News Flash

मीम पोरी मीम…

लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियात मीम्स बनवण्यात मुली आघाडीवर

सुनिता कुलकर्णी

करोनामुळे घरात बसलेली मंडळी सतत ऑनलाइन आहेत आणि नवनवीन गोष्टी करू पाहताहेत. त्यातूनच काही जणांनी एकत्र येऊन आठ-दहा दिवसांपूर्वी फेसबुकवर एक ‘मराठी मिम्स माँक्स’ नावाचं पेज तयार केलं. तिथं धडाक्यात मराठी मीम्स पडायला सुरूवात झाली.

पेज चालवणाऱ्यांच्या लक्षात आलं की मुलींचा प्रतिसाद जबरदस्त आहे. त्यांनी पण मग लगेचच एक दिवस मुलींसाठी देऊन टाकला आणि जाहीर केलं की ८ मेला #मीमर_पोरी हा हॅशटॅग वापरून सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत पेजवर फक्त मुलींनी व्यक्त व्हायचं. मुलींच्या या मीमची स्पर्धा घेतली जाईल. त्याचे निकाल नंतर जाहीर केले जातील.

मग काय, ८ तारखेला दिवसभर मीमर पोरींनी या पेजवर जोरदार धुमाकूळ घातला. पण ही गंमत नाही, खरी गंमत पुढेच आहे. आपल्या समाजात मुलींकडून नेहमीच शालीन, सोज्वळ अपेक्षा असतात. त्यांनी माणूस म्हणून व्यक्त होण्यापेक्षाही तथाकथित संस्कृती रक्षणाची ओझी त्यांच्या खांद्यावर टाकली जातात.

पण मीमर पोरी ही सगळी ओझी धुडकावून लावत या पेजवर व्यक्त झाल्या आहेत. फ्लर्टिंग, क्रश, क्रिकेट, राजकारण याबरोबरच मासिक पाळी, सेक्स, व्हर्जिनिटी, ऑर्गझम, जी स्पॉट, अशा विषयांचा टॅबू न बाळगता त्यांनी दिवसभर ३५० धमाल मीम टाकले. एका मीममध्ये म्हटलं आहे की, जेव्हा तुम्ही प्रवासात असता आणि अचानक तुमचे पिरीयड्स सुरू होतात… त्याखाली सेक्रेड गेम्समधल्या गायतोंडेचा फोटो आहे आणि वाक्य आहे की व्हिस्पर चाहिए मेरेको… तर एका मीममध्ये एक पौराणिक पुरूष व्यक्तिरेखा स्त्रीला विचारतो आहे, तुझी काय अपेक्षा आहे माझ्याकडून तर ती म्हणते आहे, अहो, मॅगीपण दोन मिनिटात बनते हो… अपर्णा रामतीर्थकर, मोनालिसा, रामायण, महाभारत, सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज, नाना पाटेकर, अक्षय कुमारच्या सिनेमांमधले डायलॉग्ज, इरफान खान, प्रशांत दामले अशा कुणालाच मीमर पोरींनी सोडलेलं नाही. प्राजक्ता चावरे, शीतल ज्योती, आरती आणि कोमल पोळ या चौघींची नावे विजेत्या म्हणून जाहीर केली गेली आहेत.

सेक्ससारख्या विषयावर मुली बिनधास्तपणे व्यक्त झाल्या की हमखास दखल घेतली जाते, हे गिमिक मिमर पोरी वापरत आहेत, अशीही टीका तिथे काहींनी केली आहे. पण एकेकाळी ज्यांनी फक्त आपल्या अंगणातच पिंगा घालत झिम पोरी झिम खेळावं अशी अपेक्षा केली जात होती, त्या पोरी अगदी गिमिक म्हणूनही सोशल मीडियावर बिनधास्तपणे मीम पोरी मीम खेळत असतील तर त्याची दखल घेतलीच पाहिजे.

‘मराठी मिम माँक्स’वर शाहू महाराजांच्या जयंतीदिवशी ९ मेला #कर्मवीर या शीर्षकाखाली मीम्सची स्पर्धा घेतली गेली. तर ११ मेला सादत हसन मंटोच्या जयंतीनिमित्त #वेश्या ही मीम्सची स्पर्धा घेतली गेली. एकूण टाळेबंदीच्या काळात लोकांची सर्जनशीलता बहरायला लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 8:28 am

Web Title: girls play with interesting memes at social media during corona virus lockdown its appreciable aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 रेडी टू लिव्ह…
2 एक साला विषाणू…
3 आई जेवू घालिना…
Just Now!
X