विनय नारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धारवाड जिल्ह्य़ातील नवलगुंद तालुक्यात शेकडो वर्षांपासून जाजमविणण्याची परंपरा आहे, जी सध्या मरणप्राय अवस्थेत आहे. ही जाजमं, ज्याला कन्नडमध्ये जमखानम्हटले जाते. ही विणण्याची कला विजापूरहून इथे सुमारे चारशे वर्षांपूर्वी पोहोचली. विजापूरच्या राजकीय धामधुमीत तिथल्या विणकरांना नवलगुंदची शांतता काम करण्यासाठी महत्त्वाची वाटली असावी.

कर्नाटकातील हुबळीपासून जेमतेम ३० किमीवर नवलगुंद हे गाव आहे. याबद्दल मी काही वर्षांपासून ऐकून होतो. या लेखाच्या निमित्ताने गेल्या आठवडय़ात तिथे जाऊन आलो. धारवाड हे या भागातील सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. धारवाडच्या या ख्यातीला एक वेगळेच परिमाण देणारा वारसा जपलाय धारवाड जिल्ह्य़ातील नवलगुंद तालुक्याने. येथे शेकडो वर्षांपासून ‘जाजम’ विणण्याची परंपरा आहे, जी सध्या मरणप्राय अवस्थेत आहे. ही जाजमं, ज्याला कन्नडमध्ये ‘जमखान’ म्हटले जाते. ही विणण्याची कला विजापूरहून इथे सुमारे चारशे वर्षांपूर्वी पोहोचली. विजापूरच्या राजकीय धामधुमीत तिथल्या विणकरांना नवलगुंदची शांतता काम करण्यासाठी महत्त्वाची वाटली.

नवलगुंदचा शब्दश: अर्थ होतो ‘मोराचे डोंगर’, कारण आधी या भागांत खूप मोर असायचे. या मोरांचेच प्रतिबिंब इथल्या जाजमांवर उमटले. विणकरांनी त्यांच्या भौमितिक शैलीत अनेक प्रकारचे मोर विणायला सुरुवात केली. आजही यातली ‘एक मोर’, ‘चार मोर’ ही डिझाइन्स बनवली जातात. त्यावेळचे राजे, सरदार, द्युत किंवा सारीपाट खेळतानाही ही जाजमं वापरायचे. त्या सारीपाटाचं डिझाइनही विणकरांनी बनवलं. हे सारीपाटाचं डिझाइन भारतातल्या अन्य कोणत्याही जाजम किंवा गालिच्यांवर बनत नाही. नमाज पढण्यासाठीही या जाजमांचा वापर होतो, याला ‘जानमाज’ असं म्हणतात. यासाठी खास मीरहाब हे डिझाइन बनवलं जातं. या सगळ्या डिझाइन्स भौमितिक आकारात विणल्या जातात. यासोबतच या जाजमांमध्ये फुलं, चुन्नत, टुकडे की घडी, लहरी, मद्दान की चुन्नत असे अनेक प्रकार विणले जातात.  याचं वैविध्य म्हणजे एक जमखाना दुसऱ्यासारखा नसतो.

मोठमोठय़ा शामियान्यांसाठीसुद्धा मोठय़ा आकारात हे जमखाने विणले जायचे. नैसर्गिक रंगांच्या अप्रतिम रंगसंगतीत ही जाजमं बनवली जायची. आज रंगांची जरा सरमिसळ झाली असली तरीही त्यांचा आकर्षकपणा कायम आहे. इथे विणकरांसोबत आम्ही पूर्ण दिवस घालवला. त्यांचं काम बघितलं, गप्पा मारल्या. सुरुवातीला शेख सय्यद समाजातील स्त्रिया हे जाजम विणायच्या. कालांतराने पुरुष विणकर व काही हिंदू परिवारांमध्येही हे काम सुरू झाले. इथे हुंडय़ामध्ये हे हातमाग मुलीला दिले जायचे. ही कला फक्त सुनांनाच शिकवण्याची रीत होती, कारण मुलींकडून ही कला अन्य गावांमध्ये जाण्याचा धोका होता.

हे हातमाग अन्य मागांप्रमाणे आडवे नसून उभे असतात. यांना जागा कमी लागते, आणि दोन्ही बाजूंची विण सारखीच असते. आजही नवलगुंदमध्ये ‘जमखान गली’ अशा नावाची गल्ली आहे. पण विणकर जेमतेम वीस शिल्लक आहेत. सर्व स्त्रिया आणि विशेषत: इथल्या दोन परिवारांमध्ये ही कला होती. एक पटवेगार आणि दुसरे जमखान. पटवेगार परिवारातील दोन स्त्रिया आज या व्यवसायात आहेत. नवलगुंदमधले सर्वात वृद्ध विणकर आहेत ‘बाबाजान जमखान’, वय वर्षे ऐंशी. त्यांच्या परिवारानेही काही वर्षांंपूर्वी हे काम बंद केले आहे.

बाबाजान आणि परिवार सध्या फुलांचे हार करून विकतात. त्या व्यवसायात त्यांना ही जाजमं विणण्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. अत्यंत दुर्मीळ अशा कलेची ही अवस्था आहे. त्यांनी त्यांच्या नातवंडांना ही कला शिकवली नाही. बाबाजान म्हणतात, ‘आधी लोक खास या जाजमांसाठी नवलगुंदला यायचे, परदेशी ग्राहकही यायचे. आजकाल धारवाडमधल्या लोकांनाही याबद्दल माहिती नाही’.

काही जुने जमखाने बघायला मिळतील का?, विचारल्यावर ते म्हणाले ‘त्यांच्याकडे एकही जमखाना नाही आहे’. पण ज्यांच्याकडे असे जुने जमखाने आहेत, अशा काही परिवारांची माहिती त्यांनी आम्हाला दिली. त्या लोकांनी जुन्या संदुकांमध्ये जमखाने जपून ठेवले आहेत. त्यातल्या काही डिझाइन्स लुप्त झाल्या आहेत. रंगसंगती जरा भडक झाली आहे, कारागिरीमध्येही फरक पडला आहे. जुन्यामधली नजाकत आज पहायला मिळत नाही. सर्वात जुन्या जमखान्यापैकी असलेला एक जमखाना पहायला गेल्यावर त्या परिवाराने सांगितले की त्यांच्या मोठय़ा भावाने वाटणीत फक्त हा जमखाना घेतला आणि तो आता बंगलोरला आहे. यावरूनच त्यांचे महत्त्व लक्षात येते.

हे सर्व टिकवण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे, पण ते प्रयत्न पुरेसे पडताना दिसत नाहीत. सर्वसामान्य लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण झाल्याशिवाय आणि याची मागणी वाढल्याशिवाय हे टिकणे शक्य नाही.

viva@expressindia.com

Web Title: Jajam weaving culture in dharwad handloom work
First published on: 16-02-2018 at 00:31 IST