vv17नव्या पिढीचा कलाकार, हरहुन्नरी गायक आणि संगीतकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’ .. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
गेल्या आठवडय़ात २७ जूनला अशा एका संगीतकाराचा वाढदिवस झाला ज्याने भारतीय चित्रपट संगीताला कुठच्या कुठे नेऊन ठेवले. प्रयोगशीलता, सुरेलता, सतत काही नवीन शोधण्याची वृत्ती, आपल्या वडिलांचे आणि रवींद्र संगीताचे झालेले संस्कार, भारतीय वाद्य आणि रागांबरोबरच पाश्चात्त्य वाद्य्ो आणि स्केल्सचाही तितकाच अभ्यास, साथीला असलेले अफलातून संगीत संयोजक या सगळ्याच्या जोरावर खूप मोठा काळ भारतीय चित्रपट संगीतावर अधिराज्य गाजवणाऱ्या या संगीतकाराचे लोक फॅनच नाहीत, तर भक्त आहेत. २७ जूनला अशा कितीतरी भक्तांनी या देवाच्या फोटोला हार घालून, त्यासमोर रीतसर उदबत्ती वगरे लावून अख्खा दिवस फक्त याच संगीतकाराची गाणी ऐकण्यात घालवला असेल. मीसुद्धा अशाच भक्तांपकी एक आहे आणि आमचा हा देव म्हणजे राहुल देव बर्मन!
आरडींच्या म्हणजेच पंचमदांच्या गाण्यांच्या महासागरातील सगळ्याच गाण्यांची प्लेलिस्ट बनवायची झाली, तर आपला आयपॉड, हार्ड-डिस्क, सीडी, सगळे भरूनही पुरणार नाहीत. तूर्तास केवळ त्यांच्या सुरेल, शब्द-प्रधान आणि चाल-प्रधान गाण्यांचा समावेश असलेली प्लेलिस्ट सादर करीत आहे. सुरुवात करूया आरडी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीने-
‘बहारोंके सपने’मधले- ‘आजा पिया तोहे प्यार दू..’ दीदींचा आवाज, ‘किसलिये तू’ नंतर येणारा छोटासा पॉझ आणि अशक्य सुंदर चाल! प्रेमातल्या सूडबुद्धीचे प्रतिनिधित्व करणारी गाणी तशी कमीच निघाली आहेत. असेच एक गाणे म्हणजे ‘मेरी भिगी भिगी सी..’ किशोरदांच्या आवाजातील ‘दर्द’चा यात सुंदर वापर केला गेला आहे, ज्याच्या शब्दांबरोबरच चालीतही एक प्रकारची चीड आहे. एकच गाणे दोन दिग्गज गायक किती वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतील याचे उत्तम उदाहरण म्हणजे- ‘तुम बीन जाउ कहा..’ (प्यार का मौसम) रफीसाब आणि किशोरदा या दोघांच्याही गायकीला अनुकूल अशी चाल बांधणे म्हणजे काही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही.
‘ओ हंसिनी’- या गाण्याची सुरुवात एका वेगळ्याच मूडमध्ये होते. स्त्रीच्या पाश्चात्त्य पद्धतीच्या काहीशा रम्य, विलक्षण आलापातून सुरू होऊन हे गाणे आपल्याला एका गोड चालीच्या गाण्याकडे घेऊन जाते. असेच गोड चालीचे अजून एक गाणे म्हणजे ‘रातकली एक ख्वाब मे आई..’ किशोरदा अॅट इट्स बेस्ट!
मजरूह-पंचम जोडीचे मला सर्वात आवडलेले गाणे म्हणजे ‘तीसरी मंझील’मधले-‘तुमने मुझे देखा होकर मेहेराबां..’ ध्रुवपदाची चाल एका रागात, स्वरसमूहात बांधून कडव्यात कुठेतरी दुसरीकडे फिरून येऊन शेवटी परत ध्रुवपदाच्या स्वरसमूहात मिसळून जाणे ही पंचमदांची मला सर्वात भावलेली स्टाइल आहे. हे गाणे अशाच स्टाइलचे आहे. ही चाल म्हणजे कधीही न सुटणारे कोडे आहे. कडव्याच्या स्वरसमूहापर्यंत आपल्याला नेऊन सोडणारे म्यूझिक हे पंचमदांच्या बरोबर असलेल्या तितक्याच प्रतिभावंत संगीत संयोजकांचे काम आहे.
पंचमदा-आनंद बक्षी-किशोरदा हे संमेलन म्हणजे काही औरच रसायन आहे. थेट हृदयात बाणासारखी घुसणारी गाणी- ‘नमक हराम’मधली- ‘दीयें जलते है’ आणि ‘म शायर बदनाम.’ ऐकत आहे आणि डोळ्यातून पाणी आले नाही असे होणे शक्यच नाही.
‘अमर प्रेम’ – या अल्बमच्या नावानेच अंगावर काटा येतो. लतादीदींचे ‘रैना बीती जाए.’ किशोरदांची ‘कुछ तो लोग कहेंगे’,  गिटारचा अप्रतिम वापर असलेले ‘चिंगारी कोई भडके’, वडील एसडी बर्मन यांच्या शैलीला न्याय देणारे ‘डोली मे बिठा के..’ त्यात येणारी सुंदर बासरी आणि ‘ये क्या हुवा, कैसे हुवा..’ त्यातल्या ‘हुवा’ या शब्दाला दिलेली जागा.. लाजवाब! याच त्रिकुटाचे तुलनेने नवीन ‘क्या यहीं प्यार है?’मध्ये  (चित्रपट – रॉकी) लतादीदी आणि किशोरदांच्या काहीशा पोक्त झालेल्या आवाजाचा मस्त वापर केलाय आणि परत परत प्रेमात पाडणारी चाल आहेच!
तुलनेने नव्या काळातील पंचमदांची माझ्या ऐकण्यात सतत असणारी काही अजून गाणी म्हणजे- ‘हरजाई’ या चित्रपटातील ‘तेरे लिये पल्कोकी झालर बुनू..’ हे लतादीदींच्या आवाजातले सुमधुर गाणे. यात प्रत्येक वेळी दीदी जेव्हा हो.. म्हणतात, तेव्हा जणू सॅक्सोफोन वाजतोय असा भास होतो आणि अर्थातच ‘1942 अ लव स्टोरी’मधली सगळीच गाणी! विशेषत: ‘रूठ ना जाना तुमसे कहूँ तो’ आणि ‘कुछ ना कहो..’ खरंच या गाण्यानंतर बाकी कुछ ना कहो..
या प्लेलिस्टमधे आरडी बर्मन – गुलजार जोडीचे एकही गाणे आलेले नाही हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट करण्यावाचून गत्यंतर नाही. पुढच्या आठवडय़ात केवळ गुलजार-पंचम!
हे  ऐकाच.. कुछ ना कहो.. बस देखो
संगीतकाराला एखादे गाणे, एखादी चाल बनवताना पाहणे, ऐकणे हा नेहमीच मस्त अनुभव असतो. ‘यू टय़ूब’वर पंचमदांचे असे ‘मेकिंग’चे अनेक व्हिडीओज उपलब्ध आहेत. त्यातील ‘तू-तू है वही’चे रेकॉìडग चुकवू नये असेच आहे. तसेच ‘क्या यहीं प्यार है’ गाण्याचे बंगाली व्हर्जन (एकी भलोभाषा) रेकॉर्ड होत असतानाचा एक व्हिडीओसुद्धा आवर्जून पाहण्यासारखा आहे. आजच्या काळात गाणे बनताना प्रत्येक जण – म्हणजे गायक, वादक आपापल्या वेळेनुसार स्टुडिओत येऊन आपापले काम करून जातो. त्या काळात मात्र सगळे एकत्र जमून गाणे ध्वनिमुद्रित करायचे. ‘एकी भलोभाषा’च्या रेकॉìडगमध्ये आशाताई आणि बासरीवादक चक्क एकाच माइकवर आळीपाळीने रेकॉर्ड करताना पाहून गंमत वाटते. तसेच ‘कुछ ना कहो’च्या मेकिंगचा किस्सा विधू विनोद चोप्रा सांगतानाचा एक व्हिडीओ आहे. पंचमदांच्या काहीशा पडत्या काळात विधू विनोदजींनी त्यांनाच संगीतकार म्हणून घेण्याचा कसा आग्रह धरला होता, ‘कुछ ना कहो’ची पंचमदांनी आधी कशी चाल लावली होती, मग सचिन देव बर्मन यांच्या ‘रोंगिला रोंगिला’ गाण्यापासून प्रेरणा घेऊन आज जी चाल आहे ती कशी बनली हे जाणण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पाहा.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com