|| प्रा. मंजिरी घरत

गेल्या चार वर्षांपासून जागतिक आरोग्य संघटना ‘अँटिबायोटिक जनजागरण सप्ताह साजरा’ करून सर्व संबंधित घटकांचे याविषयी प्रबोधन करीत आहे. हा सप्ताह गेल्या महिन्यात जगभर पाळला गेला. भारतात दरवर्षी तब्बल ६० हजार नवजात शिशु अँटिबायोटिक्सना दाद न देणाऱ्या जंतुसंसर्गाने मरण पावतात, असे आढळून आले असून ही बाब चिंता वाटावी अशीच आहे. तसेच आपला देश अँटिबायोटिक वापरात सर्वात आघाडीवर आहे. त्या निमित्ताने या गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावरील हे चिंतन..

life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार
Next gen Maruti Suzuki Dzire
मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘ही’ नवी हायब्रिड कार, कधी होणार भारतात दाखल?

मी एक अँटिबायोटिक बोलतोय. माझे हे मनोगत आपणा सर्वाना म्हणजे, डॉक्टर्स, केमिस्ट्स, फार्मासिस्ट्स ग्राहक, रुग्ण, फार्मा  उद्योजक या सर्वाना उद्देशून आहे. आपण अलीकडेच वाचले असेल भारतात दरवर्षी तब्बल ६०,००० नवजात शिशु अँटिबायोटिक्सना दाद न देणाऱ्या जंतुसंसर्गाने मरण पावत आहेत. भारत हा अँटिबायोटिक वापरात सर्वात आघाडीवर आहे आणि अँटिबायोटिक्सना निष्प्रभ करण्यातही अग्रेसर आहे. अरे मित्रांनो, ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा’ अशी स्थिती आहे आज माझी. मी जे काही बोलणार आहे त्याबद्दल राग मानू नका. केवळ माझ्या अस्तित्वाच्या लढाईसाठी नाही तर तुमच्या भल्यासाठीच उद्वेगाने हा पत्रप्रपंच करतोय मी.

माझा जन्म साधारण १९३० चा. आमच्यातील पहिलेवहिले अँटिबायोटिक – पेनिसिलिन – जगाला लाभले तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातील व मानवी इतिहासातील ही मोठी क्रांती होती. सूक्ष्म जीवांसमोर आजपर्यंत हतबल असलेल्या मानवाच्या हाती आमच्या रूपाने एक प्रभावी अस्त्र आले होते. जिवाणूंची सद्दी आता संपणार होती. विविध इन्फेक्शन्स (जंतुसंसर्ग) आता नियंत्रणात येणार होती. पेनिसिलिननंतर पुढील काही दशकांत आमच्या परिवारात अनेक नवीन अँटिबायोटिक्सची भर पडली. आमची नावे ज्याच्या-त्याच्या तोंडी झाली. आमचा वापर सतत होऊ  लागला. आम्ही एक चलनी नाणे झालो. पण ‘अति तिथे माती’ हे खरंच.

अरे, आम्ही तुमच्यासाठी एक वरदान आहे, पण तुम्ही आमची पार हेळसांड केलीत. अँटिबायोटिक्सचे वेगळेपण तुम्ही कुणीच लक्षात घेतले नाहीत. आम्ही अँटिबायोटिक्स ही इतर औषधांपेक्षा वेगळी औषधे आहोत. आम्ही शरीरातील विशिष्ट पेशी वा अवयवांवर काम करीत नाहीत, तर शरीरातील उपद्रवी जिवाणूंचा नायनाट करणे हे आमचे काम. जेव्हा तुम्ही अँटिबायोटिक्सचा कमी वा अति, वा चुकीचा वापर करता, तेव्हा रुग्णाच्या शरीरातील जिवाणूंना आमच्या काम करण्याची पद्धत जोखण्याची मुबलक संधी मिळते. या संधीचा फायदा उठवण्यात मोठे स्मार्ट असतात हे सूक्ष्म जीव. अत्यंत चतुरपणे मग ते स्वत:ला बदलवतात. (म्युटेशन) व आम्हाला चकवा देणाऱ्या प्रजाती ते तयार करतात. थोडक्यात त्यांच्या नवीन पिढय़ा या निर्ढावलेल्या, बंडखोर असतात. पूर्वी त्या जिवाणूंना लीलया नामोहरम करणारे आम्ही मग या बंडखोर जंतूंपुढे केविलवाणे होऊन जातो. आमची परिणामकारकता कमी होते, संपतेदेखील. यालाच म्हणतात प्रतिजैविक प्रतिरोध किंवा अँटिबायोटिक रेझिस्टन्स.

अँटिबायोटिक्स जिवाणूजन्य इन्फेक्शन्ससाठी वापरायची ना. तेही विशिष्ट कालावधी, विशिष्ट डोसमध्ये. प्रत्येक इन्फेक्शन किंवा आजाराला अँटिबायोटिक्स हा काही उपाय नाही. सर्दी, पडसे यांसारख्या विषाणूजन्य जंतुप्रादुर्भावात अँटिबायोटिक का घेता? एक जालीम झटपट शॉर्टकट तुम्हाला अँटिबायोटिक वाटले आणि तुम्ही त्याचा गरज नसताना वापर चालू केलात. अँटिबायोटिक्सचे प्रकार आहेत, कधी कोणते अँटिबायोटिक वापरायचे याचेही शास्त्र आहे, हे तुम्ही साफ दुर्लक्ष करता. थोडेसे पोट बिघडले की सरळ स्वमनाने ओफ्लोक्सासिनसारखे अँटिबायोटिक घेता? जिथे सुरी वापरायची तिथे तुम्ही तलवार चालवता. जेव्हा खरंच गरज असते तेव्हा मात्र ते पूर्ण क्षमतेने पूर्ण कालावधीसाठी वापरत नाही. पाच दिवसांचा समजा कोर्स दिलाय डॉक्टरांनी तर तुम्ही रुग्ण जरा बरे वाटू लागले की एक-दोन दिवसांतच औषध बंद करता. पण बरे वाटणे आणि बरे होणे यातला फरक तुम्हाला कळलाच नाही. टीबीसाठी तब्बल सहा-आठ महिने तीन-चार अँटिबायोटिक्स घ्यायचे, तेव्हाही अर्धवट कोर्स केलेत. सर्व जिवाणूंचा नायनाट होण्यासाठी कोर्स पूर्ण करणे आवश्यक असते रे. नाही तर रेझिस्टन्स निर्माण होतो. कालांतराने इन्फेक्शन अधिक तीव्र स्वरूपात उलटते. मग आधी वापरलेली अँटिबायोटिक उपयोगी ठरत नाहीत. मग अधिक जालीम अँटिबायोटिक, अधिक दुष्परिणाम असे चक्र चालू राहते. अनेक रुग्णांचे त्यामुळे मृत्यू होत आहेत. हे बंडखोर जंतू यथावकाश समाजात इतस्तत: संक्रमित होतात व प्रतिरोध ही समस्या वैयक्तिक नाही तर सामाजिक आरोग्याची बाब होते. जिवाणूच्या विजिगीषू वृत्तीमुळे जरी अँटिबायोटिक रेझिस्टन्स  प्रक्रिया नैसर्गिकच असली तरी तुम्ही मानवांनी केलेल्या निरंकुश वापरामुळे या प्रक्रियेला प्रचंड  खतपाणी घातले गेले. नवीन कोणतेही अँटिबायोटिक भारतात टाका, सहा महिन्यांत रेझिस्टन्स निर्माण होतो असे बोलले जाते.

गेल्या काही वर्षांत १९३० सालापूर्वी जसे  जिवाणूंचे साम्राज्य होते, तशीच काहीशी स्थिती परत येऊ  घातली आहे. टेट्रासायक्लिन, सल्फा, क्लोरॅमफेनिकॉल असे आमच्यातील एके काळचे रथी-महारथी आज गारद झाले आहेत. आमचे अँटिबायोटिकचे कुटुंब २०० हून अधिक सदस्यांचे, पण प्रभावी सदस्य फारच थोडे उरले आहेत. बेदरकार वापरामुळे आमचे बरेचसे सदस्य निरुपयोगी झाले आहेत. एवढेच काय, आमच्यापैकी कुणालाच दाद न देणारे सुपरबग्जही सापडत आहेत. सर्वाधिक प्रभावी समजली जाणारी आमच्यातील (हाय एण्ड अँटिबायोटिक्स) सर्वश्रेष्ठ सदस्य कार्बापिनिमनाही जिवाणू पुरून उरत आहेत. हे सर्व बघून किती वेदना होत आहेत मला म्हणून सांगू? माझे जन्मदाते सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी नोबेल पारितोषिक स्वीकारले तेव्हाच भाषणात ‘जपून वापरा अँटिबायोटिक्सना’ असा इशारा दिला होता. पण तो कोणी गांभीर्याने घेतला नाही. शिवाय गेल्या काही दशकांत आमच्या परिवारात नव्याने भर फारशी पडत नाहीये. नवीन अँटिबायोटिक अगदी क्वचितच संशोधित होताहेत.

आमचा अतार्किक वापर करण्यात डॉक्टर्स, रुग्ण, फार्मासिस्ट, फार्मा कंपन्या सारेच आघाडीवर. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन्समध्ये नुसता आमचाच भरणा, रुग्णाने पूर्ण कालावधीसाठी न घेणे, फार्मासिस्टने विनाप्रिस्क्रिप्शन आम्हाला  विकणे, रुग्णाने स्वमनाने आम्हाला घेणे, आमच्या अनेक सदस्यांना एकत्र करून अतार्किक, अशास्त्रीय औषधे, मिश्रणे फार्मा कंपन्यांनी बनवणे, हे सारे काय करताय तुम्ही? रुग्णालयात इन्फेक्शन कंट्रोल नाही, तिथे बंडखोर जंतूंचे साम्राज्य. तुम्ही अन्नोत्पादक प्राण्यांमध्येही आमचा भरमसाट वापर केलात. तुमच्या या वागण्याने दूध, मांस, अंडी वगैरे अन्नातूनही मानवी शरीरात आमचा अंश जात राहिला. शिवाय आमच्यातील न वापरलेली, मुदत संपलेली अँटिबायोटिक्सची विल्हेवाटही नीट लावली जात नाही. त्यामुळे आम्ही जमीन, पाणी यात मिसळत राहतो आणि शिवाय पर्यावरणातून परत आमच्यातील अनेक अँटिबायोटिक्स अन्नसाखळीत प्रवेशतात.

अजून एका बाबीकडे लक्ष वेधतो मी तुमचे. तुमच्या शरीरात आतडय़ामध्ये लक्षावधी सूक्ष्म जीव असतात आणि ते तुमच्या आरोग्यासाठी बरेच विधायक काम करीत असतात. जेव्हा तुम्ही अँटिबायोटिक घेता तेव्हा आमच्या हातून उपद्रवी जिवाणूंची हत्या होतेच पण अनेकदा आम्ही तुमच्या शरीरातील उपयुक्त जिवाणूंनाही मारून टाकतो. मग लगेचचा परिणाम म्हणजे तुमचे पोट तर बिघडतेच पण उपयुक्त जिवाणू बिघडल्याने प्रतिकारशक्ती कमी होणे किंवा अजून काही विपरीत परिणाम होऊ शकतात असे तुमच्यातीलच संशोधक सांगत आहेत.

युनो, जागतिक आरोग्य संघटना या साऱ्यांना बंडखोर जंतूंनी हादरवून टाकले आहे. अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स ही मानवजातीसाठी एक जागतिक धोका आहे व परिस्थिती आणीबाणीची आहे हे जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वीच जाहीर केले आहे. २०१५ पासून दरवर्षी १३-१९ नोव्हेंबर असा जागतिक अँटिबायोटिक जनजागरण सप्ताहच जागतिक आरोग्य संघटनेने या संबंधात साऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी चालू केला आहे. एखाद्या औषध प्रकाराला ‘वाचवण्यासाठी’ इतक्या उच्च स्तरावरून जागतिक व्याप्तीची मोहीम काढावी लागणे हे अभूतपूर्व आहे.

इतर अनेक देशांत अँटिबायोटिक रेझिस्टन्स कमी व्हावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. आम्हाला वापरायचे असेल तर नियम आहेत. इथल्यासारखा बेबंद वापर तिथे शक्यच नाही. राष्ट्रीय पातळीवर धोरणे बनवली गेली आहेत आणि त्याची कडक अंमलबजावणी होते. भारतापेक्षा तुलनेने मला आणि माझ्या संपूर्ण परिवाराला तिथे अगदी खास वागणूक आणि सुरक्षितता आहे. उगाच किरकोळ ताप, खोकला वगैरेंसाठी पहिल्या दिवसापासून अँटिबायोटिक देता येत नाही. डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही संयम बाळगावा लागतो. वाट पाहावी लागते. जर अगदीच गरज वाटलीच तर (शक्यतो काही टेस्ट्स करून) आमचा वापर होतो. त्यातही विनाकारण आमच्या श्रेष्ठ सदस्यांना (ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स)वापरले जात नाही. एकंदर डॉक्टरांना विचारपूर्वक, जबाबदारीने अँटिबायोटिक्सचा वापर करावा लागतो. मार्गदर्शक प्रणाली (स्टॅण्डर्ड ट्रीटमेंट गाईडलाइन्स) सर्व नियमावली पाळावी लागते. रुग्णसुद्धा मला स्ट्राँग औषध द्या, लवकर बरे व्हायचेय, असा दबाव आणून अँटिबायोटिक लिहावयास डॉक्टरांना भाग पडू शकत नाहीत. फार्मासिस्टही प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिक्स देत नाहीत, रुग्णास समुपदेशन करतात. काही देशांत तर फार्मसीच्या दुकानातच इन्फेक्शन आहे का याची शहानिशा करायला फार्मासिस्ट्स चाचण्या (पॉइंट ऑफ केअर टेस्टिंग) करतात. उदाहरणच द्यायचे तर घशाचे इन्फेक्शन. फार्मासिस्ट यासाठी स्ट्रेप थ्रोट अशी टेस्ट करतात व रुग्णास मार्गदर्शन करतात. इन्फेक्शन असल्यास डॉक्टरांकडे पाठवतात. अनेक देशांत अँटिबायोटिकच्या लेबलवर स्पष्टपणे ते अँटिबायोटिक आहे असे नमूद केलेले असते. त्यामुळे ग्राहकांनाही समजण्यास सोयीचे होते. आणि हो, बाहेरील देशात आमची भरमसाट अतार्किक औषध मिश्रणे नाहीत बरं. प्राण्यांसाठी अँटिबायोटिक्सचा सर्रास वापर करता येत नाही. त्यासाठीही नियम आहेत. याचा सुपरिणाम म्हणजे तिथे आम्ही आमचा प्रभाव बऱ्यापैकी टिकवून आहोत. रेझिस्टन्सचे प्रमाण कमी होतेय.

अजून एक महत्त्वाची बाब. तुम्हाला आमची- अँटिबायोटिक्सची इतकी गरजच का लागते? इन्फेक्शन्स होऊ  नये म्हणून का नाही तुम्ही प्रयत्न करीत? लसीकरण, सुरक्षित लैंगिक संबंध, खोकतानाची काळजी, हात धुणे अशी वैयक्तिक स्वच्छता व काळजी का नाही घेतली जात? १५ ऑक्टोबर हा म्हणे ‘जागतिक हात धुणे दिवस’ म्हणून पाळला जातो. अरे, नुसत्या स्वच्छ हात धुण्याने ५० टक्क्यांहून अधिक पोटाची इन्फेक्शन्स कमी होऊ  शकतात. या २१ व्या शतकातील आधुनिक मनुष्याने हे साधे प्राथमिक पथ्यसुद्धा पाळू नये व ‘हॅण्ड वॉशिंग डे’द्वारे यासाठी जनजागरण करण्याची पाळी जागतिक संघटनांवर यावी?

अँटिबायोटिक रेझिस्टन्स ही जरी जागतिक समस्या असली तरी त्याची भयावहता भारतात सर्वाधिक आहे. त्या मानाने तुम्ही लोक त्यासाठी कठोर उपाययोजना करीत नाहीयेत. दर वर्षी तब्बल साठ हजार नवजात बालके मृत्युमुखी पडतात आम्ही निष्प्रभ झाल्याने? कदाचित हा आकडा अधिकही असेल. हे एक उदाहरणही खूप काही सांगून जाते. मानवजातीचा संहार हा अणुयुद्ध वगैरेमध्ये नाही तर सूक्ष्म जंतुयुद्धात आहे, असे फार पूर्वी ऐकले होते. ते तसे होईल की काय, अशी भीतीच आता मला वाटतेय. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, आम्हाला जपा. वेळ झपाटय़ाने निघून चाललीये, पण अजून पूर्ण गेलेली नाही. सर्व घटकांनी, शासनापासून ते डॉक्टर, रुग्ण सर्वानीच विचार करा. अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे तुम्हाला. मानसिकता बदला, त्वरित पावले उचला. यामुळे आमच्यातील थोडय़ा तरी अँटिबायोटिक्सना तुम्ही वाचवू शकाल? तुमच्या पुढच्या पिढीसाठी तरी हे कराच. आम्हाला वाचवा, तुमच्याचसाठी.

– आपला हितचिंतक, एक अगतिक अँटिबायोटिक

काय करावे.. काय टाळावे

  • अँटिबायोटिक्स ही प्रिस्क्रिप्शनने व डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची औषधे आहेत, स्वमनाने घेण्याची नाही.
  • इतर औषधांप्रमाणेच अँटिबायोटिक्सच्या औषधांच्या लेबलवर डावीकडे तांबडी रेघ , फ७ ही खूण, शेडय़ूल एच किंवा एच १ असे चौकटीत लिहिलेले असते.
  • लवकर बरे व्हायचेय, स्ट्राँग औषध द्या, अँटिबायोटिक्स द्या असा दबाव डॉक्टरांवर वा औषध दुकानात जाऊन आणू नये. फार्मासिस्टनेही विनाप्रिस्क्रिप्शनने अँटिबायोटिक्स विकणे योग्य नाही व तशी मागणी करणाऱ्या रुग्णांना समुपदेश करणे अपेक्षित आहे. रुग्णांनीही याचे महत्त्व समजून घेऊन डॉक्टर्स व फार्मासिस्टना सहकार्य करणे आवश्यक आहे.
  • सर्दी-पडसे अशा किरकोळ विषाणूजन्य आजारांसाठी अँटिबायोटिक्स काही उपयोगाची नाहीत. किरकोळ पोट बिघडल्यास अँटिबायोटिक्स नव्हे तर ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स व तत्सम उपायांची गरज असते.
  • डॉक्टरांकडून निघताना प्रिस्क्रिप्शनमध्ये अँटिबायोटिक्स लिहिले आहे का, असल्यास ते कोणते, त्याचा कोर्स किती दिवसांचा हे जाणून घ्यावे. फार्मसीमध्ये फार्मासिस्टलाही याबाबत विचारावे व मार्गदर्शन घ्यावे.
  • अँटिबायोटिक्सचा सांगितलेला कोर्स जरी त्वरित बरे वाटू लागले तरी अर्धवट सोडू नये. ५, ७, १०, १५ दिवस वगैरे जो कालावधी सांगितला आहे तो पूर्ण करावा. टीबीसाठी कमीत कमी ६ ते ८ महिने औषधे घ्यावीच लागतात.
  • आपण इतर कोणती औषधे योग्यरीत्या घेतली नाहीत तर त्या मुळे आपल्याला स्वत:लाच त्रास होतो, पण अँटिबायोटिक चुकीचे वापरले तर अँटिबायोटिक रेझिस्टन्सद्वारे स्वत:ला व साऱ्या समाजालाही आपण धोका निर्माण करत असतो, याचे भान सर्व घटकांनी बाळगणे जरुरीचे आहे.
  • मुळात इन्फेक्शन्स होऊ नये यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयी पाळाव्यात. लसीकरण परिपूर्ण असावे.

 

symghar@yahoo.com

(लेखिका औषधनिर्माण शास्त्राच्या प्राध्यापक आहेत.)