राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असं संबोधलं जाणाऱ्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने  घडवलं ते इथल्या दगडाने. या  महाराष्ट्र घडवणाऱ्या दगडाची ओळख करून देण्याचा प्रयत्न अभिजित घोरपडे संपादित ‘भवताल’ या दिवाळी विशेषांकामध्ये करण्यात आला आहे. डॉ. एन. जे. पवार, सुनील लिमये, प्रा. अरुण बापट, डॉ. अजित वर्तक, डॉ. सचिन जोशी, डॉ. श्रीकांत प्रधान, डॉ. श्रीकांत जाधव, प्रसाद पवार यांसारख्या ज्येष्ठ अभ्यासकांच्या लेखणीने हा अंक सजला आहे. महाराष्ट्राच्या दगडाचा इतिहास, लेणींची निर्मिती, भूगोल, दगडातून महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर घालणारी राज्यातील वैभवं (लोणार, कोकणकडा, सांदण दरी), खनिजे, वास्तू आणि सर्वाच्या आवडीचे गड-किल्ले, अशा दगडांशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा या अंकात अतिशय खोलात जाऊन धांडोळा घेण्यात आला आहे.

गेली काही वष्रे महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पण मातीपेक्षा खडकामध्ये पाणी कसं जिरतं, ते तो कसा साठवतो आणि त्यासंबंधीच्या अनेक घटकांची रंजक मांडणी डॉ. एन. जे. पवार यांनी आपल्या ‘कातळातील पाणी’ या लेखात केली आहे. सुनील लिमये यांचा ‘दगडावर घडलेली माळराने’ हा लेख इथल्या जैवविविधतेला कारणीभूत घटकांची ओळख करून देतो. अभिजित घोरपडे यांनी दख्खनच्या पठारात दिसणाऱ्या काळ्या पाषाणातील बिबटय़ा दगड, दगडी कांदे, शंकराच्या जटा, ज्वालामुखीचं केंद्र, रांजण खळगे, षटकोनी पोळी या रूपांची दिलेली माहिती कोटय़वधी वर्षांचा इतिहास उलगडून दाखवतात. ‘लेणी साकारताना’ या विभागाअंतर्गत पाषाणकलावैभव, महाराष्ट्रातील शैलगृहे, वेरूळ, छिन्नीचे घाव या लेखांमधून महाराष्ट्रातील बेसाल्टमध्ये कोरलेल्या लेणींची शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि इतिहासाच्या विविध अंगांतून ओळख करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या काळ्या पाषाणात सापडणाऱ्या आकर्षक खनिजांची जगाला ओळख करून देणारे आणि गेल्या ५५ वर्षांपासून या बदलत्या पृष्ठभागाचे साक्षीदार असलेले एम. एफ. मक्की यांचे काम, त्यांच्याकडील स्फटिकांचा खजिना (चांगल्या दर्जाच्या फोटोंसह), जमिनीच्या पोटातून ते शोधून काढण्याची पद्धत आणि त्याच्यावर केली जाणारी प्रक्रिया यांना वाहिलेला एक विशेष विभाग या अंकाचे मूल्य अमूल्य करतो.

विशेष म्हणजे, ‘भवताल’कडून या अंकासोबत वाचकांना महाराष्ट्राच्या काळ्या दगडात सापडणाऱ्या अनेक स्फटिकांपकी प्रत्येक अंकासोबत एक स्फटिक भेट म्हणून देण्यात आला आहे. उटण्याच्या पाकिटापेक्षा या अनोख्या भेटीमुळे हा अंक कायम संग्रही आणि स्मरणात राहील असाच आहे.
भवताल; संपादक : अभिजित घोरपडे; मूल्य : रु. २००

विविध विषयांच्या समावेशामुळे अंक वाचनीय झाला आहे. नीला उपाध्ये यांनी ‘मालक जुन्या बॉम्बेचे’ या लेखात जुन्या मुंबईची ओळख करून दिली आहे. ‘वाचन संस्कृतीचा विकास’ या लेखात डॉ. विजया वाड यांनी आपले वाचन कसे विकसित होत गेले याचा आढावा घेतला आहे. डॉ. तारा भवाळकर यांनी ‘प्रवाही लोकसंस्कृती’ या लेखात घेतलेला वेध वाचनीय आहे. श्रीपाद नांदेडकर यांचा ‘इतिहासाचार्य राजवाडे’ यांच्यावरचा लेख अभ्यासपूर्ण आहे. डॉ. राजू पाटोदेकर यांनी ‘चित्रपटातील शाही घराणेशाही’ या लेखात चित्रपटसृष्टीतील विविध घराण्यांचा लेखाजोखा मांडला आहे.  अ‍ॅड्. असीम सरोदे यांनी प्रदूषणावर लिहिले आहे. याशिवाय अमित हुक्केरीकर, दत्तात्रेय गोखले, हेमंत महाजन, आरती साठे, ज्योत्स्ना राजपूत, माधव गवाणकर, रेणू दांडेकर यांचे लेख, माधुरी प्रभुणे, विनिता ऐनापुरे, सुधीर सुखटणकर, यांच्या कथा, स्मिता सहस्रबुद्धे, सुजाता पाटील, रमेश धनावरे, संजय सहस्रबुद्धे, रमाकांत दीक्षित, शरद पाटील, मुबारक शेख आदींच्या कविता, विवेक मेहेत्रे यांची व्यंगचित्रे तसंच राशिभविष्य आहे.
साहित्य आभा; संपादक : शारदा धुळप; मूल्य : रु. २००
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com