18 February 2019

News Flash

विमा ही आग्रहाची विषयवस्तू…

अनिश्चिततेचं सावट असलेल्या आपल्या आयुष्यात आरोग्य, अपघात आणि जीवन विमा या तिन्हींचं संरक्षण कवच अपरिहार्य असतं.

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांपासून आपण वर्तमानपत्रे, आकाशवाणी, टेलिव्हिजन किंवा समाजमाध्यमांद्वारे विमा कंपन्यांच्या जाहिराती पाहत असतो.

भक्ती रसाळ – response.lokprabha@expressindia.com
अनिश्चिततेचं सावट असलेल्या आपल्या आयुष्यात आरोग्य, अपघात आणि जीवन विमा या तिन्हींचं संरक्षण कवच अपरिहार्य असतं.

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांपासून आपण वर्तमानपत्रे, आकाशवाणी, टेलिव्हिजन किंवा समाजमाध्यमांद्वारे विमा कंपन्यांच्या जाहिराती पाहत असतो. लोभस जाहिरातींमधून विमा संरक्षण ही कौटुंबिक आपत्कालीन संरक्षण, मुलांची शैक्षणिक स्वप्ने, जीवघेण्या आजारासाठी एक अनिवार्य गुंतवणूक आहे हे बिंबवले जाते. भावनिक जाहिरातीतील दृश्यांमुळे एक अनामिक चिंता गुंतवणूकदारांच्या मनात घर करून राहते. अचानक कार्यालयात गप्पांच्या ओघात किंवा मित्रांच्या सल्ल्यानुसार एखाद्या नवीन विमा पॉलिसीचे आकर्षक फायदे कळतात. त्यातच करसवलतीची संधी चालून आल्याने आपण ‘गुंतवणूक उरकून’ टाकतो. हो लक्षात घ्या, आपण सगळेच गुंतवणूकदार विमा संरक्षणाची जबाबदारी ‘उरकून’ टाकतो! सालाबादप्रमाणे निर्णयप्रक्रियेतील घाईमुळे ‘अयोग्य विमा’ निवडीचे बळी ठरतो.

काही महिन्यांनंतर विमा हप्ते परवडत नाहीत. परतावा अपेक्षित दरापेक्षा कमी आहे हे लक्षात येते. बातम्यांमधून नैसर्गिक आपत्ती, प्रसिद्ध सिनेकलावंतांचा कर्करोगाशी सामना, विचित्र अपघात, अग्नितांडव असे मन अस्थिर करणारे विषय आपली मृत्यूपश्चात ‘विमाराशी’ नगण्य आहे याची जाणीव करून देतात. मनुष्यस्वभावानुसार आपण आपल्या चुकीसाठी कारणे शोधू लागतो. विमा सल्लागार, विमा कंपन्या यांना जबाबदार धरतो.  आपला नातलग किंवा मित्रच आपल्या गळ्यात कसा विमा पॉलिसी मारून गेला, देशातील विमा व्यवसायातील गैरव्यवहार, फसवणुकीचे आपण बळी आहोत यावर शिक्कामोर्तब करून दोषखेळांचे भागीदार होतो. सर्वसामान्यांच्या आर्थिक नियोजनातील दुष्टचक्राचे हे उदाहरण बव्हंशी गुंतवणूकदारांचे स्वगत आहे. लेखिकेला भेटणारे गुंतवणूकदार अशा चुकांची कबुली प्रांजळपणे देतात.

आयआरडीए म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया या नियामक मंडळाकडून प्रत्येक विमा कंपनीच्या जाहिरातीत किंवा ब्रोशरमध्ये लिहिलेले ‘अस्वीकरण’ म्हणजे ‘डिसक्लेमर’ लक्षपूर्वक वाचले तर या दोषखेळातील आरोप-प्रत्यारोप थोडेसे कमी होतील असं वाटतं. आपण सगळेच ‘इन्शुरन्स इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ सॉलिसिटेशन’ या सूचनेचा अर्थ समजून घेऊन गुंतवणूक करत नाही.

‘विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे म्हणजे नक्की काय?’ हा प्रश्न आपल्यास कधी पडत नाही. नियामक मंडळाद्वारे ग्राहकास सांगितलेली ही सूचना प्रत्यक्षात विमाखरेदी करताना डोळसपणे वापरली तर आपल्या आर्थिक उद्दिष्टांचे संरक्षण होऊन मन:स्वास्थ्य लाभेल.

विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे म्हणजे नक्की काय? विमा संरक्षण ही विक्रीची विषयवस्तू नाही. हे उत्पादन विक्रेत्याने ग्राहकांस विक्री पद्धतीद्वारे न विकता ग्राहकांनी मध्यस्थाद्वारे मागावे! थोडंसं संभ्रमात टाकणारं स्पष्टीकरण आहे. विमासंरक्षण ही ग्राहकांनी स्वत:च्या गरजांनुसार विमाकरारातील अटी-अपेक्षा, शक्यता समजावून घेऊन जबाबदारीने घ्यायची गुंतवणुकीची विषयवस्तू आहे. ग्राहकांची स्वत:ची जबाबदारी हे घोषवाक्य अधोरेखित करते. ग्राहकाची विमाखरेदी ही स्वत:ची जबाबदारी आहे. त्याने स्वत:चे वय, उत्पन्न, जबाबदाऱ्यांचे योग्य वर्णन विमामध्यस्थांना सांगून मगच विमाकरारात सहभागी व्हावे. ही ‘अस्वीकृती’ एक निर्थक घोषणा नाही. आपण ग्राहक विमाकरारांची नियमावली वाचत नाही. अटी आणि शक्यता पडताळून बघत नाही. विमा मध्यस्थांना परताव्यांचे दर आणि मॅच्युरिटी रक्कम मात्र विचारतो.

स्वत:च्या  कुटुंबासाठी अपेक्षित विमाराशी किंवा मृत्युदावा किती असावा हा मूलभूत प्रश्न विमामध्यस्थांना न विचारता करबचत करून मोकळे होतो.

२०१५ च्या नवीन धोरणांनुसार जाहिरातींमधून ही अस्वीकृती आता अनिवार्य नाही. परंतु आर्थिक नियोजनकार मात्र या तांत्रिक बाबींची गुंतवणूकदारांना जाणीव करून देतो. स्वत:च्या आरोग्यविषयक विमा गरजा, जीवन विमाद्वारे योग्य विमाराशींची निवड, अपघाती विमाकरारातील सुविधा, घरातील वस्तूंच्या विम्याद्वारे मिळू शकणारे फायदे याचा ऊहापोह ग्राहकाशी करणे ही इन्शुरन्स प्लानिंगची पहिली पायरी आहे. दुर्दैवाने प्रसंग उद्भवेपर्यंत विमा संरक्षणाचे महत्त्व ग्राहकास कळत नाही.

व्यावसायिक आर्थिक नियोजनकार म्हणजेच प्रोफेशनल फायन्शियल प्लानर जेव्हा सर्वसमावेशक आर्थिक नियोजनाद्वारे ग्राहकास त्याच्या जीवनलक्ष्यांचे नियोजन करून देतो तेव्हा गुंतवणूकदाराची संपत्ती संरक्षण, वेल्थ प्रोटेक्शन तयारी लक्षात घेतो. कोणताही फायन्शियल प्लान संपत्ती संरक्षणाशिवाय अपूर्ण असतो.

ग्राहकांची कौटुंबिक पाश्र्वभूमी, शैक्षणिक पात्रता, कामाचे स्वरूप, कार्यालयाद्वारे मिळणारे विमा संरक्षण यांचा संपूर्ण विचार करून मृत्युदाव्यांसाठी विमाराशी ठरवतो.

आर्थिक नियोजनकार तीन टप्प्यांवर विमा नियोजन करतो.

१) चालू विमा योजनांचे सिंहावलोकन

२) सुधारित योजना

३) योग्य विमा योजनांचे वितरण

चालू योजनांचे सिंहावलोकन :

बऱ्याचदा ग्राहक चुकीच्या विमा योजनेत हप्ते भरत असतो. चुकीचा विमा म्हणजे मृत्यूनंतर उपलब्ध विमादाव्यांचे अत्यल्प असणे. एका बाजूला भारतीय ग्राहकांची स्वत:ची वास्तू असावीच अशी भावनिक गरज, त्यासाठी उभे केलेले गृहकर्जाचे डोंगर, आधुनिक जीवनशैलीमुळे उद्भवलेले शारीरिक विकार, नोकरी-धंद्यातील असुरक्षितता, तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक आर्थिक सुबत्तेसाठी बांधिलकी अशा चक्रव्यूहात कुटुंबप्रमुख सापडलेला असताना चुकीच्या विमा योजनांतून कमीतकमी तोटा सहन करून ग्राहकास योग्य दिशेने गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करणे ही आर्थिक नियोजकाची जबाबदारी ठरते. विमाखरेदी करबचतीसाठी नसून ती ग्राहकाच्या कुटुंबाची त्याच्या मृत्यूपश्चात आर्थिक विवंचनेतून सोडवणूक व्हावी, म्हणून केलेली तजवीज असते. वर्षांनुवर्षे दीर्घ मुदतीत विमा हप्ते भरताना ग्राहक चलनवाढ लक्षात घेत नाही. आर्थिक नियोजक चालू विमा योजनांचे अवलोकन करून अयोग्य विमा योजनांमधून ग्राहकास सोडवतो.

सुधारित विमा नियोजन :

विमा नियोजनांच्या परीक्षणांनुसार सुधारात्मक पावले उचलणे ही दुसरी पायरी ग्राहकाच्या कठोर निर्णयक्षमतेची परीक्षा घेते. सुधारणात्मक नियोजन करताना टोकाचे नकारात्मक निर्णय टाळणे गरजेचे असते. उदा. गुंतवणूकदाराचे विमा हप्ते मनी बॅक विमा योजनेत दीर्घ मुदतीत गुंतवले जात आहेत. अपेक्षित विमा राशी म्हणजेच सम अ‍ॅश्युअर्ड ही उपलब्ध मनी बॅक योजनेद्वारे ग्राहकास संपूर्ण संरक्षण देत नाही. हे लक्षात आल्यावर ग्राहकाने मुदतपूर्व हप्ते भरणे बंद करून विमा योजना स्वाधीन करणे ही टोकाची भूमिका ठरते. अशा स्वयंस्फूर्त आततायी निर्णयामुळे ग्राहकास तोटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीमुळे आर्थिक गणिते सुधारत नाहीत. विमा योजनांची निवड करणे जितके डोळसपणे करणे अपेक्षित आहे, तेवढेच मुदतपूर्व योजना खंडित करणे तारतम्य ठेवून ठरविणे गरजेचे आहे. सुधारित नियोजनाद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शक अशा परिस्थितीत सुवर्णमध्य काढतो. विमा योजना अविचाराने मुदतपूर्व स्वाधीन (सरेण्डर) न करता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देतो. मासिक जमाखर्चाची सांगड घालतो. रोखप्रवाह सुरळीत करतो. आर्थिक ताण कमी करतो. अशा प्रकारे तज्ज्ञ मार्गदर्शकाद्वारे इन्शुरन्स रिव्ह्य़ू किंवा पुनर्वलोकन केल्याने भूतकाळातील चुका दुरुस्त करता येतात.

अपेक्षित विमा कवच ठरवून योग्य विमा पर्याय निवडणे :

विमा आग्रहाची विषयवस्तू आहे, या उक्तीनुसार आर्थिक नियोजक ग्राहकास त्याच्या व्यक्तिगत विमा संरक्षणाची जाणीव करून देतो. या टप्प्यावर ग्राहकांचे समुपदेशन होणे गरजेचे  ठरते. उज्ज्वल कौटुंबिक भवितव्याची स्वप्ने रंगवताना अशाश्वतता हे जीवनाचे वास्तव विसरून चालत नाही. प्रत्येक क्षणी आजारपणे, अपघात, अपमृत्यू, अपंगत्व या नकारात्मक बाबींचा तर्कशुद्ध विचार करावा लागतो. आर्थिक समीकरणे मांडताना कठोर भावनिक बैठक असावी लागते. ‘प्लान फॉर द वर्स्ट’ या उक्तीनुसार आपत्कालीन नियोजन केलेले असेल तर पैसा द्विगुणित करताना जोखमांचे सुव्यवस्थापन करता येते. ते करताना स्वत:वर भावनिक नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. आर्थिक नियोजक ग्राहकाच्या आर्थिक जीवनाकडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो. त्यामुळेच विमा नियोजनातील ही तिसरी निर्णायक पायरी तज्ज्ञ मार्गदर्शकाचे बोट धरूनच चढावी.

आरोग्य विमा, अपघाती विमा, जीवन विमा या तिन्ही संरक्षणाचे कवच कुटुंबाला अमूल्य मन:स्वास्थ्य देते. मोठय़ा प्रमाणावर माहितीचा उद्रेक झाल्याने ग्राहक गोंधळून जातो. योग्य-अयोग्य ठरवणे अशक्य होते. बिनचूक निर्णय घेणे अशक्य झाल्याने बऱ्याचदा हे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलून देतो.

आर्थिक नियोजक समुपदेशनाने ग्राहकाची ही कोंडी फोडतो. सर्वसमावेशक विमा नियोजनाची आग्रही भूमिका समजावतो. कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे सर्वसमावेशक गुंतवणूक योजनेची बैठक योग्य विमा नियोजनावर आधारित आहे. व्यक्तिसापेक्ष विमा गरज बदलते. ग्राहकाने प्रलोभनांच्या आहारी न जाता फक्त स्वत:च्या कौटुंबिक गरजा ओळखणे भाग आहे. वेळ निघून गेल्यावर मनस्ताप करण्यापेक्षा वेळेवर गणिते सुधारणे आवश्यक आहे.

विमा संरक्षण ही काळाची गरज आहे. अतिवृष्टीमुळे एखादा अपघात होतो, प्रसिद्ध अभिनेता कर्करोगाशी दोन हात करतो किंवा विचित्र अग्नितांडव घडते तेव्हा दिङ्मूढ होऊन असहाय वाचकाप्रमाणे ‘बातम्यांवरून डोळे’ न फिरवता आपली स्वत:ची ‘आपत्कालीन संरक्षण व्यवस्था’ उभारणे हे कधीही सहजसाध्य आहे.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याला योग्य वेळी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विमा संरक्षण आवश्यक आहे. आपल्या मृत्यूनंतर गृहकर्ज फेडणे आयुर्विमा योजनेद्वारे शक्य आहे. अपघाताने अपंगत्व आले तर होणारा तोटा अपघाती विम्याद्वारे सुसह्य़ होऊ शकतो. गुंतवणूकदाराने या जमेच्या बाजू लक्षात ठेवून विमा एजंट, विमा कंपनीशी स्वत: संपर्क साधून आपल्या अपेक्षा मांडल्या तर आपल्या गरजेनुसार विमा संरक्षणाची निवड करता येईल.

(लेखिका इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या असोसिएट मेंबर आहेत.)

First Published on July 27, 2018 1:03 am

Web Title: insurance