जंगलातलं एक छोटंसं जुन्या वळणाचं रेल्वे स्टेशन. त्याच्या शेजारी असलेलं लाकडी टुमदार घर. भोवताली मस्त बाग. त्यात बागडणारे विविध प्राणी, पक्षी असं सारं एकदम मस्त वातावरण. या सर्वाचा केंद्रबिंदू असणारी एकदम पिंटुकली अशी छोटीशी माशा आणि तिची काळजी घेणारा बेअर. छोटुकल्या माशाने दरवेळी काहीतरी उपद्व्याप करायचे आणि बेअरने ते निस्तरायचे हे जणू ठरूनच गेलेलं. अर्धाएक फुटाची माशा बेअरच्या पायावर अगदी आरामात विसावणारी आहे. पूर्ण अंग झाकणारा काहीसा मुस्लीम वळणाच्या हिजाबप्रमाणे असणारा तिचा पोशाख आणि कमालीचे बोलके डोळे. तिचे निरागस हावभाव, खोडकरपणा हे सारं पाहताक्षणी आकर्षून घेणारं. पण तिच्यामध्ये जो काही एक अत्रंगीपणा आहे, तो कधी कधी बेअरच्या नाकात दम आणतो. बरं प्रत्येक वेळी ही कथा फार लांबत नाही. केवळ सहा-सात मिनिटांचा एक एपिसोड. क्लॅपिंग बोर्ड घेऊन माशा स्वत:च पडद्यावर येते आणि बेअरबरोबर धिंगाणा घालत टायटल साँगने एपिसोडची सुरुवात होते. कधी बेअरची फजिती पाहायला मिळते, तर कधी माशा एकदम समंजस गुणी बाळासारखी वागत असते. अर्थातच गुणी बाळाचे एपिसोड तुलनेने कमीच म्हणावे लागतील.

माशाला भूक लागल्यानंतर तिने केलेले स्वयंपाकघरातील प्रयोग, तो पदार्थ घरातील सर्व भांडी, बरण्या, डबे भरून ओसंडून वाहू लागतो. आणि जी काही धम्माल उडते ती प्रत्यक्ष पाहण्यासारखीच आहे. तर एकदा तिचा दात काढायचा असतो त्यावेळी सर्वाचीच प्रचंड फजिती उडते.

कधी कधी ती गुणी बाळाप्रमाणे बागेतील सर्व फळं वापरून मस्तपैकी स्वयंपाकदेखील करते. तर कधी बेअरच्या प्रयोगशाळेतील विशिष्ट औषध घेते आणि तिची उंची वाढत जाते, इतकी की ती थेट घरापेक्षादेखील मोठी होते आणि घरातच अडकून पडते.

रशियन कार्टून असल्यामुळे अर्थातच हिवाळ्यात बर्फातील धम्माल येथे आपसूकच येते. या खेळात माशाची लाडीक दमदाटी अगदी पाहण्यासारखी आहे.

माशाचं हे कॅरेक्टर रशियातलं. पण तिची निरागसता आणि उचापती स्वभाव यामुळे जगातील तब्बल २५ भाषांमध्ये उपलब्ध असून १०० देशांमध्ये लोकप्रिय झालं आहे. माशाचा बारीकसा काहीसा चिरका म्हणावा असा आवाज, तिचं खिदळणं अनेकांना मोहून टाकणारं आहे. विशेष म्हणजे यातल्या बेअरला आवाजच नाही. त्याचं सारं व्यक्त होणं हावभावातूनच दिसून येतं.

२००९ मध्ये सुरू झालेल्या माशाचे इतर कार्टून्सप्रमाणे भारंभार एपिसोड झाले नाहीत. दोन भागांत प्रत्येक २६ मिळून ५२ एपिसोडच रिलिज झाले. पण त्यांना कमालीची लोकप्रियता लाभली आहे. सध्या तिसऱ्या भागाची तयारी सुरू असल्याचे कळते. काहीतरी मोठा गोंधळ करून ठेवणे ही माशाची खासियत. त्यामुळेच ‘रेसिपी फॉर द डिझास्टर’ हा एपिसोड जगात सर्वाधिक पाहिला गेलेल्या व्हिडीओमध्ये चौदाव्या क्रमांकावर आहे. त्या विशिष्ट पोषाखामुळे ती इंडोनेशियासारख्या मुस्लीम देशातदेखील लोकप्रिय झाली. मधल्या काळात काही मुलींचे नाव माशा ठेवण्यात आलं होतं. माशा टीव्हीवर प्रदर्शित होऊन बराच काळ झाला असला तरी आता त्याचे सारे एपिसोड यूटय़ूबवर उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच्या लहानग्यांच्या पिढीतदेखील कमालीची लोकप्रिय झाली आहे.
सुहास जोशी