scorecardresearch

Premium

अवकाशाशी जडले नाते: धूमकेतूंवर स्वारी!

नेपच्यून हा आपल्या सूर्यमालेतील शेवटचा ग्रह. याच्यापुढे ३० ते ५० खगोलशास्त्रीय एकक अंतरात क्यूपर पट्टा (Kuiper belt)पसरला आहे.

Comet Neptune Astronomical solar system
अवकाशाशी जडले नाते: धूमकेतूंवर स्वारी! ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

विनय जोशी

नेपच्यून हा आपल्या सूर्यमालेतील शेवटचा ग्रह. याच्यापुढे ३० ते ५० खगोलशास्त्रीय एकक अंतरात क्यूपर पट्टा (Kuiper belt)पसरला आहे. त्याच्याही पुढे सूर्यापासून सुमारे १ प्रकाशवर्ष अंतरावर बर्फ आणि धुळीचे गोळे असलेला प्रचंड ढग सूर्यमालेभोवती सर्व बाजूंनी विखुरलेला आहे. हा म्हणजे  ऊर्टचा मेघ  (Oort Cloud). कधी कधी अंतर्गत हालचालीमुळे किंवा सूर्याच्या  गुरुत्वाकर्षणामुळे या ढगातून काही  मोठे गोळे सूर्यमालेमध्ये खेचले जातात. सूर्याजवळ येताना त्यातील बर्फ वितळून गोळय़ांमागे शेपटी तयार होते. असे हजारो बर्फाळ शेपटीदार गोळे आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती फिरत आहेत. यातले काही गोळे अचानक आपल्याला आकाशात दिसू लागतात आणि अचानक गायब होतात. काही ठरावीक काळाने पुन्हा भेटायला देखील येतात.  आकाशातले हे अनाहूत पाहुणे म्हणजे शेंडेनक्षत्र, पृच्छल तारा अशा नावाने ओळखले जाणारे धूमकेतू !

guru gochar 2024
धन-ऐश्वर्याचा स्वामी गुरु ग्रहाची ‘या’ ३ राशींवर होईल कृपा, मिळेल अपार पैसा!
Why so much talk about Russia anti satellite missile and how destructive it is
रशियाच्या उपग्रहविरोधी अस्त्राची इतकी चर्चा का? ते किती विध्वंसक?
climate change election issue india
हवामान बदल अन् भारतातील निवडणूक, नेमका संबंध कसा?
global warming and sun
जागतिक तापमानवाढीला सूर्य जबाबदार आहे का? वाचा सविस्तर…

अगदी प्राचीन काळापासूनच जगभरातल्या अनेक संस्कृतीतील अनेक लोकांनी धूमकेतू पाहिले आहेत. याच्या विचित्र स्वरूपामुळे कुतूहलाची जागा भीतीने घेऊन युद्ध, रोगराई, अराजकता, राष्ट्रनेत्याचा मृत्यू अशा अशुभ घटनांशी धूमकेतूच्या आगमनाशी संबंध जोडला गेला असावा. धूमकेतू म्हणजे  विजेसारखा  पृथ्वीच्या वातावरणात  घडणारा काहीतरी आविष्कार असावा अशी युरोपीय खगोलतज्ज्ञांची कल्पना अगदी सोळाव्या शतकापर्यंत  टिकून होती. भारतीय खगोलविदांनी  मात्र अगदी प्राचीन काळापासून धूमकेतूचे शास्त्रीय वर्णन केल्याचे आढळते.  वराहमिहिर यांनी बृहत्संहितेत केतुचार या अध्यायात रश्मीकेतू, चलकेतू, पद्मकेतू असे  धूमकेंतूचे प्रकार सांगत त्यांची संख्या, स्वरूप  याविषयी सविस्तर  वर्णन केले आहे. टायको ब्राही याने १५७७ मध्ये धूमकेतू चंद्रापेक्षाही दूर असायला हवे असे मत मांडले. एडमंड हॅली यांनी कित्येक धूमकेतूंच्या कक्षा गणिताने निश्चित केल्या.  

सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्यमालेची निर्मिती  होत असताना  उरलेल्या पदार्थापासून धूमकेतूंची उत्पत्ती झाली असावी. सौरमालेच्या वेशीवर, सूर्यापासून दूर असल्याने  त्यांच्यातील रासायनिक, भौतिक रचनेत फारसे बदल झाले नसावेत. यामुळे  धूमकेतूंच्या अभ्यासातून  सूर्यमालेच्या जन्मावेळची स्थिती समजू शकेल असे शास्त्रज्ञांना वाटते.  म्हणून त्यांच्या अभ्यासासाठी अनेक मोहिमा आखल्या गेल्या आहेत. यातील काही मोहिमांनी धूमकेतू जवळून उड्डाण करत छायाचित्रे टिपली, काहींनी त्याच्या गाभ्यावर आदळून निरीक्षणे नोंदवली तर काहींनी त्याच्या शेपटीतील द्रव्य जमा करून पृथ्वीवर परत आणले.

१९८६ च्या सुमारास  प्रसिद्ध असा  हॅलेचा धूमकेतू आपल्याला भेट द्यायला येणार होता. याच्या अभ्यासासाठी  जगभरातील विविध अवकाश संस्थांकडून पाच अंतराळयाने पाठवत संयुक्त मोहीम राबवली गेली. याला  अनौपचारिकपणे हॅले आर्मडा म्हटले जाते. यात युरोपिअन स्पेस एजन्सीचे गियाटो, रशियाचे व्हेगा-१ आणि व्हेगा-२, जपानचे  सुइसेइ आणि साकिगाके यांचा समावेश होता. व्हेगा-१ आणि २ यानांनी आपल्या नियोजित शुक्र भेटीनंतर  हॅलेच्या धूमकेतू जवळून उड्डाण केले आणि त्याची छायाचित्रे  टिपली. यांच्या इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरने धूमकेतूच्या गाभ्याचे  तापमान २७ ते १२७ अंश सेल्सियस असल्याचे मोजले. धूमकेतू अत्यंत थंड असावेत या अपेक्षेपेक्षा हे तापमान अधिक होते. गियोटो यानाने मार्च १९८६ मध्ये हॅलेपासून ५९६ किमी इतक्या जवळ जात  त्याची छायाचित्रे घेतली. यातून त्याचे शेंगदाण्याच्या आकारासारखे केंद्रक  ५ किमी लांब, ७ ते १० किमी रुंद असल्याचे दिसून आले. या मोहिमांनी धूमकेतूचा गाभा आणि  शिखा यांच्या  रचना आणि वैशिष्टय़ांबद्दल अभूतपूर्व माहिती पुरवली.

इतिहासात पहिल्यांदाच थेट  धूमकेतूचे नमुने पृथ्वीवर आणण्याचा विक्रम नासाच्या  स्टारडस्ट या मोहिमेत केला गेला. पी/विल्ट -२ या धूमकेतूच्या कोमामधून द्रव्याचे नमुने मिळवणे  तसेच या प्रवासादरम्यान आंतरतारकीय धुळीचे  नमुने जमा करणे आणि त्यांना पृथ्वीवर सुखरूप परत आणणे  हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. फेब्रुवारी १९९९ मध्ये स्टारडस्ट अंतराळ यानाचे प्रक्षेपण झाले. पाच वर्षांच्या प्रवासानंतर यान धूमकेतूच्या जवळ पोहोचले. जानेवारी २००४ मध्ये अंतराळयान धूमकेतूच्या कोमात दाखल झाले. या उड्डाणात यानाने कोमातून धूळ कणांचे नमुने गोळा करण्यासाठी सॅम्पल कलेक्शन प्लेट तैनात केली आणि धूमकेतूच्या बर्फाळ गाभ्याची तपशीलवार छायाचित्रे घेतली. यानंतर यान पुन्हा पृथ्वीप्रवासाला निघाले. जानेवारी २००६ मध्ये यान परतले. पॅराशूटच्या सहाय्याने नमुने असणारी कॅप्सूल वाळवंटात सुखरूप उतरवली गेली.

नासाच्या न्यू मिलेनियम प्रोग्रॅमअंतर्गत झेपावलेल्या  डीप स्पेस-१ यानाने  २००१ मध्ये १९पी/बोरेली या धूमकेतूच्या हाय -रेझोल्युशन इमेजेस घेतल्या. यातून गाभ्याच्या पृष्ठभागाची विविध वैशिष्टय़े दिसली. आतापर्यंत धूमकेतूविषयक सगळय़ा मोहिमा फ्लाय-बाय मिशन होत्या. यातून धूमकेतूची दुरून प्रतिमा घेत माहिती मिळवली गेली. धूमकेतूचे अंतरंग जाणून घेण्यासाठी त्याच्या गाभ्यावर  एखादे यान आदळवण्याची कल्पना पुढे आली. यातून  धूमकेतूचा पृष्ठभाग भेदून त्याखालच्या द्रव्याचा वेध घेणे शक्य होणार होते. याच उद्देशाने नासाने ९ पी / टेंपल-१ या धूमकेतूची निवड करत डीप इम्पॅक्ट मोहीम राबवली. १२ जानेवारी २००५ ला यानाचे फ्लोरिडामधून प्रक्षेपण करण्यात आले. फ्लायबाय स्पेसक्राफ्ट हे मुख्य यान आणि  धूमकेतूवर कोसळणारा इम्पॅक्टर असे याचे प्रमुख घटक होते. 

४२.९ कोटी किलोमीटरचा प्रवास करून सहा महिन्यांनी यान  ९ पी / टेंपल-१ धूमकेतूच्या जवळ पोहोचले. ३ जुलै २००५ रोजी अवकाशयान धूमकेतूच्या जवळ पोहोचल्यानंतर मुख्य यानातून इम्पॅक्टर वेगळा होऊन  धूमकेतू कडे झेपावला. यावरच्या अँटोनोव्ह टार्गेटिंग सॉफ्टवेअर प्रणालीमुळे  इम्पॅक्टरला धूमकेतूचा अचूक वेध घेता आला. धूमकेतूच्या जवळ जाताना त्याने अगदी आघातापूर्वी ३ सेकंदापर्यंत अनेक छायाचित्रे टिपून पृथ्वीवर पाठवली. एखाद्या धूमकेतूच्या गाभ्याचा पृष्ठभाग पहिल्यांदा इतक्या जवळून बघण्याची ही वेळ होती. यातून गाभ्यावर कुठे  सपाट पृष्ठभाग तर कुठे घळी -उंचवटे अशी भूवैशिष्टय़े दिसली. यावरून  तिथे भौगोलिक घडामोडी घडत असल्याचा अंदाज आला.

इम्पॅक्टरची  धूमकेतूवर धडक पाहण्यासाठी अनेक वेधशाळा आणि हौशी आकाशनिरीक्षक दुर्बिणी रोखून सज्ज होते. अंतराळातील स्पिटझर, हबल, चंद्रा या दुर्बिणीदेखील हा ऐतिहासिक क्षण टिपणार होत्या. अखेर ४ जुलैला ताशी ३७,००० किमी या वेगाने इम्पॅक्टर धूमकेतूवर आदळला. या आघातामुळे ४.७ टन टीएनटी  एवढय़ा ताकदीचा स्फोट झाला आणि केंद्रकावर अंदाजे १५० मीटर  व्यासाचे आघात विवर तयार झाले. फ्लायबाय स्पेसक्राफ्टने याची छायाचित्रे पृथ्वीवर पाठवली. त्यावरील स्पेक्ट्रोमीटरने आघातातून उडालेल्या धुळीत सिलिकेट, काबरेनेट, स्मेटाइट, धातूचे सल्फाइड, पॉलीसायक्लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स यांचे अस्तित्व नोंदवले. तसेच यात पाण्याच्या बर्फाचे प्रमाणदेखील आढळले गेले.

डीप इम्पॅक्टचे प्राथमिक उद्दिष्ट सफल झाले असले तरी फ्लायबाय स्पेसक्राफ्टमध्ये मुबलक  इंधन शिल्लक असल्याने २००७ मध्ये  नासाने डीप इम्पॅक्टसाठी नवीन मिशन आखले. एपोक्झी या नव्या नावाने हे यान १०३ पी /हार्टली २ या धूमकेतूकडे रवाना झाले. नोव्हेंबर २०१० मध्ये हार्टली २ धूमकेतूपासून ६९४ किमी इतक्या जवळून जात त्याची निरीक्षणे नोंदवली गेली. याच बरोबर एपोक्झीने गॅराडचा धूमकेतू (सी २००९ / पी १) आणि आयसॉन (सी २०१२ / एस १) या धूमकेतूचे देखील निरीक्षण केले. २०१३ मध्ये संपर्क खंडित होऊन ही मोहीम थांबली. धूमकेतूंविषयी आपल्या ज्ञानावर या मोहिमेने  आपल्या नावाप्रमाणे खोलवर ठसा उमटवला आहे.

याचप्रमाणे स्टारडस्ट मोहिमेतील मुख्य स्पेस प्रोब देखील पुन्हा उपयोगात आणली गेली. डीप इम्पॅक्टने भेट दिलेल्या टेंपल-१ धूमकेतूचे अधिक निरीक्षण करण्यासाठी हे यान रवाना झाले. डीप इम्पॅक्टच्या आघाताने निर्माण झालेल्या विवराची अचूक मोजमापे त्याने नोंदवली. युरोपिअन स्पेस एजन्सीच्या रोझेटा मोहिमेत तर धुमकेतूवर थेट अवतरक(लँडर)  उतरवले गेले. च्युरिमोव्ह गेरासिमेंको म्हणजे ६७ पी या धूमकेतूची यासाठी निवड करण्यात आली होती. २ मार्च २००४ ला यानाचे प्रक्षेपण झाले. अंतराळयानामध्ये १२ उपकरणांनी युक्त रोसेटा ऑर्बिटर आणि  फिली हा लँडर होता. ६ ऑगस्ट २०१४ ला यान धूमकेतूच्या जवळ पोहोचून  ते धूमकेतूभोवती कक्षेत प्रवेश करणारे पहिले अंतराळयान बनले. धूमकेतू भोवती फिरत रोसेटा ऑर्बिटरच्या विविध उपकरणांनी निरीक्षणे नोंदवली आणि लँडरच्या उतरण्यासाठी योग्य जागेची निवड केली. १२ नोव्हेंबर २०१४ ला फिली लँडरने धूमकेतूच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या स्पर्श केला आणि धूमकेतूवरील  पहिले नियंत्रित लँिडग म्हणून इतिहास घडवला.

 धूमकेतू ६७ पीबद्दल रोझेटाने पाठवलेल्या माहितीने शास्त्रज्ञांना चकित केले. त्याला धूमकेतूचा गाभा निमुळती मान असणाऱ्या रबरी बदकासारखा दिसला. दोन लहान धूमकेतूंची टक्कर होऊन त्यांच्या जोडणीतून हा धूमकेतू बनला असावा हे यातून सिद्ध झाले. फिलीच्या सेन्सर्सला  उतरल्यावर सडक्या अंडय़ासारखा  दुर्गंध जाणवला होता. इथे असणाऱ्या अमोनिया, हायड्रोजन सायनाइड आणि हायड्रोजन सल्फाइड याचा तो परिणाम होता. रोसेटाला या  धूमकेतूवर अल्प प्रमाणात मुक्त ऑक्सिजन सापडला. तसेच ग्लायसिनसारखी सेंद्रिय संयुगे आणि अ‍ॅमिनो आम्लेदेखील शोधली गेली.

धूमकेतूवर आढळलेल्या अ‍ॅमिनो आम्ले आणि इतर सेंद्रिय संयुगांना सजीवांच्या बांधणीचे घटक मानले जाते. पृथ्वीच्या निर्मिती नंतर इथे जीवसृष्टी जन्माला येण्यासाठी आवश्यक हे घटक कदाचित एखाद्या धूमकेतूकडून पुरवले गेले असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. दोनशे वर्षांपूवीं आढळलेल्या रोझेटा या द्विभाषिक शिलालेखामुळे इजिप्तच्या अज्ञात चित्रलिपीचा उलगडा झाला होता. याच नावाने असणारी  रोझेटा मोहीम  आणि धूमकेतूंबद्दलच्या इतर मोहिमा पृथ्वीवरील जीवनलिपीचे रहस्य  उलगडतील का? हे येत्या काळात लवकरच कळेल!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Comet neptune astronomical solar system amy

First published on: 08-12-2023 at 01:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×