मार्केटिंग कंपन्या हल्ली एखादी थीम घेऊन ऑनलाइन कॅम्पेन करताना दिसताहेत. त्यातल्या काही थीम्स समाजसुधारणेच्या आशयाला धरून असतात. एका लाइफस्टाइल ब्रॅण्डसाठी केलेल्या अशाच एका अनोख्या कॅम्पेनविषयी..
एखाद्या माणसाला विशेषणं जोडणं, त्याच्या वागण्यावर शिक्का मारणं किंवा नावं ठेवणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक माणसावर आपण कधी ना कधी, काही ना काही शिक्का मारलेलाच असतो. म्हणजे तो जाडाच आहे, ती फार आगाऊ आहे, ती मंद आहे, तो जरा उद्धटच आहे, तो अभ्यासू किडा आहे.. वगैरे वगैरे. काही माणसांबाबत तर हे शिक्केच त्यांची ओळख बनून जातात. काही प्रमाणात हे असं शिक्के मारणं किंवा एखाद्याला लेबल लावणं ठीक आहे. पण या लेबल्समुळे काही माणसांचं स्वतंत्र अस्तित्व आपण नाकारत असतो. त्याच्या आवडीनिवडीला, व्यक्तिस्वातंत्र्याला नाकारत असतो आणि अकारण साचेबद्धपणा स्टिरिओटाइप्स निर्माण करत असतो. म्हणजे ‘तू मुलगा आहेस चांगला.. रडतोस काय बाईसारखा?’ किंवा तू ‘फक्त पुरुषांना शोभतील अशीच कामं केली पाहिजेस,’ ‘जाड लोकं नेहमी हॅपी गो लकी असतात’ किंवा ‘सलवार कमीझ घालणाऱ्या मुलींना फॅशन सेन्स नसतो, त्या पुढारलेल्या नसतात..’ अशा चाकोरीत आपण त्या व्यक्तींना बांधून टाकतो. आपल्या मनातल्या चाकोरीच्या बाहेर कुणी वागलं तर त्याला लेबल लावून त्याला लेबल लावून मोकळं होतो. त्या गोष्टीला नावं ठेवत बसतो.
हा मुद्दा घेऊन शेझ इंडिया हा लाइफ स्टाइल ब्रॅण्ड सध्या एक खास कॅम्पेन करतोय. आमची सर्व प्रॉडक्ट्स मुक्त विचारसरणीतून मांडलेली आहेत. वी आर अगेन्स्ट लेबल्स, असं ते सांगतात. #against Labels  हा कॅम्पेनचा हॅशटॅग सध्या बराच लोकप्रिय होतोय. ट्विटरवर याचा बोलबाला वाढला आहे. त्यांच्या व्हिडीओलादेखील यूटय़ूबवर अनेक लाइक्स मिळालेत आणि जगभरातून दहा लाखांहून अधिक व्ह्य़ूज मिळाले आहेत. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर अशा लेबल लावणाऱ्या समाजाची मानसिकता उघड होतेय. आपणही कळत-नकळत आपल्या आजूबाजूच्या माणसांना असे ‘लेबल्स’ लावत असतो, पण हे करताना आपल्यावरही एक लेबल लागतंय, हे मात्र आपण विसरतो. एक समाज म्हणून जेव्हा आपण एखाद्या माणसाला या लेबल्सच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून पाहू तेव्हाच आपल्यावर ‘सुधारलेला’ समाज हा शिक्का पडेल.
viva.loksatta@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online campaign
First published on: 20-11-2015 at 01:11 IST