03 March 2021

News Flash

रुचकर – शॉपिंग विशेष : मठरी

मदा, रवा, ओवा, जिरे, मीठ आणि पाव वाटी तेल एकत्र करून एकत्र करावे. तेल गरम न करताच वापरायचे आहे.

मठरी

साहित्य :

२ वाटय़ा मदा

१ चमचा रवा

१/४ वाटी तेल, मोहनासाठी

१ चमचा ओवा

१ चमचा जिरे

चवीपुरते मीठ

तळण्यासाठी तेल

कृती :

१)     मदा, रवा, ओवा, जिरे, मीठ आणि पाव वाटी तेल एकत्र करून एकत्र करावे. तेल गरम न करताच वापरायचे आहे.

२)     थोडेसे पाणी घालून गोळा घट्ट मळून घ्यावा. झाकण ठेवून २० मिनिटे बाजूला ठेवावे.

३)     पिठाचे एक इंचाचे गोळे करून लाटण्याने जाडसर लाटावे किंवा हाताने मोदकाची पारी करतो तसे किंचित जाडसर थापावे. तेलात तळताना फुगू नयेत म्हणून काटय़ाने टोचून घ्यावे.

४)     तेल गरम करून आच मंद ठेवावी. तयार मठरी तेलात सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यावी.

टीप : मठरी मंद आचेवरच तळावी. नाहीतर आतून कच्ची राहते.

बदाम वडी

साहित्य :

१ वाटी बदाम   दीड वाटी पिठी साखर

वेलची पूड      २ चमचे मिल्क पावडर

१ चमचा तूप

कृती :

१)     बदाम कोमट पाण्यात किमान २ तास भिजत घालावेत. सालं काढून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पेस्ट करताना कमीत कमी पाण्याचा किंवा दुधाचा वापर करावा.

२)     नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावं. त्यात बदाम पेस्ट आणि साखर घालून सतत मध्यम आचेवर ढवळावं. वेलची पूड घालावी. घट्ट गोळा तयार झाला की गॅस बंद करावा. मिल्क पावडर घालून मिक्स करावं.

३)     गोळा जरा गार झाला की लाटण्याला तुपाचा हात लावावा. आणि गोळ्याचा जाड थर लाटावा. सुरीने कापून वडय़ा पाडाव्यात.

टीप : जर वडय़ा गार झाल्यावरही खुटखुटीत झाल्या नाहीत तर मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंद हाय पॉवरवर गरम करावं. परत गोळा करून पोळी लाटावी. वडय़ा पाडाव्यात.

मालवणी खाजा

साहित्य :

२ वाटय़ा बेसन  २ चमचे गरम तेल

चिमूटभर मीठ   तळण्यासाठी तेल

१ चमचा किसलेला गूळ

इतर साहित्य :

१ वाटी गूळ     १/२ चमचा किसलेलं आलं

कृती :

१)     बेसनात दोन चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालावं. किंचित मीठ आणि गूळ घालावा. थोडंसं पाणी घालून घट्ट मळून घ्यावं.

२)     १५-२० मिनिटांनी तळण्यासाठी तेल गरम करावं. मळलेल्या पिठाचा कडबोळीला करतो तसा लांब रोल बनवावा. दीड इंचाचे तुकडे करावेत. मंद आचेवर तळून घ्यावेत.

३)     तळलेले खाजे थंड होऊ द्यावे. दुसऱ्या कढईत किसलेला गूळ, किसलेलं आलं आणि १ चमचाभर पाणी असे एकत्र करून गुळाचा पाक करावा. या पाकात तयार खाजे घालून मिक्स करावे. मिश्रण सुकेस्तोवर एकत्र करावे. सुकल्यावर खाजे ताटलीत वेगळे करून ठेवावे.

टीप : खाजे गुळाबरोबर सुकवताना थोडे तीळ घालावे. चवीला आणि दिसायलाही चांगले होतात.

मसाला शंकरपाळे

साहित्य :

२ वाटय़ा मदा   १ चमचा ओवा

२ चमचे तेल, मोहनासाठी चवीपुरतं मीठ

तळण्यासाठी तेल

मसाल्यासाठी

२ चमचे लाल तिखट     १/२ चमचा चाट मसाला

१/२ चमचा गोडा मसाला  १ चमचा जिरेपूड

१/२ चमचा साखर

कृती :

१)     मद्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालावं. मीठ आणि ओवा घालावा. पाणी घालून घट्ट मळून घ्यावं. १५-२० मिनिटं झाकून ठेवावं.

२)     मसाल्याचं साहित्य एकत्र करून चव पहावी. लागल्यास मीठ घालावं.

३)     भिजवलेल्या मद्याच्या ६ समान पोळ्या लाटाव्यात. पोळ्या पातळ झाल्या पाहिजेत. नाहीतर तळल्यावर शंकरपाळे मऊ पडतील.

४)     एका पोळीवर मसाल्याचं मिश्रण पसरवावं. त्यावर दुसरी पोळी ठेवून परत पातळ लाटावं.

५)     कातणाने शंकरपाळे कापून तेलात मध्यम आचेवर तळावेत.

बुंदीचे लाडू

साहित्य :

२ वाटय़ा बेसन  २ वाटय़ा साखर

वेलची पूड केशर

तळण्यासाठी तूप किंवा तेल

बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे

कृती :

१)     बेसनात एक चमचा तूप घालावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. पीठ घट्टही नको आणि पातळसुद्धा नको. गुठळ्या राहू देऊ नयेत.

२)     कढईत तूप गरम करून आच मध्यम ठेवावी.

३)     कढईवर झारा धरून भिजवलेल्या पिठातील थोडे पीठ घालावे. बुंदी पाडाव्यात. बुंदी तळल्या गेल्या की दुसऱ्या झाऱ्याने बुंदी तुपातून काढाव्यात. पेपरवर काढाव्यात.

४)     झाऱ्यावर लागलेले पीठ हाताने साफ करून झारा धुऊन पुसून घ्यावा. परत तीच कृती करून सर्व बुंदी तळून घ्याव्यात.

५)     साखरेमध्ये साखर बुडेल इतके पाणी घालून एकतारी पाक बनवावा. पाकात वेलची, केशर घालावे. पाकात बुंदी घालून ढवळावे. मिश्रण अधूनमधून ढवळावे. पाक शोषला गेला की लाडू वळावेत.

टीप : बुंदी तेलात तळल्या तरी चालतील पण ताजं तेल घ्यावं. तुपाचा फ्लेवर जास्त चांगला लागतो.

बटरस्कॉच रबडी

साहित्य :

दीड लिटर दूध

१ वाटी साखर

८-१० बदाम पिस्ता

३-४ थेंब बटरस्कॉच इसेंस

कॅरेमल क्लस्टर्ससाठी :

२ चमचे साखर

१ चमचा अक्रोडाचा भरड चुरा

कृती :

१)     दूध व्यवस्थित आटवावं. दाट झालं की त्यात साखर घालून अजून थोडा वेळ आटवावं. साधारण निम्म्यापेक्षा जास्त आटलं पाहिजे म्हणजे गरजेएवढा दाटपणा येतो.

२)     बदाम-पिस्ते भिजवून त्याचे पातळ काप करावेत. तयार रबडीमध्ये इसेन्स आणि बदाम-पिस्ते घालून ढवळावं.

३)     रबडी गार झाली की फ्रिजमध्ये ठेवावी.

४)     २ चमचे साखर नॉनस्टिक पॅनमध्ये मंद आचेवर गरम करावी. साखर वितळली की आच बंद करून त्यात अक्रोडाचा चुरा घालावा. मिश्रण लगेच दुसऱ्या प्लेटमध्ये घ्यावं. साखर गार झाली की तुकडे करावेत. भरडसर कुटावं.

गार झालेली रबडी लहान बोलमध्ये वाढावे. त्यावर ड्रायफ्रुटचे तुकडे आणि कॅरेमल क्लस्टर्स घालून सव्‍‌र्ह करावे.

ही रबडी जिलेबी, मालपुवा, गुलाबजाम किंवा शाही तुकडा यासारख्या डिशेस बरोबर छान लागते.

टीप : साखर आवडीनुसार कमी किंवा जास्त घालावी.

कॉर्न पकोडी चाट

साहित्य :

भजीसाठी

३ वाटय़ा स्वीट कॉर्न

१/२ वाटी बारीक चिरलेला कांदा

३-४ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून

१/२ चमचा जिरं

पाव वाटी कोिथबीर

१/२ चमचा आलं पेस्ट

चवीपुरतं मीठ

तांदळाचं किंवा बेसनाचं पीठ गरजेनुसार

तळण्यासाठी तेल

इतर साहित्य :

१ कांदा बारीक चिरून

बारीक शेव

कोिथबीर मिरचीची चटणी

चिंचगुळाची चटणी

२ वाटय़ा फेटलेले दही

थोडं लाल तिखट आणि चाट मसाला

कृती :

१)     भजीसाठी स्वीटकॉर्न वाफवून घ्यावं. नंतर अर्धवट वाटून घ्यावं. त्यात मिरची, जिरं, कोिथबीर, थोडी आलं पेस्ट आणि मीठ घालून मिक्स करावं. मिश्रण बांधलेलं राहावं म्हणून थोडं पीठ घालून मिक्स करावं.

२)     तेल गरम करून छोटय़ा छोटय़ा भजी तळून काढाव्यात.

३)     लहान प्लेट्स घेऊन त्यात प्रत्येकी ७-८ भजी वाढाव्यात. थोडा कांदा, दोन्ही चटण्या, फेटलेले दही घालावं. वरून शेव, लाल तिखट आणि चाट मसाला भुरभुरावा.

टीप : भज्यांबरोबर प्लेटमध्ये उकडलेल्या बटाटय़ाच्या फोडीसुद्धा घालू शकतो.

हरियाली पनीर समोसा

साहित्य:

कव्हरसाठी

२ वाटय़ा मैदा

१ चमचा बेसन

२ चमचे कडकडीत गरम तेल

चवीपुरते मीठ

सारणासाठी

२०० ग्रॅम पनीर

४ हिरव्या मिरच्या

२ लसणीच्या पाकळ्या

१/२ वाटी पुदिना पाने

१ वाटी कोथिंबीर

१/४ वाटी भाजलेले शेंगदाणे, सोलून

२ चमचे घट्ट दही

१ चमचा लिंबाचा रस

१/४ चमचा जिरेपूड

१/४ चमचा धणेपूड

१/४ चमचा काळं मीठ

चवीनुसार साधं मीठ

किंचित साखर

इतर साहित्य :

तळण्यासाठी तेल

कृती :

१)     कव्हरसाठी मैदा, बेसन आणि मीठ एका वाडग्यात घ्यावे. त्यात गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. २० मिनिटे झाकून ठेवावे.

२)     २० मिनिटानंतर पिठाचे लिंबाएवढे गोळे करावे. पातळ पोळ्या लाटून तव्यावर मंद आचेवर फक्त ५ ते ८ सेकंद भाजून घ्याव्यात. पोळ्या गार झाल्यावर प्रत्येक पोळीचे समान दोन तुकडे कापून घ्यावे.

३)     पनीरचे लहान तुकडे करावे. सारणासाठी दिलेले इतर साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटावे व ते पनीरला लावावे. नॉनस्टिक पॅनमध्ये थोडं तेल घेऊन त्यावर पनीरचे तुकडे ठेवून मंद आचेवर मिश्रण कोरडे होईस्तोवर परतावे. सारण थंड होऊ द्यावे.

४)     कव्हरसाठी केलेला अर्धगोल घेऊन त्याचा कोनाचा आकार करावा. मैद्याच्या पेस्टने चिकटवून टाकावे. आत पनीरचे सारण भरावे. वरून कडांना मैद्याची पेस्ट लावून चिकटवून सामोसे बनवावे. अशा प्रकारे सर्व सामोसे करून घ्यावे.

५)     कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर सामोसे तळून घ्यावे.

चिंचगुळाच्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावे.

चॉकलेट नानकटाई

साहित्य :

१/२ कप अनसॉल्टेड बटर ७ चमचे पिठी साखर

३/४ कप मैदा    २ चमचे कोको पावडर

१/४ चमचा बेकिंग पावडर  १/४ चमचा चॉकलेट इसेन्स

कृती :

१)     नानकटाई बनवण्यापूर्वी बटर २ तास फ्रिजबाहेर काढून ठेवावे म्हणजे एकदम मऊसर होईल. बटर लवकर वापरता यावे म्हणून वितळवू नये. एका मध्यम आकाराच्या खोलगट ताटलीत बटर आणि साखर घ्यावी. आणि मिश्रण हलके होईस्तोवर जोरजोरात फेटावे.

२)     १८० डिग्री सेल्सिअसवर ओव्हन ५ मिनिटे प्रीहिट करावे.

३)     बेकिंग ट्रेला तुपाचा किंवा बटरचा हात लावून तयार ठेवावा.

४)     मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी. चाळणीत जर पिठाचे गोळे अडकले असतील तर ते फोडून घ्यावेत. चाळलेले पीठ, बटर-साखरेच्या मिश्रणात थोडेथोडे घालावे, चॉकलेट इसेन्स घालावा आणि हाताने मळावे. व्यवस्थित गोळा तयार करावा. (कदाचित एखादा चमचा पीठ वाढवावे लागेल.)

५)     तयार गोळ्याचे साधारण १ इंचाच्या आकाराचे भाग करावे. प्रत्येक गोळा एकमेकापासून २ इंचांच्या अंतरावर ठेवावा. प्रत्येक गोळ्यावर पेढय़ाला लावतो तसे पिस्त्याचे काप लावून चेपावे (ऐच्छिक).

६)     ओव्हनच्या मधल्या रॅकमध्ये ट्रे ठेवावा व साधारण १२ ते १४ मिनिटे बेक करावे. बेक केल्यावर ट्रे बाहेर काढावा आणि गार होऊ द्यावा.

१५ मिनिटांनी खुसखुशीत अशा नानकटाई खाण्यासाठी तयार होतील.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:18 am

Web Title: food recipe diwali 2016 mathari
Next Stories
1 रुचकर – शॉपिंग विशेष : चिपुटले चकली
2 रुचकर – शॉपिंग विशेष : शाही फ्रूट बॉल्स
3 रुचकर – शॉपिंग विशेष : सात पडी पुरी
Just Now!
X