ती शाळकरी मुलगी होती, त्या वेळची ही गोष्ट. जगात प्रज्ञेचा अर्क मानल्या जाणारा वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याची तिने भेट घेतली होती. आइनस्टाइननेही तिच्या गणिती कौशल्याची पारख करण्याचे ठरवले अर्थातच समोर एक फळा व खडू ठेवलेला होता. त्याने तिला एक अवघड असा गणिती कूटप्रश्न विचारला.  त्याने तो प्रश्न विचारून संपवण्याच्या आत शकुंतलाने त्याचे उत्तर फळ्यावर लिहिले होते अन् ते बरोबरही होते. फळा आकडय़ांनी भरून वाहत होता. त्या मुलीचे नाव शकुंतलादेवी..
‘मानवी संगणक’ हे नामाभिधान प्राप्त करणाऱ्या या शकुंतलादेवी यांचं नुकतंच वृद्धापकाळाने निधन झालं.
त्या भेटीत तिचे गणिती कौशल्य बघून आइनस्टाइन चक्रावून गेला होता. तो म्हणाला, तुला जो कूटप्रश्न मी दिला, तो सोडवायला मला तीन तास लागतील व बाकी कुणा प्राध्यापकांना सोडवायला दिला तर किमान सहा तास लागतील, तू तर क्षणार्धात उत्तर दिलेस. याचे रहस्य काय, असे आइनस्टाइनने विचारले, त्यावर ती म्हणाली, ‘मी हे कसे करू शकते हे मला माहीत नाही..  पण माझ्या डोळ्यासमोर सतत आकडे तरळत असतात, अंतप्रेरणेने ते घडते.’
 वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांबरोबर पत्ते खेळत असताना शकुंतलाने पत्त्यांचा क्रम लक्षात ठेवून त्यांना लीलया पराभूत केले, तेव्हाच वडिलांना तिच्या प्रज्ञेची चुणूक दिसली होती. वयाच्या दहाव्या वर्षी तिला एका कॉन्व्हेंट शाळेत वडिलांनी पहिल्या वर्गात दाखल केले होते पण महिन्याची दोन रुपये फी देऊ न शकल्याने छोटय़ा शंकुतलेचे शिक्षणाचे स्वप्न कायम अधुरेच राहिले. शकुंतलादेवी यांचा जन्म १९३९ मध्ये बंगलोर येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला, त्यांचे वडील सर्कशीत झोक्यावरचे खेळ सादर करीत असत.  म्हैसूरला एका विद्यापीठात शकुंतलादेवी यांनी गणितज्ञांसमोर अनेक आकडेमोडी क्षणार्धात करून दाखवल्या, तेव्हापासून त्यांचे नाव जगासमोर आले. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये तेरा आकडी दोन संख्यांचा गुणाकार अवघ्या २८ सेकंदांत करून गिनीज बुकात नाव कोरले होते. १९७० मध्ये त्यांना एका संस्थेने जर्मनीत बोलावले होते. तेथे त्यांनी संगणकाला हरवले. त्या संस्थेने त्यांना मर्सिडीज बेन्झ गाडी बक्षीस दिली. अमेरिकेतही त्यांनी २०१ अंक असलेल्या संख्येचे घनमूळ अवघ्या पन्नास सेकंदांत काढले. तीच आकडेमोड करण्यास संगणकाला १२ सेकंद जास्त लागले. पुढे, आकडेमोडीची अनेक आव्हाने पेलणारे त्यांचे प्रयोग ठिकठिकाणी होऊ लागले. लोकांचा या प्रयोगांना प्रतिसादही वाढू लागला.
गणित शिकवण्याच्या पद्धतीतील दोषांमुळेच मुलांना गणिताची भीती वाटते असे त्यांचे मत होते. गणितात कच्च्या असलेल्या मुलीचे पात्र असलेला चित्रपट काढणे व गणिताचे स्वतंत्र विद्यापीठ ही त्यांची स्वप्ने अपूर्णच राहिली आहेत.