथेपासून अवतरला.(शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ)  देशांतर्गत गुन्हेगारी मोडून काढण्याची नाकत्र्या पोलिसांना न झेपणारी मेजर अविनाश भोसले यांची धडाडी पीटर पार्कर स्पायडरमॅनसारखीच. तस्करी, काळेधंदेवाल्यांच्या मुसक्या बांधण्याच्या गरुडाच्या कारवाया वाचकाला विलक्षणरीत्या पकडून ठेवत होत्या. राज्यभरातील गावागावांत सदानंद प्रकाशनाच्या मालाकादंबऱ्या पोस्टाने पोहोचू लागल्या. 

आपल्या उभ्या हयातीत एखादा वाचकप्रिय लेखक पन्नास ते शंभर पुस्तके लिहिताना थकून जातो, हा जागतिक साहित्याचा इतिहास आहे. पण या इतिहासाला थिटे ठरविण्याचे काम साऱ्याच रहस्यकथाकारांनी केले. पाचशेचा पल्ला द्रुतगतीने गाठणारे सत्तरच्या दशकातील दहा तरी मराठी रहस्यकथा लेखक सापडू शकतील. लेखक घडण्यासाठी त्याचे स्वत:चे विविधांगी विषयावरचे प्रचंड वाचन असणे ही मूलभूत गरज असते. या रहस्यकथा लेखकांचा लेखनाचा वेग पाहता त्यांनी कुंठा अवस्था येऊ न देता कोणत्या प्रेरणेतून आपला हात लिहिता ठेवला, हे सर्वात मोठे कोडे आहे. १२०८ कादंबऱ्यांपर्यंत जाणाऱ्या गुरुनाथ नाईकांनी आत्मचरित्र लिहिले असते, तर त्याचा उलगडा होऊ शकला असता. पण त्यांनी स्वत:विषयी फार थोडे लिहून ठेवले. ज्यातून त्यांच्या लेखन आयुष्यावर मोठा प्रकाश पडू शकत नाही.

थोडे कॅप्टन दीपविषयी…

‘रहस्यकथा म्हणून मी सत्तर साली पहिले पाऊल टाकले आणि आयुष्यातील पहिलीवहिली शिलेदार कथाच लिहिली. कारण त्यावेळी १९६५चे युद्ध जुने झाले, तरी आठवणी ताज्या होत्या. त्यातून आमची ‘आर्मी फॅमिली’ म्हणून फौजी जीवनाचा अभीमान. शिवाय राष्ट्रीय एकात्मतेचे वेड डोक्यात असल्यामुळे कॅप्टन दीप, लेफ्टनंट शेख आणि कॅप्टन मारिया लोबो हे तीन हिरो जन्माला आले. त्यात कॅप्टन दीप उजवा होता इतकेच. रहस्यकथांना मी सुरुवात केली तेव्हा त्या साहसकथाच असाव्यात हेच लक्ष्य ठेवले. परंतु माझ्यावर साहस कथाकाराच्याऐवजी रहस्यकथाकार हाच शिक्का बसला. बाबुराव अर्नाळकरांची कारकीर्द संपुष्टात आलेली. त्यावेळी शृंगारिक रहस्यकथांनी उच्छाद मांडलेला. त्यातून त्या अकल्पनीय अशा घटनांनी भरलेल्या. तेव्हा शृंगारिक कादंबऱ्या लिहायच्या नाहीत, ही खूणगाठ बांधली.’ असे नाईकांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

नाईक यांनी कॅप्टन दीप म्हणजेच संदीप राणे या नायकाची उभारणी केली, तेव्हा मराठी रहस्यकथेतच काय, मराठी साहित्यातही इतकी थेट लष्करी पाश्र्वभूमी आली नव्हती. लष्करी जीवनाचे अगदीच खरेखुरे वाटावे असे वातावरण त्यांनी कांदबरीतून आणले. अर्नाळकरांच्या चतुर, चपळ, हुशार, कुशाग्र बुद्धीचा आणि कर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या नायकांची सद्दी या कॅप्टन दीपच्या आगमनानंतर पूर्णपणे संपली. धाडसी, अत्यंत साहसी असलेला कॅप्टन दीप आणि त्याचे सहकारी कॅप्टन शेख, जमादार कदम यांनी चीन आणि पाकिस्तानी सैन्याची धुळधाण उडविण्याच्या प्रसंगांनी या कादंबऱ्या सजल्या आहेत. सहा फुटांचा भक्कमदेही कॅप्टन दीप केवळ भारतीय भाषाच बोलत नाही तर चिनी आणि उर्दूवरही त्याचे प्रभूत्व असल्याचे मांडण्यात आले आहे. तो उत्तम मुष्टियोद्धा आणि शत्रूवर चाल करून जाण्याची त्याची पद्धत चित्तथरारक रंगविण्यात आली आहे. त्याचे चमत्कारी बूट वेळप्रसंगी बंदुकीसारखेही काम करतात. तहान-भूक विसरून शत्रूच्या ताब्यात असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांची सुटका, त्यांच्या हाती लागलेला भारतासाठी महत्त्वाचा दस्तावेज, गुप्त रिपोर्ट उडवून आणण्याचे काम हा कॅप्टन दीप वारंवार करताना दिसतो. प्रसंगी वेशांतर, अल्पकाळाचे धर्मांतर आणि देशांतरही करून हा आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडतो. जालंधर ते श्रीनगर त्याचा (मुंबई-पुण्यात जात असल्यासारखा) सतत वावर होतो. अलिबाबा आणि कॅप्टन दीप यांच्या लढाया अनेक कादंबऱ्यांमध्ये आले आहे. शिलेदार कथांमधील हा प्रमुख सुपरव्हीलन आहे. ‘कानफाट्याची काळी कफनी’ या कादंबरीतून तो अवतरला. काश्मीरचा स्वयंघोषित राजा असलेला, चिनी हस्तकांची मदत घेणारा हा अलिबाबा संमोहनशास्त्रासारख्याच पण एका अघोरी विद्येत पारंगत असतो. आपल्या शत्रूच्या मनावर या शक्तीचा प्रयोग करून तो कुणालाही आपल्या हातचे बाहुले बनवू शकतो. या पहिल्याच कादंबरीत तो अत्यंत घातकी आणि क्रूर म्हणून समोर येतो. मेजर कुमार यावर आपल्या काळ्या जादूचे प्रयोग करून तो सैन्यातील अधिकाऱ्यांना मारण्याचे हुकूम सोडतो. कॅप्टन दीप त्याचा छडाच लावतो. या अलिबाबाचा पाठलाग करतो. अलिबाबाची शक्ती कॅप्टन दीपला गुलाम करू शकत नाही. पण अलिबाबा कायम त्याच्या हातातून निसटत राहतो. देशातील विविध भागांत या अलिबाबाला पकडून ठार करण्याची संधी कॅप्टन दीपला येते. पण त्या संधी चुकवत अलिबाबा नवा पवित्रा घेऊन कॅप्टन दीपचा सूड घ्यायला हजर होतो, अलिबाबा, अलिबाबाचा शिष्य, झपाटलेला अलिबाबा, खदिरांगार, मृत्युची चाहूल या दीप आणि अलिबाबा यांच्या संघर्षाची परिसीमा दाखविणाऱ्या कादंबऱ्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Novel by changing the face of the mystery with the novel akp