समोरच्याला सगळं भराभरा, एका क्षणात सांगण्यासाठी तंत्रज्ञानाने आपल्याला अनेक आयुधं दिली आहेत. दुसऱ्याच्या मोबाइलच्या स्क्रीनवर आपलं म्हणणं आपण आवेशात फडकवत राहतो. समोरच्याला आत्ता ते ऐकायचं, पहायचंय की नाही याचा विचार करतो का?

एका जवळच्या मैत्रिणीशी चांगलं तासभर बोलणं झालं. बोलायचे ठरवलेले ऑलमोस्ट सगळेच मुद्दे कव्हर केले. हम्, युजवली असं ठरवून बोलतो आम्ही; पण बरं वाटलं. नाहीतर एरवी फोन झाला की, ‘१० मिनिटं आहेत गं आपल्याकडे ! बाकी टेक्स्ट करेन’.. हे सवयीचंच ! ‘वेळ नाही’ हे त्यावरचं गोंडस एक्सप्लनेशन. हे असं सगळ्यांचंच होतंय बहुधा ! तसा अजिबात वेळ नसतोच असं नाही; पण बोलणं ‘उरकायचं’ असतं. भेटल्यावरही तेच ‘ठरलेले मुद्दे’ बोलून झाले की झालं. खूप काही बोलायचं राहतंय, हे उगीच मनातल्या मनात घोळवलेलं; पण अगदी थातुरमातुर गप्पांपासून अचानक कधीतरी भडभडून आलं की व्हॉट्सअ‍ॅप, हाइकचा सहारा ठरलेलाच. दोन-तीन दिवसांपूर्वी दुसऱ्या एका मैत्रिणीचं वेगळंच रडं! पाच- सहा स्क्रीनशॉट्स आणि त्याखाली झपाझप एकावर एक मेसेजेस. बयेने स्क्रीनशॉट्स लोड होईपर्यंतही उसंत दिली नाही. ‘ए, मी ओव्हररिअ‍ॅक्ट झाले का गं? पण, मला त्या क्षणी त्याचा खूप राग आला होता. एकतर, त्याला सगळंच एक्सप्लेन करत बसावं लागतं. त्यात हा अख्खाच्या अख्खा वीक खूप हेक्टिक गेलाय. आता होते यार चिडचिड. मग असा काहीतरी विचित्र प्रकारे राग निघतो.’ तिचा आवेग ओसरेपर्यंत तिला बोलू दिलं. हळूहळू ती शांत झाली. वाटलं, आपणही कधीतरी असेच अस्थिर होतो तेव्हा आपल्याकडूनही असं भारंभार टेक्स्टिंग सुरूच होतं की. अस्थिरतेचंच कशाला घ्या, एरवी ट्रेनच्या गर्दीतही कशीबशी दोन पायांवर उभी राहण्याची कसरत सुरू असताना, हेडफोन्सचा नाद आसुसून मनात उतरवत असताना संमिश्र भावनांनी आपणही आपलं बोलणं असं समोरच्याला सांगत राहतो (कदाचित लादत असतो). आपलं इरिटेशन, कुणाशीतरी झालेला वाद किंवा टाइमपास म्हणून समोरच्याशी काहीबाही बोलत असताना बऱ्याचदा त्या व्यक्तीला आपल्याला टॉलरेट करावं लागत असेल का हा विचारही मनाला शिवत नाही.

कधीतरी, फेसबुकाच्या खिडकीत बसून गम्माडी गंमत पाहावी तर तिथे ‘न लिहिलेली पत्रं’ आणि असं काय काय. फार सुंदर असतात ती पत्रं! शाळेत, मराठीच्या पेपरात पत्रलेखन करताना बहुतेक मित्रमैत्रिणींचा ‘औपचारिक पत्रा’चा ऑप्शन ठरलेला असायचा. त्यानंतर मात्र पत्राबित्रांशी दूरदूरचाही संबंध राहिला नाही. त्यानंतर एका महाकाय आंतरजालाने सानथोर सगळ्यांनाच आपल्या कवेत घेतलं. त्यात आपली पिढी या आंतरजालात जरा जास्तच विसावली, काहीशी सुखावली. जीमेल, ऑर्कुटवर सुरुवातीसुरुवातीला लहर आली की चॅटिंग करणारे आपण, व्हॉट्सअ‍ॅप, हाइक आल्यानंतर चॅटिंग करणं हा आपल्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग कधी झाला हे आपल्या कुणाच्याही लक्षात आलं नाही.

शब्दांची लघुरूपं, इमोजीचं चटकन बरंच काही सांगून जाणं, शब्दांची जुळवाजुळव आणि अगदीच थोडक्यात आणि कमी वेळात आपल्याला जे काही सांगायचं ते समोरच्यापर्यंत पोहोचावं ही असंयमी अपेक्षा. हे सगळंच फार नैसर्गिकपणे समोर येत गेलं. सवयीचं, सोयीचं झालं. तसं काही फार वावगं वाटण्याजोगं यात काही नाही. कारण, आपलं आयुष्यच प्रचंड गतिमान झालेलं असताना बाकीही गोष्टींचा वेग वाढला नसता तरच नवल ठरलं असतं ते. तुम्ही आयुष्याच्या वेगाबरोबरीने धावत असाल तर तुम्ही युथफुल ही अशी काहीशी व्याख्या करून घेतलीय आपण. त्यामुळे संथ, शांत असण्याच्या वेळा तशा कमीच. कधीतरी ही शांतताही हवीच असते, बरी वाटते. पण, तात्पुरतीच! नेहमीचं रुटीन खुणावतं मग लगेचच आपल्यातल्या तरुण जिवाला. आपण ओढले जातो त्याकडे. बऱ्याचदा हे व्यग्र असणं मिरवतोही. पण त्या व्यग्र असण्यातही व्यक्त होणं ही आजही गरज आहेच आणि पुढेही ती तशीच राहील.

अर्थात, हे कितीही सोयीचं असलं तरी या सगळ्यात संयमाच्या नावाने बारा वाजतात, समोरच्याला सगळं भराभरा सांगत असताना त्या वेळी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातंच असं नाही. पण तरीही काही काही गोष्टी त्यांच्या चांगल्या-वाईट परिणामांसकट आपण स्वीकारलेल्या असतात. तसंच या स्क्रीनवरल्या आवेगाचं स्वीकारलेपण! (आता या क्षणीही कुणाकुणाचा आवेग स्क्रीनवर कोसळत असेल देव जाणे.)