रशियाने सात वर्षांपूर्वी क्रिमियाचा घास घेतल्यानंतर रशिया-युक्रेन संघर्ष अटळ ठरला होताच. तो कधी पेटणार, इतकाच प्रश्न होता. गेल्या महिन्यापासून रशियाने क्रिमिया आणि पूर्व युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनातीस सुरुवात केली. त्यामुळे रशिया २०१४ च्या आक्रमणाची पुनरावृत्ती करणार की, हे केवळ शक्तिप्रदर्शन आहे, याबाबत माध्यमांत चर्चा सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या मनात नेमके काय आहे, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला आहे.

गोपनीय माहितीचोरीच्या आरोपावरून युक्रेनच्या राजनैतिक अधिकाऱ्यावर रशियाने नुकतीच कारवाई केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून युक्रेननेही रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. उभय देशांदरम्यानच्या संघर्षांचा हा केवळ पापुद्रा. रशियाने युक्रेनच्या सीमेलगत आणि क्रिमियामध्ये सुमारे ८० हजार सैनिक तैनात केल्याचा युक्रेन सरकारचा दावा आहे. त्यामुळे युक्रेनच्या अंगणात नेमके काय सुरू आहे, हे मांडताना ‘बीबीसी’ने सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियन फौजांच्या आतापर्यंतच्या कारवायांचा वेध घेतला आहे. क्रिमिया ताब्यात घेतल्यानंतर रशियन समर्थक फुटीरवाद्यांनी पूर्व युक्रेनचा काही भाग ताब्यात घेतला. खरे तर त्याच वेळी युक्रेनचे विभाजन करण्याचा रशियाचा डाव होता. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियासमर्थक तीन वाहिन्यांवर घातलेली बंदी आणि पुतिन यांच्या समर्थकांवर घातलेल्या र्निबधांमुळे या संघर्षांने पुन्हा डोके वर काढले. शिवाय, रशियामध्ये पुतिन यांचे कडवे टीकाकार अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्या समर्थनार्थ आंदोलन बळकट होऊ लागले आहे. अशा स्थितीत युक्रेनमधील रशियन नागरिकांचे संरक्षण करत असल्याचे चित्र उभे करणे आणि राष्ट्रवादाची भावना चेतवणे पुतिन यांच्यासाठी फलदायी असल्याचे विश्लेषण ‘बीबीसी’ने केले आहे.

dubai flood effect
पुरामुळे अस्ताव्यस्त झालेल्या युएईला पूर्वपदावर आणायला किती खर्च येणार?
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Ajit Pawar and Sharad Pawar
लोकजागर- विभाजितांची ‘हतबलता’!
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

गेल्या सात वर्षांत पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक आणि युक्रेन लष्कर यांच्यातील संघर्षांत १३ हजार जणांचा बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी सांगते. आता रशियाने युक्रेन सीमेवर सैन्यबळ वाढवल्याने युद्धाचे ढग जमू लागल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांना केवळ इशारा देण्याचा रशियाचा हा प्रयत्न असल्याचे निरीक्षण ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका लेखात नोंदवण्यात आले आहे. युक्रेनचे अमेरिका आणि युरोपशी चांगले संबंध असणे हे रशियाच्या प्रादेशिक वर्चस्वाला आव्हान ठरत आहे. शिवाय ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याची युक्रेनची इच्छा पुतिन यांच्यासाठी अडचणीची आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी गेल्या काही महिन्यांत पाश्चात्त्य देशांना अनुकूल धोरणात्मक निर्णय घेतल्याने रशियाचा रोष वाढला. त्यामुळे हा प्रश्न हाताळताना अमेरिकेबरोबरच युरोपची कसोटी लागेल, असे विश्लेषण या लेखात आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला झेलेन्स्की आणि अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांच्यात चर्चा झाली होती. त्या वेळी युक्रेनची एकात्मता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपले पाठबळ असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले होते. २०१४ पासून अमेरिकेने युक्रेनला ४.५ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे. अध्यक्षीय निवडणुकीतील हस्तक्षेप व सायबर हल्ल्याप्रकरणी बायडेन प्रशासनाने नुकतीच दहा रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांवर कारवाई केली व काही जणांवर निर्बंध घातले. मात्र, या र्निबधांचा फटका पुतिन यांना बसलेला नाही. पुतिन यांना पुढील कारवाईस हे निर्बंध परावृत्त करू शकणार नाहीत, असे निरीक्षण नोंदवणारा आणखी एक लेख ‘द वॉशिंग्टन टाइम्स’मध्ये आहे. युक्रेनमधून सैन्यमाघारी, अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांची सुटका आदी बाबी मान्य न झाल्यास रशियावर आणखी र्निबधांची गरज या लेखात मांडण्यात आली आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात पुतिन यांना बऱ्यापैकी मोकळीक होती. मात्र, रशियाबाबत कठोर भूमिका घेणार असल्याचे बायडेन यांनी निवडणूक प्रचारावेळीच जाहीर केले होते. आता निर्बंध लागू करताना बायडेन यांचा मवाळपणा दिसून येतो. मात्र, बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि युरोप यांच्या रशियाबाबतच्या धोरणात सुसंगती दिसते, असे मत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधील अ‍ॅण्डय़्रू क्रॅमर यांचा लेख नोंदवतो. बायडेन यांचा रशियाबाबतचा सावध पवित्रा अधोरेखित करणारा हा लेखआहे.

अलीकडे युक्रेनने संरक्षणावरील खर्चात मोठी वाढ केली. मात्र, रशियाचा संरक्षणावरील खर्च युक्रेनच्या दहापट अधिक आहे. शिवाय अत्याधुनिक साधने आणि शस्त्रांनी रशिया सज्ज असून, रशिया दीर्घकालीन संघर्षांच्या पवित्र्यात असल्याचा अंदाज ‘द गार्डियन’च्या एका लेखात वर्तवण्यात आला आहे. हा संघर्ष चिघळण्याची शक्यता गृहीत धरून ब्रिटिश युद्धनौका मे महिन्यात काळय़ा समुद्रातील गस्त वाढवणार, असे वृत्त ब्रिटनच्या ‘द सण्डे टाइम्स’ने दिले असून तुर्कस्तान व अन्य देशांतील माध्यमांनीही ते पुन:प्रसारित केले आहे. ‘द मॉस्को टाइम्स’सह रशियन माध्यमांत मात्र आताच युद्धज्वर पेटल्याचे दिसून येते. युक्रेनला अमेरिका मदत करत असल्याचे अतिरंजित वार्ताकन रशियन माध्यमांत-  विशेषत: चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवर- आढळते!

संकलन : सुनील कांबळी