30 May 2020

News Flash

छोटय़ांचा दोस्त

‘भीम भीम भीम.. छोटा भीम छोटा भीम..’

‘भीम भीम भीम.. छोटा भीम छोटा भीम..’

ही टय़ून लागली आणि गोंडस छोटा भीम पडद्यावर लुटुलुटु धावायला लागला की हल्लीची तमाम चिंटू- पिंटू- गुल्लू- टिल्लू- सोनू- मोनू- पिंकी- सोनी- मिनी टीम टीव्हीला नजर खिळवून बसते. त्यांच्या उच्छादाला कंटाळलेल्या आया-आज्याही छोटा भीमवर मनापासून प्रेम करतात, ते खरं तर छोटा भीम आहेच तेवढा गोंडस म्हणून नव्हे तर घरातल्या बच्चेकंपनीला तो तासभर तरी एका जागी शांत बसवून ठेवतो म्हणून.

बच्चेकंपनीसाठी छोटा भीम म्हणजे ढोलकपूरचा हिरो! चुटकी, राजू आणि जग्गूचा जिगरी दोस्त!

राजा इंद्रवर्माचा तारणकर्ता! दुष्ट कालियाचा शत्रू!

त्यांच्यासाठी छोटा भीम म्हणजे चांगल्याशी चांगलं वागणारा! दुष्टांना शासन करणारा!

दुर्बळांना मदत करणारा! मित्रांवर प्रेम करणारा!

चुटकीच्या बाबांच्या मिठाईच्या दुकानातले लाडू हळूच खाणारा!

आजच्या काळातली चिल्लीपिल्ली गॅदरिंगमधल्या एखाद्या भूमिकेशिवाय कधीही घालणार नाहीत असं एक धोतरवजा वस्त्र गुंडाळलेला, ढोलकपूरनामक काल्पनिक राज्यात राहणारा हा चिमुकला म्हणजे नऊ वर्षांचा भारतीय अ‍ॅडव्हेंचर, कॉमेडी हिरो. एरवी मिकी माऊस, टॉम अ‍ॅण्ड जेरी, पोकेमॉन, शिनचॅन असली अभारतीय कार्टून्स पाहत मोठं होणाऱ्या चिमुकल्यांसमोर अस्सल भारतीय अवतारात पोगो चॅनलवर २००८ मध्ये छोटा भीम अवतरला आणि बघता बघता लहान-मोठय़ा प्रेक्षकांच्या गळ्यातल्या ताईत झाला.

छोटा भीम पिटुकल्यांना आवडलाच, पण त्यांच्या आईबाबांना, आजीआजोबांनाही का आवडला असेल?

कारण तो अस्सल भारतीय आहे. आपलं मूल भारतीय लोकांना जसं असायला हवं असतं अगदी तस्साच आहे.

कारण छोटा भीम उगाचच दंगामस्ती करीत नाही. टॉम अ‍ॅण्ड जेरीसारखा उगाचच कुणाला त्रास देत नाही की उगाचच कुणाची खोडी काढत नाही. तो शिनचॅनसारखा आगाऊ नाही. तो त्याच्या ढोलकपूर या राज्याशी एकदम एकनिष्ठ आहे. (आताच्या राष्ट्रवादाच्या जमान्यात हा गुण तर हिऱ्यासारखा चमकणारा) तो राज्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी जातीने मुकाबला करतो. तो सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन जाणारा आहे. तो धाडसी आहे, हुशार आहे, सशक्त आहे. त्याची अचाट ताकद तो नेहमी चांगल्याच कामासाठी वापरतो. तो खोडकर आहे, पण त्याचा खोडकरपणा इतरांना त्रासदायक ठरणारा नाही, तर मोठय़ांना हवाहवासा वाटेल असा आहे.

बघ, तुला छोटा भीमसारखं व्हायचंय ना, असं घरातल्या पिटुकल्याला सांगता येईल इतका छोटा भीम रोल मॉडेल आहे. आता घराघरांतल्या ‘छोटय़ा भीम’ना टीव्हीवरच्या छोटय़ा भीमसारखं ‘ताकतवर’ व्हायचं असतं. त्यासाठी एरवीचं आवडतं जंक फूड बाजूला ठेवून आता त्यांना लाडू खायचे असतात. कालूचा, आपल्या ढोलू-भोलू या  साथीदारांबरोबर भीम आणि त्याच्या टीमवर कुरघोडी करायचे सततचे प्रयत्न हे कथानक हळूहळू बदलत गेलं, नवनव्या गोष्टी समाविष्ट होत गेल्या. ढोलकपूरवर आलेली संकटं भीमनं आपल्या मित्रांच्या साहाय्याने परतवली. राजा इंद्रवर्माला मदत केली. आसपासच्या इतर राज्यांनाही मदत केली. त्याच्यावर आणि त्यांच्या मित्रांवर आलेली संकटं उलटवली. कार्टून्सच्या भाऊगर्दीत भीमनं लहान मुलांनी कसं असायला हवं, याचे मोठय़ांना जे संस्कार करायचे असतात, ते अगदी अलगद केले आहेत.

ग्रीन गोल्ड अ‍ॅनिमेशनचे राजा चिलका यांच्या कल्पनेतून उतरलेला गोंडस छोटा भीम त्याच्या या सगळ्या गुणांमुळे हवाहवासा झाला आहे.
वैशाली चिटणीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2016 1:28 am

Web Title: chota bhim
Next Stories
1 समझदार नॉडी
2 फॅण्टसीतला निन्जा
3 गॅजेट मॅन डोरेमोन
Just Now!
X