06 August 2020

News Flash

खावे त्यांच्या देशा : चीझ वाईन अ‍ॅण्ड डाईन

शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होतेय. युरोपातील खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचं स्थान असलेल्या फ्रान्सला आपण आता चाललो आहोत.

| August 8, 2014 01:02 am

शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होतेय. युरोपातील खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचं स्थान असलेल्या फ्रान्सला आपण आता चाललो आहोत. हॉटेल उद्योगाची सुरुवात याच देशात झाली असं मानतात. तिथलं खाणं आणि खाद्यसंस्कृतीही तितकीच रोचक आणि रंजक. चीझ आणि वाईनशिवाय फ्रेंच जेवण अपूर्ण आहे. त्याच या दोन महत्त्वाच्या गोष्टींविषयी..
मागच्या आठवडय़ात तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फ्रेंच चित्रकार रेनाँचं मला आवडणारं चित्र, ‘लन्चन ऑफ द बोटिंग पार्टी’. फ्रान्सच्या संस्कृतीला, संस्कृतीच्या अंतरमनाला, मुळांना हात घालणारं पेंटिंग वाटतं. बोटीवर पार्टी सुरू आहे. अतिशय सुबक आणि आकर्षक पेहरावातल्या सुंदर स्त्रिया, त्यांच्या ‘डिझायनर’ हॅट्स.. त्यांच्या तोडीसतोड रुबाबदार पुरुष मंडळी, डोळ्यात नम्र प्रेमळ आणि आनंदी भाव, आपण या सृष्टीसाठी जन्मलो नाही, तर हे सुंदर जग देवाने आपल्यासाठी निर्माण केलंय, म्हणून जे माझ्याकडे आहे त्याची मजा घेत मला छान जगायचं, असं प्रतीत करणाऱ्या त्यांच्या हालचाली, त्यांचे भाव.. आणि म्हणूनच या चित्रात फॅशन, संवाद, चीझ, वाईन, खाणं, पाळीव प्राणी, निवांतपणा असं स्वच्छंद लोकजीवन दिसतं. या सगळ्या फ्रेंच संस्कृतीच्या अस्सल खुणा आहेत. अर्थात, हे इंप्रेशनिस्ट पेंटिंग असल्यामुळे या चित्राविषयीचं हे माझं इंप्रेशन दुसऱ्याला अजून वेगळं वाटू शकतं.
हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की, फ्रेंच जेवण हे वाईन आणि चीझशिवाय पूर्ण होत नाही. तिथल्या वेगवेगळ्या प्रदेशाप्रमाणे, तिथलं हवामान, द्राक्षांच्या जाती, यावर वाईन्सची टेस्ट अवलंबून असते. आज सेलीब्रेशन म्हटलं की, आपल्याला श्ॉम्पेन आठवते. श्ॉम्पेन या फ्रान्सच्या भागामधली ही स्पार्कलिंग वाईन जगाला फ्रान्सचीच देणगी. आपल्याकडे जसं एखाद्या गोष्टीची क्वालिटी निश्चित करण्यासाठी करक मार्क असतो, तसंच तिथे वाईनसाठी सर्टििफकेशन असतं. त्यात त्या वाईनची पूर्ण माहिती दिलेली असते. फ्रेंच माणसाच्या जेवणाचा अविभाज्य भाग म्हणजे वाईन. वाईनचा एकेक घोट घेत जेवायची तिथे पद्धत आहे.
बहुतेक फ्रेंच माणूस दुपारच्या जेवणाला घरी येतो किंवा सहकाऱ्यांबरोबर ‘रेस्टराँ’मध्ये जेवतो. वाईनबरोबरच चीझसुद्धा यांच्या जेवणात तितकंच महत्त्वाचं. ‘ब्री, कॅम्मेंबर्ट, शेव्र, रॉकफर्ट’ असे बरेचसे लोकप्रिय चीझ इथे आणि जगभरात खाल्ले जातात. कुठल्या डिशबरोबर कोणती वाईन प्यायची याचे काही ठोकताळे ठरलेले आहेत. याबद्दल एका फ्रेंच शेफबरोबर चर्चा करताना तो म्हणाला, आपण दोनंच ‘थंब रुल’ वापरले पाहिजेत.
रुल पहिला – सी फूड किंवा चिकनबरोबर व्हाईट वाईन आणि रेड मीट(मटन, बीफ आदी)बरोबर रेड वाईन.
रुल दुसरा – रुल नंबर एक खिडकीबाहेर फेकून द्या आणि आपल्याला आवडेल त्याप्रमाणे वाईन, चीझ आणि जेवण घ्या! अर्थात मला नियम क्रमांक २ जास्त आवडला!  मित्रांबरोबर गप्पाटप्पा करता करता निवांतपणे बराच वेळ वाईनचे घुटके घेत जेवायची इथली पद्धत आहे. फ्रान्समध्ये पाण्यापेक्षा वाईन जास्त प्यायली जाते, असं मी म्हटल्यावर माझा एक मित्र म्हणाला, ‘मला पुढच्या जन्मी फ्रेंच व्हायचयं’. तेव्हा त्याला म्हणालो, ‘लेका, ते जरी असलं तरी एका वेळी थोडीशीच वाईन पितात, बॉटल्स भरून नाही, कळलं का? तेव्हा साहेब म्हणाले, ‘मी आहे तिथेच ठीक आहे मग!’

मेडलीन्स्
साहित्य : बटर – पाऊण कप, अंडी – तीन, पिठीसाखर – दीड कप, लेमन झेस्ट (किसलेले लिंबाचे साल) – दोन टीस्पून, मदा – एक कप, बेकिंग पावडर – अर्धा टीस्पून, साखर – गाíनशकरिता.
कृती : ओव्हन दोनशे पन्नास डिग्रीवर प्रीहीट करा.  बटर वितळवून घ्या आणि थंड करून घ्या. एका बाऊलमध्ये अंडी फेटून घ्या आणि त्यामध्ये पिठीसाखर टाका. मिश्रण जाडसर होईपर्यंत फेटत राहा. नंतर त्यात लेमन झेस्ट टाका. मदा आणि बेकिंग पावडर एकत्र करा आणि अंडय़ाच्या मिश्रणात टाका. नंतर त्यात वितळलेले बटर घाका आणि मिक्स करा. चमच्याच्या साहाय्याने मोल्ड भरून घ्या. दहा ते बारा मिनिटे बेक करा. मेडलीन्स मोल्डमधून काढून घ्या आणि थंड झाल्यावर त्यावर पिठीसाखर िस्प्रकल करा.
टीप : या मेडलीन्सना वितळलेल्या चॉकलेट मध्ये डीप करूनसुद्धा तुम्ही सव्‍‌र्ह करू शकता. (चॉकलेट कोटिंग करून)

स्पिनॅच अ‍ॅण्ड रिकोटा क्रेप्स
साहित्य : पालक – एक जुडी, पाईन नटस् – पंचेचाळीस ग्रॅम (पाईन नटस् नसतील तर काजू वापरा), ऑलीव्ह ऑइल – एक टेबलस्पून, कांदा  (बारीक चिरलेला) – एक, लसूण पाकळी (ठेचलेली) – एक, रिकोटा चीज – चारशे ऐंशी ग्रॅम किंवा दोन कप, (रिकोटा चीज मोठय़ा डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये हल्ली मिळतं. नाही मिळालं तर पनीर वापरा), जायफळ पूड – चिमूटभर, क्रेप्स – बारा (पॅनकेकसारखेच दिसतात), टोमॅटो पास्ता सॉस – दीड कप, किसलेले चीज – एक कप, मिक्स सॅलड पाने सव्‍‌र्ह करण्यासाठी.
क्रेप्सचे साहित्य : मदा – एक कप, साखर – एक टीस्पून, मीठ – पाव टीस्पून, अंडी – तीन, दूध – दोन कप, बटर – दोन टेबलस्पून (वितळलेले)
क्रेप्सची कृती : एका बाऊलमध्ये मदा, साखर आणि मीठ एकत्र करा. त्यामध्ये अंडी आणि दूध टाका. मिश्रण हलकं होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्या. नंतर त्यामध्ये बटर घाला आणि मिक्स करा. आता पॅनमध्ये ऑइल टाकून प्रत्येक वेळी दोन टेबलस्पूनप्रमाणे वरील मिश्रण टाकून मध्यम आचेवर घावनासारखे क्रेप्स् तयार करा.
कृती : पालक उकडून थंड पाण्यात टाका. मग चिरून एका बाऊलमध्ये ठेवा. पॅन गरम करून पाईन नटस् किंवा काजू तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि पालकाच्या बाऊलमध्ये टाका. पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. त्यात कांदा, लसूण टाका. कांदा मऊ होईपर्यंत पाच मिनिटं शिजवा आणि नंतर पालकाच्या बाऊलमध्ये टाका. नंतर त्यात रिकोटा चीज किंवा पनीर आणि जायफळ पूड टाका. आणि मिश्रण एकजीव करा. त्यात मीठ आणि काळी मिरीपूड टाका. क्रेपमध्ये पालकाचे मिश्रण भरून रोल करून घ्या. हे रोल बेकिंग डिशमध्ये लावून घ्या. या क्रेप्सवर टोमॅटो पास्ता सॉस आणि चीज टाकून घ्या. एकशे ऐंशी डिग्रीवर ओव्हन प्रिहीट करा. वीस मिनिटं किंवा चीज वितळेपर्यंत हे रोल बेक करा. मिक्स सॅलेड पानांबरोबर सव्‍‌र्ह करा.
आजची  सजावट
हॉटेलमध्ये असतं तसं
सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
खरबुजाचा पक्षी
साहित्य : खरबूज
कृती : खरबूजाच्या कार्व्हिंगचे अनेक पर्याय आहेत. पक्षाच्या मानेचा आणि पंखाचा आकार पेन्सीलने खरबुजावर आखून घ्या. व्यवस्थित कट देऊन नको असलेला भाग काढून घ्या. पंखाच्या मध्ये कटस् देऊन या खरबुजाच्या मधल्या बिया काढून घ्या. या पक्षाच्या शोपीसमध्ये तुम्ही फ्रुट सॅलेड  किंवा कापलेली फळं भरून ती सव्‍‌र्ह करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2014 1:02 am

Web Title: foods of france
Next Stories
1 क्लिक : आसावरी गुरव,
2 नव्या वाटा नव्या दिशा
3 नवी धडाडी नवी प्रेरणा
Just Now!
X