अनंत चतुर्दशीनंतरचा दुसरा दिवस. आज देव लोकांत वेगळीच लगबग चाललीय. सगळे देवाधिदेव आणि देवीदेवता आपापली आसनं सोडून कुठच्यातरी ओढीने श्रीगणेशाच्या दरबाराच्या दिशेनं चालत राहिल्येत.

आज भूलोकीचा भक्तीमय पाहुणचार आटोपून बाप्पा स्वगृही आल्येत. त्यांच्या भोवती घोळका नाही जमला तरच नवल! खरं तर देव आंतज्र्ञानी, सगळं जाणणारे, पण प्रत्यक्ष स्वानुभवातून व्यक्त करणाऱ्याचे निरूपण ऐकायला सगळेच उत्सुक असतात.

महागणपती आपल्या आसनावर विराजित. तसेच स्थिरचित्त. इवल्या डोळ्यांनी भवताल पहात क्षणकाल स्तब्ध. देवगणांची उत्कंठा त्यांच्या ध्यानी आलीय. सांगू गेलं तर आज बोलण्यासारखं त्यांच्या मनात खूप काही आहे. पृथ्वीतलावरचा घरोघरचा आणि सार्वजनिक स्वरूपातल्या उत्सवाचा अनुभव गाठीशी आहे. सगळं ताजंताजं, उनउनीत. आणि देवगण सहोदर भोवती दाटी करतायत. अकरा-बारा दिवसांचे उत्सवी उधाण संपलाय आणि पुढील वर्षांच्या भाद्रपदापर्यंत लांबलाय. गणाधीश जाणून आहेत की आता बोलल्यावाचून सुटका नाही. गणेश त्या भूमिकेत सिद्ध होऊन बसतात. वातावरणात एक स्वर्गीय शांतता पसरलीय.

तोच, एकतारीच्या सुरावर नारायण नारायण हे लयदार शब्द कानावर पडतात. नारद नावाचा बित्तम बातमीदार हजर झालाय. अशा संधी सोडणं त्यांच्या वृत्तींत बसत नाही. हा खरं तर मोठा भाग्यवान प्राणी. भूलोक आणि स्वर्गलोक दोन्हींमध्ये स्वैर संचार करणारा. गणेश अधिकच सावध होतात. बुद्धीचा दाता म्हणून स्वत:ची ओळख असणारा आणि त्या जबाबदारीचं सार्थ भान असूनही गणपती बाप्पा काय आणि कसे बोलायचे याची मनात आखणी करू लागतात. जरा इकडचा शब्द तिकडे झाला अनावधानाने तर गय नाही. एकतारीवर टणत्कार उमटवीत नारदमुनी नुसतं सुचकतेनं नारायण नारायण म्हणणार. इत्यर्थ ज्याने त्याने जाणायचा.

सकल देवगण अधिकच अधीर, विलक्षण स्तब्धता, प्रत्येकाची नजर गणरायावर खिळलेली आणि गजानन बोलू लागतात.

‘‘बंधो, नित्यनेमाची ठरून गेलेली ही माझी भूलोकवारी. पण स्वगृही आलो की आपण सारे अपार उत्सुकतेनं असेच भोवती जमता. प्रतिवर्षी तेच तेच काय सांगायचं असं क्षणभर वाटतं खरं, पण मीच मला तपासतो. स्वानुभव असा की सगळं अगदी अक्षरश: तेच तेच नसतं. माणूस नवतेचा भोक्ता त्यामुळेच पुरातन कालापासून भूलोकीवरच्या माझ्या या भक्तीसोहळ्यांत गेल्या दहापंधरा वर्षांत तर प्रचंड बदल होतायत. सण साजरा करण्याच्या तऱ्हाच तऱ्हा प्रस्थापित होतायत. तेच ते म्हणायचे तर ते इतकेच की घरगुती सोहळा दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस तर कुठच्या घरी दहा दिवस चालतो. कुल  परंपरेचा धागा धरून घरोघरी सोहळा साजरा होतो. हा पाहुणचार मला फार संतोष देणारा वाटतो. भक्ती आणि आदरातिथ्याची परमावधी! कुठे न्यून राहू नये म्हणून घेतलेली दक्षता. वंशपरंपरेने घालून दिलेली पद्धत इथे तिथे न मोडण्याची पराकाष्ठा. प्राणप्रतिष्ठा करून मला स्थापित करायचे नि मग अर्चना, पूजा, आरती, प्रसाद, नैवेद्य आदी ठरीव नियमांतून विसर्जनाच्या चरमसीमेपर्यंत पोहोचायचे. माणसाची प्रगल्भता अचाट. शाडूच्या मूर्तीत देवत्व निर्माण करायचे ते परंपरागत मंत्रउच्चाराने आणि मनाच्या एकाग्र वृत्तींतून आणि निरोप देते वेळी यथासांग पूजेनंतर अक्षता अर्पण करून परत मला मूर्तीरूप पाहायचे आणि विसर्जनाला सिद्ध व्हायचे. दोन्हीही साधनाच. या अर्चनेच्या विधींत कुठे काहीं राहून गेलं असलं, तर क्षम्यताम् परमेश्वर हा धावा करून मगच पुढील उपचारांना सिद्ध व्हायचे. श्रद्धामय मानसिक गृहितांवर खूप साध्य होत जातं. श्रद्धा हे मानवजातीचं बळ असतं. एकचित्त झाल्याशिवाय हे सर्व शक्य होत नसतं. घरोघरीचे हे सणाचे स्वरूप.

सार्वजनिकपणे उत्सव साजरा करण्याचा घोळ जरा वेगळाच असतो. प्रतिवर्षी नव्या आणि अकल्पित आधुनिकतेचा आग्रह असतो.’’

तोच एकतारीवर टणत्कार ऐकू येतो. नारदमुनींना मध्येच काही बोलायचे आहे. श्रीगणेश अनुज्ञा देतात- ‘‘बोला मुने!’’

‘‘देवाधिदेवा विक्षेप आणतोय, पण आतून अगदी विचारावेसेच वाटले म्हणून..नारायण नारायण!!’’

‘‘कळला- हेतूभाव कळला- काय व्यक्त करायचाय!’’

‘‘बोलता होतो देवेश्वर! सार्वजनिक सोहळ्याबाबत काही आवर्जून बोलावं असं वाटतंय. आपल्या भक्तगणांचा अधीक्षेप करायचा माझा उद्देश नाही, पण आजकाल जाणवतं की हृदयस्थित भक्तीपेक्षा ती भक्ती प्रकटपणे दाखविण्यासाठी फार अहमहमिका लागलीय. ही स्पर्धा प्रतिवर्षी वाढतेच आहे. आणि कधी कधी तर ती विकृतीकडे झुकत्ये असं वाटतं, देवाधिदेवा!’’

नारद स्तब्ध.

‘‘जरा पुन्हा बोलावं मुने- शब्द न् शब्द नीट कळला नाही. कान जरा बधिर झाल्येत.’’

‘‘ते कशामुळे! माझे म्हणणे मी उच्चरवात परत मांडतो. ऐकून घ्यावे.’’ नारद बोलते होतात.

‘‘मुनीवर। मथीतार्थ ध्यानात आला. खरंच ना या भक्तगणांचे मानसिक तंत्र मलाही उलगडेनासं झालंय म्हणाना! सगळया चर विश्वाला विदित आहे की दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती! दया, क्षमा करणारे आम्ही सर्वजण या ब्रीदाच्या पालनासाठी कटिबद्ध असतो. पण शांतीचे मर्म या मानवजातीला कधी पटणार असा भ्रम निर्माण व्हावा इतका कर्कश कोलाहल माझ्या भोवती निर्माण करतात. मी नि:स्तब्ध, मूर्तीस्वरूप होऊन भक्तीचा हा सोहळा अनुभवीत असतो. पण माझ्या कानांचे काय! माझ्या सहनशीलतेची आणि ऐकण्याच्या क्षमतेची अंतिम मर्यादा ओलांडून ढोल, ताशे बडवण्यात आणि नको तितक्या मोठय़ा आवाजात माझ्या महिम्याची गाणी लावून खरं तर ते स्वत:वरच वर्षांमागे वर्ष एक नसते संकट ओढवून घेतायत. एक वेळ अशी येईल की भयानक ध्वनी-विस्फोट होईल. तो काळ फार दूर आहे असं मला वाटत नाही. तोवर या अतिउत्साही आणि सळसळत्या माणसांची बुद्धी ताळ्यावर येईल. तारतम्य सुटले की पराकाष्ठेच्या मर्यादा हरवून जातात. श्रीमंत आणि श्रीमंत, ज्ञानी, अर्धज्ञानी, अज्ञानी अशा विविध प्रकारच्या मानव भक्तगणांना याचे भान कधी यायचेय! सर्व विश्वाचे क्षेम चिंतणारे आपण, पण कुठेतरी पराभूत वाटते. या अशा प्रकटीकरणात अस्सल भक्तीचे सत्त्व कांडले जातेय हे त्यांचे त्यांना कळेल तो सुदिन! आता इथल्या प्रशांत वातावरणात माझ्या कानांवर ओढवलेलं अरिष्ट हळूहळू दूर होईल.’’

देवसभेंतून- ‘होय महाराजा, होय महाराजा’ अशी दाद येते.

नारदमुनी देवगणांच्या वतीने परत काही बोलायच्या आविर्भावात सिद्ध होतात. नारायण नारायण- तोच परवलीचा लयबद्ध उद्गार! एकतारीच्या टणत्काराच्या झंकारातून वातावरणात एक वेगळीच मंतरलेली अवस्था प्राप्त होते.

‘‘जय देवाधिदेवा गणेशा! माझ्या भूसंचार यात्रेंत मीही विविध मंडळाचे गणेशोत्सव  सादरीकरण पाहून घेतले. वेळोवेळी मीही व्यथित झालो. धनाची विपुलता ही आजकाल माणसांची उजवी बाजू. या धनाचा सदुपयोग ही खरी धनसंचयाची सार्थकता. म्हणूनच धनाचा विनियोग करतानाही औचित्य तर साधले गेले पाहिजे ना!  पण सार्थकतेचा खरा आशय गहाळ होत चाललाय. दिमाख, नखरा, गजबजाट आणि झगमग- या रोषणाईत माणसाला त्याच्या आतला खरा माणूस दिसेनासा झालाय. अंतकरणातल्या मंद तेवत्या ज्योतींचा प्रकाश कृत्रिमतेच्या हव्यासाने सारखा थरथरतोय. उत्सव साजरा करण्याचे आजचे स्वरूप त्यांच्याच हितासाठी आता वेळीच बदलायला हवेय. यावर मानव समाजात लगेचच चिंतन व्हायला हवे.’’

‘‘होय नारदा! मुद्देसूद निरीक्षणातून तुम्ही जे व्यक्त करताय ते गंभीरपणे अनुसरण्याची वेळ आलीय. होतं काय, मनुष्य समाजात अशा नवतेच्या लाटा फुटतात आणि त्या लाटेवरच मग सर्व स्वार होतात. एक वातावरण तयार होतं, तसं म्हटलं, तर वातावरण कुठे कुठे बदलतेही आहे. कुठे कुठे प्रामाणिक प्रयत्नांतून उत्सवांतील प्रासादिकता आणि सात्त्विकता साधेपणाने जपण्याचा सायास जारी आहे. पण या अशा वेगळेपणाला प्रतिसाद अत्यल्प आहे. विश्वमंडळ चक्रावून जाईल असा घणघणाट आणि दिपवून टाकण्याची ईर्षां आणि मनात आणेल तर माणूस काय करू शकतो हे प्रकट करण्याची वासना किंवा अहम् म्हणा यामुळे तोल ढळतो आहे. तरीही मी शांत, स्थिरचित्तपणे अनुभव घेतोच आहे. सादरीकरणाच्या खटाटोपात देवमूर्तीकडे एकटक पाहाण्याची उसंत कोणाला! कलाकुसरपूर्वक थाटलेल्या मखरांत स्थानापन्न झालेल्या मला अशा वेळी खूप उदास वाटतं. केवढा प्रसाद, केवढी फळफळावळ! कशाला?

मी त्यातले काय चाखतो! आम्हा देवगणांचे एकच अत्यंत साधेसोपे मागणे आहे. पत्रम्, पुष्पम्, फलम्, तोयम् यो माम्, भक्त्या प्रयुज्यते! एक पान, एक फूल, एक फळ किंवा हे काहीच नसेल तरी नुसत्या पाण्याच्या अभिषेकाचे आम्ही भुकेले असतो. अर्पण करण्यात भक्तीभाव महत्त्वाचा! या अतीव फापट पसाऱ्यात खऱ्या भक्तीचा धागाच कुठेतरी घरंगळत चाललाय. आपल्या चिरंजीव वास्तव्यात चिरंजीवपणे लक्षात राहिलेला तो एक दुर्दैवी दिवस. मला दूध भरवण्याचा प्रसंग! देवाला माध्यम करून चमत्कार सिद्ध करायचे ही एक विकृती आहे. दंभ कळूनही आपण क्षोभ करून घेत नाही ही बाब वेगळी. शेवटी चराचर सृष्टीही आपली निर्मिती आहे. जग आपल्याला बालकासारखे आहे. म्हणूनच आपण सर्व पोटात घालतो आणि जग सुरळीत चालतं.

या जग निर्माणात या विश्वाची जपणूक करण्याच्या कामगिरीच्या क्षेत्री माणसावर निर्भर होऊन भिस्त त्यांच्यावर सोपवली. या विश्वासाला कुठेतरी तडा जातोय की काय वाटू लागलाय. ही बाब अत्यंत काळजीची आहे. माझ्या रूपांत माणसाला एकपूर्णत्व भेटते. या पूर्णत्वाचे पूजक म्हणून वर्तत असताना प्रांजलतेचा वसा घेऊन ते मला भजत असतात. मला सर्व मान्य आहे. पण बदलत्या काळाचे संकेत कळण्याइतके ज्ञान असूनही माणूस मला बडिवारात गुंतवून ठेवतोय. प्रतिवर्षी मी प्रतीक्षेत असतो की यंदा तरी हे चित्र पालटेल. आराधनेचा हा पाठ बुद्धीचा वापर करून माणूस तपशिलांत बदलेल; पण नाही, ईर्षांच्या तुताऱ्या घुमू लागल्या की मी सर्वात वरचढ ही परमावधी गाठायची शर्थ सुरू होते. प्रत्येक मंडळ, प्रत्येक गट या अहमहमिकेंत अग्रेसर ठरावे यासाठी प्रयत्नशील. सारे सात्त्विक, प्रासादात्मक रूप विरूप होते ते नसत्या दूराग्रहामुळे. मला सार्वजनिक स्वरूपात स्थापित करण्यामागची मूलभूत गरज व भूमिका आज विस्कटत चाललीय. दृष्टदेखणा उत्सव साजरा करताना अस्सल संकल्पनेचाच विसर पडत चाललाय. दररोजच्या त्वरेच्या आणि घाईगडबडीच्या दिनक्रमांत माणसाला परस्परांशी माणूस म्हणून संवाद साधण्यासाठी आजकाल उसंत मिळत नाही. दिनचर्याही यांत्रिक आणि घडय़ाळाच्या काटय़ात फिरणारी, त्यामुळे माणसाचेही यंत्र होऊन गेलेले. या अशा समाजस्थितींत माणूस म्हणून माणसांचे एक जाणीवशीर संमेलन साजरे व्हावे, परस्पर विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणून तर एकत्र जमायचे. बुद्धिदात्या विधात्याला उत्सवमूर्ती करून चैतन्य, प्रेरणा आणि बुद्धीचा परिपोष होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करून माणसाला यांत्रिकतेपायी गहाळून जाईल की काय असे वाटणारे ‘मी’ पण भेटावे हा हेतू वास्तविक आद्य असला पाहिजे. पण..

उत्सवाचे साजरे होणे कुठेतरी दुसऱ्या टोकाला पोहोचते आहे, भरकटते आहे ही बाब चिंता उत्पन्न करणारी आहे. पण मला खात्री आहे, कुठच्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याला आपसूकच एक वेगळी दिशा खुणावू लागते. मध्यस्थानी राहून आणि मध्यममार्गी होऊन, परंपरांचा, श्रद्धांचा, आचारांचा उचित मान ठेवून आराधनेचा नवा पंथ नक्कीच माणसांना दिसणार आहे. गरज आहे ती पुनर्विचारपूर्वक आणि संयमाने त्या दिवसाची वाट पाहाण्याची.

मला विसर्जनांतून मुक्त केल्यानंतर जे चित्र दिसते ते माणसाला स्वत:लाच हादरवून टाकणारे असते. मंडप उतरवले जातात, लाखो रुपये खर्चून उभारलेली सजावट तोडूनमोडून टाकली जाते. एक छिन्नभिन्न पसारा रस्ते अडवून ज्याच्या त्याच्या मनात अनामिक खंत निर्माण करत राहातो. कारण माझ्या प्रतिष्ठापनेने पुनीत झालेले ते स्थळ एक उद्ध्वस्त परिसर होऊन जाते. अकरा दिवसांचा उत्सवी जल्लोष आणि त्यासाठी चुराडा झालेले लाखो रुपये. श्रद्धा जतन करण्यासाठी यातले काय आवश्यक आहे! भयाण भीषण काळ पावलावर उभा आहे. विचार व्हायला हवा की जो परमेश्वर माणसांच्या पूज्य स्थानी आहे त्याला इतका शानषौक मान्य आहे का! रसिकपणाला जरूर न्याय द्यायला हवा, पण तरीही सुटसुटीत, नजरेत भरेल, कायम मनात राहील असे सोहळे का साजरे होऊ नयेत! माणसाने स्वत:च्या मनात डोकावून पाहायची वेळ उंबरठय़ावर उभी आहे. खूप लोकोपयोगी उपक्रम या उत्सवाच्या माध्यमांतून हाती घेण्याचा सुज्ञ विचारही रुजतो आहे. त्याला भरघोस लोकाश्रय मिळण्याची गरज आहे. फापट पसाऱ्याला आणि दणका उडवून देणाऱ्या चढाओढीला विराम भेटायलाच हवा.

तृप्त, संतुष्ट होऊन परत स्वगृही आलोय खरा म्हणत असतानाही अवस्था द्विधा आहे. आपणच आकार दिलेले अधिनस्य विश्व डळमळते आहे या जाणिवेने माणसांनी मनापासून केलेल्या भजनपूजनापेक्षाही त्यांच्या मनात तारतम्याची ज्योत कधी पेटेल याची मी वाट पाहात आहे.

एकतारीवर टणत्कार, नारदमुनी वदते होतात. ‘‘ती वेळ पृथ्वीतलावर लवकरच यावी म्हणून या देवलोकी आपण सकलांनी एक प्रार्थना करूया, एकरवांत.

‘‘कल्याणम् अस्तु- आनंदमयोस्तु!’’

महागणपती स्तब्ध – आत्ममग्न! आणि श्रोतेदेवगण एकूण पृथ्वीतलावरच्या सणसोहळ्याचे साद्यंत वर्णन ऐकून क्षणकाल मुग्ध, मतिगुंग झालेले.

स्वर्गलोकात नीरव शांतता. नारदमुनी परत एकतारी गळ्यात अडकवून पृथ्वीवारीसाठी निघालेले.

आपल्याच नादात, तालबद्ध स्वरात, माणसांनी शिकवलेले गाणे म्हणतायत- गणपती बाप्पा मोरया- पुढच्या वर्षी लवकर या- गणपती गेले गावाला- चैन पडेना आम्हाला! मुनीवरांची लयदार तंद्री लागलीय.

माणसांची बेचैनी आणि अनिवार ओढ अनुभवायला नारदमुनी बघता बघता पृथ्वीतलावर पोहोचतातही.

खरंच – स्वर्गलोकीचे हे मंथन शब्देवीण संवादू होऊन मानव समाजाच्या अंतर्मनापर्यंत पोहोचेल काय!
सुमन फडके – response.lokprabha@expressindia.com