अभिषेक तेली

दशकानुदशके वाढत चाललेली महागाई, जातीय – धार्मिक तेढ यात गुरफटलेली सर्वसामान्य जनता, दुर्गम भागात सोयीसुविधांची वानवा, ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, बेरोजगारीने ग्रासलेली तरुण पिढी, सत्तासंघर्षांमुळे देशभरात खालावलेली राजकीय संस्कृती, मैतेई-कुकी समाजातील संघर्षांमुळे धुमसणारे मणिपूर आदी विविध गोष्टींमुळे सध्याच्या घडीला जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण करून ७६ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या आपल्या भारत देशाने जवळपास आठ दशकांच्या काळात अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. देशाची सद्य:स्थिती पाहता यंदा स्वातंत्र्य दिन साजरा करताना तरुणाईच्या मनात नेमकं काय सुरू आहे..

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?

स्वातंत्र्योत्तर काळात भारताला गरिबी, बेकारी, महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था, असाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आदी विविध समस्यांनी ग्रासलेले होते. परंतु न डगमगता भारताने प्रगतीच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि विविधांगी आव्हानांवर मात करीत अल्पावधीतच विकसनशील देशांच्या यादीत स्थान मिळवलं. परंतु विकासाच्या दिशेने उंच भरारी घेत असताना काही घटक मात्र दुर्लक्षितच राहिले. स्वातंत्र्यांनंतर जवळपास आठ दशकांचा काळ सरला तरीही विविध क्षेत्रांमध्ये विकासगंगा वाहूनही तिची दिशा मात्र अस्थिर झालेली पाहायला मिळते आहे. परिणामी देशाचे हात बळकट करणाऱ्या तरुणाईचे मन सध्या अस्थिर झाले आहे. ‘सध्याच्या घडीला तरुण पिढी ही बेरोजगारी आणि इतर राजकीय, सामाजिक घडामोडींमुळे मानसिक तणावाखाली दिसते. या गोष्टीला जबाबदार कोण? जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाहीवर प्रश्न निर्माण होत असताना येणारा ७६ वा स्वातंत्र्य दिन अभिमानाने साजरा करावा का? असा प्रश्न मनाला भेडसावतो आहे. उत्तरोत्तर अशीच असमतोल वाटचाल सुरु राहिली तर भारताच्या विकासरथाची चाके कधी निखळतील हे कळणारही नाही. या गोष्टीचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. आगामी काळात सर्व बाजू तपासूनच पुढे कार्यरत राहणे गरजेचे ठरणार आहे’, असे मत प्रथमेश संकपाळ या तरुणाने व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांवर सुरू असलेला अनपेक्षित व भयावह बातम्यांचा भडिमार आणि दिवसेंदिवस राजकारणाचा खालावत जाणारा स्तर पाहून किमान मतदान तरी करायचे की नाही? असा प्रश्न तरुणाईला पडलेला आहे. मधुरा लिमये ही तरुणी सांगते,‘भारताने स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ओलांडली तरी आजही स्त्रिया मुक्तपणे वावरायचं धाडस करू शकतात का? आजही किती पुरुष घरात काम करतात? इतक्या प्राथमिक स्तरापासून विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुणाईने विविध क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने इच्छा-आकांक्षा मनात बाळगून राजकारणात उतरली तर भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. देशात विकास घडवून आणणे ही नागरिकांचीच जबाबदारी आहे’.

सध्याच्या घडीला भारतातील विविध क्षेत्रे काळानुरूप प्रगत होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे सारं काही बदलत असून जलद काम साध्य होत असले तरी या तंत्रज्ञानामुळेच भविष्यात नोकऱ्या जाण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. अशाने दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेरोजगारीत भरच पडणार आहे. या पाश्र्वभूमीवर अनिरुद्ध देवगिरे हा तरुण म्हणतो ‘भारतीय तरुणांनी केवळ सरकारी नोकऱ्यांची वाट पाहू नये. स्वत:चा व्यवसाय सुरू करून उदरनिर्वाह करावा. त्यामुळे भारतीय नागरिकांना फायदा होऊन रोजगाराच्या संधी वाढतील. भारतीय उत्पादनांची एक जागतिक बाजारपेठ निर्माण होईल. भारताच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारं नावीन्यपूर्ण असं संशोधन झालं पाहिजे. त्यासाठी सरकारनेही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वत:ची बुद्धिमत्ता जगासमोर उघड करण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली पाहिजे’. मात्र त्यासाठी खुद्द सुशिक्षित तरुणांनी राजकारणात उतरून शासन-प्रशासन व्यवस्थित सांभाळणं ही आजची गरज असल्याचेही तो ठामपणे सांगतो.

विविध धर्म, जात, भाषा, संस्कृतींचे मिश्रण असलेल्या भारताकडे विविधतेतून एकता असलेला सर्वगुणसंपन्न असा देश म्हणून पाहिले जाते, परंतु अलीकडच्या काळात भारतात जातीय – धार्मिक तेढ आणि हिंसाचाराचे वातावरण हे मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. ललित सुतार या तरुणाच्या मते, ‘भारताचे विखुरलेले तुकडे एकत्र जोडण्याचा प्रयत्न न करता राजकीय व सत्ताधारी पक्ष स्वत:चा पक्ष बळकट करण्यात व सत्तासंघर्षांत मग्न आहेत. लोकशाही म्हणाल तर ती सध्या भारताच्या वेशीवर घुटमळते आहे, कारण जनसामान्यांचे मत आजच्या स्वतंत्र भारतात ग्राह्य धरले जात नाही आणि त्यांच्या मताला न्यायसुद्धा मिळत नाही. सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर चिखलफेक करत बसण्यापेक्षा देशोन्नतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सामान्य माणसाची प्रगती ही देशाच्या इमारतीचा एक भक्कम पाया आहे असे मानून चाललो तर नक्कीच भारताला नव्याने स्वातंत्र्य मिळेल’.  तर साहिल रामाणे या तरुणाच्या मते ‘आजच्या घडीला सामाजिक, राजकीय, आर्थिक पण स्वनिर्मित असे प्रश्न भारतासमोर येऊन उभे ठाकले आहेत. हळूहळू हे प्रश्न  खालच्या पातळीला जाऊन सर्प दंशाप्रमाणे आपली समाजव्यवस्था पोखरत आहेत. जोपर्यंत समाज जागा होत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आगामी काळात सर्व परिस्थितीचा सारासार विचार करून नागरिकांनी योग्य लोकप्रतिनिधींना मतदान केले तरच लोकशाही पुन्हा प्रस्थापित होईल, मतदार राजा होईल आणि भारत स्वत:च्या बंधातून स्वतंत्र होईल’.

स्वातंत्र्योत्तर काळानंतर अनेक समस्यांनी ग्रासलेले असतानाही भारताने कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आदी विविध क्षेत्रामध्ये प्रगती केली. परंतु देशाच्या व्यवस्थापनाची दोरी हाताशी असणाऱ्या राजकारण्यांचा सत्तेसाठी असलेला हपापलेपणा आणि भष्ट्राचार, जातीय व धार्मिक तेढ यामुळे देश अक्षरश: पोखरला जातो आहे. त्यामुळे देशाचं उज्ज्वल भविष्य असणाऱ्या तरुणाईमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेलं आहे. याच चिंता आणि तणावाच्या छायेत यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा करणारी तरुणाई कुठेतरी मनापासून भारताची अखंडता कायम राहावी, येथील स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने चिरायू व्हावे यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज व्यक्त करताना दिसते आहे. 

तेव्हाच भारताचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने चिरायू होईल. . .

‘विविध बाबींकडे सरकारने केलेले दुर्लक्ष, राजकारणाचा खालावलेला दर्जा, सरकारी यंत्रणांचा राजकीय स्वार्थापोटी केला गेलेला गैरवापर, लोकशाहीला पूरक नसलेला सत्तासंघर्ष, स्वायत्त यंत्रणांमध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप, देशाला लुबाडून पळून जाणारे देशद्रोही उद्योजक, लोकशाहीतील विरोधी पक्षाला संपवण्यासाठी केलेली कटकारस्थाने, नोटबंदीनंतरही वाढणारा भ्रष्टाचार आणि यावर स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानांनी व देशातील नागरिकांनी बाळगलेले मौन हे भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहे. या सर्व समस्यांचे सरकार व नागरिकांनी व्यावहारिकदृष्टय़ा निवारण करून भारतातील प्रत्येक नागरिकाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच भारताचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने चिरायू होईल’, असे मत अनिरुद्ध गंगावणे हा तरुण व्यक्त करतो. सध्याच्या घडीला मैतेई-कुकी समाजातील संघर्षांच्या आगीत मणिपूर अक्षरश: होरपळतं आहे. याच मणिपूरमध्ये शेकडो पुरुषांच्या समूहाने दोन स्त्रियांना नग्न करून त्यांच्या काढलेल्या धिंडीमुळे जगात भारताची मान शरमेने खाली गेली आहे. त्यामुळे मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. ‘आपण एक देश म्हणून मणिपूरमधील नागरिकांच्या मनात शांतता व प्रेम पेरण्यात अपयशी ठरलो आहोत आणि त्यामुळेच कदाचित देशाच्या अखंडेतला धोका आहे’, अशी भीतीही अनिरुद्धसारख्या अनेक तरुण-तरुणींच्या मनात आहे.