|| महेश सरलष्कर

जम्मू-काश्मीरमधील धुमश्चक्रीमुळे फरपट झालेल्या मुलींचे आयुष्य उजळविण्यासाठी अधिक कदम हा मराठी तरुण ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम करतो आहे. या संस्थेचे बालिकाश्रम म्हणजे या मुलींसाठी आनंदाचे घरच. शांततेने जगण्याची आस असलेली नवी पिढी ही संस्था घडवत आहे.  याच मुली काश्मीर आणि उर्वरित भारत यांच्यातील घनिष्ठतेचा दुवा ठरतील, असा विश्वास अधिकला वाटतो.

Tamil Nadu teacher's unique video to capture happy student faces is viral
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शिक्षिकेने केले असे काही…..Viral Video पाहून पोट धरून हसाल!
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनची नोंदणी पुण्यातली. संस्था जम्मूबरोबरच काश्मीर भागात अनंतनाग, श्रीनगर, बिरवा आणि कुपवाडा अशा पाच ठिकाणी बालिकाश्रम चालवते. प्रत्येक केंद्रात सुमारे ५०, अशा पाच केंद्रांत  २५० हून अधिक मुलींच्या राहण्याची, शिक्षणाची व्यवस्था ‘बोर्डरलेस’ करते. इथे आलेल्या प्रत्येक मुलीला जम्मू-काश्मीरमधील धुमश्चक्रीचा फटका बसला आहे. कोणाला आई नाही, कोणाला वडील नाहीत. कोणा मुलीचे आई-वडील दोघेही मारले गेले आहेत. वडील गेल्यानंतर आईने दुसरे लग्न केल्यामुळे मुलगी बेघर झाली आहे. या मुलींना ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या रूपात आधार सापडला आहे.

मूळचा अहमदनगरचा असलेल्या अधिक कदमने २००२ मध्ये जम्मू-काश्मीरच्या आपत्तीग्रस्त भागांमधील मुलींना चांगले आयुष्य जगण्याची संधी देणारी ‘बॉर्डरलेस’ ही संस्था सुरू केली. त्याआधीपासून म्हणजे १९९७ पासून तो या सगळ्या परिसराशी जोडला गेला होता. दहशतीच्या सावटाखालील मुस्लीमबहुल भागात एक काश्मीरेतर तरुण स्थानिक मुलींच्या विकासासाठी २२ वर्षे अखंड काम करतो आणि स्थानिक लोकांचा विश्वास मिळवतो, या काश्मिरी मुलींना नव्याने जगण्याची उमेद देतो , हे अचंबित करणारे आहे.

राज्यशास्त्राचा विद्यार्थी असलेला अधिक १९९६ मध्ये जम्मूमध्ये आला. तिथून तो काश्मीर खोऱ्यात फिरला. त्याचा १५ दिवसांचा दौरा सहा महिने लांबला. मग तो दरवर्षी काश्मीरला येत गेला. कारगील युद्धाच्या काळात तिथे राहिला, तिथल्या लोकांना त्याने मदतीचा हात दिला. ‘शस्त्रसंघर्षांत होरपळलेल्या मुलां’संबंधीचे ‘युनिसेफ’बरोबरचे सर्वेक्षण करण्यासाठी अधिक अख्खा काश्मीर फिरला. त्यानंतर मात्र त्याला वाटू लागले की काश्मीरमध्ये राहूनच काम केले पाहिजे. हा मराठी गडी जम्मू-काश्मीरमध्ये राहून सामाजिक कार्य करतोय, त्याला आता २२ वर्षे झाली आहेत. काश्मीरमधील शस्त्रसंघर्षांत लहान मुले आणि मुली होरपळलेली आहेत, पण अधिकने मुलींसाठीच बालिकाश्रम काढण्याचा निर्णय घेतला. या मुली मोठय़ा होतील, लग्न करतील तेव्हा त्यांच्या मुलांना त्या संघर्षांच्या मार्गापासून दूर नेतील हा अधिकचा दृष्टिकोन आहे. त्याला हळूहळू यशही येऊ लागले आहे.

केंद्रात आलेल्या प्रत्येक मुलीची एक करुण कहाणी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी ‘बॉर्डरलेस’चे केंद्र ‘बसेरा ए-तबस्सुम’ म्हणजे ‘आनंदाचे घर’ आहे!

अधिक कदमसारखा हिंदू तरुण जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या मुस्लीमबहुल भागात बालिकाश्रम उभे करतो यामागे कोणता हेतू असेल, अशी शंका सुरुवातीच्या काळात स्थानिक लोकांच्या मनात होती. अधिकची संस्था मुलींचे धर्मातर करायला आलेली आहे, असे लोकांना सुरुवातीच्या काळात वाटत होते. मौलवींनी बालिकाश्रम बंद करण्याचा फतवा काढला होता. पण तोपर्यंत अधिकने आपल्या कामातून लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला होता. त्यामुळे मौलवींच्या फतव्याकडे लोकांनी दुर्लक्ष केले. प्रत्येक मुलीच्या राहण्याचा, कपडय़ालत्त्यांचा, वह्य़ा-पुस्तकांचा, शाळेच्या शुल्काचा खर्च संस्थेकडूनच केला जातो. त्यासाठी प्रत्येक मुलीवर वर्षांकाठी ६० हजार रुपये म्हणजे सर्व मुलींवर मिळून किमान दीड कोटी रुपयांचा खर्च होतो. हा सगळा खर्च संस्था उचलते. दोन वर्षांच्या चिमुकलीपासून अठरा वर्षांपर्यंतच्या मुली या केंद्रात राहतात. काही मुली बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे, कोल्हापूर, नाशिक, बंगळूरु, हैदराबाद, कन्याकुमारी अशा शहरांमध्ये गेल्या आहेत. त्यांचाही खर्च संस्थेने उचललेला आहे. या मुलींपैकी ज्यांना इच्छा असेल त्या मुलींनी मुंबईत ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स’सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घ्यावे, यासाठी प्रयत्न केले जातात. किमान ५० मुलींनी तरी पत्रकार व्हावे असे अधिक कदमला वाटते. पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या संवेदनशील- सजग आणि तेही महिला पत्रकार जम्मू-काश्मीरमध्ये नवी आशा घेऊन येतील, असा विश्वास अधिकला आहे.

कुपवाडय़ाच्या केंद्रात छोटेखानी उद्योग केंद्रही चालवले जाते. सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणे, कपडय़ांवर एम्ब्रॉयडरी करणे यांसारखे प्रकल्पही चालवले जातात. त्यातून खूप पैसा उभा राहत नाही, पण ते मुलींमध्ये स्वतच्या पायावर उभे राहण्याची मानसिकता जरूर निर्माण करतात. सध्या ‘बॉर्डरलेस’कडे स्वत:ची जागा नाही. त्यांचे प्रत्येक केंद्र भाडय़ाने घेतलेल्या जागेमध्ये कार्यरत आहे. ही केंद्रे सुरूच राहणार आहेत, पण संस्थेला स्थिरस्थावर व्हायचे असेल तर हक्काच्या घराची नितांत गरज आहे. जम्मू शहरात ‘बॉर्डरलेस’चे हक्काचे घर हळूहळू आकार घेऊ लागले आहे. एका वेळी किमान अडीचशे मुली राहू शकतील असे निवासस्थान बनवण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची गरज आहे. आत्तापर्यंत दीड कोटी रुपये संस्थेला जमवता आले आहेत. हे घर झाल्यावर शेजारीच शाळाही बांधण्याचा संस्थेचा इरादा आहे.

‘बीएसएफ’च्या ताफ्यात अ‍ॅम्ब्युलन्स

बरीच वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये काम करताना अधिकच्या लक्षात आले की, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) निव्वळ सीमेवर तैनात नाही, हे दल सीमेलगतच्या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर समाजसेवा करते. सीमेपलीकडून पाकिस्तानी सैनिक गोळीबार करतात. बॉम्बगोळे फेकतात. त्यात गावकरी जखमी होतात. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी ‘बीएसएफ’कडे डॉक्टर वगैरे वैद्यकीय यंत्रणा असली तरी ‘तातडीची वैद्यकीय सेवा’ पुरवणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स नव्हत्या. ‘बॉर्डरलेस’ने जम्मू भागात चार आणि काश्मीर भागात सहा अशा दहा अ‍ॅम्ब्युलन्स पुरवल्या आहेत. जम्मू भागात ‘बीएसएफ’ला अ‍ॅम्ब्युलन्स दिल्यानंतर वर्षभरात एका अ‍ॅम्ब्युलन्सने ४६८ लोकांचे प्राण वाचवले. २०१६ मध्ये काश्मीर खोऱ्यात संचारबंदीच्या काळात पाच महिन्यांत तीन अ‍ॅम्ब्युलन्सने ४७०० लोकांना मदत पुरवण्यात आली. ‘बॉर्डरलेस’ला आणखी अ‍ॅम्ब्युलन्सासाठी निधी उभा करायचा आहे.

पॅलेट गनच्या रुग्णांना दिलासा

२०१६ मध्ये श्रीनगरमध्ये काश्मिरी तरुणांनी रस्त्यावर येऊन मोठय़ा प्रमाणावर दगडफेक केली होती. त्यांना रोखण्यासाठी पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्यात शेकडो तरुणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. यातील अनेक तरुण निव्वळ घरातून बाहेर पडले आणि जखमी झाले होते. श्रीनगरमध्ये या तरुणांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नव्हते. या तरुणांवर वेळीच उपचार केले नाहीत तर ते कायमचे अंध होतील आणि असे तरुण अधिक धोकादायक ठरू शकतील हे चाणाक्षपणे टिपून अधिकने देशभर तज्ज्ञ डॉक्टरांची शोधाशोध केली. मुंबईतील विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉक्टर नटराजन आणि त्यांची १३ जणांची टीम अधिकच्या मदतीला धावून गेली. जवळजवळ १२०० तरुणांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे डोळे वाचवले गेले. त्यापैकी ४५० शस्त्रक्रिया खुद्द डॉ. नटराजन यांनी सहा महिन्यांत केल्या. डॉक्टरांच्या टीमने श्रीनगरमधील डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिले. त्यामुळे आता काश्मीरमध्ये रुग्णालयात पॅलेट गनने जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार होऊ शकतात. अधिकचे म्हणणे असे की, हे तरुण अतिरेकी नाहीत. पण अंध झालेले तरुण अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकण्याची आणि देशासाठी अधिक घातक ठरण्याची शक्यता असते.   ‘बॉर्डरलेस’ ही संस्था उद्ध्वस्त झालेल्या मुलींना केवळ आश्रय देत नाही, ती शांततेने जगण्याची आस असलेली नवी पिढी घडवते. ही संस्था ‘बीएसएफ’ला अ‍ॅम्ब्युलन्स पुरवण्यासाठी प्रयत्न करते, त्यामागे देशाची सीमा सुरक्षित राखण्याचाच प्रामुख्याने विचार आहे. हिंसाचारग्रस्त काश्मिरी मुलींना सावरत एक मराठी तरुण हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीने जाण्याची परंपरा पुढे नेतो आहे. आपणही आर्थिक मदत करून त्याला हातभार लावायला हवा.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन

  • पुण्यातील टिळक रोडवरील अभिनव कला महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या निखिल प्राइड फेज- २ या इमारतीतील ब्लॉक एफमध्ये संस्थेचे कार्यालय आहे.
  • धनादेश – ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’(Borderless World Foundation)
  • या नावाने काढावा. : धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.