एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गाने निर्माण केलेला सर्वात सुंदर आविष्कार म्हणजे फुलं. निराश, उदास मनाला क्षणात प्रसन्न करण्याची ताकद या फुलांमध्ये असते आणि त्यामुळेच विविध प्रसंगांत, विविध समारंभांत या फुलांची सजावट आपण आवर्जून करतो. अशी ही फुलं आणि त्यांचे प्रकार शालेय जीवनापासून आपली सोबत करतात, ते अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत. हे फुलांचं काव्य पूर्ण करत मुद्दय़ावर येऊ या. कोणत्याही माध्यमातून शिकणारं मूल असो पण name of flowers ही त्यांच्या अभ्यासाची पहिली पायरी असते आणि इतक्या बेसिक पातळीवर भेटणाऱ्या या फुलांचा इंग्रजी उच्चार मात्र अगदी देशी वळणाने करण्याकडे आपला कटाक्ष असतो.
फ्लॉवर, फ्लावर, फ्लार असे अनेक उच्चार आपल्या कानांवर सहज पडतात. पण ब्रिटिश, अमेरिकन मंडळींचा उच्चार आहे फ्लावर. ‘ऑ’ हा मुळातच मराठी बाराखडीत नाही. त्यामुळे काही इंग्रजी शब्दांच्या उच्चारातला ऑ आपण मराठीत आयात केला आहे. आता तर मोबाइल टायिपगमध्येसुद्धा अ‍ॅ, ऑ चे पर्याय उपलब्ध आहेत. पण इथे ‘ऑ ’ करण्याची गरज नाही, कारण फ्लॉवर नव्हे तर फ्लावर हा उच्चार अधिक ऐकू येतो.
जुन्या फ्रेंचमधून येताना या शब्दाचे स्पेिलग सातत्याने बदलत राहिलेले दिसते. या उच्चारातही ‘र’ हा पूर्ण उच्चारण्यासाठी नाही. ‘र’ चा हलकासा उच्चारही चालून येतो. या शब्दाविषयी लिहिण्याचे कारण अगदी सर्वच थरात या शब्दाचा वापर सढळपणे होणारा आहे. जगभरातल्या प्रत्येक देशाचं नॅशनल फ्लावर हा त्या देशाच्या अभिमानाचा भाग असतो. प्रत्येक देश आपापल्या संस्कृतीनुसार राष्ट्रीय फूल निवडतो. स्कॉटलंडच्या राष्ट्रीय फुलाची गंमत मात्र खूप वेगळी आहे. फार वर्षांपूर्वी शत्रुपक्षाने स्कॉटलंडवर अचानक हल्ला चढवला. पण मधल्या जंगली थिसल्स फ्लावर्समुळे या शत्रूचा वेग मंदावला आणि स्कॉटिश मंडळींना स्वत:ला सुरक्षित करण्यास अवधी मिळाला. त्यामुळे या फुलाला स्कॉटलंडचे राष्ट्रीय फूल घोषित करण्यात आले. या कथांना ठाम आधार नसला तरी स्कॉटिश मंडळी मात्र या कथेवर खूश आहेत.
फुलाचा वापर साहित्यात बऱ्याचदा झालेला आहे. वेगवेगळ्या फुलांवरच्या कविता अजरामर ठरलेल्या आहेत. या फुलांचा इंग्रजी भाषेतील एक शब्दप्रयोग सांगायचा झाला तर flower of something असा भाषिक प्रयोग केला जातो. त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा सर्वोत्तम वा अगदी महत्त्वाचा भाग मराठीत देखील काव्यफुले, शब्दसुमने असे शब्दप्रयोग आपण करतोच की. एकूणच नाजुकातील नाजूक असा हा निसर्गाचा आविष्कार अर्थात फ्लावर आपल्या मनावर युगानुयुगं मोहिनी करत आला आहे. त्यामुळेच शब्दसखातून ही शब्दफुलांची माला गुंफावीशी वाटली खास आपल्यासाठी.
viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different pronunciations of english words
First published on: 18-12-2015 at 01:11 IST