मृण्मयी पाथरे
मंदार गेल्या दोन वर्षांपासून मनालीला डेट करत होता. तो लहानपणापासूनच एकत्र कुटुंब पद्धतीत दोन-तीन बिऱ्हाडांसोबत राहत होता. आपण लग्नानंतर स्वतंत्र घराचं स्वप्न आपल्या जोडीदारासोबत साकार करू, असं त्याला खूप वाटायचं. मात्र त्याने ही गोष्ट घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या कानावर घालताच ‘मंदार लग्नापूर्वीच कसा बदलला आहे. जोडीदार भेटली, तर घरच्यांना विसरला आहे. आपण इतकी वर्ष जोडून ठेवलेलं घर भंग करायला निघाला आहे’, असे टोकाचे विचार त्याला ऐकून घ्यावे लागले. मोठी स्वप्नं पाहणं खरंच इतकं वाईट आहे का, असा प्रश्न त्यालाही पडला. राहत्या घरात प्रायव्हसी मिळणार नसली आणि तो खूश नसला तरी आजपर्यंत ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्या वडीलधाऱ्यांना दुखवायचं नाही म्हणून त्याने त्याच्या स्वप्नांना ‘होल्ड’वर ठेवलं. लग्नानंतर काही महिने मंदार आणि त्याच्या जोडीदाराने सगळय़ांशी नीट जुळवून घेतलं. पण कालांतराने आपण असेच इतरांच्या मतानुसार जगत राहिलो, तर आपल्याला आपलं वेगळं जग निर्माण करता येणार नाही या विचाराने त्या दोघांच्याही मनात कल्लोळ केला होता.

कौशल आणि काव्याच्या लग्नानंतर दोन वर्षांतच त्यांच्यामध्ये एकमेकांच्या राहणीमानातील फरकांवरून खटके उडू लागले. कौशल भविष्याच्या विचाराने काटकसर करून कमीत कमी गोष्टींमध्ये आपलं आयुष्य जगायचा. तर काव्या ‘लिव्ह इन द मोमेन्ट’ या वाक्प्रचाराला अनुसरून दर तीन-चार महिन्यांतून भटकंती, रॅपिलग, रिव्हर राफ्टिंग यांसारख्या साहसी ॲक्टिव्हिटीजवर आणि दीडेक वर्षांतून एकदा भारतातील ट्रीपवर खर्च करायची. ‘जोपर्यंत आपलं शरीर धडधाकट आहे, तोपर्यंत जितक्या गोष्टी करता येतील तितक्या करून घेऊ. रिटायरमेंटपर्यंत या गोष्टींचा आनंद घ्यायला थांबलो तर दात आहेत पण चणे नाहीत आणि चणे आहेत पण दात नाहीत, अशी अवस्था व्हायची. क्या पता कल हो ना हो?’, असं काव्याचं म्हणणं होतं. खरं तर, या सगळय़ा गोष्टींचा कौशलला तसा काही प्रॉब्लेम नव्हता. त्यालाही हे नवनवीन अनुभव घेताना मजा वाटत होती. इतकी वर्ष नुसतं काम एके काम करून तोही कंटाळला होता. पण कालांतराने कुटुंबातील मंडळी ‘एवढा खर्च आता केलात, तर पुढे संसार कसा कराल? इतका खर्च करायला पगार तरी किती आहे तुम्हाला? मुलाबाळांचा काही विचार केला आहे की नाही? तरुण आहात, तोपर्यंत काही वाटणार नाही. वय झालं की मागे वळून पाहताना आपण आयुष्याकडे जरा सीरियसली बघायला हवं होतं असं वाटायला नको’, असं म्हणू लागले. यावरून कौशल आणि काव्यामध्ये खटके उडू लागले.

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

सावनी आणि सौरभला लग्नानंतर सहा वर्षांनी बाळ झालं. खूप वर्षांनी घरात पाळणा हलला म्हणून सगळेच खूश होते. बाळाला केवळ पालकांचंच नव्हे, तर आजी-आजोबा आणि इतर नातेवाईकांचं भरपूर प्रेम मिळायचं. सावनी सहा महिने प्रसूती रजेवर असल्याने बाळाचं सगळं काही करत होती. सौरभही घरी आल्यावर बाळाच्याच अवतीभोवती असायचा. दिवसभर बाळाला काय हवंनको ते पाहून सावनी थकून जायची, तर सौरभही ऑफिसवरून दमून घरी यायचा. त्यांचं आयुष्य बाळाभोवती फिरत असलं, तरी एक जोडपं म्हणून त्यांना एकमेकांकडे हवं तसं लक्ष द्यायला मिळत नव्हतं. त्या दोघांनीही बाळाला महिन्यातून एकदा आजी-आजोबांकडे किंवा त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडे ठेवून डेटला जाऊया असं ठरवलं. हे ऐकताच ‘बाळाला असं दुसऱ्यांकडे ठेवून जातं का कोणी? लग्नाला सहा वर्ष झाली, तरीही काय असं बालिशपणे वागायचं? झाला की इतके वर्ष रोमान्स करून. आता अजून काय बाकी राहिलंय?’, अशी नातेवाईकांनी विशेष टिप्पणी केली.

या सगळय़ात कोण चूक किंवा कोण बरोबर याचा कीस पाडण्यापेक्षा आपण जरी सामूहिक पध्द्तीने (collectivistic culture) राहत असलो, तरीही प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र मतं आणि स्वप्नं असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कधीकधी ही मतं आणि स्वप्नं व्यक्त करण्यासाठी काही जणांना सुरक्षित आणि साजेसं वातावरण मिळतं, तर काही जणांना मिळत नाही. ही उदाहरणं वाचताना आपण आयुष्याच्या कोणत्या टप्प्यात आहोत, यावरून आपली मतं आणि विचार ठरू शकतात. आजकालच्या तरुण मंडळींना त्यांची स्वत:ची स्पेस आणि स्वतंत्रपणे निर्णय घेणं महत्त्वाचं वाटतं, तर आधीच्या पिढीतील काही जणांना कुटुंबाला एकत्र धरून ठेवणं आणि पुढच्या पिढीला जन्म देऊन सृष्टीचा गाडा चालू ठेवणं महत्त्वाचं वाटू शकतं. माणूस जसजसा प्रत्येक दशकात उत्क्रांत होत असतो, तसतसा तो सभोवतालच्या सिस्टिम्सशी (उदाहरणार्थ, कुटुंब, शेजारपाजार, शैक्षणिक/ व्यावसायिक संस्था) जुळवून घेत असतो. पण माणसाचे वैयक्तिक विचार कितीही बदलले, तरीही त्याच्या आजूबाजूच्या सिस्टिम्स बदलण्यासाठी वेळ लागतो.

पिढय़ानपिढय़ा चालत आलेल्या पद्धती, चालीरीती, राहणीमान आपल्यासाठी कालांतराने एक कम्फर्ट झोन बनतो. हा झोन पुढे जनरेशन गॅप वाढण्यास कारणीभूतही ठरू शकतो. या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणं कित्येकांना ‘लोक काय म्हणतील? आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना कुठे चुकलो, तर आपल्याला परत पूर्वीच्या सिस्टिममध्ये टोमणे न ऐकता सामावून घेतील का?’ या भीतीमुळे धोकादायक वाटू शकतं. अशा द्विधा मन:स्थितीत अडकल्यामुळे बऱ्याच वेळेस आपण या झोनच्या पलीकडे स्वत: पाऊल टाकत नाही आणि दुसरी व्यक्ती टाकत असेल तर तिला ते पाऊल टाकू देत नाही. या सगळय़ा नादात मनमोकळा संवाद थांबतो आणि कित्येक जण त्यांच्या कुटुंबासमोर किंवा अगदी मित्रपरिवारासमोरही डबल लाइफ जगू लागतात. त्यामुळे एकंदर वातावरणात ताण, रुसवे-फुगवे, हेवे-दावे वाढू शकतात. आणि कितीही नाही म्हटलं, तरी या सगळय़ा गोष्टींचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

हा ताणतणाव तसा सहजासहजी आपल्या आयुष्यातून नाहीसा होणारा नसतो. पण त्याला सामोरं जाताना जोडप्यांना आपल्याला या समस्यांना एक टीम म्हणून कसं सामोरं जाता येईल, याचा विचार करता येईल. वरील उदाहरणांतील जोडप्यांप्रमाणेच आपल्या नात्यात आधी खटके उडत नसले, तरी इतरांनी दिलेल्या सल्ल्यांमुळे अनेक जोडीदारांमध्ये मतभेद होऊ शकतात. क्वचित प्रसंगी राईचा पर्वत झाल्यामुळे लहानसहान गोष्टी ब्रेकअप किंवा घटस्फोटापर्यंतही जाऊ शकतात. अशा वेळेस एक कपल म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या बाबी नेगोशिएबल (negotiable) आहेत, इतरांनी दिलेले सल्ले ऐकून आपण कितपत ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ आचरणात आणू शकतो, याचा विचार करणं गरजेचं असतं. एक कुटुंब किंवा मित्रपरिवार म्हणून आपण आयुष्यात जे निर्णय घेण्यासाठी ‘लोक काय म्हणतील’ हा विचार करून आढेवेढे घेतले, ते निर्णय इतरांनी घेऊन आपल्या कुटुंबासह किंवा कुटुंबापासून थोडं लांब राहून स्वत:चं अनोखं अस्तित्व निर्माण केलं, तर त्यांना मागे खेचण्यापेक्षा पाठबळ दिलं तर? लाइफ इज टू शॉर्ट टू लिव्ह इन द शॅडोज, नाही का?
viva@expressindia.com