एजाजहुसेन मुजावर aejajhusain.mujawar@expressindia.com

सध्या सेंद्रिय शेतीचा सर्वत्र बोलबाला सुरू आहे. परंतु ही शेती कशी करावी, छोटय़ा क्षेत्रामध्ये करता येते का, पिके कुठली घ्यावी याबाबत शेतकऱ्यांमध्ये सध्या अनेक शंका आहेत. या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील जवळा येथे एका छोटय़ा शेतकऱ्याने अर्ध्या एकर क्षेत्रावर केलेली सूर्यफुलाची सेंद्रिय शेती शेतकऱ्यांचे आकर्षण ठरली आहे. याच प्रयोगाविषयी..

pregnant, sister, Nagpur,
पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग…
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम

भारत देश आज एकविसाव्या शतकातही कृषिप्रधान म्हणूनच ओळखला जातो. प्राचीन काळापासून ते आजतागायत आपल्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्र हे विकासाचे प्रमुख साधन मानले गेले आहे. अलीकडे करोना महामारीच्या संकटात देशाला आर्थिकदृष्टय़ा आधार देण्याची जबाबदारी कृषी क्षेत्रानेच बजावल्याचे दिसून येते. सकस, पौष्टिक आणि परिपूर्ण जीवनसत्वाची गरज शेतीतूनच निर्माण झालेल्या अन्नपिकांमार्फत मिळते. शेती कसण्याच्याही विविध पध्दती असून त्यात वनशेती, नैसर्गिक शेती, पारंपरिक शेती, मिश्र शेती, जैविक आणि रासायनिक शेतीचा समावेश आहे. दुष्काळ, पूर, वादळ यांसारखी अधूनमधून येणारी संकटे, पिकाचे घटणारे उत्पादन आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ४०-५० वर्षांपूर्वी देशात हरितक्रांती झाली. कमी क्षेत्रात, कमी वेळेत जास्त उत्पादन घेणे गरजेचे बनले होते. त्यासाठी रासायनिक शेती मोठय़ा प्रमाणात विस्तारत गेली असताना दुसरीकडे रासायनिक खते, कीटकनाशकांच्या सततच्या माऱ्यामुळे शेती उत्पादने नैसर्गिक म्हणण्यापेक्षा विषयुक्त बनत गेल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळेच अलीकडे पुन्हा नैसर्गिक म्हणजेच सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत चालला आहे. सोलापूर जिल्ह्यातही अशा नैसर्गिक तथा सेंद्रिय शेतीचे प्रयोग वाढले आहेत.

सांगोला तालुक्यातील जवळा येथे भोपसेवाडीत राहणारे माध्यमिक शिक्षक श्रीपती तुकाराम वगरे यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतात अवघ्या २० गुंठय़ांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रयोग गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतला असता पहिल्या दोन वर्षांत अपयश आले. तिसऱ्या वर्षांत मात्र चांगले यश आले आहे. हा अनुभव पाठीशी घेत वगरे हे सेंद्रिय शेतीचा विस्तार करण्याच्या तयारीत आहेत. अवघ्या अर्ध्या एकर क्षेत्रात त्यांनी रासायनिक खते, कीटकनाशके टाळून संपूर्णपणे सेंद्रिय पध्दतीने सूर्यफुलाची शेती यशस्वी केली आहे. ही शेती पाहण्यासाठी, सेंद्रिय शेतीविषयीची उत्सुकता जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे आसपासच्या बहुसंख्य गावांतील शेतकरी येत असतात. त्यामुळे वगरे यांचे शेत म्हणजे सध्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे उत्तम स्थळ बनले आहे.

वगरे हे सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळेत सहशिक्षक म्हणून सेवेत आहेत. त्यांची जवळा शिवारात साडेचार एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे. जमीन काळी, कसदार असली तरी पाणी अपुरे आहे. त्यामुळे वगरे कुटुंबीय आतापर्यंत कमी पाण्यावरची पारंपरिक शेती करायचे. पाण्याचा वापर प्राधान्याने एक एकरातील डािळब बागेसाठी केला असल्यामुळे अन्य पिकांची अवस्था नगण्य अशीच राहिली आहे. सध्या तेल्या रोगासह मरसारख्या नव्या घातक रोगाच्या प्रादुर्भावाने डाळिंब बागा पुन्हा संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे वगरे यांनी तीन वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतीचा विचार कृतीत आणला. पहिली दोन वर्षे हाती काही लागले नाही. शेतात यापूर्वीच मोठय़ा प्रमाणात शेणखत आणून टाकले होते. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा प्रयत्नांचा भाग म्हणून वगरे यांनी सूर्यफुलाची सेंद्रिय शेती करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मुहूर्तमेढ रोवण्याच्या दृष्टीने बाजारात सूर्यफुलाच्या बियाणांची शोधाशोध सुरू केली. परंतु बियाणांची प्रचंड टंचाई जाणवत होती. शेवटी महत्प्रयासाने एका बियाणे विक्रेत्याकडे कर्नाटकातील मालतेश नावाच्या सूर्यफूल बियाणाची दोन किलो वजनाची एकच पिशवी मिळाली. दीड हजार रुपये मोजून घेतलेल्या या बियाणांपैकी निम्मेच म्हणजे एक किलो बियाणांची पेरणी करण्यासाठी वगरे यांनी अर्ध्या एकरातील शेतजमिनीची मशागत केली. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रत्यक्ष बियाणांची लागवड केली. जमीन काळी, हवामान अनुकूल आणि पाण्याचीही गरज कमी प्रमाणात होती. त्यामुळे सूर्यफूल लागवडीनंतर तीन महिन्यांत तीनवेळा पाणी दिले. त्यासाठी ठिबक सिंचन किंवा अन्य आधुनिक सुविधांऐवजी पारंपरिक पाटानेच पाणी देण्यात आले. सुरुवातीला नमूद केल्यानुसार शेतात पाच ट्रॅक्टर ट्राॅल्यांमधून शेणखत आणून टाकले होते. त्यासाठी प्रति ट्रॅक्टर पाच हजार रुपयांप्रमाणे २५ हजार रुपये खर्च आला. हे शेणखत एकदा शेतात टाकले की पुढे पाच वर्षांपर्यंत त्याचे काम चालते.

सूर्यफूल लागवडीनंतर टप्प्याटप्प्याने पाटाने पाणी देत असताना पिकाची वाढ तेवढय़ाच झपाटय़ाने होत गेली. दुसरीकडे कोणतीही रोगराई निर्माण झाली नाही. सूर्यफुलाची वाढ इतक्या वेगाने झाली की सध्याच्या परिस्थितीत सूर्यफुलाचे ताटवे नऊ ते दहा फूट उंच झाले आहेत. तर वाढ झालेल्या सूर्यफुलाचा व्यास तब्बल सव्वा ते दीड फुटापर्यंत झाल्याचे दिसून येते. सूर्यफुलाचे ताटवे सर्वसाधारणपणे पाच ते सहा फुटांपर्यंत वाढतात. सूर्यफुलाचा आकारही अर्धा ते पाऊण फूट आणि सरासरी वजन पाव ते अर्ध्या किलोपर्यंत होते. परंतु वगरे यांच्या शेतातील सूर्यफूल उंच वाढत व्यासही दीड फुटापर्यंत दिसत असताना त्याचे वजनही दीड किलोपर्यंत भरले आहे. एवढा भार पेलण्याची क्षमता ताटव्यांमध्ये निर्माण झाली ती सेंद्रिय शेतीमुळे म्हणजेच शेणखतामुळे, असे वगरे सांगतात. सूर्यफूल शेतात आंतरपीक म्हणून गाजराचे पीक घेण्यात आले आहे. शेणखतामुळे गाजराची लांबी आणि वजनही चांगले वाढले आहे. शिवाय हे गाजर खायला चविष्ट झाले आहे. सूर्यफुलाचे बियाणे ठरवून आणले नाही तर केवळ उपलब्ध होते म्हणून आणले. त्याचा वेगळा अभ्यास करावा लागला नाही. सुदैवाने हे बियाणे सकस, पोषक ठरल्याचे वगरे यांनी नमूद केले.

रासायनिक खते, कीटकनाशके वापरायची म्हटल्यास त्यासाठी सुमारे किमान दहा हजार रुपयांचा खर्च झाला असता. मशागत आणि बियाणांसाठी साडेतीन हजार रुपये खर्च झाला. केवळ एकाच हंगामासाठी नव्हे तर पाच वर्षे वापरात येणाऱ्या शेणखतासाठी २५ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. म्हणजेच पुढील आणखी दोन वर्षे शेणखताचा वापर करता येणार आहे. त्यासाठी वेगळा खर्च करावा लागणार नसल्याचा दावा वगरे करतात. मजुरीचाही वेगळा खर्च झाला नाही. शाळेच्या कामकाजाची वेळ सोडून दररोज भल्या सकाळी काही वेळ आणि साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी शेतात काम करणे शक्य होते. पत्नी आणि दोन्ही छोटय़ा मुलांची साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या शेतातील सूर्यफूल परिपक्व होऊन काढणीस आले आहे. यात सुमारे १२ क्विंटल सूर्यफूल मिळण्याची अपेक्षा असून सूर्यफूलाचा दर प्रतिक्विंटल पाच हजार रुपये आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते. अर्ध्या एकरात सूर्यफुलाचे उत्पन्न ६० हजारांपर्यंत मिळण्याची वगरे यांना आशा आहे.

मागील २५-३० वर्षांत शेतीसाठी रासायनिक खतांचा वारेमाप वापर झाल्यामुळे सुरुवातीच्या काळात शेती उत्पादकता वाढली. उदाहरणार्थ डाळिंब बागांमध्ये लागवड केलेला गणेश डािळब साधारणपणे एक किलो वजनापर्यंत भरून यायचा. परंतु आता त्याचे वजन घटत ४०० ग्रॅमपर्यंत आले आहे. तीच गोष्ट सूर्यफुलाची म्हणता येईल. सुरुवातीला रासायनिक खते वापरून सूर्यफुलाची लागवड व्हायची. तेव्हा उत्पादन झालेल्या सूर्यफुलाचा आकार सव्वा ते दीड फूट व्यासापर्यंत दिसायचा. परंतु वारंवार रासायनिक खतांचा अतिरेकी वापर झाल्याने जमिनीचे आरोग्यच बिघडत गेले. त्यामुळे सूर्यफुलाचा आकार घटत गेला. तर याउलट जमिनीचे आरोग्य उत्तमप्रकारे सांभाळून सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे एक तर विषमुक्त शेतीमाल तयार होतो आणि दुसरीकडे सूर्यफुलासारख्या शेतीमालाचा आकार वाढू शकतो. श्रीपती वगरे यांनी तीन वर्षे आपल्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर केल्याने त्यांच्या शेतजमिनीची प्रत वाढली आहे. परिणामी, उत्पादित शेतीमाल गुणवत्तापूर्ण होण्यास मदत झाली आहे. त्याचे उत्तम दृश्य परिणाम श्रीपती वगरे यांच्या शेतीच्या माध्यमातून दिसतात. 

– अंकुश पडवळे,  राज्य शासनाचे कृषिभूषण पुरस्काराचे मानकरी, मंगळवेढा