सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
आजच्या तरुणाईच्या चर्चेत एक शब्द अधूनमधून हमखास ऐकायला येतो, तो म्हणजे यूटय़ूबर.  काही जण तर चक्क करिअर म्हणूनदेखील याकडे पाहू लागले आहेत; पण नेमका यूटय़ूबर म्हणजे काय? यावर मात्र अनेकांच्या डोक्यात पुरेसे स्पष्ट उत्तर नसते. आपण यूटय़ूब सर्व जण मोफत पाहत असताना यूटय़ूबर म्हणून करिअर कसे होऊ शकते? तर जगात मोफत असे काहीच नसते, या ना त्या माध्यमातून मोफत सेवेची किंमत वसूल केली जातेच. त्यामुळे लोकांना पाहण्यासाठी यूटय़ूब जरी मोफत असले तरी ते एक व्यावसायिक प्रारूप आहे आणि त्यातून यूटय़ूबला तर पसे मिळतातच, पण त्यावर व्हिडीओ टाकणाऱ्यांनादेखील पसे मिळतात. हे सारे होते जाहिरातींच्या माध्यमातून. त्यामुळेच यूटय़ूबर या करिअरचा उदय झाला.

पण मग यूटय़ूबरला या सर्वातून नेमके पसे कसे मिळणार? तर त्याचे उत्तर आहे जाहिरातीतून; पण यूटय़ूबवर व्हिडीओ अपलोड केला आणि तुम्हाला जाहिरात मिळाली असे होत नाही. त्यासाठीची रचना समजून घ्यावी लागेल. कोणतीही व्यक्ती यूटय़ूबवर स्वत:चे खाते सुरू करते तेव्हा त्या खात्याच्या नावाने यूटय़ूब चॅनल सुरू होते; पण तुमच्या व्हिडीओला जाहिरात मिळणे हे सर्वस्वी तुमच्या व्हिडीओच्या लोकप्रियतेवरच अवलंबून असते. तुमचे चॅनलवरील व्हिडीओ जास्तीत जास्त लोक पाहत असतील तरच हे घडू शकते. यूटय़ूबवरील असंख्य व्हिडीओज् किती काळ पाहिले गेले याची नोंद वॉच टाइम म्हणून केली जाते. मग यूटय़ूबच्या धोरणानुसार अमुक इतका वॉच टाइम असणाऱ्या व्हिडीओज्वर जाहिरात सुरू होते.

सध्याच्या धोरणानुसार १२ महिन्यांत एक हजार सबस्क्रायबर असणे गरजेचे आहे; पण केवळ सबस्क्रायबर असून उपयोग नाही, तर तुमचे व्हिडीओ पाहण्याचा कालावधी एकूण चार हजार तास असावा लागतो. त्याचबरोबर व्हिडीओ पूर्ण बघितलेला असावा लागतो. पूर्वी यूटय़ूब या जाहिरातीतील सुमारे ५५ टक्के हिस्सा केवळ सबस्क्रायबरच्या संख्येवर देत असे; पण सध्या तसे होत नाही. त्याचबरोबर जाहिरातीतील हिस्सा हा १०० डॉलर्स होत नाही तोपर्यंत युटय़ूबरला दिला जात नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय कंटेटवरील व्हिडिओज् जर परदेशातून पाहिले असतील तर त्याला चार पैसे अधिक मिळतात.

यूटय़ूबर म्हणून चार पसे कमावण्याचे हे गणित झाले; पण यूटय़ूबर होण्यासाठी काय करावे लागते, काय शिकावे लागते हे समजून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. अमुकतमुक अभ्यासक्रम शिकला की तुम्ही यूटय़ूबर होऊ शकता अशी सोय नाही, तर लोकांना चार नव्या गोष्टी सांगू शकाल असे क्षेत्र तुम्हाला आधी निवडावे लागेल. त्यानंतर तुम्ही नेमके काय सांगणार त्याची मांडणी करावी लागेल. यूटय़ूब हे व्हिडीओ माध्यम असल्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते मुख्यत: दाखवायचेच असते. त्यामुळे चित्रीकरण आणि सादरीकरण महत्त्वाचे असते. एक तर असे चित्रीकरण तुम्ही स्वत:च करू शकता किंवा चित्रीकरण करणारी तांत्रिक टीम घेऊ शकता. त्यानंतर त्या चित्रीकरणाचे योग्य संकलन करून अंतिम व्हिडीओ तुमच्या चॅनेलवर अपलोड करावा लागेल. केवळ एवढे करून भागणार नाही, तर त्या चॅनेलचे मार्केटिंग म्हणजे तुमचा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल हे पाहावे लागते.

एकंदरीत हे सर्व पाहता केवळ एकच कला असून भागणारे नाही, तर तुम्हाला अन्य बऱ्याच गोष्टी माहिती असायला हव्यात; पण तुम्हाला या इतर बाबींमध्ये पडायचे नसेल तर त्या त्या कामासाठी तांत्रिक टीम नेमावी लागेल. हा खर्च गुंतवणूकदार शोधून भागवता येतो. मात्र त्यासाठी स्वतंत्र मेहनत घ्यावी लागेल. एरवी कोठेही लागू होणारे एक तंत्र येथेदेखील कामी येते. ते म्हणजे योग्य वेळी योग्य ते उत्पादन लोकांसमोर आणणे. सध्या रेसिपीज आणि खाद्यभ्रमंती, तंत्रज्ञान (नव्या गॅजेटचे परीक्षण), प्रवास अशा गोष्टींना चांगला प्रतिसाद मिळतो; पण गणेशोत्सवाच्या काळात तुम्ही गणेशोत्सवाशी निगडित वेगळे आणि दर्जेदार व्हिडीओज् टाकले तर तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. ही वेळ साधणे गरजेचे असते.

आज हे माध्यम बाल्यावस्थेत आहे. पूर्णवेळ यूटय़ूबर म्हणून काम करणाऱ्यांची, त्यातून पुरेसा पसा मिळवणाऱ्यांची संख्या सध्या मर्यादित आहे, पण ज्यांनी या माध्यमावर आणि त्यांच्या विषयावर हुकमत मिळवली आहे ते चांगलेच यशस्वी झाले आहेत. अगदी चांगली नोकरी सोडून यूटय़ूबर म्हणून महिन्याला लाख-दीड लाख रुपये कमावणारेदेखील आहेत. गुंतवणूकदार वैयक्तिक यूटय़ूबरपेक्षा या क्षेत्रातील मोठय़ा आस्थापनांना प्राधान्य देत आहेत; पण वैयक्तिकरीत्या तुम्ही किती चांगल्या प्रकारे प्रभाव टाकू शकता त्यावर बरेच अवलंबून असते. येणारा काळ हा व्हिडीओज्चा असणार आहे. भविष्यात यात संधी भरपूर आहेत. योग्य त्या क्षेत्रातील चांगले दर्जेदार आणि अभ्यासू व्हिडीओज् तुम्हाला तयार करावे लागणार आहेत. त्यासाठी अभ्यासाबरोबरच मेहनतदेखील महत्त्वाची आहे.