14 October 2019

News Flash

डेटिंग अ‍ॅपच्या नावाखाली

तीन महिन्यांपूर्वी पुण्यात घडलेली घटना.

(संग्रहित छायाचित्र)

|| आसिफ बागवान

तीन महिन्यांपूर्वी पुण्यात घडलेली घटना. बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांला डेटिंग अ‍ॅपवर जास्तीत जास्त मुलींशी ‘कॉन्टॅक्ट’ वाढवून देतो, असं सांगून डेटिंग अ‍ॅपच्या नावाखाली जवळपास साडेतीन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. आधी नोंदणी शुल्क, मग डिपॉझिट, त्यानंतर जीएसटी आणि नंतर भरलेले सगळे पैसे परत मिळतील या आशेने या विद्यार्थ्यांने आपल्या वडिलांच्या डेबिट कार्डवरून ३ लाख ६४ हजार रुपये फोन करणाऱ्यांना पाठवले. ते पैसे आणि फोन करणारे दोघेही गायब झाले..

ही घटना तर मुंबईची. अगदी गेल्या महिन्यात उघड झालेली. एका खासगी कंपनीतून मोठय़ा पदावरून निवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय गृहस्थाने सुमारे वर्षभरापूर्वी एका डेटिंग साइटवर स्वत:ची नोंदणी केली. नोंदणी करताच त्याला एका महिलेचा फोन आला. या महिलेने आकर्षक मुलींशी डेटिंग घडवून आणण्याच्या नावाखाली या गृहस्थाकडून तब्बल दहा लाख उकळले. एवढेच नव्हे तर, दहा लाख उकळल्यानंतर त्या महिलेने ज्या मुलीचा फोन नंबर त्या गृहस्थाला दिला, त्या मुलीनेही त्यांच्याकडून जवळपास २० लाख उकळले. आयुष्यभर नोकरी करून साठवलेले पैसे आणि निवृत्तीनंतरची मिळकत हातातून गेल्यानंतर त्या गृहस्थाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले..

‘डेटिंग’च्या नावाखाली देशात होत असलेल्या फसवणुकीच्या असंख्य घटनांतील ही केवळ दोन उदाहरणे. आपल्या जवळच्या शहरांतील; पण गेल्याच आठवडय़ात दिल्लीत एका ५२ वर्षीय महिलेला अशाच कोणत्या तरी डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या ठकसेनाने लुबाडले आणि तिची हत्या केली. आयुष्यातील एखाद्या टप्प्यावर आलेला एकटेपणा घालवण्यासाठी म्हणा किंवा निव्वळ मौजमस्तीसाठी ‘डेटिंग अ‍ॅप’चा वापर करणाऱ्यांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढते आहे. अशा प्रकारचं डेटिंग करणं, नैतिक-अनैतिक की संस्कृतीनाशक की धर्मविरोधी या चर्चेत पडण्यात हशील नाही; परंतु डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्य़ांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

काय असतात हे डेटिंग अ‍ॅप?

सध्या प्रचलित असलेल्या ‘डेटिंग अ‍ॅप’चे साधारण दोन प्रकार आहेत. एका प्रकारात तुम्ही संबंधित अ‍ॅपवर तुमची सर्व माहिती (उदा. तुमचे नाव, पत्ता, उंची, वजन, रंग, बांधा इत्यादी) नमूद करता आणि मग तुमच्यासमोर येणाऱ्या शेकडो पर्यायांतून ज्याच्याशी/जिच्याशी डेटिंग करायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज पाठवता. त्या व्यक्तीकडून तुम्हाला उत्तर आले की मामला पुढे सरकतो. दुसऱ्या प्रकारच्या अ‍ॅपमध्ये तुमची जुजबी माहिती (उदा. नाव, ईमेल, फोटो) घेतली जाते आणि तुमच्या समोर तुमच्या लोकेशनपासून ठरावीक अंतरावर असलेल्या आणि अ‍ॅपवर नोंद केलेल्या मुला/मुलींचे प्रोफाइल तुम्हाला दिसतात. या चेहऱ्यांकडे पाहून तुम्हाला केवळ ‘स्वाइप’ करायचं असतं. म्हणजे, ती व्यक्ती आवडली की उजवीकडे ‘स्वाइप’ आणि नाही आवडली की डावीकडे. असं डावं-उजवं करत असतानाच तुम्हाला आवडलेल्या व्यक्तीने तुम्हालाही पसंत केलं की मग डेटिंग सुरू.

डेटिंगच्या या प्रकारांबाबत आणखी विस्ताराने सांगण्याची गरज नाही. कारण तरुणवर्गात बहुसंख्य मुलामुलींना याबाबत माहिती आहेच; पण मध्यमवयीन किंवा उतारवयाला लागलेल्यांमध्येही डेटिंग अ‍ॅपचे आकर्षण दिवसेंदिवस वाढते आहे. भारतातच नव्हे तर जगभरात ही परिस्थिती आहे. डेटिंगची सुविधा किंवा संधी पुरवणारी संकेतस्थळे इंटरनेटच्या जन्माइतकीच जुनी आहेत; परंतु ‘टिंडर’ नावाच्या अ‍ॅपने त्याची व्याख्या आणि व्याप्तीच बदलून टाकली. २०१२ मध्ये आलेल्या ‘टिंडर’ने मोबाइल डेटिंग अ‍ॅपच्या क्षेत्राला भरभराटीची दारे उघडून दिली. ‘टिंडर’ने अल्पावधीतच इतकी लोकप्रियता कमावली की, २०१९च्या पहिल्या तीन महिन्यांत टिंडर हे गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरचं सर्वाधिक कमाई करणारं अ‍ॅप बनलं. या तिमाहीत जवळपास २६ कोटी डॉलर इतके उत्पन्न टिंडरने कमावले. ‘टिंडर’ मोफत वापरणाऱ्यांची संख्या कोटीत आहेच, पण ‘टिंडर’चे काहीशे रुपयांचे शुल्क मोजून त्याचे ‘गोल्ड’ सभासदत्व घेणाऱ्यांची संख्याच जवळपास ३० लाखांच्या घरात आहे. ‘टिंडर’ला पसंती मिळू लागताच त्याच धर्तीवर शेकडो अ‍ॅपनी आपला संसार थाटण्यास सुरुवात केली आणि या फोफावत्या बाजारपेठेत आपापला हिस्सा ताब्यात घेतला.

तसं तर डेटिंग अ‍ॅपकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन हा निव्वळ ‘टाइमपास’ असा आहे; परंतु तरीही बदलत्या जीवनशैलीत जोडीदाराकडून वेळ न मिळणं, प्रेमभंगातून आलेलं नैराश्य, वयोपरत्वे वाटणारा एकटेपणा, शारीरिक ओढ, स्वत:बद्दलचा न्यूनगंड, मानसिक आधाराचा शोध किंवा निव्वळ मैत्रीची आस यातल्या कोणत्याही कारणासाठी माणसं डेटिंग अ‍ॅपकडे वळतात. अशा व्यक्ती आधीच भावनिक बनलेल्या असतात. त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन त्यांना आपल्या जाळय़ात ओढणाऱ्यांची संख्या या अ‍ॅपवर कमी नाही. सुरुवातीला ज्या घटना सांगितल्या त्यात फसवणूक झालेल्या व्यक्तींचा हळवा कोपरा ओळखूनच त्यांना गंडवण्यात आले. मुलगी असल्याचे भासवून चॅटिंग करणे, विवाहितांना प्रेमाच्या जाळय़ात ओढून नंतर त्यांनाच ब्लॅकमेल करणे, आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा छायाचित्रे काढून त्यांच्या आधारे पैसे उकळणे, भेटायला बोलावून शारीरिक अत्याचार करणे अशा प्रकारच्या असंख्य घटना या अ‍ॅपच्या माध्यमातून घडल्याचे गेल्या दोन-तीन वर्षांत दिसून येते.

अर्थात ही झाली भावनिक फसवणूक आणि त्यातून झालेले आर्थिक नुकसान. अ‍ॅप वापरकर्त्यांने आपली सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवली तरी, अशा प्रकारची फसवणूक तो टाळू शकेल; परंतु अशा प्रकारचे अ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठा धोका आहे तो त्यांच्या माहितीच्या चोरीचा. अशा प्रकारच्या डेटिंग अ‍ॅपवरील वापरकर्त्यांची माहिती कितपत सुरक्षित आहे, याबाबत शंका निर्माण करणाऱ्या काही घटना अलीकडच्या काळात घडल्या. सुमारे दोनेक वर्षांपूर्वी BeautifulPeople.col नावाची एक डेटिंग वेबसाइट हॅक करणाऱ्यांनी या संकेतस्थळावरील ११ लाख सभासदांची संपूर्ण माहिती चक्क ऑनलाइन विकली. या माहितीत केवळ सभासदांची छायाचित्रे आणि नावच नव्हे, तर त्यांचे वय, वजन, उंची, आवडी, पत्ता अशा अत्यंत खासगी माहितीचाही समावेश होता. २०१५ मध्ये अशाच एका डेटिंग वेबसाइटवरील साडेतीन कोटी वापरकर्त्यांची खासगी माहिती एका हॅकरने इंटरनेटवरून सार्वजनिक केली होती. अशा प्रकारच्या हॅकिंगचा धोका या डेटिंग अ‍ॅपना सतत असतो. त्यामुळेच कोणतेही डेटिंग अ‍ॅप वापरकर्त्यांच्या माहितीच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेची हमी देत नाहीत. त्यांच्या ‘अटी व शर्ती’मध्ये तर तसे स्पष्टपणे नमूदच केलेले असते, पण दुर्दैवाने याच काय परंतु कोणत्याही अ‍ॅपच्या ‘अटी व शर्ती’ पाहण्याकडे किंवा वाचण्याकडे आपण लक्षच देत नाही. अशा प्रकारच्या अ‍ॅपना जेव्हा आपण आपल्या मोबाइलमधील फोटो गॅलरी, लोकेशन, फाइल्स हाताळण्याचे अधिकार बहाल करतो, तेव्हा या अ‍ॅपच्या माध्यमातून भलत्याच कुणा व्यक्तीला किंवा यंत्रणेला आपण आपली खासगी व संवेदनशील माहिती सोपवत असतो. सध्याच्या घडीला ही बाब कोणत्याही भावनिक किंवा आर्थिक फसवणुकीपेक्षाही गंभीर आहे. हा धोका टाळण्यासाठी काय करावं, हे तुमच्या लक्षात आलं असेलच!

viva@expressindia.com

First Published on May 10, 2019 12:07 am

Web Title: fake dating apps