स्त्रियांची रंगाची परिभाषा वेगळीच असते. त्यांनी चटणी कलर म्हटलं तर तुम्ही नेमक्या कोणत्या चटणीचा रंग घेणार? राणी कलर असं म्हटल्यावर पुरुषांना कोणती राणी हा प्रश्न हमखास पडणार.. रंगपंचमी हा आपला मराठमोळा सण अलीकडे मराठीजन साफ विसरून गेले आहेत. होळीनंतर पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीऐवजी होळीच्या दुसऱ्या दिवशी असणारा  धूळवड हा सण आपण मोठय़ा उत्साहात साजरा करतो. ते असो, आपण यानिमित्ताने जरा रंगांच्या दुनियेत डोकावू या.. पण तुमच्या आमच्या नव्हे तर स्त्रियांच्या रंगांच्या दुनियेत. त्यांची रंगांची परिभाषा तुमच्या-आमच्याहून खूप वेगळी आहे. स्पर्श, गंध, रंग, रूप, चव या पाच मानवी संवेदनांमधली रंग ही एक महत्त्वाची संवेदना आहे. मानवी जीवनात रंगांचे स्थान अनन्यसाधारण आहे. इंद्रधनुष्यातले सात रंग हे मुख्य रंग झाले. निसर्गात यातील प्रत्येक रंगाच्या अक्षरश: हजारो छटा आहेत. एका सिद्धांतानुसार निसर्गात एकूण लाखभर रंगछटा (शेडस्) आहेत. आपले मौल्यवान डोळे या सगळ्या रंगछटा अनुभवू शकतात, त्यातला फरक समजून घेऊ शकतात. त्यांचे विश्लेषण करू शकतात. (माणसानेच तयार केलेल्या संगणकाला केवळ २५६ शेडस् सापडल्या आहेत.) पूर्वी गाडय़ांचे रंग पांढरा, काळा, लाल, पिवळा आणि निळा इतकेच मर्यादित असत. आता मिस्टीक ब्ल्यू, कॅडेट ब्ल्यू, कॅप्री ब्ल्यू, नेपच्यून टर्कोइस, नायगारा ग्रीन, स्टील ग्रे, सॅण्ड बेज, शँपेन बेज, डायना ऑलिव्ह, अपोलो रेड, इंडियन रेड, मार्स रेड, काíनवल रेड अशा शेकडो गाडय़ांच्या रंगछटा पाहायला मिळतात. घराला रंग देण्याच्या (पेंटिंग कलर्सच्या) अशाच असंख्य शेड्स आहेत. (त्यातही बाहेरुन आणि आतून असे दोन ढोबळ प्रकार आहेत). तर छपाईच्या (िपट्रिंगच्या) आणखी वेगळ्या. छपाईतही पेपरवर करण्याच्या छपाईच्या वेगळ्या, प्लॅस्टिक वा कापडावर करण्याच्या छपाईच्या वेगळ्या, धातूंवर करावयाच्या छपाईच्या वेगळ्या. चित्रकलेत वॉटर कलर्स वेगळे आहेत, पोस्टर कलर्स वेगळे आहेत, पेस्टल कलर्स वेगळे आहेत, अ‍ॅक्रिलिक कलर्स वेगळे आहेत. कापडांच्या रंगांच्याही अशाच असंख्य शेड्स आहेत. या सगळ्या तांत्रिक नावांव्यतिरिक्त बऱ्याच अतांत्रिक शेड्ससुद्धा आहेत. त्या आहेत, स्रियांच्या प्रचलित भाषेतल्या. स्त्रियांची रंगांची एक वेगळीच परिभाषा आहे असे म्हणायला हरकत नाही. कदाचित दैनंदिन जीवनांत त्यांचा ज्या ज्या गोष्टींशी संपर्क येतो त्यांचेच संदर्भ, परिमाणे त्यांनी रंगांना बहाल केली असावी. (आजही बऱ्याच) स्त्रियांचा वावर जास्त करून स्वयंपाकघरात असल्यामुळे त्यांच्या रंगाच्या जगात खाद्यपदार्थ, फळे आणि भाज्यांनाही स्थान आहे. म्हणून तर डाळिंबी कलर, चटणी कलर, गहू कलर, दुधी कलर, टोमॅटो कलर, वांगी कलर, अंजिरी कलर, िलबू कलर, करवंदी कलर, बिस्कीट कलर, पिस्ता ग्रीन, मेहंदी ग्रीन हे शब्द तुम्हाला कधी ना कधी तुमच्या घरात, तुमच्या पत्नीकडून, बहिणीकडून वा आईकडून ऐकायला मिळाले असतील. स्त्रियांच्या परिभाषेतील सोनसळी कलर, अबोली कलर, शेवाळी कलर, बदामी कलर, मोतिया कलर, राणी कलर, चिंतामणी कलर, तपकिरी, विटकरी, किरमिजी, पीच, मरुन आणि अशा असंख्य कलर शेडस आहेत, ज्यांची तांत्रिक व्याख्या करता येत नाही, त्यांची टक्केवारी, प्रमाण ठरविता येत नाही. मग या शेड्सचं प्रमाणीकरण कसं करणार? ते करायचं नसतंच मुळी! प्रत्येक स्त्रीच्या मनातली चटणी, गहू, िलबू, अबोली, शेवाळी, बदामी, दुधी, टोमॅटो, वांगी इ. रंगांची तीव्रता वेगळी असते. ती त्या त्या संबधित (साडी, ड्रेस मटेरियल इ.) दुकानदारांना कळण्याशी मतलब ! मुळात पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक संवेदनशील असल्यामुळे रंगांच्या बाबतीतही त्या विशेष संवेदनशील असाव्यात. छपाईच्या शाईमध्ये ब्राइट यलो, डीप ब्राऊन, पॉप्युलर ग्रीन, युनिव्हर्सल रेड, रॉयल ब्ल्यू अशा सर्व शेड्स ठरलेल्या आहेत. कुठल्याही कंपनीची शाई घेतलीत तरी तिच्या शेडमध्ये फारसा फरक पडणार नाही. इथे स्रियांच्या परिभाषेतला ‘चटणी कलर’ हा प्रत्येक स्त्रीनुसार (तिच्या जहाल, अतिजहाल, कमी जहाल प्रकृती-प्रवृत्तीनुसार) बदलणार! एखाद्या स्त्रीने एखाद्या दुकानदाराकडे चटणी कलरचा ब्लाऊज पीस किंवा दोरा मागितला आणि त्याच्या डोळ्यासमोर (त्या स्त्रीला अभिप्रेत असलेल्या) मिरची-कोिथबीर-खोबऱ्याच्या हिरव्या चटणीऐवजी त्याने दुपारीच खाल्लेल्या लसणीची लालभडक चटणी आली तर? िलबू कलरचाही तोच प्रकार! वसई वा अलिबागचे िलबू वेगळे असणार, कल्याण आणि पनवेलचे वेगळे असणार! (शिवाय त्यात कच्चे, अर्धकच्चे, पिकलेले अशा कॅटेगरीजसुद्धा!) (या िलबू कलरबद्दल मी फार ताणून धरत नाही. कारण रंगांच्या अधिकृत भाषेत लेमन यलो कलर आहे!) आकाशी रंगाचेही तेच! मला सांगा, आकाशाचा रंग सगळीकडे, सगळ्या ऋतूत एकच असतो का?  इथेही आकाशी – कंसात हिवाळ्यातलं आकाश किंवा डिसेंबरमधलं आकाश असं का म्हणत नाहीत? मोरपिशी रंग हाही एक गोंधळात टाकणारा रंग आहे. मोराच्या पिसाऱ्यामध्ये अक्षरश: अनेक छटा असतात. त्यातला नेमका कोणता रंग मोरपिशी म्हणून स्त्रिांना अभिप्रेत असतो? पण मोरपिशी म्हटलं की दुसऱ्या स्त्रीला आणि मुख्यत: दुकानदारांना बरोब्बर कळतं. मोरपिशी रंगाशी साधम्र्य सांगणारा ‘पिकॉक ब्लू’ हा एक रंग मुद्रणाच्या परिभाषेत आहे, पण गंमत म्हणजे तो मोरपिशी रंग म्हणून स्त्रियांना मान्य नाही. किरमिजी म्हणजे नक्की कुठला ते अजून मला समजलेलं नाही. दुधी कलर म्हटला तर आपल्या डोळ्यासमोर हलक्या हिरव्या रंगाचा दुधी भोपळा येईल, पण दुधी कलर म्हणजे दुधाचा रंग म्हणे! शेवाळी कलर म्हणतात तेव्हा नक्की कुठलं शेवाळं त्यांना डोळ्यासमोर असतं देवास ठाऊक! कारण शेवाळं ही एक पाणवनस्पती आहे आणि तिच्या बऱ्याच जाती आहेत. प्रत्येकाची शेड वेगळी! डबक्यातलं शेवाळं वेगळं अन् जलाशयातलं शेवाळं वेगळं! बदामी कलर म्हटला की आपल्या डोळ्यासमोर बदामांचा ब्राऊन कलर येतो पण त्याला बदामी रंग म्हणायचं नाही. स्त्रियांच्या परिभाषेतला मोतिया कलर म्हणजे मोत्याच्या दागिन्यांचा कलर नाही!  चिंतामणी कलर म्हटलं तर (चिंतामणी हे गणपतीचे नाव समजून) आपण शेंदरी रंगाला चिंतामणी कलर म्हणू तर चूक ठरू. चटणी कलर, गहू कलर, िलबू कलर, टोमॅटो कलर, वांगी कलर, अंजिरी कलर, शेवाळी कलर, अबोली कलर, बदामी कलर हे एकवेळ ठीक आहेत. कारण त्यातून काही रंगबोध तरी होतो, पण राणी कलर..? हा सर्वात गोंधळात टाकणारा आहे!ं (पुरुषांना आवडती राणी व नावडती राणी हे दोन ठळक प्रकारच माहीत असतात. फारतर इस्पिक, बदाम, किलवर, चौकटची राणी!) स्त्रिया राणी कलर म्हणता तेव्हा त्यांना कोणती राणी अभिप्रेत असते? किंवा जो राणी कलर मानला गेला आहे, त्याला राणी कलर का म्हणायचं याचं समाधानकारक उत्तर मला मिळालं नाही. एका मित्राच्या ‘राणी’ला विचारलं तेव्हा ती म्हणाली, ‘राणी कलर म्हणजे गुलबक्षी रंग. हा रंग बहुतेक स्त्रियांना आवडतो, कुणालाही खुलून दिसतो आणि कशावरही ‘मॅच’ होतो म्हणून तो राणी कलर!’ (पण गुलबक्षीमध्येही अनेक रंगछटा आहेत त्याचं काय?) िपकमध्येही बेबी िपक आणि डार्क िपक असे दोन प्रकार आहेत. तुम्हा-आम्हाला जो गुलाबी रंग अभिप्रेत असतो तो स्त्रियांना नसतो. विशेषत: एखाद्या पाकक्रियेसंबधात. तुम्ही प्रयोगादाखल एखादी रेसिपी वाचा. त्यात एक वाक्य तुम्हाला हमखास आढळेल.. अमका पदार्थ ‘गुलाबी होईपर्यंत’ कढईत भाजा/परता. पण त्या पदार्थाला आजन्मात गुलाबी रंग येत नाही. इथे गुलाबी म्हणजे फिकट तांबूस असा अर्थ घ्यायचा असतो. आपल्या संस्कृतीमध्येच नव्हे तर जगभरात रंगांना विशिष्ट अर्थ आहेत. जसा पांढरा रंग पावित्र्याचा, लाल रंग शक्तीचा, पिवळा ज्ञानाचा, हिरवा सुबत्तेचा-तारुण्याचा-चतन्याचा, गुलाबी प्रेमाचा, भगवा त्यागाचा, निळा सुख व शांतीचा, काळा व करडा (ग्रे) दु:खाचा, शोकाचा. रंगांचे हे अर्थ स्त्रियांच्या कितपत गावी असतात देवास ठाऊक. ‘मॅचिंग’ हा मात्र त्यांचा मुख्य निकष असतो! त्यांच्याकडे एखाद्या साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज नसेल  (किंवा होत नसेल) तर ती साडी तितके दिवस नेसली जात नाही. एकूणच स्त्रियांचे रंगांवर मनस्वी प्रेम असते. ज्या रंगांची पुरुष कल्पनाही करू शकणार नाहीत असे रंग स्त्रियांना हमखास आवडतात. या सर्व रंगांचे ड्रेसेस, साडय़ा, त्यांच्यावरचे मॅचिंग ब्लाऊज, टॉप वा ओढण्या आपल्या वॉर्डरोबमध्ये असाव्यात असे त्यांचे स्वप्न असते. स्त्री कोणत्या रंगाचे कपडे परिधान करते यावरुन तिचा स्वभाव, वृत्ती, संस्कृती सहज कळू शकते. सोबर रंगाचे कपडे परिधान करणारी व्यक्ती शांत, संयमी, सोबर स्वभावाची तर भडक रंगाचे कपडे घालणारी व्यक्ती उथळ, आक्रमक असू शकते. अर्थात सरसकट असे विधान करता येत नाही. नवरात्रात दैनिके स्त्रियांना जणू फर्मान सोडतात.. आज तिसरी माळ.. आजचा रंग अमुक अमुक ! उद्याचा रंग अमुक अमुक! हे फर्मान सुटताच, खूळ लागल्यासारखं त्यांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी स्त्रिया धडपडू लागतात. आपल्या मत्रिणींनाही त्यासाठी आटापिटा करायला लावतात. स्वत:कडे एखाद्या विशिष्ट रंगाची साडी नसेल तर त्या शेजारणीकडून वा मत्रिणीकडून नव्हे तर चक्क विकत आणतात. कारण त्या मत्रिणीलाही त्याच रंगाची साडी त्याच दिवशी परिधान करायची असते! या खर्चाचं आणि धावपळीचं चीज होतं ते त्यांचा ग्रुप फोटो त्या दैनिकात छापून आल्यावर. (चेहरा ओळखूही येणार नाही इतका छोटा असला तरी) स्वत:चा फोटो पेपरात छापून आल्यावर त्या स्त्रीला स्वर्ग अक्षरश: दोन बोटे उरतो. मग ती नातेवाईक, मत्रिणी, सोसायटीतले, ऑफिसमधले सहकारी यांनी तो आवर्जून पाहावा यासाठी फोन करीत सुटते. अलीकडे म्हणूनच एप्रिल-मे-जून या पारंपरिक लग्नाच्या सीझनपेक्षा नवरात्रीच्या सुमारास साडी व्यवसायात मोठी उलाढाल होऊ लागली आहे असे म्हणतात. पाहिलंत, रंग काय जादू करतात? पेपरात फोटो आला म्हणून स्त्रिया खूश, स्त्रिया खूश म्हणून त्यांचे पतिराज खूश! साडय़ांना भरपूर मागणी आल्याने साडीचे व्यापारी खूश! जाहिराती आणि खप वाढला म्हणून पेपरवाले खूश. फोनाफोनीमुळे चांगला धंदा झाला म्हणून मोबाइल सíव्हस प्रोव्हायडर्स खूश! अशा रीतीने स्त्रियांची ही रंगाची आवड सगळीकडे खुशीचा माहोल उभा करते. तेव्हा एंजॉय कलर्स. रंग उडवा.. उधळू नका! रंगपंचमीच्या शुभेच्छा! जयंत टिळक – response.lokprabha@expressindia.com

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?