एजाजहुसेन मुजावर
शेती हा व्यवसाय सतत अनिश्चित मानला जातो. यामुळे शेतकरी सतत ज्या पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे, त्याच्या मागे धावत असतो. यानुसारच यंदा सोयाबीन पिकाची लागवड उत्तरोत्तर वाढत आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात, कमी कष्टात आणि हमखास बाजारभाव मिळण्याच्या शाश्वतीमुळे सोलापूरमध्ये शेतकरी सोयाबीनकडे मोठय़ा प्रमाणात वळू लागले आहेत.




शेतीमालाला किफायतशीर भाव मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे शेती तोटय़ातच जाते. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. त्यांच्या आयुष्याला स्थैर्याचा आधार मिळण्याची आशा मावळते. एखाद्या शेतीमालाला बाजारात सुदैवाने चांगला भाव मिळत असेल आणि भविष्यातही चांगल्या भावासंबंधीचा अंदाज असेल तर शेतकरी त्या शेतीमालाच्या उत्पादनाला प्राधान्य देतात. सध्या सोयाबीन पिकाची लागवड उत्तरोत्तर वाढत आहे. शेजारच्या मराठवाडा भागात सोयाबीनचे भरमसाठ उत्पादन होत असताना कमी कालावधीत, कमी खर्चात, कमी कष्टात आणि हमखास बाजारभाव मिळण्याची शाश्वती यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातही बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसारख्या भागात सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. सध्याच्या खरीप हंगामात उच्चांकी स्वरूपात म्हणजे मागील वर्षीच्या दुप्पट दीड लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत सोयाबीनची लागवड झाली आहे.
महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून मानले जाणारे सोयाबीन हे कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते. हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. एकीकडे सोलापूर जिल्ह्यात खरीप क्षेत्रात वाढ होत असली तरीही हा जिल्हा अजूनही रब्बी पिकांच्या हंगामाचा म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामात घेतले जात असताना या पिकाची लागवड सोलापुरात फार मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असते. एकूण प्रथिनांपैकी ६० टक्के प्रथिने सोयाबीनपासून तयार होतात, हे शेती शास्त्रज्ञ सांगतात. सोयाबीन पीक घेतल्यानंतर राहिलेला उर्वरित भाग पशुपक्ष्यांसाठी पौष्टिक आहार म्हणून उपयोगात आणला जातो. सोयाबीनपासून बिस्कीट, सोयामिल्क, सोयावडीसारखे अनेक उपपदार्थ तयार करता येतात. सोयाबीनचा पालापाचोळा शेतात जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, असेही मानले जाते.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आदी ठरावीक तालुक्यांमध्ये सोयाबीनची लागवड झपाटय़ाने वाढली आहे. पाच वर्षांपासून या पिकाच्या लागवडीचा सोलापुरातील आढावा घेतल्यास २०१७ पर्यंत या पिकाची लागवड खूपच मर्यादित म्हणजे अवघ्या ३३५८ हेक्टर क्षेत्रात होती. त्यानंतर त्याचे लागवड क्षेत्र वाढू लागले. २०१८ साली ३५ हजार ३७ हेक्टर, २०१९ साली ३४ हजार ९१० हेक्टर, २०२० साली ३९ हजार १०० हेक्टर आणि मागील २०२१ वर्षांत त्यात पुन्हा वाढ होऊन ६९ हजार ३७२ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली होती. यंदाच्या वर्षी चालू खरीप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली आहे.
सोयाबीन पिकासाठी उष्ण हवामान आणि साधारणत: १८ ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत तापमान अनुकूल ठरते. सोलापूर जिल्ह्यातील पावसाची सरासरी ४८१ मिलिमीटर इतकी असली तरी प्रत्यक्षात मागील तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ५४३ मिमीपासून ७४८ मिमीपर्यंत सरासरी पाऊस पडत आहे. हा पाऊस सोयाबीन पिकासाठी पोषक मानला जातो. सोयाबीनची १५ जून ते १५ जुलैदरम्यान पेरणी केली जाते. सोयाबीनची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे अपेक्षित असते. सोयाबीन लागवडीसाठी चांगला निचरा होणारी मध्यम ते उच्च दर्जाची, गाळाची जमीन उपयुक्त ठरते. पाणी साठून राहणाऱ्या आणि हलक्या दर्जाच्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन तुलनेत कमी येते.
सोयाबीन लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत शास्त्रज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसार सोयाबीन बियाणे ४५ बाय ५ सेंमी अंतरावर पेरावे लागते. पेरणी करताना बियाणे ३ ते ५ सेंमीपेक्षा जास्त खोल जाणार नाही, याचीही दक्षता घेणे आवश्यक ठरते. शेतात वाफशावर पेरणी अनुकूल ठरते. सोयाबीनची उगवण झाल्यानंतर शक्य असल्यास गरजेनुसार पाणी द्यावे लागते. सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित वाणांचा विचार करावा लागतो. एकरी ३० किलो बियाणे पेरणीसाठी वापरले जाते. एमएसीएस ११८८, एमएसीएस ४५०, एमएसीएस ५८, एमएसीएस १२४, फुले कल्याणी (डीएस २२८), फुले अग्रणी (केडीएस ३४४), शक्ती जेएस ९३०५ अशा विविध सुधारित वाणांचा पेरणीसाठी वापर केला जातो. बियाणे प्रक्रिया करणे, सुधारित जातींची बियाणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा वापर, कीड व रोगांचा आणि तणांचा वेळच्या वेळी बंदोबस्त इत्यादी बाबी सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी आवश्यक आहेत. पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी एक कोळपणी, ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी लागते. याशिवाय गरजेनुसार खुरपण देऊन पिकातील तण काढून टाकणे आवश्यक असते. तणनाशक वापरून सोयाबीन पिकामधील तणांवर नियंत्रण मिळविता येते. सोयाबीन पिकाला पाने खाणाऱ्या अळय़ा, खोडमाशी या किडींसह तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. खोडामाशीचा उपद्रव होऊन पिकाच्या प्राथमिक अवस्थेत रोपाचे एखादे पान वाळून जाते. रोपांवर जमिनीपासून काही अंतरावर छिद्रेही पडतात. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात घट होते. पाने खाणारी स्पोडोप्टेरा किडीची अंडी समूहात घातली जातात. अळय़ाही सुरुवातीला पानावर समूहानेच उपजीविका करतात. या परिस्थितीत पानांचा पापुद्रा शाबूत ठेवून केवळ त्यातील हरितद्रव्य संपुष्टात येते. त्यामुळे हिरवी दिसणारी पाने पांढरट पडून पारदर्शक होताना दिसून येतात. त्यानंतर अळय़ा स्वतंत्रपणे उपजीविका करण्यासाठी शेतात सर्वत्र पसरतात. वाढलेले शरीर, वजन आणि वाढलेली भूक यामुळे अळय़ा अधाशासारख्या पानांवर तुटून पडतात. सोयाबीन शेंगातील दाणेही खाऊ लागतात. किडीच्या उपद्रवाचा वेळीच अंदाज घेऊन पिकाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाय करणे जरूरीचे असते.
सोयाबीन पिकावर बुरशीजन्य तांबेरा रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके येतात आणि पाने तपकिरी पडतात. रोपांची जास्त संख्या, आद्र्रतायुक्त हवामान, वारा यामुळे पिकात वारा खेळण्याचे कमी झालेले प्रमाण पाहता या बाबी तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाला पोषक ठरतात. त्यामुळे बऱ्याचवेळा अकाली पानगळ होऊन शेंगांच्या वजनात लक्षणीय घट होते. त्यासाठी प्रोपीकोनझा?ल यासारख्या एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी करावी लागते. ही फवारणी एक लिटर पाण्यात एक मिली या प्रमाणात करावी. पिकांच्या अवस्थेनुसार १५ दिवसांच्या अंतराने एक-दोन फवारण्या कराव्यात, असा सल्ला शेती शास्त्रज्ञ देतात.
सोयाबीन पीक साधारणपणे साडेतीन महिन्यात येते. जून-जुलैमध्ये लागवड केलेल्या सोयाबीनचे पीक सप्टेंबर-आ?ॅक्टोबर महिन्यात हाती येते. सोलापूर जिल्ह्यात पूर्वी खरीप हंगामात प्रामुख्याने मूग, उडीद, तूर, बाजरी, मका ही पिके प्राधान्यक्रमाने घेतली जात. तुरीसारख्या पिकासाठी सहा महिन्यांची वाट पाहावी लागते. परंतु आता या पीक लागवडीत घट होऊन त्यांची जागा सोयाबीन पिकाने घेतली आहे. साडेतीन महिन्यात परिपक्व झालेल्या सोयाबीन शेंगाचा रंग पिवळट-तांबूस झाल्यानंतर पिकाची काढणी होते. साधारणत: ९० ते ११० दिवसांनंतर काढणीस उशीर झाल्यास सोयाबीन शेंगा फुटण्याची शक्यता असते.
हेक्टरी सोयाबीनचे उत्पादन २० ते २५ क्विंटलपर्यंत मिळू शकते. सोयाबीन लागवडीसाठी प्रति एकरी होणाऱ्या खर्चात पूर्व मशागत-एक हजार रुपये, बियाणे (३० किलो)-चार हजार रुपये, ट्रॅक्टरने पेरणी-१५०० रुपये, तणनाशक-एक हजार रुपये, दोन वेळा खुरपण-चार हजार रुपये, औषध फवारणी-एक हजार रुपये आणि पीक काढणी-तीन हजार रुपये याप्रमाणे १५ ते १६ हजार रुपये खर्च होतो. सोयाबीनचे एकरी उत्पादन सात ते आठ क्विंटल अपेक्षित असते. सोयाबीनला बाजारपेठांमध्ये मिळणारा भाव शाश्वत स्वरूपाचा असल्यामुळे सध्या तरी सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील शेतकरी नारायण चव्हाण हे मागील तीन-चार वर्षांपासून सोयाबीनचे पीक घेतात. यंदा त्यांनी सोयाबीनला मिळणारा किफायतशीर भाव विचारात घेऊन सोयाबीनची लागवड सात एकर क्षेत्रापर्यंत वाढविली आहे. यातून चार पैसे जास्त मिळतील,असा त्यांना विश्वास वाटतो. सुदैवाने सोलापूरसह बार्शी, वैराग, अक्कलकोट आणि दुधनी अशा शेती बाजारपेठांमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळत आहे. सरकारनेही सोयाबीनला हमीभाव दिला आहे. दुसरीकडे सोयाबीन तेल उत्पादन कंपन्यांसाठी व्यापारी सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत. यात रोखीने व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोयाबीन शेती आश्वासक ठरू लागली आहे.
रब्बी हंगामातही सोयाबीन
सोलापूर जिल्हा तसा पारंपरिक रब्बी हंगामचा म्हणून ओळखला जातो. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या जिल्ह्यात खरीप क्षेत्र वाढत असताना सोयाबीन लागवडही वाढत आहे. परंतु जिल्ह्यात बार्शी, अक्कलकोट भागात काही शेतकऱ्यांनी मागील वर्षी रब्बी हंगामात सोयाबीनचे उत्पादन घेतले आहे. सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी हंगामात सोयाबीनची लागवड झाली होती. मोकळी आणि पोषक जमीन, पाण्याची उपलब्धता यामुळे रब्बी हंगामात सोयाबीन लागवडीचा प्रयोग प्रथमच झाला. नवनवीन शेती प्रयोग, शेतकऱ्यांची जिद्द, परिश्रम यामुळे रब्बी हंगामातही सोयाबीन शेती पाहायला मिळाली. अर्थात खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन मिळू शकत नाही. तरीही प्रयोगशील शेतकऱ्यांनी सोयाबीन शेती करून त्या अनुषंगाने प्राप्त अडचणींवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.