फॅशन मांदियाळीतील मोठा फॅशन सोहळा अर्थात ‘लक्मे फॅशन वीक समर रिसोर्ट २०१८’ नुकताच पार पडला. आपल्या फॅशन जगतामध्ये या सोहळ्याचा महत्त्वाचा वाटा असतो. कारण यामध्ये अनेक नवीन, जुने फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट, मेकअप-हेअर आर्टिस्ट, टेक्स्टाइल कारागीर यांचा सहभाग असतो. या सगळ्यांच्या मेहनतीने रॅम्पवर अनेक फॅशनचे ट्रेंड सेट होतात. आणि तेच ट्रेंड ग्लोबल ते लोकल, रॅम्प ते लोकल मार्केटमध्ये फॉलो केले जातात. यंदा कोणते कोणते ट्रेंड सेट झाले? आणि यातले कुठले मार्केटमध्ये पोहोचतील याची झलक ..फॅब्रिक – कोणत्याही गार्मेटचा किंवा डिझाइनचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं फॅब्रिक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॅब्रिक – कोणत्याही गार्मेटचा किंवा डिझाइनचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं फॅब्रिक. डिझायनरने केलेलं डिझाइन जसंच्या तसं रॅम्पवर किंवा बाजारात येण्यासाठी फॅब्रिक हा महत्त्वाचा घटक आहे. कॉटन, लिनन, रेयॉन, खादी, ओरिजनल सिल्क आणि त्याचे प्रकार, मद्रास फॅब्रिक, कॅमब्रिक, शीर फॅब्रिक, लाइटवेट डेनिम, फेदर असे वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक यंदा अनेक डिझायनर्सच्या कलेक्शनचे भाग होते. त्यामुळे साहजिकच यंदा बाजारात तुम्हाला याच फॅब्रिकचे गार्मेट्स पाहायला मिळतील. या सगळ्या फॅब्रिकच्या रंगांमध्ये पांढरा, गुलाबी आणि त्याच्या सगळ्या छटा, हिरवा, केसरी आणि त्याच्या फिकट छटा, ग्रे, काळा, पिवळा, पोपटी हिरवा, आकाशी निळा आणि सोबतच सगळे न्यूड रंग, मेटॅलिक, सिल्व्हर रंग पहायला मिळाले. उन्हाळ्यात हे सगळे फ्रेश, लाइट, डोळ्यांनाही फ्रेश वाटणारे रंग ट्रेंडमध्ये असणार आहेत.

सिल्हाउट्स – रॅम्पवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सिल्हाउट्स झळकले, आणि ते प्रत्येक सिल्हाउट्स फक्त रॅम्पपुरते किंवा उच्चभ्रू वर्तुळातील लोकांनाच वापरता येतील असे अजिबात नव्हते. प्रत्येक सिल्हाउट्स हा कोणतीही सर्वसामान्य व्यक्तीही सहज वापरू शकते अशा प्रकारे डिझाइन केले असल्याचे प्रकर्षांने जाणवले. एकंदरीत रॅम्पवरची फॅशन आता सर्वसामान्यांसाठीही असायला हवी हे डिझायनर्सना उमगल्याचं दिसून आलं. सिल्हाउट्समध्ये अनेक फॅशन डिझायनर्सच्या कलेक्शनमध्ये रफ्फल्स दिसून आले आहे. साधारणत: सोळाव्या शतकामध्ये सुरू झालेली रफ्फल्सची फॅशन काही नवीन नाही, परंतु रफ्फल्स हे कधीही आउट ऑफ फॅशन होत नाहीत. लहान मुलांच्या ड्रेसपासून ते अगदी ब्रायडल वेअरमध्येही रफ्फल्सची फॅशन दिसून येते. लाँग वन पीस, इव्हिनिंग गाऊ न , ब्रायडल वेडिंग  गाऊन, साडी ब्लाउज,  टॉप्स, स्कर्ट या सगळ्या सिल्हाउट्समध्ये तुम्हाला रफ्फल्सची फॅशन बाजारात दिसणार आहेत. रफ्फल्स व्यतिरिक्त अनेक डिझायनर्सच्या कलेक्शनमध्ये लेअरिंग मोठय़ा प्रमाणात दिसून आलं. सोबतच स्लीव्हच्या फॅशनमध्ये बलून स्लीव्ह, बेल स्लीव्ह, रफ्फलसची डिझाइन असलेली स्लीव्ह, थ्री फोर्थ स्लीव्ह या स्लीव्हज ट्रेंडिंग आहेत. या सगळ्यासोबतच नेहमीच ट्रेंडमध्ये असणारे शॉर्ट वन पीस, डेनिम ऑन डेनिम, जीन्स टॉप, ए लाइन वन पीस, स्कर्ट, क्रॅप टॉप, जम्प सूट, लाँग जॅकेट्स हे सिल्हाउट्ससुद्धा रॅम्पवर दिसले असल्याने हे सिल्वेटस् इन फॅशन असतील हे वेगळं सांगायला नको!

एम्बलिशमेंट – एम्बलिशमेंट म्हणजे एखाद्या गार्मेटला अजून सुंदर बनवण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी केलेली कलाकुसर किंवा सजावट म्हणता येईल. डिजिटल प्रिंट, हॅन्ड प्रिंट, हॅण्ड पेण्टिंग, एम्ब्रॉयडरी, मेटॅलिक टॅसल, सिक्वे न्स, ब्रोचेस, कापडी लटकन हे यावर्षीचे हिट आणि ट्रेंडिंग एम्बलिशमेंट असणार आहेत. एम्ब्रॉयडरीमध्ये गोल्ड-सिल्वर एम्ब्रॉयडरी, चिकनकारी एम्ब्रॉयडरी, छोटे बुट्टे, गोटा, आरी, मिरर वर्क, काश्मिरी, जरदोसी अशा एम्ब्रॉयडरीने गार्मेट्सला वेगळाच लुक आला होता. टॅसल हे गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडींग आहेत, परंतु यंदा मेटॅलिक टॅसल जास्तच प्रमाणात पहायला मिळाले. चकचकीत मेटॅलिक टॅसल स्कर्ट, वनपीस, टॉप, गाऊ न इत्यादी अशा अनेक सिल्हाउट्सवरती दिसले. ब्रोचेसची फॅशन जास्त करून मेन्स गार्मेटवरती दिसते, परंतु यावेळी मेन्स गारमेंटबरोबरच ब्रोचेस फिमेल गारमेंटसवरही दिसले. कोणत्याही सुंदर प्लेन गार्मेट्स वरती एक छानसा छोटा किंवा मोठा ब्रोच पूर्ण गार्मेटचा लूकच बदलून टाकतो. प्रिंटसमध्ये फुलं, पानं, टाय अँड डायच्या प्रिंट, चेक्स असे असंख्य प्रकार पहायला मिळाले. एकंदरीत एम्बलिशमेंटची जादू यावर्षी पूर्ण बाजारात दिसणार आहे.

फुटवेअर – फुटवेअरशिवाय कोणताही लुक पूर्ण होत नाही. आणि निव्वळ एका फुटवेअरमुळेही पूर्ण गार्मेटची शान जाऊ  शकते. यंदा रॅम्पवर कम्फर्टेबल फुटवेअरचा वापर जास्त जाणवला. रॅम्प, रॅम्पवॉक किंवा एखादी पार्टी , कार्यक्रम म्हटलं की आपली पावलं सरळ हिल्सकडे वळतात. मात्र हिल्स काही प्रमाणात आउट ऑफ फॅशन झालेले पहायला मिळातायेत. उलट हिल्सऐवजी फ्लॅट्स -चप्पल, स्नीकर, वेगवेगळे शूजचे प्रकार आणि महत्त्वाचे म्हणजे युनिसेक्स फुटवेअरचा प्रभाव जास्त दिसून आला. यामध्ये सगळ्यात जास्त रॅम्प गाजवला तो शूजने. पांढऱ्या रंगाचे शूज साडीच्या खाली, वन पीस, गाऊ न अशा सगळ्याच सिल्हाउट्सवर बिनधास्तपणे वापरलेले दिसले. हे पांढरे शूज फ्लॅट्सपासून ते थोडय़ा इक्वल हिल्सपर्यंत बाजारात आहेत. या शूजवरती काही प्रकारची एम्बलिशमेंटही दिसून आली. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गार्मेटवरती डोळे झाकून हे पांढरे शूज घालू शकता. शूजमध्ये पांढऱ्या रंगासोबत लाल, निळा, काळा, ग्रे, ब्राऊन हे रंगही दिसले. याशिवाय युनिसेक्स फुटवेअरमध्येही फ्लॅट्स, साध्या चप्पल, सॅन्डल्स ट्रेंडमध्ये आहेत.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakme fashion week summer resort 2018 ramp walk fashion designing
First published on: 16-02-2018 at 00:33 IST