News Flash

‘फेन्ड्स’ फॉरेव्हर!

ही मालिका यशाच्या शिखरावर असताना एकाच वेळी १४ लेखक मालिकेसाठी लेखन करत होते

स्वप्निल घंगाळे viva@expressindia.com

काही वर्षांपूर्वी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ नावाची मैत्रीच्या संबंधांवर भाष्य करणारी मालिका येऊन गेली. या मालिकेच्या दुसऱ्या भागाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र दुसरीकडे जागतिक स्तरावर याच मैत्रीच्या नातेसंबंधांवर आधारित एक मालिका शेवटचा भाग प्रसारित झाल्यानंतर १७ वर्षे उलटून गेली तरी चर्चेत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘फ्रेन्ड्स’. मेट्रो शहरांमधील तरुणांच्या मनोरंजन विश्वातील अविभाज्य भाग असणाऱ्या या मालिकेचं गारूड पुन्हा एकदा दिसून येत आहे ते ‘फ्रेन्ड्स रियुनियन’च्या निमित्ताने.  या शोमध्ये असं काय आहे की इतक्या वर्षांनंतरही जगभरातील तरुणाईबरोबरच भारतीय तरुणाईसुद्धा त्याच्याशी स्वत:ला इतकं ‘रिलेट’ करते? याविषयी जाणून घेत हा कल्ट शो आपला एवढा मोठा चाहतावर्ग का निर्माण क रू शकला हे समजून घेण्याचा प्रयत्न..

१९९४ साली ‘फ्रेन्ड्स’चा पहिला भाग प्रदर्शित झाला. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच २००४ साली ६ मे रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. म्हणजेच ज्यांना आपण नाइन्टीज किड्स म्हणतो त्या १९९० ते २००० दरम्यान जन्मलेल्या पिढीला याविषयी काही कळण्याआधीच ही मालिका प्रदर्शित होऊन गेली. मात्र आजही ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर महिन्यातून दोन ते तीन आठवडे ‘फ्रेन्ड्स’ सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या दहा मालिकांमध्ये असते. म्हणजेच अगदी ३०-३५ वर्षांच्या व्यक्तींपासून ते १७—१८ वर्षांच्या तरुणांपर्यंत साऱ्यांना ही मालिका आपलीशी वाटते आणि त्यामुळेच १७ वर्षांनंतरही या मालिकेची क्रेझ कायम आहे. काम आणि शिक्षणानिमित्त एकत्र राहणारे मित्र हा या मालिकेचा गाभा आणि त्याभोवती घडणाऱ्या घडामोडींवर आधारित भाग असा सारा पसारा यात आहे. पण हा पसारा नेटकेपणे आणि सुटसुटीत मांडला आहे. इतर मालिकांप्रमाणे त्याचा गुंता न होता विषयाला हात घालून तो प्रत्येक भागानुसार बाजूला केला जातो. २०-२० मिनिटांच्या या भागांमध्ये एका विषयावर भाष्य करून तो भाग संपवला जातो. याच कारणामुळे ही मालिका कुठूनही पाहायला सुरुवात केली तरी फ्रेशच वाटते. सुपर हिरोंच्या चित्रपटांप्रमाणे आधीचे संदर्भ शोधत बसण्यासाठी वेळ आणि बुद्धी खर्च करावी लागत नाही.

कथा फार सोपी आहे. मोनिका तिचे शेजारी जोई, चँडलर, मोनिकाचा मोठा भाऊ आणि चँडलरचा मित्र रॉस, मोनिकाची मैत्रीण फिबी या पाच जाणांची अगदी तेरी मेरी यारी पद्धतीची मैत्री आहे. कॅफेमधील एका भेटीदरम्यान त्यांच्या आयुष्यात आलेली मोनिकाची जुनी मैत्रीण रेचल असा सहा जणांचा हा मैत्रीचा संसार या मालिकेत दाखवण्यात आला आहे. या मालिकेमध्ये तरुणाईला आवडणाऱ्या आणि आपल्याश्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. मुलं तारुण्यात पदार्पण करताना त्यांना नाती, मैत्री, करिअर यांसारख्या गोष्टींमध्ये कोणी जजमेंटल राहिलेलं आवडत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य त्यांना फार जवळचं वाटतं. हेच ‘फ्रेन्ड्स’मध्ये दाखवण्यात आलं आहे. कोण चूक कोण बरोबर याचा वाद न घालत बसता एकच गोष्ट सहा जणांना सहा बाजूने (दृष्टिकोनातून) कशी दिसेल याबद्दल विषय घेऊन त्यावर भाष्य करून पुढे सरकायचं असा हा सारा प्रवास. ‘या मालिके चं लेखन आणि त्यातील परफॉर्मन्स या दोन गोष्टींच्या आधारावर आजही ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. सिटकॉम पद्धतीच्या मालिकांमध्ये एक ते दोन सेटवरच कथा खेळवली जाते. इथेही समोरासमोरची दोन घरं आणि कॅ फे  एवढय़ा किमान सेटच्या पसाऱ्यात या सहा फ्रे न्ड्सची कथा खेळवली गेली आहे’, अशी माहिती चित्रपट अभ्यासक गणेश मतकरी यांनी दिली. ही मालिका जगभरातील तरुणांना आवडण्यामागेही त्याचे लेखन, त्यातले संवाद, त्यातला ह्य़ुमर या गोष्टी कारणीभूत असल्याचे ते सांगतात. नव्वदच्या दशकात अमेरिके त किं वा अन्यत्र आढळणारे तरुण-तरुणी हे असेच होते. आपल्यासमोर येणाऱ्या विषयांना, समस्यांना विनोदबुद्धीने हाताळणं ही तरुणाईची खासियत आहे. आणि ‘फ्रे न्ड्स’मधला जो ह्य़ुमर आहे त्याच्याशी आजही जगभरातील तरुणाई स्वत:ला जोडून घेऊ शकते. त्यामुळे एका पिढीसाठी हा नॉस्टॅल्जिया आहे, तर नवीन पिढीसाठी त्यातला ह्य़ुमर आणि परफॉर्मन्स त्यांना आकर्षित करतो. पिढी कु ठलीही असो, प्रत्येकाला हा शो अगदी कु ठल्याही भागापासून पाहिला तरी आकर्षित करतो, असे मतकरी यांनी स्पष्ट के ले.

ही मालिका काळाच्या ओघात टिकून राहण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे जवळजवळ वीस-पंचवीस वर्षांपूर्वी या मालिकेतून हाताळण्यात आलेले विषय आजच्या तरुणाईला आणि खास करून भारतीय तरुणांनाही रिलेव्हंट वाटतात. म्हणजे उत्तम पगार असताना मानसिक समाधान मिळत नसल्याने नवं काहीतरी करून पाहणं, प्रेमात पडताना वयाचा विचार, ब्रेकअप, घटस्फोट, समलैंगिकता, लिव्ह इन रिलेशनशिप, दत्तक मूल, विभक्त कुटुंब पद्धती, अविवाहित माता यांसारखे अनेक सामाजिक पण तरुणांनाही चक्रावून सोडणारे प्रश्न अगदी अरे हे इतकं सोप्पं आहे म्हणत यात मांडले गेले आहेत. याला प्रासंगिक विनोद, शाब्दिक कोटय़ांचा मुलामा दिल्याने प्रश्न गंभीर असले तरी हे एखादी गाठ सहज सोडवावी तशा हलक्या पद्धतीने सोडवलेले पाहायला मिळतात. हे प्रश्न भारतीय समाजामध्ये आजही फारसे चर्चा न होणारे मात्र मित्रांकडे हक्काने बोलण्याच्या विषयांमधील आहेत. त्यामुळेच अगदी १८ ते थेट ३५ वयोगटातील व्यक्तींना ही मालिका आपल्या प्रश्नांना उत्तरे देणारी वाटल्यास नवल वाटण्यासारखं काहीच नाही.

ही मालिका यशाच्या शिखरावर असताना एकाच वेळी १४ लेखक मालिकेसाठी लेखन करत होते. १९९९ साली भारतामध्ये पहिल्यांदा ही मालिका प्रदर्शित झाली आणि अपेक्षेप्रमाणे तिला तुफान प्रतिसाद मिळाला. अर्थात ही मालिका प्रदर्शित झाली तेव्हाचा काळ हा भारतामध्ये कौटुंबिक विनोदी मालिकांचा होता. ‘श्रीमान श्रीमती’, ‘हम पाँच’ यांसारख्या मालिका असतील किंवा त्या कालावधीमध्ये प्रदर्शित झालेले ‘कुछ  कुछ होता है’ किंवा ‘मोहब्बते’सारखे चित्रपट असतील. हा भारतीय मालमसाला मनोरंजनासाठी चांगला होता, मात्र त्याच्याशी ग्लोबलायझेशनसोबत मोठी झालेली पहिली पिढी रिलेट करू शकत नव्हती.

मालिकेमधील सेन्ट्रल पार्क कॅफे आणि मोनिका- चँडलरचं घर या गोष्टींचा आजही इतका प्रभाव आहे की ‘फ्रेन्ड्स’ थीमवर आधारित कॅफे जगातील अनेक देशांमध्ये आजही आहेत. याच कॅफेचा एवढा प्रभाव तरुणाईवर पडला की त्या काळामध्ये जगभरात कॅफेचा सुळसुळाट झाला. विशेष म्हणजेच याच कालावधीमध्ये भारतात ‘कॅफे कॉफी डे’सारखे प्रयोग यशस्वी झाले. हे प्रयोग यशस्वी करण्यामागे ‘फ्रेन्ड्स’चा थोडाफार का होईना हात आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

या मालिकेबद्दल लिहीत राहिलं तर ते मैत्रीच्या नात्यासारखं कधीच न संपणारं होईल. म्हणून इथेच थांबावं कारण आता चर्चा सुरू होणार आहे ‘फ्रेन्ड्स रियुनियन’ची. हा लेख वाचून होईपर्यंत ‘फ्रेन्ड्स रियुनियन’चा भाग अनेकांचा बघूनही झाला असेल. ज्या रियुनियन भागाची चाहते इतक्या आतुरतेने वाट पाहत होते तो ‘एचबीओ मॅक्स’वर हा शो जगभरात प्रदर्शित झाला तेव्हाच भारतामध्ये ‘झी फाइव्ह’वर प्रदर्शित करण्यात आला. यावरूनच या शोची आजही किती क्रेझ आहे हे दिसून येतं नाही का?

चांगलं काळाच्या ओघातही टिकू न राहतं

अमेरिके त ‘फ्रे न्ड्स’नंतरही ‘हाऊ आय मेट युवर मदर’, ‘द बिग बँग थिअरी’सारखे सिटकॉम लोकप्रिय झाले. मात्र त्यांची लोकप्रियता त्या त्या काळापुरती मर्यादित राहिली. मालिके चा आशय सगळ्यांना रिलेव्हंट वाटणारा असेल तर त्याला युनिव्हर्सल अपील मिळतं. जे चांगलं आहे ते काळाच्या ओघातही टिकू न राहतं. आपल्याकडे आईवडिलांनी पाहिलेली गाणी-चित्रपट मुलांकडून पाहिले जातात, मात्र त्यांना ते आवडले तरच पुढे ते स्वत:हून त्या कलाकृती पाहतात. ‘फ्रे न्ड्स’ ही त्या पद्धतीची लोकप्रिय मालिका आहे आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच ती बंद के ली गेली. ती तशीच चालू राहिली असती तर लोकांनी पाहिलीही असती. मात्र त्यातले औत्सुक्य तेवढेच टिकू न राहिले असते असे नाही, असं मत मतकरी यांनी व्यक्त के लं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2021 12:03 am

Web Title: article about friends reunion web series zws 70
Next Stories
1 जुन्या पद्धती नवा ट्रेण्ड
2 निवांत सुट्टी!
3 किताब विश्वसुंदरीचा!
Just Now!
X