पैसे मिळवणं म्हणजे पाप असं का वाटतं लोकांना? माझं मत वेगळं आहे. भरपूर पैसे मिळवून आरामात जगायचं, सगळं जग फिरायचं, छान आयुष्य घालवायचं असं मी ठरवलंय. खरं तर सगळ्यांना हेच हवं असतं. कुठली साइड घ्यायची, कोर्स कोणता करायचा हे त्यातल्या जॉब प्रॉस्पेक्ट्सवरच ठरवलं जातं. नवरा शोधताना त्याचा पगार, इन्कम, स्वत:चं घर, गाडी या बेसिक गरजा आहेत आजकाल. माझे काही मित्रमैत्रिणी उगीचच मोठमोठय़ा बाता मारतात. आपण खूप त्याग वगैरे करणार आहोत, सोशल वर्क करणार आहोत असं म्हणतात. पण शेवटी सगळे नोकरी, फॉरेन ट्रिप्स, मोठं घर, गाडय़ा असंच करतात ना? मी तर सरळ सांगते की मला मस्त जगायचंय, भरपूर पैसे कमवायचेत. यात काही चूक आहे का?     – नेहा

हाय नेहा,
तुझं म्हणणं बरोबर आहे. मध्यमवर्गीय मानसिकता अशी असते की पैसे मिळवणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे काही चांगलं नाही. आपली प्राचीन संस्कृतीही सांगते की शारीरिक सुख मिळवण्यापेक्षा आत्मिक सुख मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. पण आता विचार खूप बदलू लागलेयत. लहानपणापासून सगळी आखणी तुम्ही मोठे होऊन भरपूर पैसे कसे कमवू शकाल यासाठीच केली जाते. शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट्स असे मध्यमवर्गीय घरांमधे कधीही ऐकू न येणारे शब्द आता सर्रास ऐकू येऊ लागलेत.
तू योलो (YOLO) कल्चरविषयी ऐकलं आहेस का? YOLO म्हणजे ‘यू ओनली लिव्ह वन्स’. गेल्या दोन-तीन वर्षांत तरुणांमधे अतिशय पॉप्युलर झालेली ही फ्रेज. यंगस्टर्सची अ‍ॅटिटय़ूड दाखवणारी. धाडसी, रेकलेस आणि बिनधास्तपणाची. हे दिवस पुन्हा येणार नाहीत, भरभरून त्यांचा आस्वाद घ्या असं सांगणारी. काहीसा वेस्टर्न परिणाम असणारी ही संकल्पना. तसं बघायला गेलं तर छान आहे हा कॉन्सेप्ट. पण हळूहळू यातली पॉझिटिव्हिटी जाऊन त्यात निगेटिव्हिटी यायला लागली. एकदाच जगायचंय तर बिनधास्त जगू, परिणामांची चिंता कशाला? कुठल्याही अकार्यक्षमतेचं, अपयशाचं समर्थन काय, तर YOLO! मग असं व्हायला लागलं की स्वत:च्या आनंदापुढे, सुखापुढे कशाचीही आणि कुणाचीही तमा बाळगायची नाही. लोक हे विसरायला लागले की आपल्या प्रत्येक अ‍ॅक्शनचा इतरांवर बरा-वाईट परिणाम होत असतो. आपण काही बेटावर असल्यासारखे एकटेच नाही आहोत या जगात. मग बऱ्यापेक्षा वाईटच परिणाम जास्त होऊ लागला तर? आपल्या सुखासाठी इतरांनी किंमत का चुकती करायची? आणि यातून खरं सुख लाभणार आहे का?
यावर उतारा म्हणून मग दुसरी एक फ्रेज आली- YODO – ‘यू ओन्ली डाय वन्स’. म्हणजे तुमचं आयुष्य अनलिमिटेड नाही, त्याला काहीतरी अंत आहे. याचं भान ठेवून आपण जगायला हवं. ही दुसरी विचारधारा जन्माला आली ती ‘योलो’च्या अर्निबध जगण्याला ब्रेक लावावा म्हणून. योलो म्हणून भरपूर दारू प्यायली आणि तशीच भन्नाट गाडी चालवली. अ‍ॅक्सिडेंट झाला आणि जिवावर बेतलं तर? स्वैरपणे सेक्शुअल संबंध ठेवले, प्रेग्नंट राहिलं तर नऊ महिन्यांनी इतकं छान वाटेल का?
नेहा, तुला वाटेल मी पैशाविषयी बोलतेय, यात ‘योलो’चा संबंध कुठे आला? तो संबंध येतो जेव्हा पैसे हा सुख मिळवण्याचा, छान जगण्याचा एकमेव मार्ग म्हणून आपण त्याकडे बघायला लागतो. तेव्हा, पैसे मिळवणं वाईट नाही. पण नुसतं पैसे मिळवणं हा आयुष्याचा एकमेव गोल, एण्ड पॉइंट असू शकतो? त्यातून मिळणारा आनंद टिकतो? तुला वाटतं का की सगळे श्रीमंत लोक आनंदी असतात? त्या पैशातून आपल्याला हवं असतं सुख, हवी असते मानसिक शांतता. नेमक्या या गोष्टी विकत मिळत नाहीत कुठे.
प्रश्न फक्त या सगळ्याच्या नियंत्रणाचा, समतोलाचा आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तोल जाऊन पडायला होतं. तसंच पैशाच्या बाबतीतही होऊ शकतं हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं. आपापली आनंदाची, सुखाची व्याख्या नीट तयार करायला हवी. म्हणजे मग ते मिळवण्याचे अनेक मार्ग आपल्याला लख्ख दिसू लागतात.
we tend to forget that happiness doesn’t come as a result of getting something we don’t have, but rather of recognising and appreciating what we do have.

तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.