विनय नारकर

‘हिरवा जोठ’ या शब्दांनी काही नेमका अर्थबोध होत नव्हता. जोठ हा एक वस्त्र प्रकार असावा, यापेक्षा काहीच लक्षात येत नव्हते. ज्या अर्थी देवीला नेसवल्या जाणाऱ्या साडय़ांपैकी जोठ ही एक साडी होती, त्या अर्थी ही एक महत्त्वाची साडी होती हे लक्षात येते.

काही महिन्यांपूर्वी आमच्या एक ज्येष्ठ स्नेही नीलिमाताई इनामदार यांच्याशी लोकसाहित्य, ओवी याविषयी गप्पा चालू असताना त्यांनी, त्यांच्या संग्रहातलं देवीचं एक पारंपरिक ओवीगीत दाखवले. या गीताच्या ओव्यांमध्ये देवीला नेसवल्या जाणाऱ्या साडय़ांचे उल्लेख आहेत. याशिवाय विणकर आणि विणकाम यांचेही उल्लेख येतात. त्यात उल्लेख असलेल्या बहुतेक साडय़ा माझ्या माहितीतल्या होत्या. त्यातल्या एका ओवीतील एका नावाने विशेष लक्ष वेधून घेतले.

मातेच्या दरबारी लिंबाचा नाही देठ

बया नेसली हिरवा जोठ

मातेच्या दरबारी लिंबाला नाही काडी

माता नेसली हिरवी साडी

मातेच्या दरबारी हळद लेण्या गेली

बया पिवळी बाली ल्याली

यातला ‘हिरवा जोठ’ या शब्दांनी काही नेमका अर्थबोध होत नव्हता. जोठ हा एक वस्त्र प्रकार असावा, यापेक्षा काहीच लक्षात येत नव्हते. ज्या अर्थी देवीला नेसवल्या जाणाऱ्या साडय़ांपैकी जोठ ही एक साडी होती, त्या अर्थी ही एक महत्त्वाची साडी होती हे लक्षात येते. ओव्यांमध्ये आणि अन्य काही पारंपरिक गीत प्रकारांमध्ये वस्त्रांचे, पोशांखांचे उल्लेख व वर्णनं येतात. त्यांचे दस्तऐवजीकरणातील महत्त्व फार असल्याने, अशा उल्लेखांना गांभीर्याने घेतले गेले पाहिजे. वस्त्रांच्या किंवा साडय़ांच्या संदर्भात ‘जोठ’ हा शब्द कधी ऐकला नव्हता. काही जाणकारांशी बोलून पाहिले, पण कुणालाही हा शब्द ऐकल्याचे आठवत नव्हते.

हे ओवीगीत विदर्भ भागातील आहे. तिथल्या काही विशिष्ट वस्त्र परंपरा होत्या. त्यामुळे जोठ हा वस्त्र प्रकार तिथला असावा, अशी एक शक्यता वाटत होती. त्यानंतर भारतीय वस्त्रांसंबंधीच्या पुस्तकांमधून शोध घेण्यास सुरुवात केली. त्यापैकी एका पुस्तकात जोट साडी असल्याचा उल्लेख सापडला, पण त्याचं नेमकं छायाचित्र काही त्यात नव्हतं; पण ही साडी विदर्भातीलच असल्याचा संदर्भ मात्र त्यात मिळाला. आणखी एका पुस्तकात मात्र जोट साडीचं एक छायाचित्र सापडलं. त्याच पुस्तकात जोट साडी ही नागपूर भागातील असल्याचंही प्रतिपादन केलं होतं. काही दुवे जुळले होते.

त्या पुस्तकातील छायाचित्राच्या आधारे आम्ही आणखी शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. आंतरजालावर बराच शोध घेतला असता, काही आंतरराष्ट्रीय संग्रहालयांमध्ये जोट साडीचे काही नमुने जतन केल्याचे आम्हाला सापडले. अशा महत्त्वाच्या संग्रहालयात जतन केल्यामुळे या वस्त्राचे संग्राह्य़मूल्यही अधोरेखित झाले.

अशा प्रकारे विविध मार्गानी जोट साडीबद्दल संशोधन चालू असताना एक अतिशय सुरेख योगायोग घडून आला. आमच्या माहितीत एक दुर्मीळ वस्तूंचे विक्रेते आहेत. ते अधूनमधून त्यांच्याकडे आलेल्या वस्तू, विशेषत: वस्त्रे आम्हाला दाखवत असतात. या दरम्यानच त्यांनी काही जुन्या साडय़ांची छायाचित्रे मला पाठवली. त्यातच मला नेमकं एक जोट साडीचं छायाचित्र सापडलं. आजपर्यंत न ऐकलेलं व पाहिलेलं हे वस्त्र, नेमकं या संशोधनादरम्यानच असं चालून आलेलं पाहून फार अचंबित व्हायला झालं. लागलीच ती जोट साडी मी मागवून घेतली. लाल रंगाचा रेशमी पोत, त्यावर काळ्या रंगाच्या रेघा असलेला रास्ता, या काळ्या रेघा मात्र सुती, मध्यम आकाराचे काठ, काठावर विणलेले काही भौमितिक आकार, काही आकार नेहमीच्या मराठी साडय़ांच्या काठावर असतात तसे, म्हणजे करवत नक्षी आणि मोतीचूर असे असूनही वेगळे आणि वैशिष्टय़पूर्ण काठ आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे काठांमध्ये असलेला इकतचा एक छोटा पट्टा. याशिवाय, मराठीपणाची ग्वाही देणारा गंडेरी पदर.

जोट साडीच्या काठांमध्येच या साडीचं वेगळेपण आहे. वैशिष्टय़पूर्ण नक्षी आणि इकतचा छोटासा पट्टा. इकत ही रंगलेपन पद्धती भारतात गुजरात, ओरिसा आणि तेलंगणा या राज्यांत प्रामुख्याने पाहायला मिळते. या रंगलेपन पद्धतीत धाग्यांवर नक्षी आधी काढली जाते आणि मग त्यांचे वस्त्र विणले जाते. जोट साडीच्या काठांमधील इकतचा छोटा पट्टा पाहून महाराष्ट्रातही या कसबाचा प्रयोग होत असे, याचे प्रमाण मिळते.

तेला तेलाने बाई न्हाल्या

तोही लोट गेला फुलझाडा

फुलझाडाच्या करया मोठय़ा दाट

त्या बाई नेसल्या हिरव्या जोट

हिरव्या जोटाले काऱ्या मोऱ्या रेघा

वरी वरी शिगा मोतीयाच्या

(करया — फांद्या), (शिगा — कांबी, रेघा)

हे विदर्भातील एक लोकगीत आहे. विदर्भात लोकगीतांच्या अनेक परंपरा आहेत. त्यामध्ये दसऱ्याच्या वेळेस गायली जाणारी अशी काही खास ‘जोगवा गीते’ असतात. हेसुद्धा असेच एक जोगवा गीत आहे. देवीच्या वस्त्रांचे वर्णन करणाऱ्या यातल्या काही ओळी खूप महत्त्वाच्या आहेत.

त्या बाई नेसल्या हिरवा जोट

हिरव्या जोटाले काऱ्या मोऱ्या रेघा

वरी वरी शिगा मोतीयाच्या

यामध्ये जोट साडीचे वर्णन करताना त्यावर काऱ्या, म्हणजे काळ्या रेघा आहेत, असे म्हटले आहे. माझ्याकडे असलेल्या जोट साडीमध्येही आडव्या काळ्या रेघा, म्हणजे रास्ता आहे. याशिवाय या गीतात असेही म्हटले आहे की, यावर ‘शिगा मोतीयाच्या’ आहेत. ‘शिगा’ म्हणजे रेघा. पारंपरिक वस्त्र आरेखनामध्ये जरी किंवा रेशमाने विणलेली एक नक्षी असते. ही नक्षी तुटक रेषेसारखी दिसते. तिला मोतीया किंवा मोतीचूर म्हटले जाते. जोट साडीच्या काठांमध्येही अशी नक्षी दिसून येते. या पारंपरिक गीतामध्ये इतके यथार्थ वर्णन करण्यात आले आहे.

जीवनशैली, नेहमीच्या वापरातील वस्तू, ठेवणीतील वस्तू, त्यांचे वापरातील औचित्य, त्यांचे स्वरूप या बाबींचे दस्तऐवजीकरण लोकसाहित्याशिवाय अन्यत्र सापडणे दुर्मीळच म्हणावे लागेल. इतिहास फक्त राजकीय नसतो, सांस्कृतिकही असतो. लोकजीवनाच्या अंतरंगांचा अभ्यास करणाऱ्या लोकसाहित्याच्या समावेशाशिवाय इतिहास रसरशीत होऊ शकणार नाही.

या ओव्यांमध्ये आलेला जोट साडीचा उल्लेख आणि वर्णन वाचून, तसेच आम्हाला मिळालेल्या साडीमुळे आमचा या साडीबद्दल आणखी शोध घेण्याचा विचार बळावत गेला. या साडीचा इतिहास काय असेल, ही नेमकी कुठे विणली जात असेल, आम्हाला मिळालेली साडी किती जुनी असावी, ही साडी कधीपर्यंत विणली जात होती, ही साडी बनणं का बंद झालं, ही साडी विणलेले कुणी विणकर आता आहेत का, ते सध्या काय करतात, असे प्रश्न माझ्या समोर येत होते. कोणत्याही पुस्तकात या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. आपण स्वत: शोध घेतल्याशिवाय ही उत्तरं आपल्याला मिळू शकणार नाहीत, हे आमच्या लक्षात आलं. विदर्भात जाऊनच शोध घ्यावा लागणार होता.

क्रमश:

viva@expressindia.com