फॅशन ट्रेण्ड कोणते, याची माहिती तर हल्ली अनेक माध्यमांतून आपल्यापर्यंत पोचत असते; पण बडे स्टाइल गुरू सांगतात – ट्रेण्ड फॉलो करू नका, ट्रेण्ड निर्माण करा.. आंधळेपणाने फॅशन ट्रेण्ड फॉलो करण्यापेक्षा स्वत:ची खास फॅशन शैली निर्माण करण्यासाठी थोडं आऊट ऑफ फॅशनजावं लागतं. त्यासाठीच हे सदर.. तुमची स्वत:ची फॅशन शोधण्याच्या टिप्स देण्यासाठी! पहिल्या भागात फ्युचरिस्टिक फॅशनविषयी.

नुकत्याच एका नामवंत मोबाइल कंपनीने त्यांचं नवीन मॉडेल बराच गाजावाजा करत बाजारात आणलं. त्यानंतर काही दिवसांत त्यांनीच या मॉडेलचा एक खास रंग मर्यादित आवृत्तीसाठी आणला. हा रंग होता सोनेरी, जो मार्केटमध्ये ‘गोल्डन’ रंग म्हणूनच चकाकतो. वरवर पाहता या बातमीत विशेष काहीच वाटणार नाही. सोनेरी रंगाचे फोन आपण याोधी पाहिले किंवा वापरले नाहीत असं नाही. तो फोन काही खऱ्या सोन्यापासून बनवलेला नाही (भारतातील एका बडय़ा उद्योगपतीच्या पत्नीचा कित्येक कोटींचा सोन्याचा फोनसुद्धा चर्चेत आहेच म्हणा) त्यामुळे त्याविषयी बोललंच पाहिजे असं काही नाही. पण जे चकाकतं ते सगळंच सोनं नसतं.. ही पूर्वापार म्हण लक्षात ठेवूनही याच चकाकत्या सोनेरी आणि चंदेरी रंगाचा झगमगाट सध्या जगभरातील तरुणाईला भुलवतोय. आणि हा सोनेरी झगमगाट फक्त दागिने, मोबाइलपर्यंत नाही तर कपडे, शूज, बॅग सगळीकडे पसरलेला आहे हे विशेष. म्हणूनच आजचा विषय हा ‘सोनेरी’ पुराण..

सोनं-चांदी यांच्यावरील भारतीयांचं प्रेम कोणी नव्याने सांगायला नको. आपल्याकडे मुलाच्या जन्मापासून त्यांच्यासाठी सोन्याचांदीचे दागिने बनवायला सुरुवात होते. आजही सोन्या-चांदीमधील गुंतवणूकीला लोक पसंती देतात. अगदी दागिनेच कशाला पूर्वी साडय़ांमध्येही सोन्याचांदीची जर वापरली जायची. जरदोसी, पिटावर्क, आरीकामसारख्या कलाकुसरीमध्ये सोनेरी, चंदेरी रंगांचा आवर्जून वापर केला जातो. त्यामुळे एरवीही साडय़ा, ड्रेसेसच्या किनारींवर (बॉर्डर्स) केलेल्या एम्ब्रॉयडरीमध्ये हे रंग दिसतात. पूर्वीच्या काळी सिल्कच्या बुटांवरसुद्धा सोनेरी जरदोसी केली जायची. अगदी आपल्याकडे ताटंवाटय़ासुद्धा सोन्याचांदीच्या होत्या. त्यामुळे भारतीयांना या लखलखत्या सोनेरी दुनियेचं कुतूहल नवीन नाही. भारताप्रमाणेच इजिप्त, अरब देश काही प्रमाणात युरोपातही पूर्वीच्या काळी सोनेचांदीचा वापर मुबलक प्रमाणात होत होताच.

पण मध्यंतरीच्या काळात तरुणाई या रंगापासून काहीशी लांब पळत होती. पारंपरिक कपडय़ांमध्ये एम्ब्रॉयडरीचा वापर कमी होता, इंग्लिश रंगांना पसंती मिळू लागली. लग्नाच्या दागिन्यांमध्येही सोन्याच्या पिवळ्या धम्मक रंगांपेक्षा गेरू गोल्ड, अँटिक गोल्ड, रोझ गोल्ड वापरले जाऊ  लागले. चांदीमध्येसुद्धा ऑक्सिडाइज दागिने अधिक वापरले गेले. पण सध्या हे चक्र पुन्हा उलटं फिरलं आहे. दागिन्यांच्या बाबतीत तितका बदल झालेला नाही, पण कपडे, मेकअप, शूज, अ‍ॅक्सेसरीजमध्ये मात्र सोन्याला झळाळी मिळू लागली आहे. यामध्ये खऱ्या सोन्या-चांदीचा वापर होत नसला तरी ग्लिटर, शिमर कापडाचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊ  लागला आहे. मेटॅलिक लेदर, मेकअप पुन्हा एकदा बाजारात उतरू पाहत आहेत आणि या सगळ्यांचं जगभरातील तरुणाईने खुल्या दिलाने स्वागत केलं आहे.

सोनं-चांदी यांचा थेट संबंध श्रीमंती, ऐषोआरामाची जीवनशैली याच्याशी जोडला जातो. सध्याचा शिमर ट्रेंड यापेक्षा वेगळा नाही. आजच्या तरुणाईची करिअरसाठीची धडपड, पैशांची जुळवाजुळव आणि त्यामागची पळापळ कमी झालेली नाही किंवा संपलेली नाही. पण इतक्या मेहनतीनंतर हातात आलेला पैसा पुरवून वापरण्यापेक्षा तो पैसा आपल्याला गरजेच्या वाटणाऱ्या आणि आवडीच्या गोष्टींवर खर्च करण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे आज पैसे वाचविण्यासाठी ट्रेन-बसचे धक्के खाणाऱ्या पालकांची मुले मात्र उबेर, ओलाने सुटसुटीत प्रवास पसंत करतात. पण त्यातही कारपूलसारखे पर्याय निवडून पैसे वाचविण्यासाठी तेही धडपडतात. भाजीमंडईमधील गर्दीत वेळ घालविण्यापेक्षा ऑनलाइन आपल्या पसंतीचा बाजारहाट थोडीशी अधिक किंमत देऊ न करणं त्यांना कधीही मान्य असतं. मग त्यातल्या त्यात या साइट्सवरील सेलच्या दिवसांची आवर्जून वाट पाहत तिथे बचतीचा प्रयत्न केला जातो. यातला सांगायचा मुद्दा हा की मोठय़ातलं मोठंही घ्यायचं आणि मग त्यात काही छोटी-मोठी सवलत मिळाली तर त्यावरही लक्ष ठेवणारी या पिढीची विचारसरणी सोन्या-चांदीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलवणारी ठरली आहे.

आता फक्त सणाच्या दिवशी किंवा लग्न सोहळ्यासाठी बँकेच्या तिजोरीतून दागिने बाहेर काढण्यापेक्षा आपली खरेदी रोज मिरविण्याकडे त्यांची पसंती असते. त्यामुळे सोन्याचे मोठाले हार, बांगडय़ा ते क्वचित घेतील, पण अंगठी, ब्रेसलेट, पेंडेंट या नाजूक आणि रोजच्या वापरातील वस्तूंची खरेदी ते आवर्जून सोन्यातच करतात. कपडय़ांच्या बाबतीतसुद्धा भरजरी सोनेरी एम्ब्रॉयडरीपेक्षा सुटसुटीत शिमर कापड त्यांना जास्त आकर्षित करतं. पुन्हा शिमर स्कर्ट, शर्ट, जॅकेट, पँट एरवीही सहज वापरता येते. आपल्या इतर कपडय़ांसोबत ते जुळूनही येतात. त्यांच्या लुकमधून बोल्डनेस आणि स्टेट्सचा थाट येतो, मात्र वापरायला ते तितकेच आरामदायी असतात. त्यांना घालायचं विशेष निमित्त लागत नाही. ऑफिस, पार्टी, कॉलेजला सहज घालू शकता. पण या कपडय़ांमधून तुमचा चोखंदळपणा दिसून येतो. पुन्हा या कपडय़ांसोबत तुम्हाला जादाची ज्वेलरी घालायचीही गरज उरत नाही. मागच्या वर्षी ‘गोल्डन ग्लोब’ अवॉर्डससाठी प्रियांका चोप्राने अँटिक गोल्ड स्ट्रेट गाऊन घातलेला तेव्हा मोकळे केस आणि ब्राइट लिप्स या लुकला तिने पसंती दिली होती. पण यंदा ऑस्करसाठी सफेद शिमर ड्रेससोबत सोनेरी ब्रेसलेट आणि कानातले तिने घातले होते.

सोनेरी शिमर स्कर्टसोबत छान सफेद किंवा पेस्टल शेडचा शर्ट मस्त दिसतो. हाच स्कर्ट तुम्हाला पार्टीसाठी घालायचा असेल, तर त्यासोबत काळा क्रॅप टॉप घाला. सोबत सोनेरी स्टेटमेंट नेकपीस घालू शकता. चंदेरी पँटचा उठाव कमी करायचा असेल, तर त्यासोबत स्पोर्टी टी-शर्ट आणि ओव्हरसाइज श्रग घालून बघा. एखाद्या डल लुकला उठाव देण्यासाठी शिमर हिल्स नक्कीच मदत करतात. लेदर जॅकेट घेतल्यास मल्टीकलर शिमर ड्रेसचा भडकपणा तितका जाणवणार नाही. ऑफिसवरून पार्टीला जायचं असल्यास बॅगेत एक शिमर सोनेरी ब्लेझर आवर्जून असूद्यात. पार्टीसाठी कपडे बदलायची धावपळ वाचेल. काहीच नाही तर एक गोल्ड किंवा सिल्व्हर क्लच नेहमीच कपाटात असूद्यात. पार्टीसाठी कधीही उत्तम. पण रोजच्या वापरासाठी छोटी सोनेरी स्लिंज बॅग वापरता येईल. कुठलाही भडकपणाचा ठपका न लागता, कमीतकमी प्रयत्नांत उठावदार फॅशन देणाऱ्या या झगमगत्या ट्रेंडला तुमच्या कपाटात थोडी जागा देऊन बघाच..

viva@expressindia.com