मान्सून सेलमधल्या शॉपिंगसाठी हवी ‘पारखी नजर’. कारण नेमकी सवलत लक्षात घेऊन हवी तशी वस्तू पदरात पाडण्यासाठी तीच महत्त्वाची. त्यासाठी काही बेसिक टिप्स..

– मॉलमध्ये मान्सून सेलमध्ये जात असताना शनिवार, रविवार संध्याकाळची वेळ शक्यतो टाळा. कारण या वेळी दुकानांमध्ये झुंबड असते. पार्किंगपासून ट्रायल रूमपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी लाइन लावावी लागते आणि आपला पेशन्स त्यातच संपतो.

– शक्यतो मित्रांचा किंवा नातेवाइकांचा ग्रूप असेल तर डील मिळणं सोयीचं असतं. कारण बाय ३ गेट वन फ्रीसारख्या ऑफर असे ग्रूपने गेलात तरच उपयोगाच्या ठरतात. एकाच प्रकारचे तीन कपडे स्वतसाठी घेणं निश्चितच व्यवहार्य नाही.

– अँटिक आणि इमिटेड ज्वेलरी शक्यतो स्ट्रीट मार्केटवरून घ्यावी. कारण ब्रॅण्डेड शॉप्समध्ये हीच ज्वेलरी दुप्पट-तिप्पट दरामध्ये मिळते आणि याची फॅशन फार काळ टिकत नाही.

–  हँडबॅग्ससुद्धा स्ट्रीट मार्केटमध्ये बऱ्याच स्वस्त दरामध्ये मिळतात. दुकानांमध्ये ब्रॅण्ड्सच्या रिजेक्ट झालेल्या बॅग्स विकायला असतात. त्यांच्यामध्ये काही छोटे दोष असतात, पण ते लक्षात येत नाहीत. या बॅग्सची किंमतही मूळ बॅग्सपेक्षा निम्म्याने कमी असते. पण त्यांच्यातील डिफेक्ट नक्कीच पाहून घ्या.

– पावसाळी सेलमध्ये शक्यतो स्वेटर, जॅकेट्स, वूलन कपडे यांसारख्या हिवाळी कपडय़ांवर जास्त सूट असते. पण जास्त फंकी जॅकेट्स घेण्यापेक्षा क्लासिक लूक निवडावा. कारण ते तुम्ही सहा महिन्यांनंतर वापरणार आहात. तेव्हा त्याची फॅशन गेलेली नसेल, याची दक्षता घेतली पाहिजे.

– सणांच्या कपडय़ांची खरेदी करण्यासाठी अशा मान्सून सेलचा फायदा होऊ शकतो. त्यावेळी अनारकली, साडय़ांवर सर्वाधिक सूट असते. यावेळी ब्रॅण्ड्स नवे कलेक्शन भरण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे जुना स्टॉक संपवण्याच्या तयारीत असतात.

– प्रत्येक ब्रॅण्डच्या दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा मल्टी ब्रॅण्डेड दुकानांमध्ये गेल्यावर जास्त पर्याय पाहायला मिळतात आणि सवलतही भरपूर मिळते.

– याच कालावधीमध्ये ऑनलाइन वेबसाइट्ससुद्धा त्यांचे सेल्स घोषित करतात. पण त्यांचे सेल ऑफ सिझन गोष्टींवर नसतात, तर इन सिझन गोष्टींवर असतात. शक्यतो मॉल्समध्ये नवे कलेक्शन्स भरल्यावर ऑनलाइन शॉपिंग केल्यास डिस्काऊंट गणित नीट जमतं.

मृणाल भगत – viva.loksatta@gmail.com