28 January 2020

News Flash

ज्वालामुखीच्या प्रदेशात

कामचाटका म्हणजे रशियाकडे गेलेला अलास्काचा भाग. तो प्रसिद्ध आहे तिथल्या जागृत ज्वालामुखींमुळे.

पृथ्वीच्या पोटात खदखदणाऱ्या तप्त लाव्हारसाला वाट मिळताच, कारंजातून पाण्याचा फवारा येतो तसा जमिनीतून लाव्हारस येतो.

गौरी बोरकर

कामचाटका म्हणजे रशियाकडे गेलेला अलास्काचा भाग. तो प्रसिद्ध आहे तिथल्या जागृत ज्वालामुखींमुळे. त्याचा तिथल्या पर्यावरणावर, माणसांच्या जगण्यावर अपरिहार्य परिणाम झाला आहे.

कधी कधी आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी ठासून राग, द्वेष भरलेला असतो, तो आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. ती व्यक्ती वरून शांत दिसली तरी संधी मिळताच तिचा एकदम स्फोट होतो आणि मनातली मळमळ भसभस् करून बाहेरची वाट धरते, तेव्हा आपण म्हणतो, बघ, कसा ज्वालामुखीचा स्फोट झाला. अगदी अशीच तऱ्हा पृथ्वीवरच्या ज्वालामुखीची असते. पृथ्वीच्या पोटात खदखदणाऱ्या तप्त लाव्हारसाला वाट मिळताच, कारंजातून पाण्याचा फवारा येतो तसा जमिनीतून लाव्हारस येतो.

सामान्यजनांना वाटते की, पृथ्वी फक्त पंचमहाभूतांनी तयार झालेली आहे. पण तिच्या उदरात ७२०० कि.मी. खोलपर्यंत काय काय दडलेले आहे याची आपल्याला अजिबात माहिती नसते. आम्ही कामचाटका, म्हणजे अलास्काचा जो भाग रशियाकडे आहे तो, तिथे गेलो होतो. त्या वेळी काही ठिकाणी उष्णतेने खदखदणारी चिखलाची कुंडे, मातीतील खनिजांमुळे दिसणारे त्यांचे वेगवेगळे रंग, तर कुठे जमिनीतून येणाऱ्या वाफा, निखाऱ्यासारखी दिसणारी जमिनीवरील रेष, ठरावीक वेळी रेल्वे इंजिनासारखा आवाज करून उंच उडणारे गरम पाण्याचे कारंजासारखे फवारे, गरम पाण्याची कुंडे हा सर्व आश्चर्यचकित करणारा नजारा पाहिला. गाईडने सांगितल्याप्रमाणे लाखो वर्षांपूर्वीचे पृथ्वीवरील वातावरण कसे असेल याची थोडीफार कल्पना आली. पण हे दृश्य आम्हाला जरा दुरूनच पाहायला मिळाले. कारण तिथे जवळपास गेलो तरी भाजल्यासारखे होईल. त्यामुळे ही सावधगिरी घ्यायलाच लागली. आता पृथ्वीतलावर एवढे, तर भू-गर्भात काय असेल याची कल्पनाही आपण करू शकणार नाही.

एखादी वास्तू उभारायची असल्यास जमिनीत खणावे लागते. त्या खणण्यातून बरीच माती आपण बाहेर काढतो, त्या वेळी मधे कुठे मऊ दगड, खडक लागतो. आपल्याला आणखी खोल जाण्याची गरज नसते. त्यामुळे आपल्याला कल्पना नसते. पण भूगर्भात वेगवेगळे थर कित्येक कि.मी. खोल असतात. ते आपण क्रमाक्रमाने पाहू. प्रथम मातीचा थर सहा ते ५० कि.मी. खोल, त्याखाली १०० कि.मी. पर्यंत लिथोस्फिअर हा खडक. त्याखाली अ‍ॅथनोस्फिअरमध्ये ३०० कि.मी.पर्यंत मऊ प्लास्टिकसारखा खनिजांचा दाट रस. तीन हजार कि.मी. मेझोस्फिअरमध्ये खडकांचा सतत हालचाल करणारा खनिजांचा पातळ रस. पुढे पाच हजार कि.मी. खाली गेलेल्या थरात, आऊटर कोअरमध्ये लाव्हा किंवा मेन्टल, आणि त्याच्या आत पृथ्वीच्या केंद्रभागी इनर कोअर, सहा हजार ३७० कि.मी.वर घट्ट लोखंड. आणि इथे तापमान असते ते सात हजार अंश सेल्सिअस. हे सूर्याच्या उष्णतेपेक्षा कितीतरी जास्त. आता उन्हाळ्यात तापमान ४०-४५ अंश सेल्सिअल्सकडे टेकल्यावर आपली लाही लाही होते, मग इथे? पृथ्वीच्या केंद्रस्थानी एवढा प्रचंड दाब असतो कीतिथे लोहाचा रस असला तरीही हालचालीसाठी जागा नसल्याने तो एकत्र गोळ्यासारखा होऊन त्याची स्पंदने होत असतात. मध्यभागी असलेल्या लोखंडात लोह, त्यावर लोह निकेल यांचा रस, त्यावर त्यांच्यासोबत मँगनीज, सल्फर, अ‍ॅल्युमिनियम, त्यावर विरघळलेल्या खडकांच्या रसात सिलिका, कॅल्शिअम यांसारखी तसेच आणखी दुसरी खनिजे, हालचाल करणारे खडक, त्याच्यावर कॉन्टिनेन्टल प्लेटमध्ये घट्ट खडक तर ओशिआनिक प्लेटमध्ये माती, पाणी असते.

(संपूर्ण लेखासाठी वाचा लोकप्रभा दिवाळी अंक २०१९. बाजारात सर्वत्र उपलब्ध)

First Published on November 6, 2019 4:21 pm

Web Title: lokprabha diwali issue 2019 alaska volcano
Next Stories
1 ट्रेण्ड :यंदाच्या सणासुदीत ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ
2 संशोधन : दीड लाख वर्षांपूर्वीची हत्यारनिर्मिती
3 लहान मुलांचा आहार
Just Now!
X