विनय नारकर

गेल्या दोन्ही लेखांमधून आपण अनेक प्रकारच्या शिरोभूषणांबद्दल जाणून घेतले. या सगळ्या शिरोभूषणांमध्ये खास प्रतिष्ठा असलेले आणखी एक शिरोभूषण आहे, तो म्हणजे ‘पगडी’. सगळ्या शिरोभूषणांमध्ये पगडीने स्वत:चे स्थान निर्माण केले.

Nagpur, Bust Prostitution Racket, Nagpur Police Bust Prostitution Racket, Model from Delhi, Brokers Arrested , crime news, Prostitution Racket news, Prostitution Racket in Nagpur,
देहव्यापारासाठी दिल्लीची मॉडेल विमानातून नागपुरात
story of ganga canal construction by  sir proby cautley
भूगोलाचा इतिहास : गंगा कालव्याची कहाणी
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
builder mastermind behind robbery on college road
कॉलेज रोडवरील दरोड्यामागे बांधकाम व्यावसायिक सूत्रधार; गुंडांकडून वृध्द दाम्पत्यास मारहाण

पगडी आणि इतर शिरोभूषणांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे पगडी ही शिवलेली असते. बाकीची शिरोभूषणे प्रत्येक वेळी नव्याने नेसावी लागतात. तर पगडी ही डोक्यावर ठेवावी लागते. साधारण नऊ इंची पन्हा असलेले व वीस ते पंचवीस वार लांबीचे वस्त्र पगडीसाठी लागायचे. पगडीसाठी सुती किंवा रेशमी वस्त्र वापरले जायचे. पगडबंद लाकडाच्या ठोकळ्यावर छोटा टोप ठेवून त्यावर वस्त्राचे लपेटे देत ते शिवत असत. माथ्यावर गोलाकारात वस्त्राच्या पट्टय़ा गुंडाळण्यात येत असत, समोरच्या भागावर केळ्यासारखा भाग असायचा. मधल्या गोलाकार भागास ‘कमळ’ म्हणत. कमळाच्या वरच्या भागात एका बाजूस पीळ व दुसऱ्या बाजूस कोंकी, म्हणजे चोंच असायची, याला ‘कोंच’ असेही म्हटले जायचे.  हा कोंकीचा आकार कागदाचा करून त्यावर वस्त्राच्या पट्टया शिवण्यात येत असत. यावर शोभेसाठी कधी कधी जरीची झिळमिळी म्हणजेच झिरमिळ्याही असायच्या. अशा रीतीने पक्की बांधणी असल्यामुळे तिचा आकार बिघडण्याची भीती नव्हती. तसेच रोज डोक्यावर पागोटे बांधण्याची कसरत करण्याची गरजही नव्हती. तिच्या या सुटसुटीतपणामुळे समाजातील अभिजन वर्गाने पगडीस आपलेसे केले.

अभिजनांमध्ये हळूहळू स्वत:च्या आवडीनुसार पगडी बनवून घेण्याकडे कल वाढला. त्यातही फॅशनचा भाग बराच होता. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पगडीच्या फॅशनमध्ये बरेच प्रयोग होत होते. पगडीचा परीघ वाढत जाणे हा त्याचाच भाग होता. हळूहळू हा परीघ वाढत जाऊन गाडीच्या चाकाशीच बरोबरी करू  लागला. अशा पगडय़ा परिधान करणाऱ्या प्रसिद्ध महानुभाव म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, रे. विष्णु भास्कर करमरकर, रे. बाबा पदमनजी वगैरे. न्यायमूर्तीं महादेव गोविंद रानडे यांनी या पगडीचा घेर कमी करून त्यात सुटसुटीतपणा आणला. या पगडय़ा रंगीत असायच्या, पण गोपाळ गणेश आगरकरांनी काळी पगडी प्रचारात आणली.

पगडीचा आणखी एक प्रकार म्हणजे ‘कंगणीदार’ पगडी. पुढे पीळ असलेल्या पगडीला कंगणीदार पगडी असे म्हणत. या पगडीला म्हणजे आजच्या भाषेत ‘स्टाइल स्टेटमेंट’ मानले जात असे. ‘संगीत मृच्छकटिक’ नाटकात देवलांनी, ‘कंगणीदार भरजरी पिळाची पगडी शिरावर’ असे वर्णन केले आहे. होनाजी बाळाने एका लावणीत नायकाचे वर्णन करताना, ‘पगडि कंगणीदार अंगावर ज्वाहार छबेला गडी’ असे म्हटले आहे. तसेच धोंडीबापूनेही तशाच प्रकारचे वर्णन केले आहे, ‘शिरी पगडी कंगणीदार अंगावर ज्वाहार कुठिल रहाणार कोण परगणा जी’. कंगणीदार सारख्याच पिळाच्या पगडीला ‘बालदार’ असेही म्हटले जाते. एका गीतामध्ये ‘निमाजामा फिरकी पगडी माजी शोभे पटका’ असे वर्णन आले आहे. यातली फिरकीची पगडी म्हणजे ‘कळीच्या पगडी’ अशी माहिती मिळाली, पण यापेक्षा जास्त अर्थबोध होऊ शकला नाही.

पुणेरी ब्राम्हणी पगडी खूपच प्रसिद्धीस पावली. वर सांगितलेल्या पगडय़ांमध्ये बदल होत होत पुणेरी पगडी आपल्याला असलेल्या ज्ञात रूपात स्थिरावली. अशाच प्रकारे विकसित होत मराठा सरदारांच्या पगडय़ाही खूप नावारूपाला आल्या. यात इतके वैविध्य आले की, बडोद्याच्या गायकवाडांची, ग्वाल्हेरच्या शिंद्यांची, धारच्या पवारांची, कोल्हापूरच्या भोसल्यांची, सातारच्या भोसल्यांची, इंदोरच्या होळकरांची अशा निरनिराळ्या पगडय़ा अस्तित्वात आल्या.

पगडी बनवणारे पगडबंद पुण्यात बरेच होते. नाशिकमध्ये तर खास ‘पगडबंद गल्ली’ होती, नव्हे अजूनही आहे. ही गल्ली पगडय़ांसाठी प्रसिद्ध होती. इथे पेशव्यांसाठी खास पगडय़ा बनवल्या जायच्या. अनेक प्रतिष्ठित लोक, वेदशास्त्री, सरदार वगैरे इथून पगडय़ा बनवून घेत. इथल्या घरोघरी पगडी बनवण्याचे कारखाने होते. पगडी बनवण्याचे काम मुस्लीम समाजाकडे होते. यांच्यापैकी एक परिवार आजही ही परंपरा प्रतीक रूपाने टिकवून आहे. त्यांचे नाव युसूफ गफूर रंगरेज. यांचे पूर्वज पेशव्यांसाठी सोन्या – चांदीची जर असणाऱ्या नक्षीदार पगडय़ा बनवत असत. असेच काम करणारे आणखीही परिवार होते. या पगडय़ांसोबत आणखीही एक मजेदार परंपरा इथे होती. गणपतीच्या मूर्तीसाठी छोटय़ा छोटय़ा पगडय़ा इथे बनवल्या जात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही ही परंपरा टिकून आहे. या गल्लीतल्या गणपतीसाठी आजही रंगरेज परिवार छोटी पगडी बनवतो. त्यांच्याच हस्ते गणपतीची आरतीही केली जाते. पागोटय़ा प्रमाणेच पगडीनेही मराठी भाषेला काही वाक्प्रचार देऊन समृद्ध केले आहे. ‘शीर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण बरीच प्रचलित आहे.

पगडी हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे पगडी उतरणे किंवा पगडी उरू न देणे म्हणजे अपमान करणे, असे म्हटले जाते. त्याच बरोबर ‘पगडी फिरवणे’ म्हणजे वचन न पाळणे.  ‘पगडी देणे’ किंवा ‘पगडी बांधणे’ म्हणजे सन्मान करणे हेही ओघाने आलेच. एखाद्याने ‘पगडी घेतली’ म्हणजे त्याने आपल्या गुणांनी वर्चस्व स्थापित केले. तसेच ‘पगडी फेकणे’ म्हणजे वैभवाचे प्रदर्शन करणे आणि ‘पगडी हरणे’ म्हणजे खोड मोडणे. पगडी हा एका प्रकारे जिव्हाळ्याचा विषय असल्याने यासंबंधी काही प्रथाही निर्माण झाल्या. ‘वस्त्र प्रथा’ या लेखातील याबद्दलचा काही भाग इथे पुन्हा देत आहे. पगडी संबंधी एक प्रथा पगडीचे समाजातील स्थान याविषयी भाष्य करते. ती प्रथा म्हणजे एकमेकांची पगडी बदलून लोक ‘पगडीभाई’ किंवा ‘पगडीबंधू’ बनायचे. एकमेकांची पगडी बदलून झालेले मित्र एकमेकांच्या रक्षणाची जबाबदारी घेत असत. पगडी बदलणे ही एक इमानाची शपथ असे. ‘भाऊसाहेबांची बखर’ मध्येही असा उल्लेख आला आहे, ‘हिंदुस्थानातील स्वधर्म की, पगडीभाई झाल्यावर पोटचें द्यावे पण पाठचे देऊ नये, त्यास रक्षावे’.

या तीनही भागांतून आपण शिरोभूषणांतील वैविध्य, यात होत गेलेले बदल, त्यांसंबंधी परंपरा, प्रथा, लोकसाहित्यातले त्यासंबंधीचे उल्लेख, भाषेमध्ये पडलेली भर इत्यादी मुद्दय़ांचा अभ्यास केला. काही प्रमाणात आज पुन्हा शिरोभूषणांना एक फॅशन म्हणून समारंभातून का होईना स्थान मिळत आहे. आपल्या वस्त्र किंवा परिधान परंपरा आजही आपल्याला लुभावतात, हे चित्र उत्साह वाढवणारंच आहे.

viva@expressindia.com