News Flash

लग्नसराई विशेष : बंगाली लग्न – पाटी पात्रो आणि बऊ भात

लग्नाच्या एक दिवस अगोदर पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये वधूच्या घरी ऋद्धी पूजा ही पूजा घातली जाते.

लग्न म्हणजे सहसा आयुष्यात एकदाच होणारा सोहळा. साहजिकच तो प्रत्येकाला झोकात साजरा करायचा असतो. तो करण्यासाठीचं माध्यम म्हणजे लग्नसोहळ्यातल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा. आपल्याच परंपरा प्राचीन, समृद्ध असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आपल्या देशातल्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतांमधल्या लग्नपद्धती, परंपरा यांच्यावर एक नजर टाकली तर थक्क करणारं वैविध्य पाहायला मिळतं.

स्वप्ना अय्यंगार, ग्रीष्मा नायर, शलाका सरफरे, भाग्यश्री प्रधान, अश्विनी पारकर

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले बंगाल हे राज्य त्याच्या भौगोलिक रचनेबरोबरच तिथल्या वेगळ्या संस्कृतीमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधणारे राज्य आहे. तिथल्या परंपरा, भाषा, कला-कौशल्य, निसर्गसौंदर्य आणि तेथील माणसांची जीवनशैली या सगळ्या गोष्टी वैशिष्टय़पूर्ण आहेत. या सगळ्याचे प्रतिबिंब बंगाली विवाह सोहळ्यातून अनुभवता येते. देखण्या सजावटी, फुलांचा मनमोहक वापर, साडी परिधान करण्याची वैशिष्टय़पूर्ण पद्धत, साडय़ांची रंगसंगती, फुलांची आरास, मुंडावळ्यांचे प्रकार आणि महिलांकडून तोंडाने काढला जाणारा विशिष्ठ ध्वनी सगळ्याच गोष्टी अलौकिक लग्नपद्धतीचा अनुभव दिल्याशिवाय राहात नाही. रवींद्रनाथ टागोर आणि बंगाली लेखकांच्या कथांमधून आलेल्या वर्णनातून पारंपरिक विवाहाचे वेगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहते तर दुसरीकडे चित्रपटांमधून विवाहाचा देखणा अनुभवही घेता येतो. बंगाली विवाहाच्या याच पद्धती खूप महत्त्वाच्या आणि सुखद अशा आहेत.

लग्नापूर्वी होणाऱ्या पाटी पात्रो या विधीला पुरोहित उपस्थित असतात. विधिवत विवाह ठरवल्यानंतर याच दिवशी वर आणि वधूचे आईवडील आणि कुटुंबीयांच्या एकत्र बैठकीमध्ये लग्नाची तारीख निश्चित केली जाते. एक रुपयाचा शिक्का कागदावर चिटकवून त्यावर लग्न ठरल्याचा वृत्तांत लिहिला जातो. त्याला ‘पाटी पात्रो’ असे म्हणतात.

लग्नाच्या एक दिवस अगोदर पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये वधूच्या घरी ऋद्धी पूजा ही पूजा घातली जाते. पूर्वजांसाठी ही पूजा केली जात असून त्याला विरिधि असे म्हटले जाते.

लग्नाच्या दिवशी सूर्य उगवण्यापूर्वी दोधी मंगल विधी केला जातो. यामध्ये आठ ते दहा विवाहित स्त्रिया, वर आणि वधूसोबत तलावाच्या काठी जातात. तेथे गंगा देवीला लग्नाकरिता आमंत्रित करत असतात. त्यावेळी तलावातून पाणी भरून सोबत आणले जाते. या पाण्याचा उपयोग वधू-वरांना स्नान घालण्यासाठी केला जातो.

विवाहाचा धार्मिक विधी : विवाहच्या सोहळ्यामध्ये वर आणि वधूची आई सहभागी होत नाही. बंगाली लग्नामध्ये आईच्या अनुपस्थितीमुळे वधूवरांचे अपशकुनापासून रक्षण होते असा समज आहे. लग्नासाठी नवरामुलगा आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी घंटा, शंख यांच्या माध्यमातून सुमधुर नाद निर्माण करून, पायावर पाणी घालून त्याचे स्वागत केले जाते. गोड मिठाई भरवून त्याला घरात घेतले जाते. लग्नमंडपामध्ये वराचा प्रवेश झाल्यानंतर पुरोहित धार्मिक पूजा आणि विधी पूर्ण करतात.

वरमालांचे आदानप्रदान : वधू-वरांनी एकमेकांना घातलेल्या वरमाला यावेळी बदलल्या जातात. त्यानंतर संपूर्ण रात्र, संपूर्ण कुटुंबीय आणि नातेवाईकमंडळी वधू-वरांसोबत जागरण करतात. वेगवेगळे खेळ खेळले जातात. गाणी म्हटली जातात.

सकाळी वर वधूच्या भांगामध्ये सिंदूर भरतो. त्यानंतर पुरोहितांच्या उपस्थितीत सूर्याची पूजा केली जाते. त्यानंतर घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन वधूवरांना त्यांच्या घरी परत पाठवले जाते.

बऊ भात : नवऱ्यामुलाच्या घरामध्येही या दोघांचे स्वागत शंख वाजवून केले जाते. दुधाने भरलेला कलश पावलांनी ओलांडून नवऱ्या मुलीला घरामध्ये प्रवेश दिला जातो. घरामध्ये आलेली नववधू पतीच्या घरातील काहीच खात नाही. शेजारच्या घरातून तिच्यासाठी भोजन आणले जाते. तर दुसऱ्या दिवशी घरामध्ये ‘बऊ भात’ केला जातो. याशिवाय वधू आपल्या नव्या कुटुंबासाठी स्वहस्ते भोजन बनवते. वधूला नव्या ताटामध्ये भोजन वाढले जाते. संध्याकाळी सर्वासाठी मेजवानी आयोजित केली जाते. ज्यावेळी वधू पारंपरिक बंगाली साडी नेसते तर वर धोतर परिधान करतो.

फूल सज्जा : या विधीसाठी लागणारी फुलं आणि वर-वधूचे कपडे वधूच्या घरातून आणले जातात. फूल सज्जा या विधीनंतर बंगाली लग्नातील सगळे विधी पूर्ण झाले असं मानलं जातं.

लग्नातील काही महत्त्वाचे…

बंगाली वधू परिधान करते त्या दागिन्यांना नीर डोल म्हटले जाते. हे दागिने खूप जड असून प्रत्येक वधूला ते परिधान करणे आवश्यक मानले जाते. वधूचे कपाळ चंदनाने सजवले जाते. कपाळावर तसेच भुवयांवरही हा शृंगार केला जातो. बंगाली वधूला भांगामध्ये सोन्याचा दागिना परिधान करावा लागतो. या दागिन्याला टिकली असे म्हटले जाते. लग्नाच्या प्रसंगी वधूच्या डोक्यावर मुकूट घातला जातो. याला टियार असे म्हटले जाते. या मुकुटाशिवाय वधूचा शृंगार अर्धवट मानला जातो. याशिवाय नवरीमुलीने नथ परिधान करणेही अत्यावश्यक असते.
शलाका सरफरे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:17 am

Web Title: wedding special issue bangali marriage
Next Stories
1 लग्नसराई विशेष : गुजराती लग्न – समुरता आणि हस्तमिलाप
2 लग्नसराई विशेष : पंजाबी लग्न – वरना आणि मिलनी
3 लग्नसराई विशेष : तेलुगु लग्न – पेलिकुथुरू  आणि जीलकरा बेल्लम
Just Now!
X