वेदवती चिपळूणकर

निवेदक, लेखक, अभिनेता, कवी म्हणून आपल्या सर्वाना माहीत असलेलं नाव म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. लहानपणीच त्याची कलाक्षेत्राची आवड त्याला कळली होती. कलाक्षेत्रातच काम करायचं हे त्याचं ठरलं होतं. लहानपणी एकांकिकेत बालकलाकार म्हणून बक्षीस मिळवणारा संकर्षण आज टीव्ही, रंगभूमी अशा सगळय़ा माध्यमांत अनेक वेगवेगळय़ा रूपांत प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे.

marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
do-you-know-who-is-this actress
फोटोमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही कमावतेय नाव
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

इयत्ता पहिलीत असताना संकर्षणने पहिल्यांदा रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि तेव्हाच त्याला कलेची दिशा सापडली. तो सांगतो, ‘माझे बाबा बँकेत कर्मचारी होते, मात्र त्यांना स्वत:ला नाटकाची भयंकर आवड होती. त्यावेळी लहान असताना मला फार कुतूहल वाटायचं एकच माणूस कसा काय पोलीस पण असतो, शिवाजी महाराज पण असतो! असं कसं? हा प्रश्न मला नेहमी पडायचा’. अभिनय करणं ही काहीतरी भारी गोष्ट आहे याची जाणीव कशी झाली याचा किस्साही त्याने सांगितला. ‘मी इयत्ता पहिलीत असताना शाळेच्या गॅदिरगसाठी मला एका नाटकात शिवाजी महाराज बनवलं होतं. मी आधीच जरासा घाबरलेला होतो. त्यात माझ्या वाक्यावर प्रेक्षकांनी भरपूर टाळय़ा वाजवल्या. त्यामुळे तर मी आणखी घाबरलो. माझ्या बाबांना ते लक्षात आलं आणि त्यांनी मला उचलून घेऊन समजावलं. पण तेव्हाच कळलं होतं की हे खूप मस्त आहे, खूप भारी आहे आणि मला मोठं होऊन हे करायचंय. मी सात वर्षांचा असताना पहिली एकांकिका पाहिली होती. त्यावेळी मला माझी आवड कळली. १९९६ साली मी आठ- नऊ वर्षांचा असताना मी एका एकांकिकेत काम करत होतो. ती एकांकिका िहगोलीला बेंडे एकांकिका स्पर्धेत उतरवली होती आणि त्यात मला बालकलाकार म्हणून बक्षीस मिळालं होतं. या सगळय़ा गोष्टींनी हे ठरत गेलं की मला हे आवडतंय आणि जमतंयसुद्धा!’, असं संकर्षण सांगतो. 

सामान्यत: मध्यमवर्गीय घरांतून जे सांगितलं जातं तेच संकर्षणलाही सांगितलं गेलं होतं की शिक्षण अर्धवट सोडायचं नाही. त्यामुळे संकर्षणने बी.एस.सी. केलं आणि एमबीएसुद्धा केलं. तो म्हणतो, ‘हे क्षेत्र शाश्वत नाही, रिस्क आहे, धाडस करावं लागतं वगैरे या गोष्टी सगळय़ांनाच माहीत असतात. बाबांनासुद्धा नाटकाची आवड असल्यामुळे मला कोणी विरोध केला नाही. मात्र शिक्षण पूर्ण करायचं हा आग्रह घरच्यांचा होता आणि नाटक, एकांकिका करता करता मीही शिक्षण पूर्ण केलं. अर्थात खरं सांगायचं तर मी जिवावर येऊनच शिकत होतो कारण मला त्यातलं काही आवडतही नव्हतं आणि त्यातलं काही कधी करायचंही नव्हतं. माझी मला पूर्ण खात्री होती की मला बॅकअप प्लॅनची गरज पडणार नाही’. मनोरंजनासारख्या अस्थिर क्षेत्रात काम करतानाही तो खात्रीने सांगतो, ‘२००८ पासून मी कला क्षेत्रात काम करतोय. आतापर्यंत असं एकदाही झालेलं नाही की मला परत फिरावंसं वाटलं असेल, माझ्या निर्णयाबद्दल शंका आली असेल, वगैरे. उलट मी याच क्षेत्रातल्या इतरही शक्य तितक्या गोष्टी शिकून घेतल्या, करत राहिलो आणि अजूनही करतोय जेणेकरून माझा रस्ता कायम रुंद राहील. आपणच आपला मार्ग संकुचित करून घ्यायचा नसतो. त्यामुळे निवेदन, लेखन, कविता, गाणी, अभिनय असं शक्य तितकं सगळं मी करत असतो. त्यामुळे मला बॅकअप प्लॅनचा विचारच करावा लागला नाही’. कलाकार म्हटल्यावर जे समोर येईल ते व्यवस्थित जमलं पाहिजे. उदाहरणार्थ विनोदी भूमिका, गंभीर भूमिका, लाइट मूड अशा सगळय़ाच गोष्टी जमल्या पाहिजेत. अभिनेता म्हणून काम मिळत नसेल तर लेखक म्हणून प्रयत्न करावा, गीतकार म्हणून प्रयत्न करावा, उत्तम निवेदन करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा ज्याची गरज पडेल, ज्याची डिमांड असेल, जे चालेल अशी स्किल्स तुम्हाला त्या त्या वेळी दाखवता आली पाहिजेत, असा सल्लाही तो देतो. 

सध्या संकर्षणने लिहिलेली दोन नाटकं रंगभूमीवर सुरू आहेत, एक चित्रपट त्याने लिहिला आहे, एक नाटक तो अजून लिहितो आहे. त्याची मुख्य भूमिका असलेलं एक नाटक सध्या थिएटरमध्ये आहे. तो सांगतो, ‘मराठवाडय़ात एक दिग्दर्शक आहेत कालिदास कुलकर्णी म्हणून ज्यांनी खूप पूर्वी माझं काम बघून सांगितलं होतं की मराठवाडय़ाचा चेहरा म्हणून कलाक्षेत्रात भविष्यात नाव कमावणारा संकर्षण असेल. प्रशांत दामले मुलाखतीत माझ्याबद्दल अगदी सहजपणे बोलून जातात की रंगभूमीवरचा आश्वासक चेहरा म्हणजे संकर्षण कऱ्हाडे, कारण त्याला नाटक करायला मनापासून आवडतं, तो त्यासाठी धडपडतो, आणि तो मनापासून नाटक करतो. चार लोक मला माझ्या भूमिकांमुळे, डायलॉगमुळे, एखाद्या वाक्यामुळे ओळखतात. माझी ‘पंढरीच्या विठुराया’ ही कविता इतकी प्रसिद्ध झाली, इतक्या लोकांना आवडली की अनेकजण मला भेटले की त्याबद्दल बोलतात, ती आवडल्याचं आवर्जून सांगतात. ‘आम्ही सारे खवय्ये’च्या शेवटी मी एका विशिष्ट टोनमध्ये बाय म्हणतो. माझ्या नाटकाच्या वेळी मला कोणी भेटायला आलं की लहान मुलं मला माझ्याच स्टाइलने बाय म्हणून दाखवतात. या आणि अशा अनेक शाबासक्यांमुळे मला कधीच असं वाटलं नाही की दुसरं काहीतरी करावं, दुसरा प्लॅन असावा. माझ्या दृष्टीने मी काम करत राहणं हेच माझं उद्दिष्ट आणि ध्येय आहे.’

कला, अक्टिंग हे पार्ट-टाइम करायची गोष्ट नाही, पूर्णवेळ सीरियसली करायचं काम आहे असं संकर्षणचं म्हणणं आहे. कोणीही मुंबईत या क्षेत्रात स्ट्रगल करण्यासाठी येताना आपल्या कौटुंबिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक या सर्व बाजूंचा विचार करून यावं, असं संकर्षणचं मत आहे. तो म्हणतो, ‘कितीही काम करायची, चोवीस तास काम करायची तयारी ठेवावी लागते म्हणून शारीरिक, काम मिळालं किंवा नाही मिळालं तरी खचून जायचं नाही म्हणून मानसिक, सहा-आठ महिने काम मिळालंच नाही, लॉकडाऊनसारखी परिस्थिती झाली तर म्हणून आर्थिक आणि आपल्या अट्टहासामुळे आपल्या कुटुंबाची ओढाताण होऊ नये म्हणून कौटुंबिक अशा बाजू लक्षात घेऊन माणसाने निर्णय घ्यावेत.’

(समाप्त)

viva@expressindia.com