lp46‘‘हं, आल्या वाटतं मॅडम..’’ हॉलमधून आईचा हसण्या-खिदळण्याचा आवाज आला की समजायचं ऋ चा आली. म्हणजे ही बाई फक्त म्हणायला माझी मैत्रीण आहे. बाकी घरी आल्यावर ती आईची बालमैत्रीण म्हणून सहज खपून जाईल. तर ऋ चा म्हणजे आमच्या ग्रुपची लव्हगुरू. प्रेमाची गाडी मध्येच कुठे तरी अडकली की आम्ही ऋचा नामक मॅकेनिकला बोलावतो. तिला मी शाळेपासून ओळखते. माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. शाळेतल्या बाकापासून एका फ्रॉकपर्यंत सगळं शेअर केलंय आम्ही.

‘‘तुमच्या दोघींच्या अत्यंत महत्त्वाच्या गप्पा झाल्या असतील तर मी जरा बोलू का तुझ्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीशी?’’ असं विचारल्यावर ऋचाने आणि आईने माझ्याकडे अशा काही नजरेने पाहिलं की मी घुसखोर असल्याची पूर्ण खात्री झाली मला. ‘ये बाई, तुझीच वाट बघत थांबलेले.’ मग काकूंशी बोलत बसले. (वास्तविक असं काही नसतं. माझी वाट पाहणे हा एक बहाणा आहे आणि ही मुलगी केवळ माझ्या आईशी गप्पा मारण्यासाठी माझ्या घरी येते यावर माझा विश्वास बसत चाललाय.) ‘‘चला, तुम्ही बोला. मी आलेच जरा जाऊन. ऋ चा तुला सांगितलंय ते आहे ना लक्षात. मग बोलूच आपण नंतर.’’ व्वा, ही तर हद्दच झाली म्हणायची. या आता गॉसिपिंगही करतात म्हणजे मी काही बोलणार इतक्यात ऋ चाच म्हणाली, ‘‘काकू बाल्यानंदला जाताय का?’’

‘‘हो अगं, आज येणाऱ्या ताई आल्या नाहीत अन् मी मोकळीच होते म्हणून म्हटलं मीच जाते.’’

बाल्यानंद म्हणजे आमच्याच विभागातली एक एनजीओ. आई, बाबा, मी आणि दादा चौघेही गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याबरोबर काम करतोय. ही एनजीओ आमच्याच इथे असलेल्या एका वस्तीत जाऊन तिथल्या मुलांना शिकायला मदत करते. आम्हीसुद्धा बऱ्याचदा वस्तीत जाऊन त्या मुलांना शिकवतो. खरं सांगायचं तर मी काही समाजसेवा वगैरे म्हणून हे करत नाही. मी एन्जॉय करते ते काम, मजा येते खूप. त्यामुळे माझ्या स्वार्थासाठीची समाजसेवा. ‘बाल्यानंद’चे अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते माझ्या.

‘‘ऐकलंत ना गं, दादा आला की घ्यायला सांग त्याला जेवण. तयार आहे. नाहीतर भूक भूक करत बसेल.’’ आईच्या बोलण्याने माझी तंद्री भंगली. ‘‘हो मातोश्री, या आता तुम्ही. आणि त्या मुलांना जास्त बोअर करू नकोस.’’ आई गेल्यावर आता कुठे आम्हाला आमच्या गप्पांसाठी निवांत वेळ मिळणार होता. ‘‘ऐक नाऽऽऽ, तुला खूप काही सांगायचंय..’’ आऽहा! काय सुरुवात गप्पांची. हे वाक्य म्हणजे ना, खमंग फोडणी असते गप्पांची. एकदम लज्जतच वाढवून जातं. ‘‘थर्टी फर्स्टला मी आणि वैभव पार्टीला गेलेलो.’’ तर वैभव म्हणजे ऋ चा मॅडमचा बॉयफ्रेंड. त्या दोघांना आम्ही ‘फेविकोल का मजबूत जोड’ म्हणतो. कॉलेजमधलं ‘पहला पहला प्यार’ संपून पाचसहा र्वष झाली तरी ही दोघं एकत्र आहेत. याचं आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटतं. कारण आजकालची नाती ही त्या चायना फोनसारखी असतात. ‘टिक गया तो दूर तक, नही तो कल तक’. तर यांचं हे टिकनेवालं नातं माझ्या मते सिरियस वळण घेणार आहे लग्नाचं. लवकरचं लग्न म्हटलं की मला जरा जास्तच धास्ती भरते. असो. ‘‘तर ऋ चा, खूप मस्त पार्टी होती. आणि तुला माहित्येय, आपल्या शाळेतलेसुद्धा भेटले मला तिथे.. स्ट्रेंज ना. आणि सगळ्यात वियर्ड गोष्ट म्हणजे, सांग बघू मला. कोण भेटलं असेल तिथे?’’ हा खेळ मला बिल्कुल आवडत नाही, कोणी शोधून काढलाय देव जाणे. समोरच्याच्या वेळ आणि बुद्धी दोहोंचा अपव्यय. ‘‘कोण भेटलं सांग ना?’’

‘‘आमोद..!’’

‘‘आमोद? तो कसा काय तिथे?’’

‘‘ओ हो, खुशी छुपाये नही छुप रही, आय नो, यू स्टील लाइक हिम. अंम् अंम्..’’

‘‘अगं काय आता.. मी जस्ट विचारलं की तो कसा काय तिथे, यात काय एवढं?’’ फेल्ड.. पूर्णपणे फेल्ड होता हा माझा प्रयत्न.. आमोदचं नाव ऐकूनच मस्त वाटलेलं मला. म्हणतात ना, ‘पुरानी यादे ताजा हो गई. टाइप्स..’

‘‘हे बघ, आय नो, तुला तो शाळेत असल्यापासून आवडतो.’’ ऋ चाचं बोलणं अगदी खरं होतं. चौथीत असल्यापासून तो मला आवडायचा. कारण तो मला त्याचं पायलट पेन वापरायला द्यायचा. पायलट पेनाचं रूपांतर पायलट क्रश मध्ये कधी झालं कळलंच नाही. ही वॉज माय फर्स्ट क्रश! किती वेगळंच वाटायचं तेव्हा. छान काही तरी घडतंय आपल्याबरोबर.. तेव्हा वाटायचं की आपण त्याच्या प्रेमात आकंठ बुडायला. मग कॉलेजला गेल्यावर कळलं की, हे असं काही नसतं. हे म्हणजे ‘क्रश’ नामक प्रेमाचं मृगजळ. कॉलेजमध्ये कळल्यावर मग आमोदचा विचार खूप मागे राहिला. धूळ खात नाही पडला. तो अलगद बाजूला ठेवला गेला. ‘‘आयडिया.’’ ऋ चा ओरडलीच जवळजवळ. ‘‘आपण शाळेतले सर्व पुन्हा भेटू या. रियुनियन  सारखं, अन् व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप पण आहे ना आपला. त्यात आहे बरं का आमोद.. ठरलं तर फेब्रुवारीमध्ये भेटू, जेणेकरून सगळ्यांना जमेल. मी आजच टाकतो ग्रुपवर. आय होप सगळे येतील.’’ तिचा तो ‘सगळे’चा स्वर मला चांगलाच कळला. मी वरवर पाहता काहीच रिअ‍ॅक्ट नाही झाले. मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ऋ चा गेल्यावरही मी त्याच्याच विचारात रेंगाळत होते. म्हटलं, आज तो लिखनाही पडेगा. काय क्युट फिलिंग असते ना ही. आणि मला अचानक जाणवलं.. हे असं खरं तर अनेकदा वाटतं आपल्याला.. हा एवढाच आनंद आपल्याला त्या क्षणीही मिळतो. आजारी असताना आईच्या हातानं ऊन ऊन खिचडी खाताना, तिच्या कुशीत साऱ्या चिंता विसरून झोपताना मला हाच आनंद मिळतो. अगदी तसाच. दादाशी मस्ती करताना आणि शेवटी मी जिंकल्यावर मिळणारा आनंद हा सेम असाच असतो. बाबांना वादामध्ये हरवल्याचा आनंद तर याहीपेक्षा जास्त असतो. आणि अचानक मला तो प्रसंग आठवला, बाल्यानंदमध्ये शिकवतानाचा. सात वर्षांची ती. आपल्याला ‘अ’ काढता आला याचा काय आनंद झालेला तिला. तिच्या चेहऱ्यावरची रेषान्रेषा हसत होती. तिच्या त्या आनंदाच्या तर प्रेमातच पडलेले मी. तिचं ते सुख मला खूप काही देऊन गेलं. आमच्या शेजारच्या छकुलीताई जेव्हा जन्मल्या तेव्हा पाहायला गेलेले तिला हॉस्पिटलमध्ये. ते मोठाले डोळे खूपच आवडले मला, मी हलकेच तिचं तो इवलुसा पंजा माझ्या बोटात अडकवला. त्या स्पर्शातली निरागसता आणि डोळ्यातल्या कुतूहलाने पार वेडं करून टाकलं मला. खरंच की.. हो सगळे माझ्या आयुष्यातले ‘क्रश’च तर आहेत. अपार आनंद देणारे, पाहता क्षणी आवडून जाणारे, मनाला भावणारे.. आपण ना, आयुष्यातल्या खूप गोष्टींना, प्रसंगांना, व्यक्तींना अंडरएस्टिमेट करतो. किंवा त्या सहज घडतात म्हणून तितकंस महत्त्वही देत नाही. पण याच ‘सहज’ गोष्टी आयुष्यातल्या सगळ्यात मौल्यवान असतात.

डायरीचं दुसरं पान उघडलं आणि ‘सहज’ लिहिलं गेलं, ‘‘आमोद..!’’
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com