करोना विषाणूच्या फैलावाबाबत वैज्ञानिक इशारे देत असताना आणि या विषाणूने अमेरिकेत ५० हजारांहून अधिक बळी गेल्यावरही, ‘फेक डेथ, फेक डेटा’ अशी आरोळी ठोकत काही अमेरिकी लोक रस्त्यावर उतरत आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलनांचे जाहीर समर्थन करून, टाळेबंदीविरोधाच्या सत्ताकारणाची दिशा उघड केली आहे. ट्रम्प यांचे रिपब्लिकन पाठीराखे, समर्थक अर्थव्यवस्था आणि व्यक्तिस्वातंत्र्याची हाकाटी देत टाळेबंदी हटवण्याची मागणी करत आहेत, तर डेमोक्रॅट्स वैद्यकीय तज्ज्ञांचा दाखला देत त्यास आक्षेप घेत आहेत. तिकडे युरोपात करोनाच्या आजारपणातून परतलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरही टाळेबंदी मागे घेण्यासाठी राजकीय दबाव वाढतो आहे. संकटकाळात रंगलेल्या या राजकारणाकडे वृत्तमाध्यमे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात?

टाळेबंदी हटवण्याबाबतच्या राजकीय दडपणामुळे ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन पेचात सापडल्याचे ‘द गार्डियन’ने म्हटले आहे. टाळेबंदी उठवण्याबाबत जॉन्सन यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि विरोधकही त्यांच्यावर दबाव आणत आहेत. अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर टाळेबंदी सैल करावी, असे जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाच्या खासदारांचे मत आहे, तर मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानांना इशारा देणारे पत्र लिहिले असून त्यात त्यांनी ‘टाळेबंदी मागे घेण्याबाबत चर्चा करण्यास नकार देऊन ब्रिटनने जगाच्या मागे पडण्याची जोखीम पत्करली आहे,’ अशी टीका केल्याचा दाखलाही या लेखात आहे. मात्र टाळेबंदीचे ब्रिटिश राजकारण अद्याप मतभेदांच्या स्वरूपातच आहे.

याउलट, अमेरिकेतील टाळेबंदीचे राजकारण विभाजनवादी असल्याचे माध्यमांचे मत आहे. ‘नॅशनल पब्लिक रेडिओ’ (एनपीआर)च्या वृत्तसंकेतस्थळावरील लेखात, अमेरिकेत एक लाल आणि एक निळा देश उदयास येत येत असल्याचे भाष्य केले आहे. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि मिशिगनसारखी डेमोक्रॅट्सच्या आधिपत्याखालील राज्ये टाळेबंदी उठवण्याबाबत संयम दाखवत असताना खुद्द ट्रम्प मात्र नागरिकांना टाळेबंदीविरोधात चिथावत असल्याचे दिसते, असे निरीक्षणही लेखात नोंदवले आहे. व्हाइट हाऊ स आणि राज्यांचे हक्क यांच्यातील तणावपूर्ण संबंध अमेरिकेच्या इतिहासाएवढेच जुने आहेत. हा तणाव पुढचे अनेक आठवडे राजकीय मार्गाने उफाळत राहणार आहे, अशी चिंताही हा लेख व्यक्त करतो.

ट्रम्प यांनी ‘ओपनिंग अप अमेरिका अगेन’ अशी घोषणा केली. याविषयी ‘द गार्डियन’मधील लेख म्हणतो की, ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही स्पष्ट आणि निवडणूक जिंकून देणारी घोषणा होती, परंतु ‘ओपनिंग अप..’ ही घोषणा अस्पष्ट आणि अनेक प्रश्न मागे ठेवणारी आहे. करोना संकटाने निर्माण केलेले आर्थिक प्रश्न अध्यक्षीय निवडणुकीतील कळीचे मुद्दे असतील, असाही माध्यमांचा कयास आहे. करोनाच्या उद्रेकापासून ट्रम्प कशा कोलांटउडय़ा मारत आले आहेत, याचे दाखले देणारा लेख ‘नॅशनल रिवू’ने प्रसिद्ध केला आहे. तर आपल्याच (रिपब्लिकन) पक्षाचे नेते जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांना आधी टाळेबंदी हटवण्यास प्रोत्साहन देऊ न नंतर ‘ट्रम्प यांनी त्यांच्या टाचा कशा तोडल्या’ याचे विश्लेषण ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील लेखात केले आहे.

ट्रम्प प्रशासनात एक हास्यास्पद विरोधाभास सुरू आहे – ट्रम्प विरुद्ध सरकारी वैद्यकीय तज्ज्ञ. एकीकडे ट्रम्प म्हणतात, मी डॉक्टर नाही आणि दुसरीकडे ते क्लोरोक्वीन घ्या, विषाणूनाशके घ्या, असे सल्ले देत आहेत. परंतु हे सल्ले धोकादायक असल्याचे ट्रम्प यांचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अ‍ॅण्टनी फॉची, डॉ. डेबोरा बर्क्‍स अप्रत्यक्षपणे सूचित करत आहेत, हे ‘एबीसी न्यूज’च्या संकेतस्थळावरील लेख अधोरेखित करतो. या लेखाचे शीर्षकच ‘ट्रम्प व्हर्सस डॉक्टर्स’ असे आहे. तर अमेरिकेचे भविष्य ट्रम्प आणि डॉ. फौची या नाजूक नात्यावर हेलकावत आहे, अशी मल्लिनाथी ‘ द गार्डियन’ने केली आहे.

करोना संकट हाताळताना ट्रम्प प्रशासनाला अपयश आल्याने तेथील लोकांमध्ये उन्माद आणि अस्वस्थता आहे. शिवाय, हे निवडणूक वर्ष आहे. राजकीय रंगमंचावर एक हास्यापद नाटक रंगेल. बिनबुडाचे आरोप आणि बनावट युक्तिवादांचे पेव फुटेल, अशी टीका ‘चायना डेली’ने अग्रलेखात केली आहे. नेत्यांनी आता लोकांसाठी काम करण्याची आणि आपल्या जीर्ण आरोग्य यंत्रणेला अत्याधुनिक करण्याची वेळ आली आहे. चीन हा जगाचा शत्रू नाही, तर या लढय़ातील सहकारी आहे. करोना विषाणू हा जगाचा शत्रू आहे. म्हणून हा लढा जिंकण्यासाठी राष्ट्रा-राष्ट्रांत संघर्ष नव्हे, तर संघटनेची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही हा अग्रलेख व्यक्त करतो.

संकलन : सिद्धार्थ ताराबाई