कपडे, चपला, दागिने या सगळ्याच्या शॉपिंगमध्ये राहून जातात त्या अ‍ॅक्सेसरीज. अ‍ॅक्सेसरीज तुमच्या दिसण्याला परिपूर्ण करतात. कमी दरात चांगल्या दर्जाच्या, विविध प्रकारच्या या वस्तू तुमच्या सौंदर्यात भर पाडतात.
ऑफिसमध्ये सगळेच आपापली कामं करण्यात व्यग्र असतात. महिनाअखेरीस एकीचा मोबाइल वाजतो. मग तिच्या बाजूला असणाऱ्या दुसरीचा वाजतो. मग आणखी तिच्या समोरच्या एखाद्याचा. मग त्याच्या बाजूच्या मुलाचा. असं एकेक करत ही मोबाइल वाजण्याची साखळी काही मिनिटं सुरू असते. मेसेज असतो फार महत्त्वाचा. अर्थात पगार झाल्याचा..! एकतर आजकाल असे नॉर्मल मेसेजेस येणं फार कमी. कारण व्हॉट्सअ‍ॅपचा जमाना. पण, तरी बँक, मोबाइल कंपन्यांचे मेसेजेस मोबाइलमध्ये आदळत असतात. त्यामुळे असा कुठला मेसेज आला की तो कोणाचा आहे एवढंच फक्त बघून मिनिमाइज केला जातो. पण, हा महत्त्वाचा मेसेज पगाराचा आहे म्हटल्यावर त्याला डावलून कसं चालेल. तर ती ऑफिसातली मुलगी हा मेसेज व्यवस्थित बघते. पगार कधी, किती झाला हे नीट तपासते. मग चेहऱ्यावर आपसूकच एक हलकंसं हसू येतं. आणि समोर दिसू लागतात ती शॉपिंगची दुकानं..! मग बोटं आपोआपच व्हॉट्सअ‍ॅपकडे जातात आणि एखाद्या ग्रुपचा सब्जेक्ट चेंज होतो. ‘चलो शॉपिंग’, ‘शॉपिंग..
इट्स हॅपनिंग’ किंवा ‘पगार झाला, शॉपिंगला चला’ अशा सब्जेक्टचे ग्रुप्स दिसू लागतात. खरंतर मुलींना शॉपिंगसाठी काही कारण लागत नाही. पण, तरी आता कोणी थांबवू शकलं नाही तर पगाराच्या मेसेजसाठी थांबावंच लागतं. ही शॉपिंग रोजच्या आयुष्यातली असते. कपडे, चपलांव्यतिरिक्तही बारीकसारीक गोष्टी महत्त्वाच्या असतात. कानातलं, गळ्यातलं, सन ग्लासेस अशा अनेक वस्तूंची शॉपिंग महत्त्वाची ठरते. अ‍ॅक्सेसरीजची शॉपिंग आनंद देणारी असते. एकेक गोष्टी विकत घेत गेलो की त्यातल्या क्रिएटिव्हिटीच्या आपण प्रेमात पडत जातो. पगाराचा तो मेसेज आल्यानंतर शॉपिंगची स्वप्नं रंगवणाऱ्या त्या मुलीचं उदाहरण हे प्रातिनिधिक! अशी मुलगी किंवा मुलगाही आपल्याच आजूबाजूला किंवा आपल्यातच दडलेला किंवा दडलेली असेल यात तीळमात्रही शंका नाही.
शॉपिंग न करणारी, न आवडणारी मुलगी दहात एक असावी. कारण ‘शॉपिंग हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असं सांगणाऱ्या मुलींचीच संख्या जास्त आहे.
मग ती मोठाली शॉपिंग असो किंवा विंडो शॉपिंग असो. निमित्ताशिवायही मुलींचं शॉपिंग सत्र सुरूच असतं. पण, गर्ल्स, शॉपिंग करताना जरा ट्रेंडकडे लक्ष असू द्या. आता हा ट्रेंड ठिकाणापरत्वे बदलत जातो. म्हणजे कॉलेज, ऑफिस, बिझनेस अशा ठिकठिकाणी वेगवेगळे ट्रेंड दिसून येतात. कानातले म्हणजे इअरिरग्स ही चेहरा खुलवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट.
रोज कॉलेज किंवा ऑफिसला जाताना मुलींना पडलेला ‘आज कोणते कपडे घालू’ हा प्रश्न कानातल्यांबाबतीतही पडू शकतो. एक इअरिरग अनेक कुर्ते, टॉप्स किंवा पंजाबी ड्रेसवर जात असतात. त्यामुळे रोज वेगळं दिसण्यासाठी वेगळ्या कानातल्यांची गरज असते. अशा वेळी एकाच रंगाचे छोटे टॉप्स वापरता येतात. यात आकाराचं वैविध्य असतं. स्टोन, प्लास्टिक, मोती, खडे अशा वेगवेगळ्या मटेरिअलच्या कानातल्यांचा यात समावेश होतो. कुर्तीवर लटकन असलेले कानातले चांगले वाटतात. तर जीन्स-टी शर्टवर छोटे टॉप्स किंवा रिंग्स शोभून दिसतात. अशा कानातल्यांची किंमत अगदी वीस रुपयांपासून सुरू होऊन शेदीडशेपर्यंत असते. कुर्त्यांवर झुमके किंवा लटकन असलेले कानातले छान दिसतात. यात मल्टिकलर आणि सिंगल कलर असे दोन पर्याय असतात. कुर्त्यांमध्ये एकापेक्षा अधिक रंग असतील तर मल्टिकलर कानातल्यांचा वापर करता येईल. कुर्त्यांवर एकाच रंगाचे प्लेन मोठे टॉप्स घालण्याचा आताचा ट्रेंड आहे. त्यामुळे हा ट्रेंडही फॉलो करायला हरकत नाही.
कानातल्यांची निवड होताना काही वेळा लेगिंग्सच्या रंगाचाही विचार केला जातो. कारण कुर्त्यांला काँट्रास्ट दिसण्यासाठी लेगिंग्सचा रंग लक्षात घेतला जातो. चेहऱ्याच्या ठेवणीनुसारही कानातल्यांची निवड करावी.
लांब, गोल, बसका, उभा अशा चेहऱ्यांच्या विविध ठेवणीनुसार इअररिंग्स बघितले जातात. चेहरा गोल आणि छोटा असेल तर त्यावर मोठे लटकन असलेले कानातले नेहमीच चांगले दिसतात असं नाही. त्यामुळे हा विचार जरूर करावा. तरुणींमध्ये नथीची क्रेझ प्रचंड वाढतेय.
सणासुदीच्या दिवशी पारंपरिक नथ घालणं मुली पसंत करतात. पण, एरवी रोज चमकी घालण्यासाठीही मुली उत्सुक असतात. अशा नोझिरगमध्येही आता वैविध्य आलंय. फक्त खडय़ाच्या छोटय़ा नोझिरगना मुलींची जास्त पसंती असते. पण, मुली यातही प्रयोग करू पाहताहेत. बारीक रिंग, विशिष्ट आकाराची रिंग, छोटासा खडा असलेली रिंग, विविध रंगाची खडय़ांची रिंग असे असंख्य प्रकार नोझिरंगमध्ये सापडतील. हवं तेव्हा सहज काढता येऊ शकतील अशा नोझिरंगची मुली जास्त निवड करतात. यामुळे वेगवेगळ्या कपडय़ांवर नोझिरंगही बदलता येतात.
स्टोनच्या एका खडय़ाच्या अंगठय़ा सध्या जास्त इन आहेत. कानातल्यांप्रमाणेच अंगठय़ांच्या या खडय़ांचा रंगही काही वेळा लेगिंग्सवर अवलंबून असतो. तर काही वेळा नुसतीच खडय़ांची अंगठीही चांगली वाटते. हल्ली बऱ्याच जणींच्या एका हातात घडय़ाळ असतं. अशा वेळी दुसरा हात मोकळा दिसू नये म्हणून मुली एखाद्या बांगडीचा आधार घेतात. ही बांगडी सगळ्या कपडय़ांवर जाईलच असं नसतं. त्यामुळे ब्रेसलेट हा यावर उत्तम उपाय आहे. एरवी फक्त सण-समारंभांना ब्रेसलेट घातलं जातं. पण, रोजसाठीही ब्रेसलेटचे विविध पर्याय आहेत. धावपळ करताना नाजूक ब्रेसलेट घालून काही उपयोग नाही. अशा वेळी दणकट ब्रेसलेटचाच पर्याय पुढे येतो.
ऑक्सडाइज म्हणजे अँटिक ब्रेसलेट यासाठी उपयोगी ठरतात. तर रंगीबेरंगी प्लास्टिकचे ब्रेसलेट्स टॉप्स किंवा कुर्त्यांवर चांगले दिसतात. तर एखाद्या समारंभाच्या वेळी एखादं खडय़ाचे नाजूक ब्रेसलेट कपडय़ांना सुंदर लुक देतात. अँटिकमध्येच आता एकच मोठं कडं किंवा तीन-चार मध्यम मापाच्या बांगडय़ा एकत्र करून घालण्याचाही ट्रेंड आहे. अँटिक अ‍ॅक्सेसरीज दिसायला महाग वाटत असली तरी त्यात कमी दराच्या अ‍ॅक्सेसरीज मिळतात. जीन्स किंवा लेगिंग्सची उंची आता कमी होतेय. ‘अँकल लेन्ग्थ जीन्स दाखवा’ असं दुकानदाराला सांगताना सर्रास ऐकायला मिळतं. याचं कारण म्हणजे अँकल लेन्ग्थ जीन्स किंवा लेगिंग्स घातल्यानंतर दिसलं जाणारं अँकलेट. अँकलेट्समध्येही आता अनेक प्रकार बघायला मिळतात. जाड, बारीक डिझाइनचे, अँटिक, एकाच रंगाचे, दोन रंगांचे कॉम्बिनेशन असलेले, स्टोनचे, सोनेरी, चंदेरी असे अनेक प्रकार यात आहेत. एकाच पायात घातलं जाणारं अँकलेट एकदम स्टायलिश वाटतं. तसंच कानातल्यांप्रमाणे अँकलेटही कपडय़ांनुसार बदलता येतं. त्यामुळे अँकलेटचंही कलेक्शन करायला हरकत नाही. कमी दरातले पण, चांगल्या दर्जाचे आणि व्हरायटी असलेल्या अँकलेटचा सहज संग्रह होऊ शकतो.
सण, समारंभ सोडले तर इतर वेळी गळ्यात एखादी चेन किंवा तत्सम काही तरी घालावं असा विचार सरसकट सगळ्याच मुली करतात असं नाही. गळ्यात घालायचं म्हणजे ते सोनेरी, मोत्यांचं, खडय़ांचं असं काही तरी घालावं लागेल असा त्यामागचा समज चुकीचा आहे. तर त्यातही आता बरेच पर्याय आहेत. जीन्स टॉप्सवर चंदेरी रंगाची मोठी चेन आणि त्याला एक मोठं पेंडंट हा प्रकार अलीकडे मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळतो. त्यात वेगवेगळ्या डिझाइन्सचे पेंडंट असतात. आकारही लहान-मोठा असा मिळतो. तसंच याची किंमतही फार नसते. यातल्या पेंडंटमध्ये स्टोनचा किंवा अन्य खडा असेल तर तो टॉपला काँट्रास्ट जाईल असा बघावा, कारण तरच ते पेंडंट उठून दिसेल. स्टेटमेंट नेकपीस या अ‍ॅक्सेसरीजचा ट्रेंडही सध्या जोरात आहे. गळ्याला बऱ्यापैकी घट्ट बसतो. वेगवेगळ्या रंगांच्या स्टोनस्चा हा नेकपीस टीशर्टवरही वापरू शकता.
तर कुर्त्यांवरही पारंपरिकतेकडे झुकणारे नेकपीस बाजारात असतात. ऑफिसला जाताना कॉर्पोरेट लुकवरही हा नेकपीस अतिशय सुंदर दिसतो. फॉर्मल पँट, इनर आणि त्यावर जॅकेट या पेहरावावर रंगानुसार नेकपीस घातला की वेगळा लुक येतो. याचीही किंमत फार नसते.
दीडशे-दोनशे रुपयांपासून हे नेकपीस मिळतात. सणासुदीला शॉपिंग केले जातेच. पण, इतर वेळी कॉलेजऑफिसमध्ये जाण्यासाठी खास शॉपिंग केलं जातं ते फक्त कपडय़ांचंच. बाकी अ‍ॅक्सेसरीजचं शॉपिंग कॉलेजऑफिसला येता-जाता केलं जातं. असं न करता ठरवून फक्त अ‍ॅक्सेसरीजचं शॉपिंग करायला काहीच हरकत नाही. या अ‍ॅक्सेसरीजचं महत्त्व खूप आहे. कपडे कितीही चांगले घातले तरी त्यावर अ‍ॅक्सेसरीज घातल्यानंतरच ते खुलून दिसतात. नेहमी सगळे अ‍ॅक्सेसरीज घालायला हवं असं नाही. पण, किमान एखादं कडं, गळ्यात एखादी चेन आणि इअरिग्ज घातल्या तरी उठून दिसतं. यात आणखी एक गोष्ट वाढली ती म्हणजे हेअरबॅण्ड्स. काही काळापूर्वी हेअरबॅण्ड्स घालून कोणी दिसलं तर ‘शाळेत जातेस का?’ किंवा ‘हे काय लहान मुलीसारखं.’ असं बोललं जायचं. पण, आता असे हेअरबॅण्ड्स घालणारी मुलगी ट्रेंडी वाटते. अर्थात हे हेअरबॅण्ड्स शाळेसारखे लाल किंवा काळ्या रंगाचेच नसतात. तर वेगवेगळ्या डिझाइन्सचे, रंगाचे, आकाराचेही असतात. रोज ऑफिस, कॉलेजला जाताना घालण्यासाठी एकदम साध्या हेअरबॅण्ड्सचाही यात समावेश आहे. तर काही वेळा टीशर्टवर एखादा बो असलेला हेअरबॅण्डही छान दिसतो.
असा बबली लुक हल्ली मुलींना आवडतो. ऑफिसला जाताना फॉर्मल्सवरही डिसेंट वाटतील असे हेअरबॅण्ड्स बाजारात कमी किमतीत सहज उपलब्ध आहेत.
‘मुलींच्या पर्समध्ये अख्खी दुनिया असते’ असं गमतीने, उपहासाने, चेष्टेने, रागाने पुरुष मंडळी बोलत असतात. काही अंशी ते खरंही आहेच. खरंच त्यांच्या पर्समध्ये जमेल तितकं सगळं सामान असतं. एवढं सगळं सामान ठेवायचं म्हणजे मोठी पर्स नको का?
त्यामुळे बहुतांशी महिलांकडे पर्सचंही चांगलं कलेक्शन असतं. ऑफिसची पर्स, फिरायला जातानाची पर्स, शॉपिंगची पर्स, छोटी पर्स, मोठी पर्स, पारंपरिक पेहरावावर जाईल अशी पर्स अशा अनेक पर्स मुलींच्या कपाटात रांगेत मांडलेल्या असतात. मुलींची पर्सची आवड लक्षात घेता बाजारातही असे अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. बॅग, स्लिंग बॅग, शॉपिंग बॅग, शॉपिंग टोट्स, क्लच असे विविध प्रकार यात आहेत.
ऑफिससाठी अनेक जणी लेदर पर्सेसना प्राधान्य देतात. पण, ही पर्स मोठी, सुटसुटीत, बऱ्याच कप्प्यांची आहे की नाही हे मात्र आवर्जून बघितलं जातं.
लेदर पर्सची किंमत तुलनेने जास्त असते. पण, दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि ऑफिस लुक येण्यासाठी याला प्राधान्य असतं. काही जणी सॅकचाही वापर करतात. त्यातही आता वेगवेगळे प्रकार, डिझाइन आहेत. त्यामुळे त्यात वापरले गेलेले रंग फ्रेश लुक देतात. हे झालं रोजच्या प्रवासासाठी वापरात असलेल्या बॅग्सचं. इतर वेळी शॉपिंगला जाताना मात्र ही रोजचीच बॅग अपुरी पडते. मग अशा वेळी शॉपिंग टोट्स कॅरी केले जातात. या शॉपिंग टोट्सचा आकार मोठा आणि हँडल छोटं असतं. दिसायला ट्रेंडी आणि फॅशनेबल असते. त्यामुळे ‘स्टाइलमें शॉपिंग’ करण्याचा फिल येतो.
हे टोट्स ऑफिसला जातानाही वापरले जातात. पण, यात आकार छोटा आणि लुक थोडा वेगळा असतो. एरवी सिनेमा किंवा डिनरला वगैरे जायचं असेल तर एवढी मोठी बॅग कशाला असा विचार मनात डोकावतो. मग अशा वेळी स्लिंग बॅगचा पर्याय खुणावतो. स्लिंग बॅग्समध्ये असंख्य पर्याय आहेत. स्लिंग बॅग कॅरी करायलाही फार सोयीस्कर आहे.
सणसमारंभांना पारंपरिक लुकवर नेहमीची ऑफिसची बॅग घेणं थोडं विचित्र दिसतं. पण, मेकअपचं थोडंफार सामान तर सोबत हवं असतं. अशा वेळी क्लच उपयोगी पडतो. खडे, सोनेरी, चंदेरी रंगाचे पारंपरिक लुकला साजेसे असे क्लच तरुणींमध्ये लोकप्रिय आहेत.
‘क्लच’ या नावावरून अनेकदा पुरुष मंडळी मस्करी करतात. ‘गाडीचा क्लच का’ असंही विचारतात. पण, हा क्लच समोर आला की सब की बोलती बंद असं होतं. प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत असं सगळेच सगळीकडे आता म्हणतात. त्यात तथ्यही आहे. पण, आता मुलंही मुलींच्या खांद्याला खांदा लावून एका क्षेत्रात उभे आहेत. ते म्हणजे शॉपिंगचं!
मुलींची शॉपिंग हा चर्चेचा विषय असतो. मग त्या मुली खरेदी करताना दहा दुकानात फिरतात कशा इथपासून दुकानदाराशी किमतीबाबत हुज्जत घालतात कशा इथवर ही चर्चा रंगते. आता या सगळ्यात मुलंही पुढे आहेत.
फरक इतकाच की त्यांना खरेदीला अजून तरी फार वेळ लागत नाही. पण, खरेदीची त्यांचीही यादी आता मोठी होत चालली आहे. बेल्ट, टाय, ब्रेसलेट, कडं, इअरिरग्स, भिकबाळी, वॉलेट अशा वस्तूंची विंडो शॉपिंग आता तेही करतात.
हल्ली बऱ्याचशा ऑफिसमध्ये टाय अनिवार्य केला आहे. त्यामुळे पुरुषांच्या खरेदीत टायची भर पडली आहे. शर्टवर काँट्रास्ट अशा टायला जास्त पसंती असते. शर्टाचा रंग गडद असेल तर त्याच रंगाची फिकट छटा असलेला टाय घेण्याचाही ट्रेंड आहे. प्लेन किंवा डिझाइन अशा दोन्ही प्रकाराला पसंती असते. टायच्या कपडय़ाबाबत मात्र ही निवड व्यक्तिपरत्वे बदलत जाते.
बेल्टचंही तसंच आहे. साधारणपणे काळ्या रंगाची पँट घालण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तपकिरी किंवा अन्य कोणत्या रंगाचा बेल्ट फार चांगला दिसत नाही. त्यामुळे काळ्या रंगाच्या बेल्टचाच पर्याय स्वीकारला जातो. ही निवड इतर काही रंगांच्या पँटसाठी बदलली जाऊ शकते. बेल्टची शॉपिंग करताना बेल्टच्या हुकचा विचार महत्त्वाचा ठरतो. साधारणपणे आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या हुकला प्राधान्य द्यावं कारण ऑफिसात फॉर्मल लुक हवा असतो. या बेल्टच्या हुकला काही वेळा खडे लावलेले दिसतात.
दिसायला ते चांगलं वाटत असलं तरी त्यात पसंतीही महत्त्वाची असते. पण, काहींना खडय़ांचं असणं आवडतं त्यामुळे अशा प्रकारच्या बेल्ट्सनाही मागणी आहे. बेल्टमध्येही प्लेन आणि रेषांच्या बारीक-जाड डिझाइन असतात. टाय, बेल्ट या ‘इतर’ गोष्टी वाटत असल्या तरी तुमच्या पेहरावाला त्या परिपूर्ण करतात. त्यामुळे त्यांची शॉपिंग फावल्या वेळेत किंवा करायची म्हणून कधीच करू नये. विचार करूनच या शॉपिंगसाठी बाहेर पडावं. सलमान खान हा मुलांचा आयकॉन. म्हणूनच त्याच्या हातातलं निळ्या रंगाचा स्टोनचा खडा असलेलं चांदीचं ब्रेसलेट अनेकांच्या मनगटावर दिसतं.
सगळ्यांनाच चांदीचं करणं शक्य नसल्यामुळे काही चांदीचं कोटिंग असलेलं त्याच डिझाइनचं ब्रेसलेट बनवून घेतात. ब्रेसलेटची क्रेझ मुलांमध्ये वाढताना दिसतेय. साखळीसारखं बारीक डिझाइन असलेलं ब्रेसलेट ऑफिसगोअर्ससाठी शोभून दिसतं. तर काहींना नाजूक ब्रेसलेटपेक्षा मोठं ठसठशीत कडं जास्त आवडतं. यातही पेहरावानुसार विविध स्टाइल, डिझाइनचे कडं मिळतात. मुलांचा कल जास्त करून चंदेरी रंगाकडे असतो. एखाद्या मुलाच्या कानात छोटे खडय़ाचे टॉप्स बघितले तर ‘मुलींसारखं कानात काय घालतोस?’ असं चटकन बोललं जायचं.
पण, आता ही गोष्ट ट्रेण्डी होऊ लागली आहे. केवळ कॉलेजातली मुलं असे कान टोचून इअरिरग्स घालत नाहीत. तर यामध्ये ऑफिसात जाणाऱ्या मुलांचंही प्रमाण जास्त आहे. फरक इतकाच की ऑफिसला जाणाऱ्या मुलांच्या इअरिरग्स साध्या बारीक खडय़ाच्या असतात.
कॉलेज गोइंग मुलं मात्र यात वेगवेगळे प्रयोग करत असतात. यात विविध रंगांचे बारीक खडे येतात. ते साधं, सुंदर दिसतं. हे इअरिरग फक्त एकाच कानात घालण्याचीही फॅशन आहे. नाजूक रिंग्सही यात छान वाटतात. मुलींसारखं दिसेल किंवा कोणी तरी चिडवील हा विचार आता कोणीही करत नाही. ‘कुल डय़ुड’ लुक दिसतोय ना, मग झालं तर..
असा मुलांचा पवित्रा असतो. अर्थात असा विचार त्यांना चांगलाच लुक देतोय यात शंका नाही. मुलींमध्ये जसं पारंपरिक लुकसाठी नथीची क्रेझ आलीय तसं मुलांमध्ये भिकबाळीची फार चलती आहे सध्या. पण, भिकबाळीचं एक वैशिष्टय़ असं की, ती रोज घालता येऊ शकते. म्हणजे अमुक एका पेहरावावरच ती अधिक चांगली दिसत,े असा अट्टहास नसतो. फक्त ज्यांच्या ऑफिसात चालत नाही त्यांची मात्र काहीशी पंचाईत होते. पण, अशा वेळी त्यांनी सहज काढता-घालता येऊ शकते, अशा भिकबाळीची शॉपिंग करायला काहीच हरकत नाही.
खडय़ाची, अँटिक भिकबाळी सध्या इन आहे. दुकानात गेल्यावर पहिलीच बघितलेली वस्तू आवडली तर ती चटकन घेऊन पाचव्या मिनिटाला दुकानाबाहेर पडणाऱ्या मुलांची संख्या आजही तशी बरीच आहे. पण, यालाही अपवाद आहेतच. समजून-उमजून शॉपिंग करणारे बारीकसारीक गोष्टींचाही प्रचंड विचार करतात. वॉलेट या अत्यंत महत्त्वाच्या वस्तूच्या खरेदीतही आता शंभरदा विचार केला जातो. मुलांचं वॉलेट आकाराने लहान असलं तरी त्यात सामान बरंच असतं. त्यामुळे ते फुगतं.
असं वॉलेट पँटच्या खिशात ठेवलं की त्याचा त्रास होतो. या कारणास्तव वॉलेट थेट बॅगमध्ये रवाना होतं किंवा वॉलेट वापरणंच बंद होतं. मग यावर तोडगा काय? तर तोडगा असा की लहान आकाराचे, न फुगणारे, बेल्ट असणारे वॉलेट्स आता मिळतात. अशा वॉलेट्समुळे येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि वॉलेट वापरल्याचंही समाधान मिळतं. विविध मोठय़ा ब्रॅण्ड्सने असे वॉलेट्स बाजारात आणले आहेत. मोठे ब्रॅण्ड्स असले तरी या वॉलेट्सची कमीत कमी किंमत तीनशे ते पाचशे इतकी आहे.
थोडक्यात काय, कपडय़ांसोबतच या लहानसहान अ‍ॅक्सेसरीजही महत्त्वाच्या असतात. याची शॉपिंग केली तरी यातली एकही गोष्ट वाया जात नाही किंवा आपण हे का घेतलं, असा प्रश्नही पडत नाही. कारण ठरवलेल्या पेहरावावर घेतलेले कानातले काही काळानंतर दुसऱ्या कपडय़ांवर शोभून दिसतात.
त्यामुळे अशा अ‍ॅक्सेसरीजला लगेच मरण नक्कीच नाही. उलटपक्षी याचा संग्रह करणं केव्हाही उत्तम. संग्रह असला की त्यात घरच्या घरी प्रयोगही केले जातात. तसंच किमतीने या फार महाग नसल्यामुळे याची शॉपिंग दोन महिन्यांतून एकदा केली तरी हरकत नाही. यामुळे फॅशनचा चालू ट्रेण्डही फॉलो केला जाईल. किमतीने कमी पण, सौंदर्याची हमी असं असतं या अ‍ॅक्सेसरीजचं..!
चैताली जोश