25
एरिअल सिल्क डान्स हा नृत्यप्रकार एक फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून सेलेब्रिटींमध्ये लोकप्रिय होत आहे. रोप मल्लखांबप्रमाणे सिल्कच्या कापडाचा वापर करून त्यावर सादर केली जाणारी ही कला आहे. दोरीच्या ऐवजी सिल्कच्या कापडाला धरून शरीराचा तोल सावरत लयबद्ध हालचाली केल्या जातात. मी गेलं वर्षभर आदिती देशपांडे यांच्याकडे एरिअल सिल्क डान्सचं प्रशिक्षण घेतेय. सुश्मिता सेनलाही आदिती देशपांडे यांनीच एरिअल सिल्क डान्सचे धडे दिले आहेत. हे नृत्य करण्यासाठी मनाची एकाग्रताही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक फिटनेससाठी याचा उपयोग होतो. माझ्या मते हा केवळ नृत्यप्रकार नसून मी याकडे एक फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून बघते. हे शिकताना माझी कोअर बॉडी स्ट्रेन्थ वाढल्याचा मला अनुभव आलाय. अपर बॉडी अर्थात खांदे, पाठ आणि हात यांना बळकट करण्यासाठी या प्रकाराचा उत्तम उपयोग होतो. हा प्रकार मी केवळ आवड म्हणून नव्हे तर फिटनेससाठी शिकले.
ऊर्मिला कोठारे (अभिनेत्री आणि कथक नृत्यांगना)