News Flash

पडद्यामागचे : साथ-संगत

लाइव्ह रेकॉर्डिगचं युग अखेरच्या टप्प्यात असताना कमलेश यांचं करिअर सुरू झालं.

विजया जांगळे response.lokprabha@expressindia.com

‘ताक धिना धिन’ आठवतंय? रिअ‍ॅलिटी शोचा तो अगदी सुरुवातीचा अवतार होता. गेल्या २५ वर्षांत सांगीतिक स्पर्धाचं विश्व आमूलाग्र बदललं. प्रतिसाद वाढला, ग्लॅमर वाढलं, संधी वाढल्या, स्पर्धाची भव्यताही वाढत गेली. अंताक्षरी स्पर्धा ते रिअ‍ॅलिटी शो हे स्थित्यंतर अनुभवलेल्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्रसिद्ध संगीत संयोजक कमलेश भडकमकर! सांगीतिक स्पर्धाच्या गर्दीतही स्वत:चं स्थान कायम राखणाऱ्या ‘सारेगमप’च्या लोकप्रिय वाद्यमेळाचं सुकाणू पहिल्या पर्वापासून त्यांच्याच हाती आहे. ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ हे नवं पर्व नुकतंच सुरू झालं. त्यानिमित्त संगीत संयोजनाच्या क्षेत्रातली कमलेश यांची मुशाफिरी आणि रिअ‍ॅलिटी शोचं बदलतं रूप याविषयी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न..

शाळेत असताना पेटी शिकण्यापासून कमलेश यांचा संगीत क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. पण याच क्षेत्रात करिअर करावं, असा विचार शाळेच्या १० वर्षांत कधीही त्यांच्या मनात आला नव्हता. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली ती महाविद्यालयात गेल्यानंतर. त्याविषयी कमलेश सांगतात, ‘सुरुवातीला चेतना आणि नंतर रुपारेल महाविद्यालयात शिकलो. वाद्यांविषयी लहानपणापासूनच आकर्षण होतं. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होतो, त्यामुळे हाती भरपूर वेळ होता. अकरावी-बारावीत असतानाच ऑर्केस्ट्रामध्ये काम करू लागलो. त्यामुळे हिंदी गीतांची नोटेशन्स कशी काढतात, हे कळलं. ऑर्केस्ट्राच्या प्रमुखांनी मला चंद्रकांत वस्त यांच्याकडे शिकायला पाठवलं. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. वेगवेगळी काम करताना या क्षेत्रातल्या अनेकांशी मैत्र जुळत गेलं. कॉलेजमध्येच कौशल इनामदारशी ओळख झाली. मला कीबोर्ड वाजवता येत होता, नोटेशन्स लिहिता येत होती. त्यामुळे त्याच्या नव्या चालींवर काम करण्याची जबाबदारी नकळत माझ्यावर आली. दोघांचाही प्रवास एकत्र सुरू झाला. हा प्रवास कुठे घेऊन जाणार आहे, याचा अंदाज तेव्हा कोणालाही नव्हता.’

लाइव्ह रेकॉर्डिगचं युग अखेरच्या टप्प्यात असताना कमलेश यांचं करिअर सुरू झालं. त्यामुळे खरीखुरी वाद्यं आणि ती प्रत्यक्ष समोर बसून वाजवणारा वाद्यवृंद हा आजच्या काळात दुर्मीळ असलेला अनुभव त्यांना काही वर्ष का असेना घेता आला. त्याविषयी ते सांगतात, ‘लाइव्ह रेकॉर्डिगचं जग वेगळंच होतं. कीबोर्डवरून सतार वाजवण्याचा काळ अजून सुरू व्हायचा होता. त्यामुळे पहिली सात-आठ वर्ष तरी खरीखुरी वाद्य वाजवण्याची; त्या काळातल्या प्रसिद्ध संगीतकारांबरोबर, वादकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर, यशवंत देव, अशोक पत्की, रवी दाते, स्नेहल भाटकर अशा प्रथितयश संगीतकारांप्रमाणेच कौशल इनामदार, सलील कुलकर्णी, मिलिंद जोशी या समवयस्कांबरोबरही काम केलं. लाइव्ह रेकॉर्डिगसाठी खूप काटेकोर नियोजन करावं लागत असे. मी जवळपास १५-१६ वर्ष श्रीनिवास खळेंचा साहाय्यक होतो. त्यांच्या गाण्यांची नोटेशन्स लिहिण्याचं काम मी करत असे. कितीही प्रसिद्ध गायक असला, तरी तो तालमींसाठी त्यांच्या घरी यायचा. एका कामासाठी जवळपास दोन-दोन महिने तालमी होत. मग ऱ्हिदमिस्ट येत. गाण्याची चाल, लय, आवर्तनं हे सारं घरीच निश्चित होत असे. स्टुडिओत जाण्यापूर्वीच गृहपाठ पक्का झालेला असे. सगळ्यांचं सगळं अगदी तोंडपाठ असे. आता काय वाजवायचं, असा प्रश्न स्टुडिओत गेल्यावर कोणालाही पडत नसे. या पद्धतीत आता खूप बदल झाला आहे. अनेकदा गायक-वादकांना स्टुडिओत गेल्यावर कळतं की गाणं कोणतं आहे, कसं गायचं, वाजवायचं आहे. प्रत्येक संगीतकाराची शैली वेगवेगळी होती. डावजेकरांचं काम अतिशय नाटय़पूर्ण होतं. त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येत असे. शब्दप्रधान गायकी हे यशवंत देव यांचं ब्रीद होतं. आणि या प्रत्येकाचं वैशिष्टय़ हे की त्यांचा गाण्यामागचा विचार पक्का असे. आपण एखादी गोष्ट का करायची असं विचारलं, तर त्यावर समाधानकारक उत्तर मिळत असे. उगाचच कामचलाऊ, उडवाउडवीची उत्तरं कोणीही देत नसे. एखाद्या प्रभावाखाली काम करायचं आणि त्यामागचा विचारच आपल्याला माहीत नाही, असं होत नसे.’

‘ताक धिना धिन’च्या जमान्याविषयी कमलेश सांगतात, ‘त्या कार्यक्रमासाठी मी आणि हृषिकेश कामेकर गावोगावी जाऊन दूरदर्शनच्या खर्चाने गाण्यांच्या कॅसेट्स खरेदी करायचो आणि ती गाणी बसवायचो. नीना राऊत यांच्या ओळखीने अनेक दिग्गजांकडून गाण्यांच्या चाली मिळवायचो. आम्हाला कोणी ओळखत नव्हतं पण सर्वजण मदत करायचे. संगीत साखळी नावाचा एक प्रकार होता. पाच गाण्यांची मेलडी वाजवायचो. त्यात काही चूक केली, तर नीना राऊत ती नेमकी ओळखायच्या. दूरदर्शनच्या लायब्ररीतूनही अनेक सुंदर गाणी मिळाली. तेव्हा ऑर्केस्ट्रा किंवा रेकॉर्डिगमधून महिन्याला ६०० रुपये वगैरे मिळायचे. त्यातून महिन्याला फार तर एक कॅसेट परवडत असे. त्यामुळे पुढच्या महिन्यात कोणती कॅसेट घ्यायची हे आधीच ठरवून ठेवलेलं असे. नाही तर रिकाम्या कॅसेटवर गाणी रेकॉर्डही करून घेता येत असत.’

गाणं तयार होण्याच्या प्रक्रियेविषयी अनेक किस्से प्रचलित असतात. या प्रक्रियेत संगीत संयोजकाची नेमकी भूमिका काय याविषयी कमलेश सांगतात, ‘भावगीत असो, लावणी असो वा बालगीत. चाल भिडली तर त्यावर संगीत देण्यात मजा येते. चित्रपटासाठी गाणं करताना त्याचं चित्रीकरण आऊटडोअर होणार आहे की इनडोअर याची माहिती घेतली जाते. नायकाच्या हातात एखादं वाद्य दिसणार असेल, तर संपूर्ण संगीतसंयोजनावर त्या वाद्याचा प्रभाव असतो. उदाहरण द्यायचं झालं, तर ‘हम आपके है कौन’मध्ये सलमान खानच्या हातात मेन्डोलिन आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपटावर मेन्डोलिनचा प्रभाव आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक यांच्यात झालेल्या चर्चाचे संदर्भही संगीत संयोजकासाठी उपयुक्त ठरतात. यानंतर वाद्यवृदांचा विचार केला जातो. इथे आर्थिक बाबी महत्त्वाच्या ठरतात. बजेट कमी असेल तर १० वादकांमध्येच ४० वादकांचा आभास निर्माण करण्याचं कसब संगीत संयोजकाला अंगी बाणवावं लागतं. दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक यांच्यात उत्तम संवाद असेल आणि त्यांचे परस्परांशी सूर जुळलेले असतील, तर अतिशय सुंदर गाणं तयार होतं.’

मुंबईतल्या ‘कलांगण’ या संस्थेने २०१२ साली ‘तालस्वर’ नावाचा एक उपक्रम राबवला होता. त्याचं काम कमलेश यांनी केलं होतं. त्या अनुभवाविषयी ते सांगतात, ‘त्यात १४ भाषांतली गाणी होती आणि त्यासाठी आम्ही तब्बल १७५ वाद्यं वाजवली होती. ज्या भाषेतलं गाणं त्या प्रांतातली वाद्यं असं सूत्र होतं. त्यामुळे विविध प्रांतांची खासियत असलेल्या मात्र त्या भागाबाहेर फारशा ज्ञात नसलेल्या अनेक वाद्यांशी ओळख झाली. त्या-त्या भागातल्या संगीताचा अभ्यास केला. दक्षिण भारतीय संगीतात मृदुंगम्, घटम् तर असतातच पण त्यापलीकडे जात तविळ, चेंडई ही तिथली स्थानिक वाद्यंही या गीतांसाठी वाजवण्यात आली. बंगाली गाण्यामध्ये तिथलं दोतारा हे स्थानिक तंतुवाद्य वाजवण्यात आलं. पंजाबी गाण्यासाठी तिथल्या खास शैलीत ढोल वाजवण्यात आला. राजस्थानी गीतात रावणहत्ता वाजवण्यात आलं. संस्कृत गीतात आम्ही संतुर, सरोद आणि फारच क्वचित वाजवली जाणारी वीणा यांचा मिलाफ साधला. घुंगरूतरंग नावाच्या सुरांचे घुंगरू असलेल्या वाद्याशीही परिचय झाला. हे वाद्य जुन्या चित्रपटांच्या गाण्यांत वापरलं जात असे. ते एखाद्या जुन्या वादकाने, नव्या पिढीच्या वादकाला दिलं असणार. ते पाहण्याची, त्याविषयी जाणून घेण्याची संधी आम्हाला मिळाली. या कामाच्या निमित्ताने अनेक तालवाद्य, तंतुवाद्य, बासरीचे विविध प्रकार वाजवता आले.

कमलेश यांच्या ‘मनसा’ या संस्थेतर्फे संगीतकार संमेलनं भरवण्यात येत. त्यांचा हा उपक्रम सांगीतिक विश्वाशी संबंधित असलेल्यांमध्ये बराच वाखाणला गेला. त्याविषयी ते सांगतात, ‘ही संकल्पना माझा मित्र मिथिलेश पाटणकर याची! खास संगीतकारांसाठी असा कोणताच कार्यक्रम त्या वेळी नव्हता. संगीतरचनांची देवाणघेवाण होईल, संगीतकार एकमेकांची गाणी ऐकतील, स्वत:ची गाणी सादर करतील आणि विचार-कल्पनांचं आदानप्रदान होईल असा त्यामागचा विचार होता. या संमेलनांत व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकांचाही समावेश होता. याअंतर्गत २००८ ते २०१५ दरम्यान एकूण ७५ कार्यक्रम आयोजित केले. संगीतविश्वातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. तौफिक कुरेशी, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, देवकी पंडित अशा अनेक मातब्बरांनी त्यात मार्गदर्शन केलं. यातूनच २०१० साली २७ नवीन गीतांची एक सीडी काढण्यात आली. खरं तर यातून आर्थिक लाभ काहीही नव्हता, नवनवीन कलाकारांबरोबर काम करण्याचं समाधान मात्र होतं. अनेकांनी हा उपक्रम उचलून धरला.

‘सारेगमप’ म्हटलं की स्पर्धक, परीक्षकांच्या बरोबरीनेच आठवतो तो स्पर्धकांना दमदार साथ करणारा वाद्यवृंद. ‘मराठी सारेगमप’साठी निष्णात वादकांची मोट बांधण्यापासून स्पर्धकांची तयारी करून घेण्यापर्यंत विविधांगी जबाबदारी कमलेश सुरुवातीपासून पेलत आले आहेत. पण या कार्यक्रमासाठी झालेली पहिली बैठक त्यांच्यासाठी काहीशी निराशाजनकच ठरली होती. तो किस्सा ते सांगतात.. ‘झी मराठी अल्फा मराठी होतं, तेव्हापासून मी त्या वाहिनीशी जोडला गेलो होतो. त्यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाची संकल्पना अतिशय अप्रतिम होती. या कार्यक्रमाच्या अनेक भागांमध्ये मी वादक म्हणून सहभागी होतो. त्यातल्या बऱ्याच भागांचं दिग्दर्शन सुधीर मोघे यांनी केलं होतं. काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि दर्जेदार कलाकृती, याचं ‘नक्षत्रांचे देणे’ हे उत्तम उदाहरण होतं. यातून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. त्याच सुमारास ‘मराठी सारेगमप’साठी नियोजन सुरू झालं. पहिल्याच बैठकीत त्यांनी मला सांगितलं की, या कार्यक्रमात तुझा वादक म्हणून विचार केलेला नाही. हे ऐकून माझा विरस झाला. १९९६ पासून दूरदर्शनवर गाजत असलेलं ‘ताकधिनाधिन’ आणि नंतर ‘नक्षत्रांचे देणे’मध्ये मी वादक म्हणून सहभागी होतो. त्यामुळे वाजवायचं नाही, तर काय उपयोग, असं मला वाटत होतं. पण नंतर मला सांगण्यात आलं की तू नियंत्रण कक्षात राहशील आणि सगळ्यावर लक्ष ठेवणं ही तुझी जबाबदारी असेल. ही नवी भूमिका समजून घेणं मला जड गेलं. मी व्यासपीठावर नसणार, त्यामुळे मला माझ्यापेक्षाही तरबेज वाद्यवृंद लागणार होता. त्यातूनच ‘सारेगमप’चा वाद्यवृंद साकार झाला. अशा कार्यक्रमांत एखादं गाणं ५० वादकांनी वाजवलेलं असो वा ३०० आपल्याला सात-आठ वादकांमध्येच प्रेक्षकांना ती अनुभूती मिळवून द्यायची असते. सुरुवातीच्या काही भागांमध्ये आम्हाला ते अतिशय कठीण गेलं. काही चुकाही झाल्या. भट्टी जमून यायला थोडा वेळ गेला, पण त्यानंतर मात्र आम्हा सर्वाचे सूर जुळले. आज एवढय़ा वर्षांनंतरही त्यातली मजा वाढतच आहे.’

‘सारेगमप’ने वादकांना ओळख मिळवून दिली. त्याविषयी कमलेश सांगतात, ‘सारेगमपमध्ये एवढी गाणी सादर झाली आहेत की आज आमच्या ग्रुपकडे साधारण आठ-दहा हजार गाण्यांची नोटेशन्स तयार आहेत. त्याचा आम्हाला आता खूप फायदा होतो. झी मराठी आणि ‘सारेगमप’ने वादकांना घराघरांत पोहोचवलं. अमरने स्वत:चा ‘अमरबन्सी’ हा कार्यक्रम केला. सत्यजीतने ‘जादूची पेटी’, तर नीलेशने ‘रंग ढोलकीचे’ केला. झी मराठीने २०११ साली मी अ‍ॅरेंज केलेल्या गीतांचा ‘सूर तेच छेडिता’ हा कार्यक्रम वाहिनीवरून प्रसारितही केला. ४५ वादक आणि २६ गायकांचा ताफा त्यात सहभागी झाला. एका संगीत संयोजकाच्या अ‍ॅरेंजमेन्ट्सचा कार्यक्रम होणं ही दुर्मीळ आणि मोठी गोष्ट आहे, असं मला वाटतं.’

‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या यंदाच्या पर्वात छोटय़ा वादकांनाही संधी देण्यात आली आहे. पण एवढी लहान मुलं आणि एवढी मोठी जबाबदारी, म्हटल्यावर त्यांची तयारी करून घ्यावीच लागत असणार. कमलेश तो अनुभव सांगतात.. ‘लिट्ल चॅम्प्सचं पहिलं पर्व आणि आताचं पर्व यामध्ये १२ वर्षांचा काळ लोटला आहे. पर्वागणिक काही तरी वेगळं असायला हवं आणि ते नावीन्य आपल्याला झेपायलाही हवं. वादक म्हणून लहान मुलांना संधी देणं हा असाच एक अनोखा प्रयोग! प्रसिद्ध वादकांबरोबर वाजवताना लहान मुलांवर दडपण येणं स्वाभाविकच होतं. शिवाय मोठे वादक वाजवतायत आणि कॅमेरा छोटय़ांवर आहे, असं आम्हाला होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. त्याच वेळी तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सर्व जण आहोतच, असं आश्वस्तही केलं. वादनाचा सराव सुरू असतोच. खरं तर मुलं लहान असली, तरी त्यांच्यात वादकांचा आत्मा आहे. ती नेहमीच छान वाजवतात, पण इथे स्पर्धात्मक वातावरण आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक तयारीने उतरावं लागेल, याचं भान त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न आहे. ‘सारेगमप’ हे एकही रीटेक न घेण्याबद्दल ओळखलं जातं आणि सांगताना आनंद वाटतो की छोटे वादक असूनही या पर्वातसुद्धा अद्याप एकही रिटेक झालेला नाही. आजवर ‘सारेगमप’ची १४ पर्व झाली. स्पर्धक लहान असोत वा मोठे; आम्ही रिटेक घेत नाही हे मी अतिशय ठामपणे सांगू शकतो. खरं सांगायचं तर वादकांना स्पर्धकांपेक्षाही जास्त टेन्शन असतं. सत्यजीत प्रभू असो वा अमर ओक प्रत्येकाच्या डोक्यावर एक टांगती तलवार असतेच. गाण्याची लय त्या स्पर्धकाला झेपली पाहिजे म्हणून सगळं काटेकोर लिहूनच ठेवलेलं असतं. मुलांच्या आवाजापासून त्यांच्या तालमींपर्यंत सगळ्यांची काळजी घेतली जाते. मुलं त्या गाण्याला सरावत नाहीत, तोपर्यंत आम्ही तालमी करत राहतो.

एवढी लहान मुलं आत्मविश्वासाने गाताना पाहून त्यांची तयारी कशी करून घेतली जात असेल, असा प्रश्न पडतोच. त्याविषयी कमलेश सांगतात, ‘स्पर्धकांच्या गाण्याचा अंदाज घेण्यासाठी सुरुवातीला त्यांना विविध बाजांची गाणी दिली जातात. त्यातून त्यांची शैली कळत जाते. एखादा मुलगा शास्त्रीय गाणी गात असेल, तर त्यातली कोणती गाणी त्याला उत्तम गाता येतात, हे पाहिलं जातं आणि स्पर्धेदरम्यान येणाऱ्या संकल्पनांनुसार त्याला ती दिली जातात. संगीताच्या संदर्भातले काही निर्णय आम्ही घेतो. काही वाहिनी घेते.’

रिअ‍ॅलिटी शोच्या बदलत गेलेल्या स्वरूपाविषयी कमलेश सांगतात, ‘पूर्वी समाजमाध्यमं फारशी प्रभावी नव्हती. २००८ साली पहिलं पर्व झालं तेव्हा ती मुलं फक्त गायला आली होती, त्यापलीकडे त्यांना काही माहीत नसे. आज इंटरनेटमुळे अख्खं जग सर्वासमोर खुलं झालं आहे. एखाद्या महान गायकाने खूप वर्षांपूर्वी गायलेलं गाणंही उपलब्ध आहे आणि सध्याची कव्हर व्हर्जन्सही आहेत. शहर असो वा गाव, प्रत्येकाला हवी ती माहिती सहज मिळते. त्यामुळे मुलं स्मार्ट झाली आहेत, दडपण नाही, आत्मविश्वास वाढला आहे. पण गाण्यावर मेहनत आजही तेवढीच घ्यावी लागते. आज या मुलांचे समाजमाध्यमांवर आमच्यापेक्षा जास्त व्हिडीओज आहेत. मुलं तयारी करूनच स्पर्धेत उतरतात. कसं गावं, वाजवावं याच्या टिप्स स्पर्धेदरम्यान दिल्या जातात. ‘सारेगमप’च्या वादकांचा ग्रुप गेली २०-२५ वर्ष एकत्र काम करतोय. कदाचित पुढच्या २०-२५ वर्षांत ही मुलंही आमच्यात सहभागी होतील. खरं तर ती आताच आमच्या ग्रुपचा भाग झाली आहेत आणि जो एकदा आमच्यामध्ये येतो तो कायम राहतो.’

रिअ‍ॅलिटी शोमुळे अतिशय लहान वयात मिळणाऱ्या प्रसिद्धीचा मुलांच्या मनावर आणि कलेवर काय परिणाम होतो, याविषयी ते सांगतात, ‘मुलांना लहान वयातच या सर्व संधी उपलब्ध आहेत, तर ती सहभागी होणारच. गाण्याचं शिक्षण तर थांबत नाही. ते त्यांच्या गुरूंकडेच शिकत असतात. स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना खूप गाणी कळतात. जुनी-नवी सर्व गाणी अभ्यासली जातात. चांगल्या गायकांना व्यासपीठ मिळतं. भविष्यात त्यांना याच स्पर्धेच्या जगात यायचं आहे, त्याची तयारी इथे होते. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.’ आधीच्या पर्वातल्या गायकांपैकी काही या पर्वात मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याविषयी कमलेश सांगतात, ‘त्यांनी हा प्रवास अनुभवला आहे आणि बाहेरच्या जगातही ते यशस्वी होत आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षक म्हणून नाही तर मार्गदर्शक म्हणून घेण्यात यावं, असा निर्णय वाहिनीने घेतला.’

टाळेबंदीने एकूणच मनोरंजन क्षेत्राला ग्रासलं असताना, कमलेश मात्र या संकटाकडे संधी म्हणून पाहतात. ते सांगतात, ‘टाळेबंदी एका प्रकारे पथ्यावरच पडली आहे. मी १०० वादकांबरोबर एक सांगीतिक प्रयोग करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टाळेबंदीच्या काळात वेळ देता आला. साथीची तीव्रता कमी झाली की साधारण २०२२च्या आसपास हा प्रयोग रसिकांसमोर सादर करण्याचा विचार आहे. सारेगमपविषयी सांगायचं तर सगळं नेहमीसारखंच आहे. फक्त या वेळी ऑडिशन्स ऑनलाइन घ्याव्या लागल्या. हा अनुभव फार वेगळा होता. थेट संपर्कातली सहजता त्यात हरवल्यासारखी वाटली, मात्र प्रत्यक्ष भेटल्यावर खूप मजा आली. संवाद फार महत्त्वाचा आहे, हे या पर्वाच्या निमित्ताने प्रकर्षांने जाणवलं.’

पूर्वीच्या तुलनेत आता वादकांना ओळख मिळू लागली आहे, त्याविषयी कमलेश सांगतात, ‘पूर्वी ऑर्केस्ट्रा असायचा, मग थिमॅटिक शो आले, मग रिअ‍ॅलिटी शो आले आणि संगीताला चांगलं आर्थिक पाठबळ मिळू लागलं. संगीतकार आहे असं म्हटलं की पूर्वी लोक विचारायचे, मग  पोटापाण्यासाठी काय करतोस? आता एखादा म्युझिशिअन यूटय़ूबर असेल तरी लाखांत कमवू शकतो. त्यामुळे वादक, संगीतकार, संगीत संयोजक, गीतकार अशा गाण्याशी संबंधित सर्वच व्यवसायांना नक्कीच चांगले दिवस आले आहेत. यात गुंतवणूक करण्यासाठी लोक पुढे येत आहेत.’

काळ बदलला आहे. एके काळी केवळ छंद म्हणून ज्या क्षेत्राकडे पाहिलं जात होतं, त्याची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. गायक, वादकांना आज नवनवी व्यासपीठं उपलब्ध होत आहेत. समाजमाध्यमांतून स्वतची कला जगाच्या व्यासपीठावर सादर करण्याच्या संधीही मुबलक आहेत. काळानुसार आपणही बदलायला हवं, या नव्या माध्यमांकडे सकारात्मकतेने पाहायला हवं, असं कमलेश यांना वाटतं. पण काळ कितीही बदलला, तरी कलाकाराला मेहनत ही घ्यावीच लागते; सुरेल वाजवणं आणि सुरेल गाणं हे अपरिहार्यच आहे, हेदेखील ते अधोरेखित करतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2021 3:14 am

Web Title: music arranger kamlesh bhadkamkar journey and view on reality shows zws 70
Next Stories
1 शोध वारशाचा : लोहगड परिक्रमेतला पुरातन खजिना (पूर्वार्ध)
2 निमित्त : पासवानांचं राजकीय कुटुंब
3 प्रासंगिक : लशीसाठी ‘लॉलीपॉप’ कशाला?
Just Now!
X