अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी पदग्रहणादिनीच आधीच्या ट्रम्प प्रशासनाचे अनेक निर्णय फिरवून आपली आगामी वाटचाल स्पष्ट केली. ती सोपी नाही, याची जाण त्यांना आहेच. त्यामुळेच हा लोकशाहीसाठी महत्त्वाचा दिवस आहे, असे बायडेन पहिल्याच अध्यक्षीय भाषणात म्हणाले. त्यास अर्थात ६ जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर केलेल्या हल्ल्याचा संदर्भ आहे. लोकशाहीचे अवमूल्यन झेलणारी, दुभंगलेली अमेरिका पुन्हा एकतेच्या माळेत गुंफण्याचे आव्हान बायडेन यांच्यापुढे आहे.

ते ओळखूनच अमेरिकेतील सत्तांतराचे जगभरातील नेत्यांनी स्वागत केले. बहुतांश माध्यमांतही तोच सूर उमटला. मात्र, अमेरिकेतील सत्तांतराचे वृत्तांकन करताना माध्यमांनी बायडेन यांच्या पाठीवर आशा, अपेक्षांचे ओझे लादत आव्हानांचा वेध घेतला आहे.

चीनमधील बहुतांश माध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील ‘शीतयुद्धाचे धोरण’ आता बदलावे, असे आवाहन बायडेन यांना केले आहे. चीनच्या काही माध्यमांनी माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांना लक्ष्य केल्याचे दिसते. पॉम्पिओ यांनी लावलेला ‘टाइम बॉम्ब’ निकामी करण्याचा निर्धार बायडेन यांचे प्रशासन करेल, असा आशावाद ‘द ग्लोबल टाइम्स’ने व्यक्त केला. चीन आणि अमेरिका यांनी छोटी-छोटी पावले उचलली तरी उभयपक्षी संबंध सुधारतील, असे मत ‘द साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’च्या एका लेखात व्यक्त करण्यात आले आहे.

रशियन माध्यमांत मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अलीकडे अमेरिकेत रशियाविरोधी सूर वाढत असून, बायडेन प्रशासनाने रशियावर कठोर निर्बंधांचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे बायडेन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका-रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचे भवितव्य फार आशादायी नाही, असा सूर ‘इझवेस्तिया’ या वृत्तपत्राने आळवला आहे.

देशांतर्गत प्रश्नांबरोबरच बायडेन यांच्यापुढे जागतिक आव्हानेही मोठी आहेत. इराणबरोबरच्या अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर विविध निर्बंध लादले होते. त्यामुळे आता इराणशी संबंध सुधारण्याचे आव्हान बायडेन यांच्यापुढे आहे. अरब राष्ट्रांतील अनेक माध्यमांनी सत्तांतरामुळे धोरणबदलाचा आशावाद व्यक्त केला आहे.

ट्रम्प यांनी उद्ध्वस्त केलेली अमेरिका पुन्हा सावरण्याचे आव्हान बायडेन यांच्यापुढे आहे, ही स्पेनमधील ‘ल वाँगर्दिया’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखातील टिप्पणी जगभरातील माध्यमांतील सूर टिपणारी आहे. येमेन, इराक आदी देशांवर प्रतिकूल परिणाम करणारे ट्रम्प यांचे निर्णय बायडेन तातडीने बदलतील, अशी अपेक्षा जर्मनीच्या काही वर्तमानपत्रांनी व्यक्त केली आहे. बायडेन हे ‘नाटो’वरचा विश्वास पुनस्र्थापित करतील आणि रशियाविरोधात भूमिका घेतील, असे भाकीत ‘दी वेल्ट’ या जर्मनीतील वर्तमानपत्राने वर्तवले आहे. ट्रम्प यांच्याप्रमाणे बायडेन हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडे मित्र म्हणून नव्हे तर विरोधक म्हणून पाहतील. पुतिन यांनाही हे माहीत आहे, असेही या वृत्तपत्राने म्हटले आहे. ट्रम्प पायउतार झाल्याचा आनंद अगदी आफ्रिकी माध्यमांतही दिसतो. केनियाच्या ‘तैफा लिओ’ या स्वाहिली भाषेतील वृत्तपत्राच्या मुख्य बातमीचे शीर्षक- ‘अमेरिकेसाठी नुकसानकारक ट्रम्पकाळ समाप्त’ अशा आशयाचे होते!

डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रूर सत्ताधीशांना पाठीशी घालत लोकशाहीवादी देशांशी अन्यायकारक वर्तन केले. आता बायडेन हे आपल्या सहकारी देशांना समान वागणूक देऊन जगाला नवी दिशा देतील, असा आशावाद फ्रान्सच्या ‘ली फिगॅहो’ या वर्तमानपत्राने व्यक्त केला आहे. ‘द टेलिग्राफ’ने बायडेन यांचे विधान उद्धृत करून ‘एण्ड धिस अनसिव्हिल वॉर’ असे मुख्य बातमीचे शीर्षक दिले. बायडेन यांच्यामुळे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या खडतर प्रवासाची रात्र समाप्त झाली आहे, असा सूर काही युरोपीय माध्यमांत उमटला आहे. ट्रम्प २०२४ मध्ये पुन्हा निवडून येऊ नयेत, यासाठी महाभियोग कारवाईची आवश्यकता व्यक्त करणारा लेख ‘द गार्डियन’मध्ये आहे. ब्रिटन आणि अमेरिका विध्वंसक कालखंडातून जात आहेत. उभयपक्षी संबंध भूतकालीन कल्पनेवर नव्हे तर वर्तमानातील वास्तवावर आधारित हवेत, असे मत ‘द गार्डियन’ने अग्रलेखात मांडले आहे. गेल्या चार वर्षांत दोन्ही देशांत बरीच उलथापालथ झाली आहे. आता अमेरिका-ब्रिटन यांनी उभयपक्षी संबंधांची पुनर्बाधणी करावी, असे सांगताना या अग्रलेखात उभय देशांतील अनेक साम्यस्थळे अधोरेखित करण्यात आली आहेत. एकुणात, बायडेन यांच्यापुढच्या आव्हानांचा पाढा माध्यमांनी वाचला आहे. त्यामुळे बायडेन म्हणतात त्याप्रमाणे ‘लोकहो, आता खरे काम सुरू झाले आहे’!

(संकलन : सुनील कांबळी)