जपानी भाषेसह तिथली संस्कृती आणि चांगले आचारविचार तिनं मन:पूर्वक स्वीकारलेत. सध्या हैदराबादच्या ऑफिसमध्ये ‘अमेझॉन.जपान’साठी काम करणारी प्रियांका रेखाटतेय, तिच्या जपानमधल्या आठवणींचं चित्र..

प्रियांका हिरवे,जपान

हाय फ्रेण्ड्स, कामाच्या व्यापातून जरा निवांत बसले होते. वाटलं, किती बदललंय आयुष्य! या सकारात्मक बदलाला कारणीभूत ठरलेय ती भाषा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीला भाषेच्या ज्ञानाची साथ मिळाल्यानं साकारतंय माझं स्वप्न. आठवतोय तो भूतकाळ.. भाषेच्या माध्यमातून देश-संस्कृती जाणून घेण्याचा..
आधी माझा विचार होता विज्ञान शाखेकडं वळण्याचा. पण थोडे टक्के कमी पडल्यानं कला शाखेकडं वळले. होतं ते चांगल्यासाठीच! कलाशाखेचा अभ्यास करताना मधल्या काळात जपानी भाषा शिकायला सुरुवात केली. नंतर BBM IB (बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस)साठी पुण्यालाच mitsom मध्ये अ‍ॅडमिशन घेतली. ते आणि जापनीज एकत्र शिकणं, ही तारेवरची कसरत व्हायला लागली. कॉलेजमधली फ्रेंच भाषा आणि जपानी या दोन्ही भाषांचा अभ्यास एकदम करणं कठीण व्हायला लागलं. मग जापनीज शिकणं थांबलं. तोपर्यंत माझ्या जापनीजच्या दोन लेव्हल झाल्या होत्या. आता अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा झालाय. तिसऱ्या वर्षांला मी फ्रेंचमध्येही टॉप केलं. मी ‘कायझेन’वर प्रोजेक्ट केलं. तिसरं वर्ष संपल्यावर AIESEC कंपनीत इंटर्नशिपसाठी अप्लाय केलं. या कायझेनबेस कंपनीला भारतात व्यापारविस्तार करायचा असल्यानं भारतातील उमेदवार हवा होता. त्याआधी एक पार्टटाइम जॉब केला. दरम्यान, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात जापनीज शिकणं चालूच होतं. तिथल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचं खरं मोल जपानला गेल्यावर कळलं. त्यांच्या वक्तशीरपणासह अनेक गुण आम्हा विद्यार्थ्यांना तेव्हा फारसे महत्त्वाचे वाटले नाहीत.
या सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत मी खानागावा राज्यात सुजिडो गावात एकटी राहात होते. ऑफिस नि घरापासून जवळ असलेल्या बीचवर रोज फिरायला जाऊन रिलॅक्स व्हायचे. जपानी शिकणं आणि ती बोलणं, यात नाही म्हटलं तरी थोडा फरक होताच. त्यामुळं सुरुवातीला ऑफिसमध्ये बोलताना थोडी भीती वाटली. माझं जपानीचं ज्ञान वाढण्यासाठी जापनीजच बोलायचं होतं. एकटीच परदेशी असल्यानं नि ट्रेनिंग घेत असल्यानं माझे गुण पारखले गेले. पहिला महिनाभर मी फक्त दोघांशीच बोलत होते. माझा मंथली रिव्ह्य़ू द्यायचे प्रत्येक जण. त्यात माझ्या वागण्या-बोलण्यात काय सुधारणा हवीय किंवा काय चांगल्या गोष्टी आहेत, यांचा समावेश होता. दरम्यान, सगळ्यांशी मैत्री होऊन संवाद वाढला नि आत्मविश्वास वाटू लागला. ऑफिसची वेळ ९ ते ५ असली तरी ८.२०ला ऑफिसला जायला लागायचं. कारण ऑफिसच्या बाजूची बाग-परिसर स्वच्छ करायला लागायचा. आमच्यासोबत ऐंशीच्या घरातले बॉसचे वडीलही या स्वच्छता अभियानात भाग घ्यायचे. त्यामागचं कारण बॉसनी सांगितलं की, ‘चांगल्या ठिकाणी चांगली लोक येतात. त्यामुळं आपल्या आजूबाजूचा परिसर चांगला असावा.’ पहिल्या वेळी ग्लोव्ह्ज् नि चिमटय़ांच्या साहाय्यानं कचरा उचलताना थोडी बुजले होते. हे काम सगळ्यांनाच आळीपाळीनं करायला लागायचं. ऑफिसमधल्या सकाळच्या मीटिंगमध्ये आधीच्या गोष्टींचा आढावा, आज-उद्याचं प्लॅनिंग, एखाद्याच्या सुट्टीच्या अर्जावर चर्चा व्हायची. प्रोफेशनल थॉट्सचं शेअिरग व्हायचं. या सगळ्या गोष्टी वेळेत आटोपून नवाच्या आत सगळ्यांचं काम सुरू झालेलं असायचं. हे लोक कामाच्याबाबतीत खूपच डेडिकेटेड असतात. तिथं दोन तासांहून अधिक ओव्हरटाइम करू दिला जात नाही.
मला स्थिरावायला पहिल्या आठवडाभराचा वेळ लागला. शाकाहारी असल्यानं खायची पंचाईत होत होती. त्या काळात ‘परतावं भारतात..’ असं वाटून पोटभर रडले होते. त्या वीकएण्डला घरच्यांशी नि फ्रेण्ड्सशी बोलले स्काइपवरून. मग स्वत:ला सावरून जापनीज फ्रेण्ड्ससोबत फिरायला गेले. प्रत्येक वेळी फिरायला कंपनी हवी आणि ती मिळेल, ही अपेक्षा ठेवायची नाही, हे कळलं. सुरुवातीला एकटीला जेवणंही जड गेलं. हळूहळू हे बदल मनानं स्वीकारले. पंधरवडय़ात डीएसएलआर कॅमेरा घेऊन भटकंती सुरू झाली. कॅमेऱ्यात जपानमधल्या हजारो आठवणी टिपल्या गेल्यात. जपानी लोकांची शेडय़ुल डायरी मेंटेंन करायची चांगली सवय मलाही लागलेय. साधं भेटायचं असलं, तरी ते व्यवस्थित प्लॅनिंग करून भेटतात. तिथं पाळीव कुत्रे- मांजरींना फिरायला नेल्यावर त्यांची पॉटी मालकांनाच साफ करावी लागते. त्यात हयगय झाल्यास भरभक्कम रकमेचा दंड भरावा लागतो आणि पाळीव प्राणीही गमवावा लागतो.
हा खूप सुरक्षित देश आहे. काही वेळा मीही शेवटची ट्रेन पकडून घरी आलेय. ट्रेनमध्ये एखादी वस्तू विसरल्यास ती स्टेशनवरच्या लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड सेंटरमध्ये मिळते. माझा मोबाइल राहिला होता एकदा. खूप घाबरले होते. मी दुसऱ्या फोनवरून त्यावर कॉल केल्यावर कळलं की, मोबाइल अमुक सेंटरमध्ये आहे. तो ओळख पटवून न्यायचाय. तसा तो मिळालादेखील. त्यानंतर दोन मोबाइल मला ट्रेनमध्ये सापडले. ते मी तत्परतेनं सेंटरमध्ये जमा केले. जपानमध्ये ग्रीन टी आणि माच्चा पाण्याऐवजी ऋतुमानाप्रमाणं सव्‍‌र्ह केला जातो. जेवण तेलकट आणि मसालेदार नसतं. सायकलचा वापर अधिकांशी असून त्या महागही आहेत. व्हेंडिंग मशीनमधून अल्कोहोल मिळतं, ही गोष्ट खटकली. लग्न होत असली तरी घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे. शालेय शिक्षणात मुलाला ‘चांगला माणूस’ म्हणून घडवण्याकडं त्यांचं लक्ष असतं. मूल अठरा वर्षांचं झाल्यावर त्याला ड्रायव्हिंग लायसन्ससह सगळ्या सुविधांची कार्ड्स दिली जातात.
एकदा आठ रिश्टर स्केलचा भूकंप झाला तेव्हा मी योकोहामात जायंट व्हिलमध्ये होते. आम्हांला पटापट खाली उतरवलं गेलं. बघितलं तर सगळे जण लपलेले. तेव्हा टय़ूब पेटली की, हा भूकंप आहे.. सगळ्यांनी काळजीनं माझी फोन करून चौकशी केली होती. त्यानंतर एकदा जाणवला तो ऑफिसमध्ये. सगळे जण पटापट सुरक्षित जागी जमले होते. तिथल्या घरांची बांधणी अशी असते की, ती पडली तरी आतला माणूस जिवंत राहील. भूकंपासंदर्भात लोकांना प्रशिक्षण दिलेलं असतं. जपानमध्ये लोक भूकंप, हीटरमुळं लागू शकणारी आग आणि वडील या तीन गोष्टींना खूप घाबरतात. असाकुरातील सेंसोजी ( Senso-ji ) मंदिरात आपल्या पालखीसारखा उत्सव साजरा केला जातो. सुमिडा नदीवर सगळ्यात मोठा फायरवर्क फेस्टिव्हल असतो. शो संध्याकाळी सुरू होणार असला तरी तो पाहायला आलेले लाखो लोक जागा पकडायला सकाळपासून येतात. खूप भारी वाटतं तेव्हा.. चेरी ब्लॉसम आणि साकुरा ब्लूम्स फेस्टिव्हलचं वर्णन काय करू.. ती नजाकतदार फुलं आणि रंगलेल्या गप्पांची मैफल.. जपानमध्ये मी किरीगामी नि ओरिगामी शिकलेय. या कलाकृती करताना आपसूकच आपला मूड ठीकठाक होऊन जातो. आताशा माझ्या पेटिंग्ज आणि म्युरल्समध्ये जपानी संस्कृती आणि निसर्ग डोकावायला लागलाय..
जापनीज शिकणं आणि कंपनीच्या भारतातल्या नवीन प्रॉडक्ट लॉन्चसाठी सेटअप तयार करत त्यासाठी मार्केटिंगच्या दृष्टीनं उपयुक्त माहिती गोळा करणं, हे माझ्या कामाचं स्वरूप होतं. सहा महिन्यांनी पुण्याला परतले. दरम्यान, नोकरी डॉट कॉमवरच्या अर्जावर अमेझॉनकडून कॉल आला. मी सध्या हैदराबादमध्ये amazon.jp मध्ये काम करतेय. इथं माझ्यापरीनं वेळ, शिस्तपालन आणि स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करतेय. जपानच्या आधीच्या ऑफिसमधला स्वच्छता अभियानाचा धडा माझ्या बाबांच्या बँकेत गिरवला जातोय. बँक मॅनेजर असल्यामुळं बाबांनी स्टाफला लवकर बोलावून, सगळ्यांना जबाबदारी वाटून स्वच्छता अभियान सुरू केलंय. हैदराबाद ऑफिसमध्ये १५ जणांची टीम ऑर्डर्सचं काम बघते. उदाहरणार्थ एखाद्या कस्टमरनं आयफोन मागवलाय, तर त्याला तो द्यायचा की नाही, हा निर्णय घ्यावा लागतो. जपानमध्ये दोन ठिकाणी, सिएटल आणि हैदराबादमध्ये आमचं काम चालतं. गेले तीन महिने इथं काम करतेय. जपानमधल्या काही भागांतले काही जण चोरी करण्याच्या वृत्तीचे असल्यानं ऑर्डर आल्यावर या गोष्टी पडताळून बघाव्या लागतात. कारण व्हिडीओ गेम खेळण्याच्या अ‍ॅडिक्शनमुळं ते अनेकदा कर्जबाजारी होतात.. जपानींच्या इतर चांगल्या गुणांच्या पाश्र्वभूमीवर अशी पडताळणी करावी लागल्यानं थोडी खंत वाटते. जपानमध्ये एकटी राहिल्यानं इथं राहाणं सोपं जातंय. तिथल्या वक्तशीरपणा आणि नोट्स काढण्याच्या चांगल्या सवयीचा खूप फायदा होतोय. तिथलं सायकलिंग खूप मिस करतेय सध्या..
इथं एक-दोन र्वष जॉब करून नंतर जपानमध्ये सेटल व्हायला मला आवडेल. फॅमिली मेंबर्सना बेसिक जपानी शिकवल्यानं ते माझ्याशी जपानीत संवाद साधताहेत. जपानमधल्या मित्रमंडळींसोबत संवाद नि गिफ्टसची देवघेव चालूच असते. जपानमधल्या बॉसनी ई-मेलमध्ये लिहिलेलं की, ‘तू जपानला केव्हाही आलीस, तरी जपानचे बाबा तुझी वाट बघताहेत.’ त्यांनी माझी मुलीसारखी काळजी घेतली होती.. मला ‘माजीमे ना ओना’ अर्थात ‘गुणी मुलगी’ व्हायला नक्कीच आवडेल. प्रयत्न सुरू आहेतच.. ओहो.. निवांत असले, तरी पुढय़ातली डायरी सांगतेय की, मैत्रिणींना भेटायची वेळ दिल्येस आत्ता.. सो, गुडबाय फ्रेण्ड्स.. सायोनारा!
( शब्दांकन – राधिका कुंटे)

तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com